Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 14, 2021 in जीवन प्रकाश

काहीही होवो

काहीही होवो

डेविड मॅथीस

सुमारे २५०० वर्षांपूर्वी हळूहळू पुढे सरकणारी एक आपत्ती प्राचीन जगतात पसरू लागली. एका देशातून दुसर्‍या देशात भीतीदायक वेगाने ती पुढे सरकू लागली.

पर्ल हार्बर, दहशतवाद्यांचा हल्ला किंवा त्सुनामी यासारखी ती नव्हती. कारण ही पीडा तयारी नसताना अचानक गाठणार नव्हती. प्रत्येक राजा, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक नागरिक यांना ती येतेय हे दिसत होते. त्यांनी बातम्या ऐकल्या होत्या. ते त्या साम्राज्याखाली राहत होते. त्या काळच्या जगातील महान शहर निनवे एका रात्रीतून पडले गेले नाही. तर आठवड्यामागून आठवडे व कित्येक महिने गेल्यावर ते पडले. त्यानंतर यरुशलेम आले. ह्या पवित्र नगरीवर नाशाच्या लाटा आल्या. पहिली इ.स. पूर्व ६०५ मध्ये, नंतर आठ वर्षांनी ५९७ मध्ये आणि अखेर अकरा वर्षांनंतर इ.स. पूर्व ५८६ मध्ये तिचा संपूर्ण नाश झाला.

तर काही तास, दिवस, आठवडे नव्हे तर महिने आणि कित्येक वर्षे जगातील शहरांना दुर्बल करणारी ही दहशत कोणती होती? बाबिलोनचे वाढते सामर्थ्य आणि एका राजधानीतून दुसरीकडे सरकणारे तिचे सैन्य. कित्येक महिने वेढा घालून जगातील त्या मोठ्या शहरांचा पुरवठा तोडून त्या शहरातील लोकांची उपासमार करून ते त्याचा पाडाव करीत असत.

खरं तर या येणाऱ्या आपत्तीमुळे देवाच्या पहिल्या कराराच्या लोकांना काही आश्चर्य वाटायला नको होते. ख्रिस्तापूर्वी सातव्या शतकामध्ये जेव्हा अश्शूर हे राज्य जागतिक सामर्थ्य होते आणि बाबिलोन नुकताच उदयाला लागला होता तेव्हा देवाचा संदेष्टा यशया याने येणाऱ्या विपत्तीची कित्येक दशके आधी सूचना दिली होती. त्याप्रमाणेच हबक्कूक याने सध्याच्या हळूहळू पुढे सरकरणाऱ्या आपत्तीबद्दल हादरून टाकणाऱ्या शब्दांत आपल्यालाही सूचना दिली असावी.

देव स्वस्थ बसून पाहत नाही

आपल्या तीन अध्यायांच्या पुस्तकात हबक्कूक संदेष्टा इतर संदेष्ट्याप्रमाणे थेट (directly) बोलत नाही. तो त्याच्या आणि देवाच्या संवादाचे आणि देवाने त्याच्यामध्ये केलेल्या कार्याचे निवेदन करतो आणि वाचकांना त्यांचे वैयक्तिक लागूकरण करण्यास मुभा देतो. या पुस्तकाची रूपरेषा अगदी सोपी आहे.

प्रथम हबक्कूक धार्मिकतेने निराशा व्यक्त करताना दिसतो, कदाचित जरा वाजवीपेक्षा जास्तच. तो विचारतो, “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो” (हब. १:२-४). देव त्याला जे प्रकट करतो त्याची या संदेष्ट्याने कल्पनाही केली नसावी (१:५-११). थोडक्यात: होय छोट्या संदेष्ट्या, माझे लोक दुष्ट झाले आहेत – आणि मी काही स्वस्थ बसून पाहत नाहीये. खर तर मी बाबिलोनी लोकांना त्यांचा नाश करण्यासाठी उठवत आहे.

हबक्कूक कण्हतो, ओरडतो. त्याला वाटले होते की त्याच्या पुढे न्यायाची समस्या होती. तो आणखी एक तक्रार करून प्रतिसाद देतो (१:१२-२:१). देव विश्वासघातक्यांकडे स्वस्थ कसा पाहू शकतो? (हब. १:१३) बाबिलोनी लोक हे देवाच्या घसरलेल्या लोकांपेक्षा अधिक दुष्ट आहेत? आता संदेष्टा अजून बेपर्वा वृत्तीने बोलतो: “मी आपल्या पहार्‍यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गार्‍हाण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन” (हब. २:१).  त्याला वाटते की त्याच्या या दुसऱ्या तक्रारीला देवाचा प्रतिसाद पुरेसा नसणार आणि तो पुन्हा उत्तर द्यायला तयार असणार.

