नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ८

बायबलमधील करारांचा तपशीलवार अभ्यास

देवाने केलेले करार त्याच्या राज्याच्या योजनेची उकलून सांगणारी साधने आहेत. करार म्हणजे दोन पक्षांनी अटी व नियमांनी मान्य केलेला, मोडता न येणारा जाहीरनामा असतो. पण बायबलमधील एक सोडल्यास सर्व करार सार्वकालिक असून देवाने एकट्याने मानवाशी विनाअट केलेले करार आहेत आणि आजवर तो ते पाळत आला आहे.

विना अट असलेले करार आहेत :

१- नोहाशी केलेला करार  
२- अब्राहामाशी केलेला करार
३-याजकीय करार
४- दाविदाशी केलेला करार
५- नवा करार.
तर  ६वा करार अटींसह असून तात्पुरता आहे, तो आहे मोशेशी केलेला करार.
हे सर्व करार वचनात स्पष्ट आढळतात.  अनेक लोक कर्मांचा करार, मुक्तीचा करार, कृपेचा करार अशा शीर्षकांखाली देव युगारंभापूर्वीची तारणाची योजना आदामाच्या पतनापासून कशी राबवत आला आहे याविषयीची सत्ये शिकवतात. पण वचनात अशा कराराचे स्पष्ट संदर्भ नाहीत. त्यामुळे विषयानुरूप वरील करार अभ्यासताना गोंधळ उडू शकेल. आणि देव या करारांमधून जे दाखवून देऊ इच्छित आहे ते पुढे येणार नाही. त्यामुळे देवाची इस्राएलांविषयी व मंडळीविषयी देवाची जी खास भावी योजना आहे ती डावलली जाईल. म्हणून तारणाच्या इतिहासात वचनात दिलेले करार कसे उलगडत जातात हे पाहणे फारच बोधाचे, रोचक आणि सुस्पष्ट होईल.
चला तर पाहू या वचनातील एकेक करार.

१ नोहाशी केलेला करार

निर्माणकर्त्या देवाची कृतज्ञतेने आराधना व सेवा करण्यास मानवाला देवाने निर्माण केले होते. त्यामुळे आरंभापासून मानव देवाच्या कृपेखाली आहे. उत्पत्ती ६:१८ मध्ये प्रथमच आपण करार या शब्दाचा उल्लेख वाचतो. तेथे देव नोहाशी करार करण्याविषयी सूचकपणे बोलतो आणि उत्पत्ती ९: ९-१७ मध्ये प्रत्यक्ष तो करार स्थापित करतो आणि त्याला युगानुयुगीचा, सार्वकालिक करार असे संबोधतो. या कराराचा संबंध
अ- उत्पत्तीशी
ब- मानवाच्या अधमतेशी, उत्पत्ती ६: ५-१३
क- नोहावर झालेल्या देवाच्या कृपेशी, उत्पत्ती ६:८  व
ड- नोहाच्या यज्ञाशी आहे. उत्पत्ती ८ : २० -२१ .  
(कृपया ही वचने वाचा म्हणजे विवेचन समजायला मदत होईल.)

