दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

 अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण २२

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

तुमच्यातीलच एक कवी

(प्रेषितांची कृत्ये १७:१६-३४)

आज फोलोपात काहीतरी महत्त्वपूर्ण घडणार होते की जे कॅलेंडरवर लाल रंगाने नमूद करावे.

आम्ही मार्स हिलपासून १०००० मैल दूर होतो पण आम्ही प्रे.कृ. १७ मधील पौल मार्स हिलवर असताना जे घडले त्याचा अभ्यास करत होतो. पौलाने जसे हेल्लेण्यांना अचूक शब्द सांगितले  तसे आमच्या खोलीतील १६ जण पौलाचे शब्द अचूकपणे समजायला बसले होते. 

बिरुयात ताणतणाव निर्माण झाल्याने पौलाला दक्षिणेकडे पाठविलेले आम्ही अभ्यासले होते. थेस्सलनीकाच्या  यहुद्यांनी आपल्या नगरातून पौलाला घालवून दिले तरी तेवढ्यावर समाधान न झाल्याने ते बिरुयातील लोकांना पौलाविरुद्ध चिथावणी द्यायला तेथेही आले होते. संपूर्ण प्रेषितांच्या कृत्यात खूप नाट्यमय घटना आढळतात. पुढे काय घडते हे ऐकायला फोलोपाचे लोक फार आतुर असत.

अथेन्समध्ये तीमथ्य व सीला येईपर्यंतचा वेळ घालवणे पौलाला फार कठीण होते. तो सभास्थानात अथवा बाजारपेठेत जाऊन लोकांशी बोलत असे. अध्ययनाचे व प्रतिष्ठेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी मूर्तिपूजेचा सुळसुळाट पाहून त्याला खिन्न वाटत होते. काही दिवसांनी वाद घालणाऱ्या काही विद्वानांनी त्याला जेथे परदेशी लोक नेहमी आधुनिक विषयांवर वादविवाद करीत अशा जागी म्हणजे अरीयपगावर आणले.

पौलाने धैर्याने आपला संदेश त्यांच्या परिस्थितीला लागू करीत सांगायला सुरुवात केली. त्याचे श्रोते त्यांच्या शैलीत जसे विचार करत व मुद्दे मांडत त्या पद्धतीने तो आपले विचार मांडू लागला. बायबल भाषांतरांचे हेच मूलभूत तत्त्व असते. हे या शास्त्रभागासाठी सोपे नव्हते कारण फोलोपा हेल्लेण्यांशी अनेक बाबतीत, भाषेशी व संस्कृतीशीही परिचित नव्हते.

अरीयपगावर पौलाने सुरुवात करताना म्हटले, “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदैवतांस फार मान देणारे आहा असे मला दिसते” (१७:२२).

येथेच आम्हाला समस्या आली. फोलोपात ‘देवदैवत’ यासाठी शब्द नाही. त्यांच्या मतप्रणालीत संपूर्ण जीवन धर्मकृत्यांचे समजले जात होते. ती कधीतरी करायची गोष्ट नसते. उलट त्यांना आत्म्यांची मर्जी संपादन करून त्यांना संतुष्ट करण्यासाठी अशी काही कृत्ये करावी लागत की त्यांना कोणी आनंददायक धर्मकृत्ये म्हणणार नाही. त्यामुळे आम्ही या वचनाचे भाषांतर केले की “मला वाटते, तुम्ही सारा वेळ प्रार्थना करणारे लोक आहात.”