पण देवाच्या दुसऱ्या प्रतिसादाने (२:२-२०) तो गप्प बसतो. संदेष्टा तिसरी तक्रार करतच नाही. देव बाबिलोनला शिक्षा न देता सोडणार नाही. त्याचा पूर्ण न्याय – पाचदा केलेला धिक्कार- त्याच्या योग्य वेळी केला जाईल. “नीतिमान तर आपल्या विश्वासाने वाचेल” (हब. २:४).

आपण विश्वासाने कसे जगायचे?

देवाच्या वाणीपासून लोकांच्या ह्रदयापर्यंत या पुस्तकाच्या संदेशाचा गाभा आहे: पूर्वी कधी घडले नाही अशा दिवसामध्ये  -काहीही होवो- तुम्ही विश्वासाने जगा. चिंतेत असलेल्या या संदेष्ट्याला देव वचन देत नाही की लवकरच मी सगळे काही ठीक करीन. खरं तर तो वचन देतो की परिस्थिती ठीक होण्यापूर्वी ती मी अधिकच वाईट करीन. प्रथम संपूर्ण नाश होणार, नंतर सुटका होईल. प्रथम पूर्ण उद्धवस्त नंतर मुक्तता.

दिशाहीन, घाबरलेल्या या संदेष्ट्याला देव मानवी गर्वाची मूर्खता प्रकट करतो आणि नम्र होण्यासाठी व विश्वास धरण्यासाठी पाचारण करतो. देवाच्या अनाकलनीय न्यायाच्या कामाचा धीराने स्वीकार करायला सांगतो (हब.१:५, ३:२). संकटाची सावली असणाऱ्या दिवसात देवाचे त्याच्या लोकांना निरंतर पाचारण आहे. गूढ, आकलन न होणार्‍या दिवसात – हबक्कूकच्या आणि आपल्या – विश्वासाने जगा (२:४).

याचा अर्थ काय आहे? “विश्वासाने जगणे” अस्पष्ट आणि सामान्य वाटेल. आता सध्याच्या (आणि येणाऱ्या) धोक्याच्या दिवसांत आपल्यासाठी याचा अर्थ काय?

आपण शांतपणे वाट पाहणार का?

त्याला गप्प केल्यानंतर तिसऱ्या अध्यायात हबक्कूक पुन्हा बोलतो पण आता प्रार्थनेद्वारे तक्रार करून नाही. त्याने देवाचा आवाज ऐकला आहे व त्याकडे लक्ष दिले आहे आणि आता तो देवाचे न थोपवता येणारे सामर्थ्य व सच्चा न्याय यांची वाखाणणी करतो. त्याची प्रार्थना दोनदा “तरी” या शब्दांनी संपवली जाते. प्रथम तो म्हणतो, मी धीर धरीन. जे गर्विष्ठ आणि अविश्वासी आहेत ते सर्व प्रकारच्या भीती आणि आवाजांनी भरून जातील पण हबक्कूक शांतपणे वाट पाहील.

“तरी ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे” (हब. ३:१६).

देवाच्या परिपूर्ण न्यायावरील त्याचा विश्वास आता पुन्हा नवा झाला आहे. देवाच्या वेळापत्रकानुसार तो त्याच्या जिवाचे घड्याळ लावणार आहे. देव स्वस्थ बसलेला नाही याची आपल्याला खात्री आहे. तो पाहत आहे. तो सावध आहे. तो प्रत्येक क्षण, प्रत्येक बारकावा पाहतो. अखेरीस जग पाहील की त्याने योग्य तेच केले आहे, कोणालाच कधीही अन्यायाने वागवले नाही.

आपल्या पापामध्ये आणि काळजीमध्ये आणि मर्यादेमुळे आपण देवाने निर्णय घ्यावा म्हणून आपले वेळापत्रक त्याच्यावर लादण्यास प्रवृत्त होऊ शकतो पण तो आपल्याला शांतपणे धीर धरण्यास सांगतो – सध्याचा त्रास कितीही हळूहळू उलगडत जात असला तरी.

आपण आनंद करणार?

