दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सहजतेने केलेली उपासना

ग्रेग मोर्स


त्या उज्ज्वल दिवसाची सुरवात मोठ्या आशेने आणि खात्रीने झाली होती. पतनानंतर एदेन मधील मनुष्याच्या जीवनाशी सदृश्य असणारा हा दिवस होता: देवाचे  पुन्हा मनुष्यांमध्ये निवासस्थान झाले होते.


इस्राएल लोकांच्या मुक्कामामध्ये निवासस्थान उभे होते. आपल्या याजकांची नेमणूक करण्यास यहोवाने नादाब, अबीहू, एलाजार आणि इथामार यांना सर्वोच्च देवाची सेवा करण्यासाठी याजक म्हणून अभिषेक केला होता.

पवित्र सेवा करण्यासाठी केलेल्या या पहिल्या अभिषेकाच्या वेळी रक्त सांडले गेले, जनावरांचा वध झाला, अभिषेकाचे तेल ओतले गेले, खास वस्त्रे चढवली गेली, कराराचे भोजन केले गेले” (लेवीय ८:४,९, १३,१७, २१, २९, ३६). आतापर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते.


अभिषेक होताच दर्शनमंडपात पहिली उपासना सुरू झाली. अहरोन आणि त्याच्या चार मुलांनी लोकांकडे वळून स्वत:साठी व लोकांसाठी अर्पणे वाहिली आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि हे सर्व योग्य आहे हे दर्शविण्यासाठी देवाने याची भव्य सांगता केली:

“नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले.आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले” (लेवीय ९:२३-२४).

देवाने ही दीक्षा मान्य केली आणि त्यांच्या उपासनेमध्ये आनंद व्यक्त केला.

पण हे वातावरण लवकरच बदलले.

छावणीमध्ये आक्रोश


त्या प्रसंगाची कल्पना करा. तुमच्या कुटुंबासमवेत त्या दिवसाच्या अखेरीस तुम्ही बसलेले असताना तुमच्या दिशेने रडण्याचे आवाज येत असल्याचे तुम्ही ऐकता. किंकाळ्या आणि आरडाओरडा तुमच्या कानावर पडतो…जसजशी गर्दी तुमच्या जवळ येते तसे तुम्ही विचारात पडता: या अशा दिवशी एवढे दु:ख कशामुळे आले असावे? लवाजमा जवळ येत आहे आणि तुमच्या कानावर हुंदक्यावर हुंदके पडतात.


हे अहरोनाच्या कुटुंबातले मिशाएल आणि एलशाफान तर नाहीत? ते इतक्या कष्टाने का चालत आहेत? ते काय वाहून नेत आहेत? जळलेल्या मांसाचा वास हवेत पसरू लागतो – बैल?


नंतर ते तुम्ही पाहता- छावणीतून वाहून नेत असलेला तो निचेष्ट ढीग, अर्पणाचा कचरा टाकण्याच्या ठिकाणी जात आहे: नुकताच सूर्यप्रकाशात चमकणारा तो पोशाख – अंगरखा, कमरबंद, याजकाचा मंदील. हे शक्यच नाही! नादाब? आणि अबीहूसुद्धा?

हे दोघे? शक्य नाही!

आज सकाळीच त्यांनी देवाकडून अभिषेक साजरा केला. हे तर अहरोनाचे थोरले मुलगे, अहरोनानंतर हेच आमचे मार्गदर्शन करणार होते,  सत्तर वडिलांसोबत यांची निवड झाली होती व पर्वतावर यांना खुद्द देवाचे दर्शन घडले होते ना (निर्गम २४:१)? हे तेच नसावेत. देवाचे तेज दृष्टीस पडताना आम्ही देवाला दंडवत घातले तेव्हा यांनीच अहरोनाला मदत केली होती.

नुकतेच यांना स्नान घातले होते, अंगरखा व झगा चढवला होता, कमरबंद बांधून मंदील घातला होता. अर्पणावर यांनी हात ठेवले होते, यांच्या कानाला, हातापायाच्या अंगठ्याला रक्त लावले गेले होते व यहोवासाठी पवित्र केले गेले होते. नाही, हे शक्य नाही!

यांच्यावर कुणी हल्ला केला की काय? की त्यांच्या तंबूत कुणी त्यांचा खून केला? की खुद्द देवाने नुकतेच त्यांना पवित्र करून आता अग्नीने नष्ट केले?