पुढे वचन १७: २३अ होते, “कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना——.”  पुन्हा ठप्प. पौल धूर्त होता. तो हेल्लेण्यांच्या मूर्तींना ‘पूज्य वस्तू’ संबोधतो. ‘आराधना’ साठी फोलोपात शब्दच नव्हता. अधिकारासाठी म्हणजे मातापिता, प्रांताधिकारी अशांना निखळ आदर दर्शवणारे शब्द होते. असा शब्दप्रयोग होता की, ‘श्रेष्ठ म्हणून उच्च स्थान देणे व मेल्यागत त्यांच्या अधीन राहणे.’ त्यांच्या श्रेष्ठत्वाला कोणी आव्हान करू शकत नाही असे मानणे. पण यातून कोठे आदरभाव, प्रशंसा, प्रेम व्यक्त होत नाही. म्हणून आम्ही हेल्लेण्यांच्या त्या ‘वस्तू’ साठी  ‘दगडांची रचलेली रास’ असा शब्दप्रयोग वापरला, आणि पुढच्या वाक्याकडे वळलो.

“अज्ञात देवाला अशी अक्षरे असलेली वेदी मला आढळली” (१७:२३ब). आता मात्र जणू आम्ही दगडांवर आमची डोकी आपटत होतो. पुन्हा ‘वेदी’ साठी फोलोपात शब्द नव्हता. पुन्हा आम्ही वर्णनात्मक शब्दप्रयोग वापरला.  ‘प्रार्थना व यज्ञपशू जाळण्यासाठी रचलेली दगडांची रास.’

‘अक्षरे’ यासाठी पण फोलोपात शब्द नव्हता. म्हणून पुन्हा त्यासाठीही आम्ही वर्णनात्मक शब्दप्रयोग केला.

‘दगडात कोरून लिहिलेले.’ प्रत्येक वाक्यागणिक आम्हाला अडचणी येत होत्या. मी मान वर करून पाहिले, लोक चिकाटीने थांबून आहेत का,  ते तर विशेष आतुरतेने बसलेले मला आढळले.

मग मी पुढे सुरू केले. पौल हेल्लेण्यांना आवडणाऱ्या विषयावर बोलत होता. “ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावे असेही नाही. कारण जीवन व प्राण सर्व काही तो स्वत: सर्वांना देतो. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत” (प्रे. कृ.१७:२३क-२६).

पौल जाणून होता की देवाला आत्म्याने व खरेपणाने केलेली भक्ती हवी आहे; आणि हेल्लेणी लोक त्यात उणे पडत होते. त्याची खात्री पटली होती की अथेन्सचे लोक खऱ्या देवाची भक्ती करत नव्हते. आणि जरी एखादा अज्ञात देव अस्तित्वात असेल असे ते समजत असतील तरी ते त्या देवाला संतोष होईल असे काहीही करत नव्हते. त्याच देवाने तर आपल्या पुत्राच्या मरणाने मार्ग तयार केला होता.

आमच्या बायबल खोलीतील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती हे मला दिसत होते, पण त्याचे कारण मला समजत नव्हते. यापूर्वी ही उत्सुकता ते कृतीतून दर्शवत होते पण यावेळेस ते मूक होते याचे मला आश्चर्य वाटत होते. 

देवाने मानववंश सुरू केला आणि तो कसा वाढला हे त्यांना उत्पत्तीतच चांगले कळले होते. पण येथे त्यांना काहीतरी खटकत होते हे नक्की. ते मध्ये छोटी सुट्टी घ्यायलाही तयार नव्हते. आम्ही पुढे काम चालू ठेवले.

“अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापासून कोणापासूनही दूर नाही” (१७ :२७).

मला ‘चाचपडत’ साठी फोलोपात शब्द माहीत नव्हता. म्हणून मी कृती करून त्यांना दाखवावे म्हणून डोळे बंद करून भिंतीचा आधार घेऊन अडखळत चालू लागलो. त्यांना ही कृती परिचयाची होती, कारण रात्रीच्या वेळी या ना त्या कारणाने ते हाती दिवा नसता घराबाहेर अंधारात जात असत. त्यामुळे पौलाला जे म्हणायचे होते तो शब्द मला सापडला. देवाशिवाय आपण वाट चुकलेले व हरवलेले आहोत. पण देवाने सर्व काही असे शिस्तबद्ध ठेवले आहे की आपण त्याचा शोध घेऊ लागलो तर तो आपल्याला सहज सापडेल. तो आपल्यापासून कधीच दूर नसतो. आम्ही काम पुढे चाल ठेवले.

