दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जर सर्वात वाईट घडलं तर ?

वनीथा रिस्नर

माझी भीती वाढत आहे असं मला जाणवलं. ती अगदी ह्रदयाची धडधड बंद करणारी, सर्वत्र व्यापून राहणारी भीती नव्हती पण  सतत कुरतडत राहणारी भीती- जेव्हा तुम्ही सध्याच्या निराशाजनक घटना पाहता आणि हे कधी बदलणार नाही असं गृहीत धरू लागता. जेव्हा तुम्ही भविष्याकडे पाहता आणि मनात म्हणता “जर सर्वात वाईट घडलं तर?”

जर..?

असे ‘जर’चे प्रश्न विचारतच मी माझे सर्व जीवन घालवले आहे. ह्या प्रश्नांमध्ये मला अस्वस्थ करून टाकणारा, माझी शांती नष्ट करणारा, मला असुरक्षित करून टाकणारा एक मार्ग आहे.

बायबलमध्ये काही लोकही “जर..” या प्रश्नाने अस्वस्थ झाले होते. मोशेला जेव्हा इस्राएल लोकांचे पुढारपण करायला सांगितले तेव्हा त्याने देवाला विचारले, “त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर?” अब्राहामाच्या सेवकाला जेव्हा इसहाकासाठी भावी पत्नी आणण्यास सांगितले तेव्हा त्याने विचारले, “ती मुलगी माझ्याबरोबर येण्यास तयार झाली नाही तर?” योसेफाच्या भावांनी विचारले, “योसेफाने आमच्या विरुद्ध मनात आकस बाळगला असला तर?” या सर्वांनी असाच विचार केला की जर परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तर काय होईल? अगदी आपल्यासारखाच.

या सर्वांनाच थक्क करणाऱ्या “जर..” च्या मालिकेलाच तोंड द्यावे लागले. काहींचे मामले साधे होते तर काहींचे जीवनाची उलथापालथ करणारे. माझे मूल मरण पावले तर काय होईल? मला कॅन्सर झाला तर? माझा जोडीदार मला सोडून गेला तर?

अस्वस्थ करणारे सत्य हे आहे की यातील कोणतीही गोष्ट घडू शकते. दु:खद घटना व वेदना यातून कोणाची सुटका नाही. सुलभ जीवन जगण्याची हमी आपल्या कोणालाही नसतेच. कधीही. काही महिन्यापूर्वी मी ह्या नमवणाऱ्या वास्तवाबद्दल विचार करत होते. त्या थोड्या दिवसांच्या अवधीत मी प्रभूपुढे अनेक इच्छा आणि मागण्या आणल्या होत्या. त्या पूर्ण व्हाव्या अशी माझी इच्छा होती. पण विचार करण्यास अशक्य असलेल्या त्या प्रश्नाने  मला झपाटले होते. “माझ्या आंतरिक इच्छा कधीच पूर्ण झाल्या नाहीत आणि माझी भयानक स्वप्ने खरी ठरली तर काय?

देव पुरेसा आहे का?

मी बायबलमध्ये धुंडाळत असताना कित्येक दशके मी झगडत असलेल्या प्रश्नाची मला आठवण करू दिली गेली.

“देव पुरेसा आहे का? जर माझी खोलवरची भीती खरी ठरली तरीही तो पुरेसा असणार का?” भूतकाळात ज्या ज्या वेळी हे प्रश्न पुढे येत तेव्हा मी त्यांना बाजूला सारत होते. पण ह्या वेळी मला त्यांना सामोरे जाणे भागच होते.

मी विचार करत होते: जर माझी प्रकृती खालावत गेली आणि मला संस्थेमध्ये ठेवावे लागले तर देव पुरेसा असणार का? जर माझ्या मुलांनी देवाविरुद्ध बंड केले आणि त्याच्याबरोबर कधीच चालली नाहीत तर देव पुरेसा असणार का? जर माझा पुनर्विवाह झाला नाही, जर कोणाही पुरुषाने माझ्यावर प्रेम केले नाही तर देव पुरेसा असणार का? जर माझी सेवा वाढली नाही आणि तिची फळे मी कधी पाहू शकले नाही तर देव पुरेसा असणार का? जर माझे दु:खसहन चालूच राहिले आणि त्यामध्ये काय हेतू आहे हे मला कधीच समजले नाही तर देव पुरेसा असणार का? “ होय. अर्थातच देव पुरेसा असणारच,” असे मला सहज म्हणता आले असते तर बरे झाले असते. पण मी झगडत होते. माझी स्वप्ने सोडून देण्यास, मला प्रिय असणाऱ्या गोष्टींचे समर्पण करण्यास, ज्यासाठी मी लायक होते ते सोडून देण्यास मी तयार नव्हते.