अ- या करारात मानवासाठी निसर्गात देवाने अनेक तरतुदी केल्याचे आढळते. देव येथे निसर्गात स्थिरता ठेवण्याचे   
     आश्वासन देत आहे. पुन्हा तो विश्वव्यापी जलप्रलय आणणार नाही याची हमी देत म्हणतो, “पृथ्वी राहील  
     तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत”
     (उत्पत्ती ८: २२). हे स्थैर्य निसर्गात असल्याने जलचक्र नियमित चालते, मानवाला मोसम कळतात. हे सर्व
     आशीर्वाद निर्मितीला या कराराने प्राप्त झाले आहेतच. शिवाय देवाची त्याच्या राज्याविषयीची योजना
     नोहाच्या व्यासपीठावरून उलगडत अंमलात येत असल्याचेही आपण पाहतो. या कराराच्या पायावर    
     बायबलचे इतर करार रचून पूर्ण होत असल्याचे लक्षात येते.      
ब- “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.” ह्या आदामाला दिलेल्या आज्ञेची नोहापुढे देव
      पुनरावृत्ती करतो. जलप्रलयानंतर नोहा आदामाप्रमाणे कार्यरत दिसतो.  
क- पक्षी, प्राणी, जलचर  यांना देव मानवाचे भय धरायला भाग पाडतो.
ड – येथून पुढे पशुसुद्धा मानवाचे खाद्य बनले. उत्पत्ती ९;२.     
ई- मानव देवाचे प्रतिरूप असल्याचे अधोरेखित करण्यासाठी मानवाचे जीवन पवित्र असल्याने मानवाने अगर
     प्राण्यांनी मानवाची हत्या करू नये अशी देवाने आज्ञा दिली.
फ- देवाचे प्रतिरूप असलेल्यांची हत्या करणार्‍यांवर देवाने शिक्षामोर्तब केले. उत्पत्ती ९:४-६.
ग- संपूर्ण पृथ्वीचा जलप्रलयाने पुन्हा नाश न करण्याची देवाने हमी दिली. उत्पत्ती ९:१५.
    देवाने केलेला हा विना अट सार्वकालिक करार देव आजतागायत पाळत आला आहे. मानव आजही  
    निसर्गातील या स्थैर्याचा अनुभव घेत आहे.२ पेत्र ३:१०-१३ नुसार पृथ्वी अग्निसाठी राखली आहे तोवर हा    
   करार चालू राहील.

२. अब्राहामाशी केलेला करार
नोहाशी केलेला करार देवाच्या उद्दिष्टाचे एक व्यासपीठ होता. तारणाच्या योजनेच्या पूर्ततेसाठी देवाने नोहाचे कुटुंब वाचवून मानवजात राखली होती. ही सैतानाच्या मानवजात भ्रष्ट करण्याच्या कुयुक्तीला मोठी चपराक होती. आता अब्राहामाशी केलेला करार लोकांच्या तारणाच्या व पुनरुद्धाराच्या देवाच्या योजनेचा तपशील देतो. या जीर्णोद्धाराची अभिवचने तीन टप्प्यात दिली आहेत.
अ- अब्राहामाला भूमी
ब- अब्राहामाचे अगणित संतान
क- संपूर्ण विश्वाला आशीर्वाद

शिवाय देव पुढे जे करार करणार होता त्याविषयीची अभिवचने देणारा हा मूलभूत व सार्वकालिक करार आहे. उत्पत्ती १२:१-३ मध्ये आपण हा करार वाचतो.
१- देव अब्राहामापासून महान राष्ट्र करील असे म्हणतो. हे तो अब्राहाम, इसहाक याकोब यांच्या संतांनापासून
    उदयास येणार्‍या राष्ट्राविषयी बोलतो.  
२- देव त्याला अभिवचन देतो की तो आशीर्वादित होईल. त्याचे नाव महान होईल.
३- अब्राहाम इतरांना आशीर्वाद होईल.
४- देव इतरांना आशीर्वाद देईल. ते अब्राहामाला कसे वागवतात यावर तो आशीर्वाद अवलंबून असेल.
५- अब्राहाम व त्याच्यापासून येणारे राष्ट्र जगातील सर्व कुटुंबांना व राष्ट्रांना आशीर्वाद होतील.

अशा प्रकारे अब्राहाम व इस्राएलांचा वापर विदेश्यांना आशीर्वाद होण्यासाठी केला जाईल. या करारात अब्राहामाने काहीही करण्याची त्याला अट घातलेली नाही. नोहाशी केलेल्या करारातही नोहाने काहीही करायचे नाही. दोन्ही करार एकतर्फी आहेत.           

हाच करार उत्पत्ती १२:६-७; १३:१४-१७; १५:१-१८ विस्ताराने ही अभिवचने देऊन पुन्हा सांगितला आहे. ही भूमी सर्वकाळासाठी देण्याचे भावी कालाविषयी अभिवचन देताना देव अब्राहामाला संरक्षण व पारितोषिक देण्याचे अभिवचन देतो. अध्याय १५ मध्ये वधलेल्या पशूंमधून चालण्याचे चिन्ह देऊन हा करार पाळण्याची देव हमी देतो. उत्पत्ती १५: १८-२१ वचने मिसरातील नदीपासून ते फरात नदीपर्यंतचा विस्तार मांडतात.