“कारण आपण त्याच्याठायी जगतो वागतो व आहो. तसेच तुमच्या कवींपैकी कित्येकांनी म्हटले आहे की, आपण वास्तविक त्याचा अंश आहो” (प्रे.कृ. १७:२८).

लोकांनी मान डोलावली व विचारमग्न होऊन थांबले. पुन्हा आम्ही अडकलो होतो, ‘कवी’ या शब्दापाशी.

मी स्पष्टीकरण करू लागलो, “कवी हा सुरेख व प्रभावी बोलणारा असतो. तो आपले बोलणे कर्णमधुर करतो. लोकांना त्याचे बोलणे ऐकायला आवडते, कारण जीवनाच्या ज्या मूलभूत बाबी त्यांना मोलाच्या वाटतात व ज्यावर त्यांचा विश्वास असतो, त्या तो शब्दात मांडत असतो.”

“हो आमच्याकडे असे लोक आहेत. असा मनुष्य जुन्या दंतकथा व गोष्टींचा संबंध लावत असतो. त्याला ज्ञान असते व ते कसे मांडावे हे तो चांगले जाणतो. तो बोलतो तेव्हा लोक म्हणतात, काय खुमासदार आहे!”

पण ‘कवी’ साठी आम्हाला शब्द सापडला नाही. म्हणून मी वर्णनात्मक शब्दप्रयोग वापरला. “कवीला मूलभूत गोष्टींचे ज्ञान असते व तो त्याचे स्पष्टीकरण करू शकतो.” पुन्हा शांतता पसरली. लोकांची नजर माझ्यावर तरी किंवा मी लिहीत असलेल्या शब्दांवर तरी खिळली होती. फक्त लेखणीचा आवाज शांतताभंग करीत होता. अजूनही मला त्यांच्या विषयीचे रहस्य उलगडत नव्हते. मी उसासा टाकला व काम पुढे चालू ठेवले.

“तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा, अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे” (प्रे. कृ. १७:२९-३१).

मी जे क्षणात करू शकत होतो त्यावरही हे लोक मला लांबलचक माहिती देत होते. मी व्याकरण तपासत असता ते आपसात करत असलेली चर्चा माझ्या कानावर पडत होती. तेथील दोन प्रकारच्या सापांविषयी ते बोलत होते. पण आमच्या कामाशी मला त्याचा काही संबंध दिसत नव्हता. त्यांना विषयांतर करायची सवयच होती. म्हणून मी त्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांकडे वळलो.

“तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य अरीयपगर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते” (प्रे. कृ. १७:३२-३४).

मी काम संपवून लेखणी खाली ठेवली. भिन्न संस्कृतीच्या पहिल्या श्रोत्यांना देण्यात आलेला पहिला आणखी एक सुवार्ता संदेश आम्ही ह्यांना ऐकवला होता. २००० वर्षांनंतर फोलोपांना तो समजणार होता का?

माझ्या लिखाणावर शेवटचा हात फिरवत असता मला कुजबुज वाढत असल्याचे जाणवले. अनेक माणसे अचानक उठली आणि त्वेषाने एकसाथ बोलू लागली. मला काही बोध होईना. मोठा वारसा प्राप्त झाल्यासारखे ते ओरडत होते. शेवटी ते मला म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का आम्ही कशाविषयी बोलत आहोत? आत्ताच केलेल्या भाषांतराविषयी आम्ही बोलत आहोत.”

“दोन सापांविषयी.” मी तर अगदी गोंधळून गेलो होतो.

“काय? सापांविषयी? पण येथे सापांविषयी काहीही म्हटलेले नाही.” खरेच मी अंधारात हरवल्यासारखा झालो होतो.

आता मी अंधारात राहायचे आणि त्यांनी मला प्रकाशात आणायची वेळ होती.