मी माझ्या देवाशी केलेल्या एकतर्फी, अलिखित करारावर विचार करू लागले. त्यामध्ये जर त्याने माझ्या इच्छा पूर्ण केल्या तर मी माझा भाग करण्याचे वचन दिले होते. मी नाखुशीने कबूल केले मी विश्वासू राहण्याचे मूळ माझ्या अपेक्षा पूर्ण होण्यामध्ये होते. देव मला ऋणी होता ना?

नाखुशीने मी माझे हात उघडले, माझ्या स्वप्नांनी ते भरून टाकले आणि त्याला अर्पण केले. देव जे माझ्यासाठी करेल त्यानुसार त्याच्यावर प्रीती करणे मला नको होते. देव जो आहे त्यासाठी मला त्याच्यावर प्रीती करायची होती. तो पात्र आहे म्हणून त्याची भक्ती करायची होती.

जशा माझ्या अपेक्षा मी सोडून दिल्या तसे देवाच्या सान्निध्याने मला भरून टाकले. माझ्या “जर…”  घडले नाही तर या भयानक प्रश्नापेक्षा खूप मोठे आश्वासन माझ्याजवळ आहे याची त्याने मला आठवण करून दिली. मला खात्री आहे की जरी त्या गोष्टी घडल्या तरी त्यांच्यामध्ये तो असणार. तो मला उचलून घेईल. तो माझे समाधान करील, तो ममतेने माझी काळजी घेईल. देव आपल्याला संकटविरहित मुक्त जीवनाचे अभिवचन देत नाही. पण दु:खामध्ये तो आपल्यासोबत असणार असे वचन देतो.

जरी…

बायबलमध्ये शद्रख, मेशक, अबेज्ञगो यांना सुटकेची हमी दिलेली नव्हती. नबुखद्नेसर राजाने त्यांना अग्नीत टाकण्यापूर्वी कोणी म्हटले नाहीत असे धीराचे शब्द त्यांनी म्हटलेत, “ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” (दानीएल ३: १७,१८).

तरी/ ते कसेही असो

जरी सर्वात वाईट घडले तरी देवाची कृपा पुरेशी आहे. जरी च्या ऐवजी तरी/ ते कसेही असो हे शब्द घातले तर तो सुटका देणारा मोठा बदल आपण करू शकतो. आपण आपल्या अवास्तव भीतीची न बदलणाऱ्या देवाच्या  प्रेमळ खात्रीत अदलाबदल करू शकतो. आपण पाहतो की सर्वात वाईट घडले तरीही देव आपल्याला उचलून घेईल. तो अजूनही चांगलाच असणार. आणि तो आपल्याला कधीही सोडणार नाही.

ही अदलाबदल हबक्कूक संदेष्टा सुंदर रीतीने मांडतो. जरी देवाने आपल्या लोकांची सुटका करावी म्हणून त्याने विनंती केली होती तरी आपल्या पुस्तकाचा शेवट करताना तो स्पष्टपणे “तरी”  मांडतो

“अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,

तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्‍या देवाविषयी मी उल्लास करीन” (हबक्कूक ३:१७,१८).

आमेन

Previous Article

येशूचा सर्वात वादग्रस्त दावा

Next Article

सुलभतेवरच्या प्रीतीचा धोका

You might be interested in …

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९) हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण […]

नीतिसूत्रे ३१ मधला पुरुष

स्कॉट हबर्ड  बरेच पुरुष नीति. ३१ प्रमाणे आपल्याला बायको मिळावी असे स्वप्न पाहतात. ती सर्वात सुद्न्य स्त्री आहे आणि कष्टाने आपले घर उभारते (नीति. १४:१). ती आपल्या पतीचे नाव उंचावते आणि तिचा पती वेशीत देशाच्या […]

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

“ तो त्यांजपुढे रोप्यासारखा, रुक्ष भूमितील अंकुरासारखा वाढला”  (यशया ५३:२). जगाच्या आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीसाठी, देवाच्या चुकलेल्या मंडळीसाठी देवाच्या अद्वितीय वचनात, बायबलमध्ये अगदी अनुरूप असा प्रभूच्या दु:खाचा, अपमानाचा, गरीबीचा, निरोप सर्वत्र पेरलेला आहे. वरील प्रतीक यशयाच्या […]