अप्रैल 12, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा

लेखांक २                            

(लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत करण्याच्या निर्धाराने ती पुढे आली. १९७९ मध्ये तिने जॉनी अँड फ्रेंड्स ही संस्था स्थापन केली व अशा विशेष गरज असलेल्या कुटुंबांना व मंडळ्यांना ख्रिस्तकेंद्रित कार्यक्रम देऊ लागली. या संस्थेद्वारे अनेक अपंगामध्ये सेवा करणाऱ्या ख्रिस्ती संस्था व विद्यापीठांना शिक्षण दिले जात आहे.)

देवाने तुम्हाला बोलावले आहे

होय. दैवी प्रतिसाद हा न्यायाला दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद आहे. पण जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर, अन्यायाने झालेले हे दु:ख कटुत्वाने किंवा सूड न उगवता किंवा परत दु:ख देण्याची इच्छाही न बाळगता सहन करण्यासाठी देवाने तुम्हाला बोलावले आहे. कारण देव हा सार्वभौम आहे. देवाच्या ताब्यात सर्वकाही आहे आणि दुष्ट लोकसुद्धा त्याच्या योजना निष्फळ करू  शकत नाहीत (नीती १६:४).

ह्या जगातील जीवनात अनेक गोष्टी चुकीच्या आणि अयोग्य आहेत. ख्रिस्ती व्यक्तीने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावे  तसेच दुष्टांचे दुर्गुण उजेडात आणायला हवेत. तथापि ख्रिस्ती व्यक्तीने दुष्टाईची  फेड दुष्टपणाने करायची नाही तर जे त्यांना दुखावतात अथवा खाली पाडतात त्यांच्यासाठी चांगलेच करायला पाहिजे.

ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या घोषणा व प्रत्यक्ष जीवनाद्वारे  देवाला त्याची दया या जगापर्यंत पोचवायची आहे. देवाला न्याय प्रिय आहे आपण त्याची धार्मिकता व न्याय या सर्व जगभर पसरावा अशी त्याची इच्छा आहे. कारण “तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत” (स्तोत्र ८९:१४).

आपल्या राजाच्या अधिपत्याखाली जेव्हा आपण ह्या पापी जगावर पुन्हा हक्क दाखवतो तेव्हा हे राज्य कसे दिसते ते आपण जगाला दाखवतो – म्हणून शांती आणि न्याय यासाठी आपण परिश्रम करतो (अनुवाद २७;१९; स्तोत्र ८२ ;३; नीती ३१:८,९) आणि आपले दु:ख आपण सहनशीलतेने सहन करतो.

ख्रिस्ती म्हणून आपले पाचारण

“जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.

कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’ त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्‍याकडे स्वतःला सोपवून दिले. ‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’ कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात” (१ पेत्र २:१९-२५).

ही वचने पुन्हा वाचा. प्रेषित पेत्र म्हणत आहे की जेव्हा तुम्ही चांगले करता तेव्हा तुम्हाला दु:ख भोगावे लागेल. जेव्हा तुम्ही बरे करता तेव्हा तुमचे दोष दाखवले जातील. जेव्हा तुम्ही चांगले करता तेव्हा परिस्थिती सुधारेलच असे नाही. तुम्ही चांगले केले तरी कोणी तुम्हाला दुखावणारे शब्द बोलेल. तुम्ही चांगले कराल पण लोक त्याची दखलही घेणार नाहीत आणि तुमच्या श्रमांचे कोणी कौतुक करणार नाही.

दैवी पाचारण

१ पेत्र ३:८-९ पाहा, “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदु:खी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू व नम्र मनाचे व्हा. वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.”

जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी हेच पाचारण आहे.

जॉन पायपर ह्याचे स्पष्टीकरण असे करतात; “ख्रिस्ताने दया केली नसती तर देव आपल्याला ज्यासाठी आपण लायक आहोत तेच देत राहिला असता : दंडाज्ञा.  पण देवाचा न्याय ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाने तृप्त केला गेला म्हणून आता तो आपल्याला कृपा व दया देऊ करत आहे! आणि त्याचमुळे आपले दु:ख हे जितके चुका केल्यामुळे मिळते  तितकेच चांगले केल्यानेही येते. ही दैवी शिक्षा नाही तर दैवी पाचारण आहे.

म्हणून पेत्र म्हणतो, पुन्हा न  दुखावणे हे आपले पाचारण आहे. म्हणून आपण आपल्या कटुत्वाने क्षुब्ध होऊ नये कारण आपल्याला बदला घेऊन दुखवायचे नाही. ह्या आश्चर्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. ही कृपा आपल्याला मिळवायची आहे.

ईयोब: अन्यायाचा एक अभ्यास

ईयोबाची गोष्ट ही एका सहन करणाऱ्या माणसाचे आणि त्याचे देवाविषयीचे व अन्यायाविषयीचे प्रश्न यांचे एक उत्कृष्ट चित्र रेखाटते. त्याचे कुटुंब मारले गेले होते. त्याची मालमत्ता हिरावून नेली होती व उद्धवस्त झाली होती आणि त्याच्या शरीरावर गळवे आले होते. ईयोब अन त्याच्या मित्रांनी केलेल्या आव्हानांना अखेरीस पाच अध्याय उरले असताना देव उत्तर द्यायला व्यासपीठावर येतो. आणि जेव्हा देव आला तेव्हा अशा विध्वंस आणि ह्रदयभंगासाठी त्याने काय स्पष्टीकरण दिले? एक शब्दही नाही.