“अहो असे काय म्हणता, आहे ना! तुम्हाला दोन सापांची गोष्ट माहीत नाही? ऐकायला आवडेल?” अर्थात मला ऐकायला आवडलेच असते. सगळे बसले, आणि अपुसी अली गोष्ट सांगू लागला.

“आम्हा तरुणांनाच जुन्या लोकांप्रमाणे पूर्वीचे रीतीरिवाज जुन्या गोष्टी मुळीच माहीत नाहीत….. ते सांगतात की युगारंभापूर्वी उत्पत्ती होताना दोन सर्प बोलत होते. त्यातला एक होता हुपु केपी. तो एक शब्द बोलला, “केपायाको, केपायाको” म्हणजे “जिवंत राहा. जिवंत राहा.” दुसरा होता, वुसिकी. तो एक शब्द बोलला, “सिनाको, सिनाको.” म्हणजे “मरा. मरा.”

पण वुसुकी “मर” म्हणाला म्हणून हुपु केपीने त्याच्या तोंडात मारून म्हटले, “असे म्हणू नकोस.” त्याने थोबाडीत देताच त्याचा जबडा वाकडा झाला. त्यामुळे आजही आम्ही त्या सापाला पकडून उलट धरले की त्याचा जबडा एका बाजूला वळतो. ती जुनी माणसे सांगतात की जर वुसुकीने ‘मर’ म्हटले नसते तर आपण मेलो नसतो.

अपुसी अली माझ्याकडे वळून रोखून पाहात म्हणाला, “पण आपण मरतो.” अजूनही या वचनाशी याचा काय संदर्भ लागतो हे मी शोधतच होतो. तो पुढे म्हणाला, “गावात वरचेवर मृत्यू होतंच असतात. आमची मुले, भावंडे, पत्नी असे प्रियजन मृत पावतात तेव्हा आम्ही शोकग्रस्त होतो. ते आमच्यापासून हिरावले जातात. अशा घटनांनी सारा गाव दु:खी होतो. मरण आमच्या इतक्या जवळ आहे. हे भयानक वास्तव आहे आणि या भयानकतेची आठवण करून देणारे आहे की, आपणा सर्वांना मरण आहेच.”

क्षणभर तो थांबला. काही क्षणांपूर्वीच्या तुलनेत आता खोलीत स्मशान शांतता होती. जणू काही तो वुसुकी जमिनीवर सरपटत फिरत होता, आणि कोणीच त्याला रोखू शकत नव्हते. तो पुढे म्हणाला, “पण म्हणूनच तर… पौल अरीयपगावर पुनरुत्थानाचा संदेश देत होता …. हेच ते.”

पुन्हा खोलीत सगळे एकसाथ मोठमोठ्याने बोलू लागले, मला त्यांचा रोख समजेना.

“तुम्हाला काय म्हणायचे आहे? या वचनांमध्ये एवढे उल्हसित करणारे काय आहे?”

“सर्व त्यातच आहे.” ते माझ्या वहीकडे इशारा करून सांगू लागले.

“तुम्हाला आनंदित करणारे असे यात काय आहे?” सगळे मागे हटले आणि मला एका विद्यार्थ्याला मनात ठसवू लागले.

त्यांनी या सर्व वचनांच्या स्पष्टीकरणातून मला नेले व त्या वचनांमागे दडलेला अर्थ मला समजावला. माझ्यासाठी ते नवे होते पण त्यांच्या संस्कृतींत ते चपखल लागू पडणारे होते.

वेदी म्हणजे ‘प्रार्थनेसाठी उभारलेले दगडांची रास.’ येथून सुरुवात केली.

“आमच्याकडे पण अशा राशी असत. तुम्हाला त्या माहीत नाहीत. पण अजून त्या आहेत आणि काही लोक आजही तेथे प्रार्थना करतात.” माझ्यासाठी ही नवीनच बातमी होती.

