मार्शल सीगल
जग निर्माण करण्यापूर्वी बराच काळ आधी देव पित्याने आपला एकुलता एक पुत्र पृथ्वीवर पाठवण्याची तयारी जगाच्या स्थापनेपूर्वी केली ( योहान १७:२४). आणि तरीही त्यावेळी त्याला ठाऊक होते की बेथलेहेम येथे जन्मणाऱ्या या बाळाला किती दु:ख सहन करावे लागणार आहे.
बापाला हे ठाऊक होते हे आपल्याला समजते कारण आपली नावे जगाच्या स्थापनेपूर्वी ‘वधलेल्या कोकर्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत’ (प्रकटी. १३:८). देवाने पहिले झाड निर्माण करण्यापूर्वी ख्रिस्तजन्माची गोष्ट आधीच योजण्यात आली होती. सूर्याला ज्वालांनी प्रकाशित करण्यापूर्वी वधस्तंभ रोवण्यासाठीचा खड्डा खणण्यास त्याने सुरुवात केली होती. आपण एक दिवस मानवी देह घेणार आणि अखेरीस स्वत:चे रक्त सांडणार हे येशूला नेहमीच माहीत होते. सर्वात सुद्न्य, जीवन आणि इतिहासाचा सर्वसमर्थ निर्माता त्याच्या पुत्राला आपल्यासारखे राहण्यास – आणि सर्वात भयंकर मरण सोसण्यास तयार करतो याची कल्पना तरी तुम्हाला करता येते का? काळ मोजता येण्यापूर्वी – अनंतकाळाच्या इतिहासामध्ये दैवत्वामध्ये असलेल्या जवळिकीची आणि प्रीतीची यत्किंचितही कल्पना तरी आपण करू शकतो का?
देवाने त्याच्या पुत्रावर एवढी प्रीती केली
परंतु ज्याला पाठवले तोच त्याला पित्याने कसे तयार केले याची विस्मयकारक अशी झलक देतो. “मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे” (योहान १०:१५-१८).
जेव्हा पुत्र जगात आला तेव्हा तो पित्याच्या प्रीतीने व्यापलेला असा आला. जेव्हा पित्याने त्याच्या पुत्राची तीव्र यातनामय किंमत देऊन आपल्याला त्याच्या प्रीतीचे लक्ष्य केले तेव्हा त्याने पुत्रावरची प्रीती कमी केली नाही. त्याच्या समर्पणामुळे त्याने त्याच्यावर अधिक प्रीती केली. येशूने म्हटले, “मी आपला प्राण परत घेण्याकरता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो” (योहान १०:१७). देवाच्या पुत्रावरील प्रेमाने त्याला आपल्याला तारण्यापासून राखून ठेवले नाही. त्याच्या पुत्रावरील प्रीतीनेच त्याला पाठवण्याची चालना दिली.
पित्याने येशूला अतुलनीय प्रीतीने आणि एकमेव अधिकाराने पाठवले. येशूने म्हटले, “कोणी माझा जीव माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” (योहान १०:१८). पित्याने या कार्यासाठी स्वर्गाचे सर्व सामर्थ्य घेऊन ते नाझरेथ येथील नम्र बालकाला सुपूर्त केले. त्याने काहीही मागे ठेवले नाही.
येशू जो सर्व प्रकारे पूर्ण मानव होता तो अगम्य आणि धक्कादायक विधान करू शकला की, “जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे” (योहान १६:१५). मनुष्य म्हणून इतके सहन करत असतानाही तो पृथ्वीवर रिकाम्या हाताने आलेला नव्हता, तो विश्व घेऊन आला होता. तो देव म्हणून आला.
परंतु पित्याची अमर्याद प्रीती आणि अधिकार यांसह त्याला मरण्यासाठी पाठवले होते. त्याच्या शब्दामध्ये ख्रिस्तजन्माचा अर्थ आणि भीषण जडपणा पाहा. “मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो … मी आपला प्राण देतो… . ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे” (योहान १०:१५, १७-१८). पित्याने येशूला फक्त देहधारण करण्यासाठी नाही तर जीवन देऊन टाकण्यासाठी पाठवले. आत्म्याने क्रूसावर खिळला जाण्यासाठी ख्रिस्ताची गर्भधारणा केली गेली. भटकणाऱ्या आणि हरवलेल्या मेंढरासाठी – तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. येशूला यासाठी पाठवले की त्याने सर्व गमवावे म्हणजे आपल्याला सर्व काही प्राप्त होईल. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला – जन्मामध्ये, जीवनामध्ये, आणि मरणामध्ये – अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे (२ करिंथ ८:९). प्रीतीने पाठवला गेला, अधिकाराने पाठवला गेला. मरण्यासाठी पाठवला गेला- आणि तारण्यासाठी.
जसे पित्याने मला पाठवले
जगाचा पाया घालण्यापूर्वी हे पाठवणे देवाच्या मनात धारण झाले. या पाठवण्यावर इतिहासाची प्रत्येक घटना बदलते आणि टांगली जाते. हे ख्रिस्तजन्माचे आश्चर्य आणि महत्त्व येशूच्या एका वाक्याने धक्कादायक अर्थ पूर्ण करते. तो पित्याजवळ प्रार्थना करतो,
“जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले” (योहान १७:१८).