नादाब व अबीहूचे पाप


नादाब व अबीहू यांनी काय पाप केले असावे याबाबत अनेकांनी निष्कर्ष काढले आहेत. नुकतेच दिलेल्या नियमानुसार त्यांच्यासाठी मद्यपान वर्ज केले असल्याने (लेवी १०:८ ते ११) त्यांनी दारू पिऊन धूप अर्पण केला असावा किंवा परम पवित्र स्थानात जाण्याचा प्रयत्न केला असावा असे तर्क काढले जातात. त्यांचा काहीही गुन्हा असला तरी आपल्याला ठाऊक आहे की यहोवासमोर  “त्यांनी अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती ” (लेवीय १०:१). जे न करण्याची आज्ञा देवाने दिली तिच्यामुळे त्यांचा अंत झाला. ते स्वत:हून त्यांना बरे दिसले तशा रीतीने देवाच्या जवळ गेले.


आणि शिक्षा तत्काळ मिळाली जी अगदी न्याय्य होती. त्यांनी आपली धुपाटणी घेताना स्वत:ला  मुभा दिली आणि “तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले” (लेवीय १०:२).

उपासना ही सुरक्षित नाही

आजच्या दिवसात असे दिसते की सर्वसमर्थ देव हा किरकोळ, बेफिकीर आहे अशी भावना असते. आपण देवाला भेटायला आलो यापेक्षा कित्येक स्त्रियांना मेक-अप ची जास्त फिकीर असते तर पुरुषांना सर्व्हीसनंतर कोठे जाणार याची. यामागची कल्पना असते की, रविवारी आपण आपला मौल्यवान वेळ बाजूला काढून दिला यामुळे देव समाधानी आहे – कृतज्ञ सुद्धा आहे. काही जण तर आपल्या बिछान्यातून न उठता आठवड्यामागून आठवडे ऑन लाईन सर्व्हीस पाहतात आणि यातही देव नेहमी खुश आहे असे मानतात.


भीतीयुक्त आदर कोठे गेलाय? त्याला गमावून टाकण्याचा धोका केव्हा आला? ख्रिस्ती म्हणवणाऱ्या बऱ्याच लोकांना, “मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे?” (मलाखी १:६) असे विचारण्याचा अधिकार देवाला नाही का? हे मी नियमित चर्चला जाणाऱ्या लोकांना विचारत आहे: तुम्ही भीत आणि कापत देवासमोर जाता का? हे मी मला विचारतो, पवित्र देवासमोर, यहुदाच्या सिंहासमोर मी दर रविवारी जाणीवपूर्वक भक्ती करतो का?


नादाब व अबीहू यांच्या प्रकाशात पहिले तर हजारो जन जे रविवारी जमतात त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणजे गैरहजर राहणे हेच असावे असे दिसते.


भीतीयुक्त आदर हरवलाय


जुन्या करारामध्ये नादाब व अबीहू आणि नव्या करारात हनन्या व सप्पीरा यांच्यावर (प्रेषित. ५:१-११) न्यायाच्या विजेने आघात केला (प्रेषित ५:११). त्यावेळी  पहिल्या मंडळीने दिलेला हाच प्रतिसाद आपल्याकडूनही दिला जावा. “ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले”


मला देवाच्या उपासनेमध्ये बहुधा अशी  भीती व  आदर नाही यामुळे मी दु:खाचा सुस्कारा टाकतो. त्याच्या समक्षतेमध्ये यशया मोठ्याने म्हणाला, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे”  (यशया ६:५). इयोबाने आक्रोश केला, “मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे; म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे” (४२:५-६). पेत्र म्हणाला  “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे” (लूक ५:८).

जिवलग शिष्य लिहितो, “मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो” (प्रकटी १:७)


आता हे दररोज घडणारे देवाचे अनुभव नाहीत हे मान्य आहे – पण आपण कधीतरी असा प्रतिसाद देतो का?


मृतांचा संदेश


जर आजच्या दिवसातले नादाब व अबीहू आपल्या मंदिरामध्ये मधल्या जाण्याच्या वाटेवर मरून पडले असते तर आपली उपासना कशी बदलून जाईल?

