Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 3, 2020 in जीवन प्रकाश

जेव्हा मला भीती वाटेल                                                                  मार्शल सीगल

जेव्हा मला भीती वाटेल मार्शल सीगल

कोणती भीती बहुधा तुमच्या मनात घर करते?

तुमचा विवाह कधीच होणार नाही अशी काळजी तुम्हाला वाटते का? किंवा जर तुमचा विवाह झालेला असेल तर तो कधीच सुधारणार नाही अशी? तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार नाही किंवा तुम्हाला नोकरी गमवावी लागेल अशी भीती तुम्हाला वाटते का? तुमच्या प्रकृतीबद्दल तुम्हाला भीती वाटते का की कोणता आजार आपल्याला होईल आणि आपण कशा प्रकारे मरणार? तुमच्या मुलांसंबंधी तुम्ही सतत काळजी करता करता का – त्यांचे आरोग्य, त्यांचे नातेसंबंध, त्यांचा विश्वास? तुम्हाला केव्हा भीती वाटते?

ज्याची तुम्हाला जास्त भीती वाटते त्याच बाबतीत सैतान तुमच्यावर अधिक हल्ला करत आहे. तो असुरक्षा, काळजी, निराशा यांच्यावर नेम धरतो. तो तुमच्या भीतीवर लबाडीचे केरोसीन ओततो – आणि आपल्याला असा विचार करायला भाग पाडतो की देव असमर्थ आहे, बेफिकीर आहे किंवा दूर आहे. देवाच्या मनासारखा मनुष्य दावीद राजा विचारतो, “हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार” (स्तोत्र १३:१)?

देव असमर्थ नाही; त्याचे सामर्थ्य अफाट आहे (इफिस १:१९). देव तुमच्याशी बेफिकिरी करत नाही. बापाप्रमाणे तो तुमची काळजी घेतो (१ पेत्र ५:७). आणि देव दूर नाही. “जे खर्‍या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे” (स्तोत्र १४५:१८). पण जेव्हा आपण भितो तेव्हा तो दूर आहे असे आपल्याला वाटते.
कधी परीक्षांमध्ये देव दूर आहे असे वाटते कारण आपण त्याचे वचन ऐकण्यापासून आपल्याला दूर ठेवतो.

भीती वाटणे रास्तच

शौलाच्या सैन्यापासून पळून जाताना जेव्हा दाविदाला पलिष्टी लोकांनी पकडले तेव्हा दाविदाने स्तोत्र ५६ लिहिले. त्याला वाटले की जर पलिष्टी लोक तो कोण आहे हे विसरले असतील तर त्याला आसरा मिळण्याची शक्यता आहे. पण काही सेवकांनी राजाला म्हटले, “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले, असे ज्याच्याविषयी बोलून नाचत, गात होते तोच ना हा” (१ शमुवेल २०:११)? म्हणून त्यांनी त्याला पकडले.

शिपायांचे सैन्य असणाऱ्या एका खुनी माणसापासून जीव घेऊन पळत आहे आणि तो आता दुसऱ्या धोकेबाज, इर्षावान शत्रूच्या हातात पडतो. हे स्तोत्र लिहिताना ही त्याची ‘नाना प्रकारची संकटे’ होती. तो म्हणतो, “हे देवा, माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत; दिवसभर माझ्याशी लढून त्यांनी माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत; दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यास करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाइटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते टपून बसतात; ते माझ्या पावलांवर पाळत ठेवतात; ते माझा जीव घेण्यास पाहतात” (स्तोत्र ५६:१-२, ५-६).

दररोजचा दिवस आपण कदाचित आज मरणार या विचारानेच नाही तर आज मला कोणीतरी ठार मारणार अशा विचारात तो जगत होता. तरीही या स्तोत्रात तो अनेक वेळा म्हणतो “मी भिणार नाही” (५६:४, ११). तर असा पळून जात असताना आणि धरला गेलेला असताना तो हे कसे म्हणू शकतो?

जेव्हा मला भीती वाटेल

दावीद भयाण संकटांशी सामना करू शकला कारण भयाण संकटांत कुठे वळायचे हे त्याला माहीत होते. “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार” (स्तोत्र ५६:३-४)?

तो सुरवातीलाच म्हणतो, “ मला भीती वाटेल तेव्हा.” धोका, संकट, भीती ही खरी आहे हे तो मान्य करतो. पलिष्टी लोकांच्या बंदीत असताना भीती वाटत असल्याचे तो नाकारत नाही. किंवा शौलापासून लपला असताना तो कबूल करतो की “मला भीती वाटतेय.’

पण खूप वेळ नाही. “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.” काही क्षण मी घाबरलो पण भीती वाटल्यास कुठे वळायचे हे मला ठाऊक आहे. आणि जेव्हा माझी भीती मी त्याच्यावर टाकून देतो तेव्हा तो माझी भीती काढून टाकतो. “मी भिणार नाही.”