विश्वाच्या निर्मात्याने आपल्या स्वत:च्या गौरवाचा प्रकाश, त्याच्या तत्त्वाचे तंतोतंत प्रतिरूप विश्वामध्ये पाठवणे याच्याशी कशाचीही तुलना होणे शक्य नाही – येशू तुम्हाला पाठवीपर्यंत. “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” (योहान २०:२१). हे तो त्याच्या पुनरुत्थानानंतर बोलला व स्वर्गारोहणापूर्वी बोलला. पित्याने पुत्राला जसे पाठवले – कसे? म्हणजे पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी योजना करून देवाचे अनंत सौंदर्य, सामर्थ्य, मोल दाखवत, प्रत्येक वंश, भाषा, लोक आणि राष्ट्रांतील लोकांच्या पापासाठी खंडणी भरून आणि त्याचवेळी अब्जावधी लोकांचे भवितव्य टांगते ठेवत त्याने पुत्राला पाठवले. आणि आता पुत्र आपल्यालाही तसेच पाठवतो.
जसे पिता आपल्या पुत्राला विशिष्ट आणि नेत्रदीपक कामगिरीसाठी पाठवतो तसेच पुत्राने आपल्याला या आशेची गरज असलेल्या जगात पाठवले आहे (योहान १७:२१,२३). जसे पित्याने आपल्या पुत्राला घोषणा करण्यास त्याची बहुमोल वचने दिली, तसेच पुत्राने आपल्याला बोलण्यास काहीतरी दिले आहे, भक्ती करायला प्रभू दिला आहे, आणि आज्ञा पाळण्यासाठी आदेश दिला आहे (योहान १७:१४, मत्तय २८:१९-२०). जसे पित्याने पुत्राला प्रीतीसाठी दु:खसहन करण्यास पाठवले तसेच पुत्र त्याच्या मेंढरांना लांडग्याच्या कळपात पाठवतो (मत्तय १०:१६). जसा पित्याने पुत्रासमोर आनंद ठेवला होता तसाच पुत्राने आपल्याला त्याच्या आनंदाचे अभिवचन दिले आहे (योहान १७:१३) – आता काही प्रमाणात व अनंतकाळात पूर्णपणे. जसे पित्याने पुत्राला प्रीतीने पाठवले तशी पुत्राने आपल्यावर प्रीती केली (योहान १५:१३). आणि तसेच त्याने आपल्याला जगामध्ये पाठवले आहे.
देवाने जगावर एवढी प्रीती केली
आपण जरी स्वर्गातून उतरलो नाहीत तरी ख्रिस्तामध्ये आपण या जगाचे नाहीत. तुमच्या आणि माझ्याबद्दल येशू म्हणतो, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत ( योहान १७:१६). पण तो किंवा आपण या जगाचे नसताना सध्या त्याने आपल्याला या जगात येथे ठेवले आहे. येशू प्रार्थना करतो, “ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत” (योहान १७:११). आता तो या जगात नाही पण आपण आहोत. त्याच्या कळपात जी मेंढरे नाहीत त्या सर्वांना स्वत:कडे आणण्याऐवजी तो ह्या कार्याचे नियंत्रण करण्यासाठी वर गेला जेथे विश्वाचे राजासन आहे व आपल्याला या कार्यासाठी तो पाठवत आहे. त्याचे एकमेव उद्धाराचे कार्य पूर्ण केल्यावर त्याने आपल्याला हे त्याचे कृत्य सर्व जगाला सांगण्यासाठी सोपवले आहे.
तो त्याच्या शिष्यांना म्हणतो, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा” (मत्तय २८:१८-१९). जसे त्याने आपल्या पित्याला ‘जा’ असे म्हणताना ऐकले तसेच तो आपल्याला सर्व जगामध्ये जाण्यास पाठवत आहे – त्याचा अधिकार, त्याची वचने, त्याचे सहाय्य, आणि त्याचे स्वत:चे सान्निध्य यासोबत: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” (मत्तय २८:२०).
देवाने तुम्हाला कोणाकडे पाठवले आहे? तुमच्या कुटुंबातील लोक, तुमची गल्ली, सोसायटी, ऑफिस. येथे तुमचे असणे हा काही योगायोग नाही. देवाने तुम्हाला त्यांच्याजवळ आणून क्षमा, आशा, आनंद त्यांच्या पुढ्यात आणून ठेवला आहे. शंभर वर्षापूर्वी ते जिवंत नव्हते पण आता ते आहेत. देवाने तुमच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या गौरवासाठी आयोजित केली आहे, नेमली आहे (प्रेषित १७:२६-२७). जसे त्याने सर्व मानवी इतिहासाचे येशू येण्यापूर्वी हजारो वर्षे मार्गदर्शन केले तसेच. आणि आता त्याने तुम्हाला अगदी अचूक वेळी जेथे तुम्ही आहात तेथे तुम्हाला पाठवले आहे – आनंदाच्या शब्दांनी, प्रीतीने दु:ख सहन करण्यासाठी, बोलण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी.
लक्षात ठेवा की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने तुम्हालाही पाठवले.
Social