जर दहशतीच्या किंकाळ्यांनी आपल्याला घेरले आणि जळलेल्या संदेशामध्ये लिहिलेले असते की:

“ख्रिस्ती मंडळ्यानो ऐका, स्वर्ग आणि पृथ्वीच्या भस्म करणाऱ्या अग्नीला क्षुल्लक लेखणाऱ्या दोघांची प्रेते इथे पडली आहेत. उच्च स्थान असलेले दोघे, मोठी उमेद असणारे दोघे, खुद्द अहरोनाचे दोन पुत्र देवाच्या न्यायामध्ये नाश पावले आहेत. त्यांना पाहा, त्यांच्यासाठी रडा. त्यांच्यापासून शिका.”

त्यांच्या निचेष्ट आकृतीमध्ये लिहिलेला संदेश वाचा. “जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” (लेवीय १०:३).


सेवकांनो, आज जे तुम्ही उपासनेत देवाजवळ येता ते तुम्ही पाहा; माझ्या क्रोधाने भस्म झालेल्या या दोघांना. तुम्ही मेंढपाळाच्या काठीशी खेळायला धजाल का? खोट्या शिक्षणाच्या अनधिकृत अग्नी घेऊन तुम्ही माझ्यासमोर येणार का? याहून मोठ्या न्यायाचा धोका तुम्हाला मिळाला नाही का? तुम्ही स्वत:ला, तुमच्या शिक्षणाला, आणि तुमच्या मेंढरांना जपा अशी आज्ञा तुम्हाला मिळाली नाही का? माझ्या समक्षतेमध्ये तुम्हाला – वचनाचे शिक्षण द्या; स्वत:चे नाही – असा आदेश तुम्हाला मिळाला नाही का? पुलपीट हे सुरक्षित आहे ही आशा खोटी आहे. किंवा  देवाला भयाने सन्मान न देता सहज फिरत भक्तीला येणाऱ्या, दुर्लक्ष करणाऱ्यांना मी आज्ञा दिली नाही – अशी नाश करणारी जवळीक दाखवणाऱ्या लोकांनो, “ माझ्या निवडलेल्या सेवकांची ही प्रेते पाहा. जर मी यांना माझ्या धार्मिक नि:पक्षपाताने वागवले तर तुम्ही सुटणार आहात का?


भीत आणि कापत


देवाची उत्तुंग प्रीती, ख्रिस्ताचा उबदार कळवळा, इमानुएल (आमच्याबरोबर देव) हे आशीर्वादित नाव मानवप्राण्यांना अनादराने देवापुढे येण्यास परवानगी देत नाही. आपला उत्तम याजक येशू याच्याद्वारे आपण दयासनापुढे धैर्याने प्रवेश करू शकतो – पण त्याच्याशिवाय कधीच नाही आणि त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करून तर कधीच नाही.


इस्राएल लोकांच्या उपासनेपेक्षा आजच्या उपासनेची किंमत कमी झाली नाही. कारण ज्या देवाची आपण भक्ती करतो त्याचे पावित्र्य कमी झालेले नाही. मॅथ्यू हेन्री यांनी म्हटले आहे, “ जर देवाला आपल्याकडून गौरव आणि पावित्र्य दिले गेले नाही तर तो आपल्यावर गौरवी आणि पवित्र होईल. जे त्याच्याशी खेळ खेळतात  आणि त्याचे पवित्र नाव भ्रष्ट करतात त्यांचा तो सूड उगवील.”


म्हणून लेवीय १० मधील कलेवरे छावणीबाहेर आपल्या पुढून जात असताना आज ती आपल्यापुढे एक प्रश्न मांडत आहेत : नादाब आणि अबीहू यांच्या पवित्र देवाची आपण उपासना करतो का? 

Previous Article

विश्वाचे सर्वात मोठे दोन प्रश्न

Next Article

अनपेक्षित व गैरसोयींसाठी देवाची योजना

You might be interested in …

आत्म्याचे फळ – सौम्यता

पुरुषांनो सौम्य असा  डेविड मॅथीस  विविध प्रकारचे सामर्थ्य हे देवापासून मिळालेली दान आहे व ते त्याच्या राज्याच्या वाढीसाठी लोकांनी वापरायचे आहे. इतर चांगल्या देणग्यांप्रमाणेच ते सामर्थ्य  योग्य प्रकारे वापरले नाही तर ते नाशकारक असते. सामर्थ्याच्या […]

गेथशेमाने बाग

लेखांक ३                                     ब –  प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]