देव काही इयोबाला खाली बसवून बोलला नाही, “आता काळजीपूर्वक ऐक, मी तुला या सर्वांतून का जाऊ दिले याच्या मागची आतली गोष्ट सांगतो” त्याऐवजी देव म्हणाला, “ आता तू पुरुषासारखी कंबर बांध कारण मी तुला विचारतो आणि तू मला सांग” (३८:३). इयोबाचे पुढचे चार अध्याय देव दुसरे काही न सांगता स्वत:च्या निसर्गातील कृतीचे गौरवयुक्त भीतीचे ऐश्वर्य वर्णन करीत आहे आणि नंतर तो इयोबाला विचारतो, याच्याशी तू सामना करू शकतो का? देव त्याच्यापुढे  स्पष्ट चित्रे साकारतो, जगाची निर्मिती, ताऱ्यांची व अवकाशाची अवाढव्यता, बैलाचे सामर्थ्य, घोड्याचा दिमाख, आणि प्रत्येक सजीवाला पृथ्वी अन्न कशी पुरवते. पण देव इयोबाचा उपहास करून म्हणतो, “ हे तुला ठाऊक असेलच कारण तेव्हा तू जन्मला असावास आणि तुझ्या दिवसांची संख्या बहुत आहे” (ईयोब ३८:२१).

ईयोबाला का फशी पाडायचे? देवाच्या वचनाचा ईयोबाच्या परीक्षांशी आणि त्याच्या  देवाच्या न्यायासंबंधी असलेल्या प्रश्नाशी काय संबंध? इयोबाने काही निर्मिती, जीवनाचा उगम यांचे सर्व गूढ माहीत असल्याचा आव आणला नव्हता. आपल्या कुटुंबाचा मृत्यू , मालमत्तेचा नाश आणि त्याच्या शरीरावरचे गळवे यांचे स्पष्टीकरण देवाने करावे एवढीच इयोबाची इच्छा होती!

तू शरण येशील?

अखेरीस सर्व वेळ जो प्रश्न देव पुढे करत होता तो प्रश्न देव इयोबाला विचारतो.  “ मला तुला प्रश्न विचारू दे व तू मला त्याचे उत्तर दे. माझ्या निर्णयाला कमी लेखून तू मला दोष देणार आहेस काय म्हणजे तुला म्हणता येईल की मी खरा आहे (इयोब ४०:२, ७-८)?  देवाला इयोबाला नक्की काय सांगायचे होते? आपण यातून काय धडा घ्यावा?

  • आपण देवाकडून उत्तरे मिळवण्याचा अट्टाहास करू शकत नाही. कारण देव आपल्याला जबाबदार नाही. देवाकडून उत्तराचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:ला त्याच्यावरती नेऊन  ठेवणे.
  • आकाशात काही काल्पनिक न्यायालय नाही जेथे देवाने “न्याय” या शब्दासाठी उत्तर द्यायला हवे. देव स्वत:च न्यायालय आहे. त्यानेच न्याय स्थापन केला, कारण “कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही” (यिर्मया ४९:१९).
  • आपण ईयोबासारखा प्रतिसाद द्यावा अशी देवाची इच्छा आहे. “परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते. परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे. म्हणून मी स्वत:ला तुच्छ लेखतो आणि धूळ व राख यावर बसून पश्चात्ताप करतो” (इयोब ४२:५-६).

न्याय्य काय आहे?

देवाने जेव्हा आपल्या पुत्राला वधस्तंभावर मरण्याकरता पाठवले तेव्हा त्याच्या प्रेमावर आपण विश्वास ठेवू शकतो हे त्याने सिध्द करून ठेवले आहे. हे पुरेसे नाही का? की आपल्याला आपण राहत असलेल्या गोंधळलेल्या खालच्या तळावर न राहता नेहमी देवाबरोबर त्याच्या नियंत्रण बुरुजावर बसायला हवे असते? उपदेशक ११:५ म्हणते, “आत्म्याचा मार्ग काय आहे हे आणि गर्भिणीच्या पोटात हाडे कशी निपजतात हे  जसे तुला कळत नाही तसे देव जो सर्व साधतो त्याचे काम तुला कळत नाही.”  तसेच अनुवाद २९:२९ सांगते “गुप्त गोष्टी यहोवा आमचा देव याच्या आहेत..”