जेव्हा तुम्ही कोणी “मला भीती वाटते” पासून “मी भिणार नाही” कडे फिरतो तेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला हवा हवा- ‘कसे’? दाविदाने भीतीवर विजय मिळवल्याचे पाहून भीतीमध्ये असलेल्या व्यक्तीला आपोआप उत्तेजन मिळेल, पण त्याने जर ‘कसे’ – हे  नाही सांगितले तर त्याच्या या कहाणीने आपली भीती जाण्यास मदत होणार नाही.

देवावर कसा भरवसा टाकायचा

“मला भीती वाटते” पासून “मी भिणार नाही” यांच्या दरम्यान दाविदासाठी काय घडले? त्याने देवावर भरवसा टाकला. मग जेव्हा भीती वाटेल तेव्हा देवावर भरवसा टाकायचा? होय. गुहेमध्ये, बंदिवासात, जीव वाचवण्यासाठी पळताना देवावर भरवसा ठेवणे कसे असते याबद्दल दावीद आणखी काय सांगतो?

“मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार” (स्तोत्र ५६:३,४)?

जेव्हा दाविदाने देवावर भरवसा ठेवला तेव्हा त्याने त्याचा भरवसा व स्तुतीसुद्धा देवाच्या वचनावर ठेवली. त्याने अनिश्चित आशेच्या प्रार्थना केल्या नाहीत तर त्याच्या वेदना, अपेक्षा आणि भीती देवाच्या विशिष्ट अभिवचनावर घट्ट रोवली. जेव्हा मला भीती वाटेल तेव्हा तुझ्या वचनामध्ये मी तुला कवटाळून राहीन. माझ्यासमोर असलेल्या मोठ्या भयाण पर्वतावर राहण्यापेक्षा तुझ्यावर प्रेम करण्याऱ्यांना तू जे सांगितले आहे त्यावर मी माझे मन केंद्रित करीन. मग अचानक त्या धमक्या आता भेडसावणार नाहीत कारण एका मोठ्या गर्जनेने त्या बुडवून टाकल्या आहेत.

वचनाविषयी एक शब्द

जीवनाच्या चढ उतारामध्ये देवाचे वचन जपून ठेवणे म्हणजे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर स्तोत्र ११९ मधून  शांतपणे जा. बायबलच्या ह्या सर्वात मोठ्या अध्यायात देवाचे वचन किती उंचावले आहे व साजरे केले आहे! या १७६ वचनात स्तोत्रकर्ता ज्या वचनातून आपली भीती शमवणाऱ्या, दु:खातून आपल्याला पुढे नेणाऱ्या देवाच्या वचनाचे सामर्थ्य सांगतो ती वचने पहा.

“माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे” (११९:२८).

“मी फार पिडलो आहे; हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे” (११९:१०७).

“तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो” (११९:११४).

“उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो; मी तुझ्या वचनांची आशा धरतो” (११९:१४७).

“अधिपती माझ्या पाठीस विनाकारण लागले आहेत; परंतु माझे हृदय तुझ्या वचनांचे भय धरते” (११९:१६१).

काही कारण नसताना राजे माझा छळ करीत आहेत – मी विनाकारण दु:ख सहन करतोय – पण तरीही तुझी वचने अजूनही माझ्यासाठी गोड आहेत. माझ्या परीक्षा इतक्या मोठ्या आहेत की काय बोलावे हे मला सुचत नाही; इतके की मला तुझा आवाज नीट ऐकू येत नाही. बरे होण्यासाठी, सामर्थ्य मिळवण्यासाठी, संरक्षणासाठी, मदत आणि सुटकेसाठी माझी एकच आशा आहे जी तुझ्या पुस्तकात लिहिलेली आहे. माझे ह्रदय तू जे काही म्हणतोस त्याने भीतीयुक्त आदराने चकित होऊन जाते.

देव तुमच्या बाजूचा आहे

५६व्या स्तोत्राच्या अखेरीस दावीद पुन्हा पुन्हा तेच म्हणत आहे.
“मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन, परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार” (५६: ९-११)?

देवावर भरवसा ठेवणे म्हणजे काय? याचा अर्थ तो जे काही म्हणतो त्यावर भरवसा ठेवणे. आणि देव त्याच्या वचनात काय म्हणतो?  “देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण” (रोम ८:३१)? आणि  मनुष्य तुमचे काय करू शकणार?

जेव्हा भीती येईल- आणि ती येईलच, आजही- तेव्हा कोठे वळायचे हे आता तुम्हाला ठाऊक आहे. कोणता आवाज ऐकायचा हे तुम्हाला ठाऊक आहे. जो आवाज तुमच्यामध्ये शांती भरून टाकील जी शांती सर्व समजण्यापलीकडे आहे . आणि तो तुम्हाला म्हणतो, जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” (योहान १६:३३). आणि तुम्ही त्याच्यामध्ये असल्याने आणि तो तुमच्यामध्ये राहत असल्याने विश्वासाने तुम्ही जगाला जिंकले आहे (१ योहान ५:४-५).

दाविदाबरोबर तुम्हीही म्हणू शकाल. “मी भिणार नाही.”