दुसरा “तरी” १८व्या वचनात येतो  “तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन ” आणि त्याच्या पुढ्यात अगदी वाईट परिस्थिती असतानाही हबक्कूक अगदी निश्चित शब्दात म्हणतो:

“अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्‍या देवाविषयी मी उल्लास करीन” (हब ३:१७ – १८).

दुसर्‍या शब्दात जरी पुरवठा बंद झाला, फडताळं  रिकामी असली, अर्थव्यवस्था ढासळली, आमच्या शहरात, रस्त्यावर आणि घरात व्हायरस आला, तरीही – होय तरीही – हा नव्याने नम्र झालेला संदेष्टा देवामध्ये आनंद करणार.

आपण करणार ? आपल्या भरपूरतेमध्ये नाही, आपल्या आरोग्यात नाही. आपल्या स्वत:च्या सुरक्षेत नाही, आपल्या शत्रूच्या पराभवातही नाही. तिथे एक अचल (स्थिर), एक न ढळणारी खात्री, एक पूर्ण खात्री, खऱ्या आनंदाचा एक स्वर्ग या आव्हान देणाऱ्या प्रवासात आहे: खुद्द देव. तो स्वत:ला आपल्यापुढे ठेवतो आणि आपले इतर आनंद दूर सारतो. आपण त्याच्यावर नव्याने अवलंबून राहणार का?

जे गर्वाने फुगून गेले आहेत त्यांचा कालांतराने  नक्कीच नाश होणार, आता किंवा नंतर. पण जे देवाचा नम्र करणारा हात स्वीकारतात आणि विश्वासाने त्याच्यापुढे नमतात त्यांना अशा दिवसात खुद्द देव “माझे सामर्थ्य” असा दिसेल. “परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे” (३:१९). आपल्यालाही अशा दिवसामध्ये विश्वासाने धीर व आनंदात जगण्याने असेच म्हणता येईल. पण हे कसे दिसेल?

आपण गीत गात उभे राहणार?

येणाऱ्या दिवसात देव आपल्या मंडळीला अनेक मार्गांनी प्रेरणा देईल. हबक्कूकमधून असा धीर व आनंद कसा दिसतो याची निदान एक तरी खूण दिसते: गीत गाणे. या संदेष्ट्याचा व देवाचा संवाद अशा एका अनोख्या आणि आकर्षक रीतीने संपला जातो – संदेष्टा स्तुती गाऊ लागतो. म्हणून त्याने सामुदायिक भक्तीला मार्गददर्शन केले आहे [मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे] ह्या शेवटच्या ओळी फक्त प्रार्थनाच नाही ते गाणे आहे ज्यात इतरांनी सामील व्हायचे आहे.

इतर संदेष्ट्यामध्ये असे दिसून येत नाही. हबक्कूक प्रथम चिडून आणि उघड आव्हान देऊन सुरुवात करतो असे दिसते. आणि तरीही देव त्याचा जीव हळुवारपणे विरोधाकडून स्तुतीकडे वळवतो. जे प्रामाणिकपणे कबूल करतात की ही महामारी विश्वासातून आपले पाय ढळण्यास कारण होऊ शकते त्यांच्यासाठी हे उत्तेजन आहे.

आपण पाहिले की हबक्कूकने ही बातमी सहजतेने स्वीकारली नाही. तरीही देव तिथे त्याला त्याच्या गर्वात, विरोधात आणि भीतीमध्ये भेटला. ह्या छोट्या भविष्यवाद्याने मूर्खपणाने आपली भूमिका बजावली आणि देवाने त्याच्या दयेने त्याला गुडघ्यावर आणले. देवाने त्याला नम्र केले. आणि संदेष्ट्याने त्याचा स्वीकार केला व स्वत:ला नम्र केले. त्याने दिशा बदलण्याचे निवडले. देवाच्या येणाऱ्या न्यायाचे, गैरसोयीचे, वेदनामय हेतू त्याने निवडले आणि आपला विरोध टाकून दिला, प्रार्थनेमध्ये गुडघे टेकले आणि स्तुतीमध्ये उभा राहिला.

सध्या आपण राहत असलेल्या हळूहळू पुढे सरकणाऱ्या गोंधळात आणि दिशाहीनतेमध्ये आपण हेच करू या का? आपला विरोध कितीही न्याय्य वाटला तरी आपण गुडघ्यावर जाऊ या का? आणि आपल्या प्रार्थना आपल्याला गायला लावतील का?