देव न्यायी आहे की नाही हे आपल्यासमोर असलेल्या कोणत्याही वेदनामय स्थितीत ठरवणे अशक्य आहे. कल्पना करा तुम्ही एका खोलीत जाता आणि तिथे दोन व्यक्तींचा वाद चालू आहे आणि ते तुम्हाला एकदम तुमचे मत विचारतात! तुम्हाला तर ना समस्या माहीत ना सत्य परिस्थिती. काय चाललंय याची तुम्हाला जाणीव नाही अन त्यामुळे तुम्ही तुमचे प्रामाणिक मत सांगू शकणार नाही. अगदी तसेच या पृथ्वीवर न्याय्य काय आहे याचा अधुरा दृष्टिकोन आपल्याला आहे – आपल्याजवळ पूर्ण सत्य मुळीच नाही! याचे कारण अनंतकाळच्या या बाजूला देवाचे अनंतकालिक हेतू व योजना आपण जाणून घेऊ शकत नाही.

आपल्या लायकीनुसार मिळणे ….आणि लायकीशिवाय मिळणे

या मोडलेल्या आणि रोगट जगात वाजवीनुसार योग्य असे होत नसते. आपल्याला समान असे निर्माण केले गेले आहे ते या अर्थाने की आपण सर्व पापी आहोत आणि आपल्याला सुटकेची गरज आहे. पण समानता ही निर्मितीच्या वेळीच संपते. जीवनामध्ये सर्व गोष्टी निश्चितच समान नाहीत. चांगले लोक तरुणपणीच मरण पावतात, दुष्ट लोकांची भरभराट होते. निर्दोष मुलांवर अत्याचार होतात, न जन्मलेल्या अर्भकांना निर्घृण रीतीने मारून टाकले जाते.

मग प्रश्न असा आहे की: देव आपल्याला आपल्या लायकीनुसार देतो का? नाही, तो देत नाही. आणि ही फार चांगली गोष्ट आहे! देवाचे  प्रमाण आहे परिपूर्णता आणि प्रीती. जर त्याने आपल्या लायकीनुसार दिले असते तर तर आपण जळून खाक झालो असतो व एका निमिषात नरकाकडे जात असतो.

तर न्याय हा आहे की आपण ज्याला पात्र आहो ते आपल्याला मिळायला हवे आणि ते आहे नरक.

दया म्हणजे आपण ज्याला पात्र आहोत ते आपल्याला दिले जात नाही आणि ते तारण आहे.

कृपा म्हणजे ज्यासाठी आपली पात्रता नाही ते आपल्याला दिले जाते आणि ती म्हणजे क्षमा, प्रार्थनांना उत्तरे,  स्वर्गामध्ये जागा, ख्रिस्ताबरोबर सहवारीस, देवाच्या राज्यात सर्व काळ सेवा  आणि अशाच आणखी कितीतरी गोष्टी.

विशेषत: ख्रिस्तावर केवळ विश्वास ठेवून आनंदाने स्तुती ओसंडून वाहू लागते. पण जेव्हा तुमच्यावर संकटे हल्ला करतात आणि अन्याय तुमच्या मनाची शांती हरवून टाकतो तेव्हा देवाची स्तुती वेगळाच आकार घेऊ लागते.

जेव्हा तुम्ही दुखावले जाता आणि न्याय आपल्यापासून काढून घेतला आहे याची तुम्हाला जाणीव होते तेव्हा तुमची स्तुती अशी होते:

एक दैवी निश्चय                                          एक स्थिर भक्ती
एक निर्णयात्मक कृती                                  एक दैवी सामर्थ्य
एक शांत ठराव                                          आत्म्याने!

हिब्रू १३:१५-१६ अशा प्रकारच्या स्तुतीला “स्तुतीचा यज्ञ” असे म्हणते. स्तुतीच्या यज्ञाची नेहमीच किंमत भरावी लागते. क्षणभर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सर्वात भीतीदायक समस्या येऊ शकते असा विचार करा: कॅन्सरची गाठ, शक्तिहीन करणारा आजार, आर्थिक आणीबाणी, मुलीचे अनैतिक गर्भारपण, मुलाचा क्रोध आणि बंड, किंवा तुम्ही कोणाच्या छळवणुकीचा बळी होता, तुमचा फायदा उठवला जातो, तुम्हाला कलंक फासला जातो. अशा प्रसंगी जर तुम्ही सातत्याने तुमचे ह्रदय देवाच्या स्तुतीवर केंद्रित केले तर तुम्ही त्याला स्तुतीचे अर्पण  केले आहे. स्तोत्रकर्त्याबरोबर तुम्हीही देवाला म्हटले की, “नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन” (स्तोत्र ७१: १४). तर तुम्ही असे शब्द अर्पण केले आहेत की त्यांचे तुम्हाला मोल द्यावे लागले. इब्रीकरांस पत्र म्हणते की अशी स्तुती देवाला आवडते.

(पुढे चालू)

Previous Article

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)

Next Article

काहीही होवो

You might be interested in …

त्याने एकाकरता सर्वस्व विकले

डेविड मॅथीस येशूने एका माणसाबद्दल एका वाक्याचा दाखला सांगितला की “त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले.” तो एक व्यापारी होता. त्याला इतके मौल्यवान काही सापडले की त्याला प्रिय वाटणाऱ्या सर्व खजिन्यापेक्षा ते सरस होते. “स्वर्गाचे राज्य […]

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

( १७२६-१७९८) लेखांक  १२                            पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या […]