“संपूर्ण जग कसे दुभंगले व लोक जगभर पांगले याविषयीचीही दंतकथा आमच्याकडे आहे.”
“म्हणून तो भाग वाचत असता तुम्ही एवढे शांत होता व लक्षपूर्वक ऐकत होता तर!”

“पौलाच्या काळच्या कवींविषयी तुम्ही बोलत होता. आमच्याकडेही तसे लोक आहेत. त्यांच्याकरवी देव स्वत:ला त्या वस्तूंच्या वर्णनातून आम्हाला प्रकटीकरण करत होता. पण ते त्यांना स्वत:ला समजत नव्हते आणि आम्हालाही समजत नव्हते.” आता माझ्यासाठी धुके हळूहळू निवळू लागले होते. तेवढ्यात कोणीतरी म्हटले, “देव आम्हाला खरोखर ओळखतो.” आणि पुन्हा संपूर्ण खोली आनंदमय झाली.

“पण सापांचे काय?” मी विचारले.

अपुसी अलीने बोलायला सुरूवात केली. “आम्हाला पण त्याचा संबंध कधी लावता आला नाही. कधी कधी हे कवी अर्थपूर्ण बोलत नसतात. जुने लोक सांगतात की तो वुसुकी ‘मर’ म्हटला नसता तर आपण मेलो नसतो. पण बलशाली साप हुपु केपी ‘जगत राहा. जगत राहा’ म्हणाला. त्याने वुसुकीला जखमी केले. त्या दंतकथेत बलशाली सर्प विजयी झाला. पण आपल्या जीवनात तसे दिसत नाही. आपण मरतच राहतो. आपल्याला अखेर काही आशाच नाही. काही तरी आपल्याला सांगायचे राहून गेले असावे किंवा काहीतरी भेळमिसळ झाली आहे.”

“पण जेव्हा आपण देवाने आपल्या माणसाला मरणातून पुनरुत्थित केल्याचा पुरावा दिल्याचे आपण वाचले. देव आपल्याला ओळखतो. त्याला आमची दंतकथा माहीत आहे. आम्हाला आता या दंतकथेचा अर्थबोध झाला आहे. कारण देवाने येशूच्या द्वारे जे केले त्याची परिपूर्ती झाली आहे.”

एवढा मग जल्लोष वाढला की रस्त्यावरचे वाटसरू काय झाले ते पाहायला जमू लागले. तोवर मी विचारमग्न अवस्थेत बसून राहिलो. मी ही दंतकथा कधीच ऐकली नव्हती. पण ती एक कवीदृष्टी देणारी व एक उंच झेप घ्यायला प्रवृत्त करणारी होती.

दिवसाच्या प्रकाशासारखा त्यांना खरा मथितार्थ स्पष्ट झाला होता. मार्स हिल्सवर देवाने जे पौलासोबत केले तेच देव येथे करत होता. जे मूळ विस्मरणात गेले होते, त्याचा देव अर्थबोध करत होता. तो काय करत आहे हे तो जाणून होता.

देवाने त्यांच्या भाषेत त्यांना आमच्या बायबल खोलीत थेट संदेश पाठवला होता. एखादा बाण सोडावा आणि तो रुतावा  तसा. त्यांना सखोल अर्थ समजून त्यांनी पुन्हा तो शास्त्रभाग वाचला.

त्यांना महान शोध लागला की देव  सर्वकाळ त्यांच्याबरोबर होता. त्याने आपल्या पाऊलखुणा मागे सोडल्या होत्या, पण त्यांना त्या कधी दिसल्याच नव्हत्या. नवीन दृष्टीने त्यांनी ही वचने वाचली. सगळे बदलून गेले होते. त्यांना हे बायबल व त्यातील संदेश परप्रांतातून कोणा गोऱ्या माणसांकडून आला आहे असे वाटेनासे झाले होते. तो त्यांना वैयक्तिक पाठवलेला खास संदेश होता. या क्षणापासून बायबल ‘त्यांचे स्वत:चे’ पुस्तक झाले होते.

मी कागद गोळा करून उठू लागलो. पण ते म्हणाले, आपण गीत गाऊ या. आम्ही गाऊ लागलो, भावपूर्ण, गांभीऱ्याने, नितांत आदराने. सगळे जणू बायबल खोलीत तरंगत होते. एक गाणे संपल्यावर त्यांना आणखी दुसरे, आणखी दुसरे, आणखी दुसरे गीत गायचे होते.

मग सगळे एकसाथ म्हणाले, “प्रार्थना करू या.” वर्तुळाकार सगळे उभे राहिले . प्रत्येक जण वैयक्तिक रीतीने एकाच वेळी देवाशी बोलत होता. 

अखेर हर्षाचा हा मेळावा संपला. मी घरी गेलो आणि घरातील सर्वांना घडलेल्या वृत्तांत सांगितला. माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. मी खूप मागे गेलो. मी हे कधी करू शकलो असतो का?  देवाने माझा – आमच्या सर्वांचा  कसा वापर करून घेतला! फोलोपांपर्यंत पोहोंचण्यासाठी असलेल्या देवाच्या योजनेचा त्याने मला भाग करून घेतल्याबद्दल मी विनम्रपणे त्यांच्यापुढे नतमस्तक झालो.

नुकत्याच केलेल्या शास्त्रभागातील वचन समोर आले: “अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो” (प्रे.कृ.१७:३०).

येथे ऐतिहासिक जाणीव करून दिली आहे. गतकाळात बरेच अज्ञान होते. पण आज प्रत्येक व्यक्तीला पश्चात्ताप करण्याची व मरणातून जिवंत होण्याचा अनुभव घेण्याची संधी आहे.

पुनरुत्थानाच्या या संकल्पनेपाशी पुष्कळ हेल्लेणी- जगभरचे प्रतिष्ठित, ज्ञानी लोक— चुकले. कोणी उपहास केला.

कोणी म्हटले यावर आणखी ऐकू. आणि थोडक्यांनी विश्वास ठेवला.

ग्रीसमध्ये, मार्सहिलवर, पूर्वीच्या काळी, बऱ्याच वर्षांपूर्वीपासून, मैलोनमैल दूरच्या संस्कृत्यांमध्ये हेच घडत आले. पण त्या दिवशी टेकडीवरील फुकुटाओ गावातील सर्व उपस्थित लोकांनी विश्वास ठेवला.  कोणालाच शंका नव्हती. देव फुकुटाओच्या इतिहासातून, फुकुटाओच्या संस्कृतीतून, त्यांच्या विचारसरणीतून थेट बोलला. माणूस ज्यांना विसरला होता ते लोक, देवाला असलेल्या त्यांच्याविषयीच्या घनिष्ट  ज्ञानातून व आस्था आणि जिव्हाळ्यातून मुळीच सुटले नव्हते. त्यांच्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले नव्हते. सर्व लोक अत्यंत हर्षित झाले होते.

मी देखील आनंदातिशयाने माझ्या घरात पाऊल टाकल्यापासूनच मोठमोठ्याने हा वृत्तांत माझ्या कुटुंबियांना सांगत होतो.

आम्हीही हर्ष करीत होतो.

समाप्त

Previous Article

देवाने जगावर एवढी प्रीती केली

Next Article

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

You might be interested in …

ईयोबाच्या संदेशाचा आढावा

जॉन पायपर एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे. “माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ […]

हेन्री मार्टिन

(१७८१-१८१२) लेखांक १७ पलटणीतील काही ब्रिटिश सैनिकांचा भारतीय स्त्रियांशी विवाह झाला होता. तर काही केवळ विवाहबाह्य संबंध ठेऊन त्यांच्याबरोबर राहात होत्या. अशांची दुरावस्था जाणून त्यांना आध्यात्मिक स्पर्श व्हावा म्हणून त्याने हे खास काम केले होते. […]