उत्पत्ती अध्याय १७ मध्ये या कराराचा आणखी तपशील दिला आहे. त्यात १-७ वचनामध्ये देव अब्राहामाचे संतान बहुगुणित करील, तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल त्याच्यापासून राजे उदयास येतील असे सांगितले आहे. तेव्हा दाविदाशी होणारा करार गृहीत धरून त्याच्या राजघराण्यावर प्रकाशझोत टाकल्याचे स्पष्ट होते. २ शमुवेल ७:१२-१८. संपूर्ण कनान देश देण्याचे अब्राहामाला वचन दिले आहे.  सुंता हे त्या कराराचे चिन्ह आहे.

उत्पत्ती २२:१५-१८ मध्ये देव पुन्हा याच कराराची अब्राहामाशी पुनरावृत्ती करतो व त्याच्या संततीपासून्न पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होण्याचे वचन देतो. अब्राहाम, इस्राएल राष्ट्र व विदेशी लोकही देवाचे लोक म्हणून आशीर्वादित होण्याची देव कराराच्या या वचनामध्ये हमी देतो.

कराराची ही वचने जरी इस्राएलावर केन्द्रित दिसत असली तरी ती फक्त इस्राएलांना लागू नाहीत. तर विदेश्यांचाही या आशीर्वादात समावेश आहे. विशेष हे की सुंता होण्यापूर्वीच १५:६ मध्ये अब्राहाम नीतिमान ठरला गेला हा फार महत्त्वाचा भाग आहे. रोम ४:३; गलती ३:७-९ या वचनानुसार तारणाने विदेश्यांचा मंडळीत समावेश होण्याशी या कराराचा संबंध जोडलेला आहे. अब्राहामाच्या सुंतेचा समय ह्या कारणास्तव फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो विश्वास ठेवणारे यहूदी व विश्वासाने तारण पावलेले विदेशी या दोहोंचा पिता ठरतो व हे दोन्ही गट अब्राहामाचे संतान गणले जातात. गलती ३:२९. त्यामुळे अब्राहामाचा करार हेच सूचित करतो की विश्वासाने कृपेच्या द्वारे अनेक प्रकारचे लोक तारण पावणार आहेत. ते आज घडत असल्याचे आपण पहातो. पण देवाच्या मंडळीत तो त्यांचे स्वतंत्र अस्तित्व राखत असल्याचे आपण अभ्यासात पाहतो. मरीया येशूला अब्राहामाच्या संतांनात गणते. लूक १:५४-५५ . बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा पिता जखर्‍या पवित्र आत्म्याने पूर्ण असता देवाच्या या कराराचे स्मरण करतो. लूक १:६७; ७२-७४ . मरीया व जखर्‍या दोघेही इस्राएलांना त्यांच्या शत्रूंपासून देव मुक्त करणार असल्याची आशा व्यक्त करतात. त्यामुळे मंडळीला आत्मिकदृष्ट्या इस्राएल न समजता व या वचनांचा  विपर्यास न करता आपण हे ठाम लक्षात ठेऊ या की इस्राएल राष्ट्रासंबंधी ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासमयी त्यांच्या बाबतीतला कराराचा हा भाग पूर्ण होणार आहे.           

                                                             प्रश्नावली                                                                                      

प्रश्न १ ला – पुढील प्रश्नाची उत्तरे द्या.                                                                       

१- करार म्हणजे काय?                                                                                                 
२- नोहाच्या कराराचा संबंध कोणत्या चार गोष्टींशी आहे?                                           
३- नोहाच्या करारानुसार निर्मितीला निसर्गाचे कोणते आशीर्वाद सातत्याने आजतागायत मिळत आहे?         
४- देवाने नोहापुढे कोणत्या जुन्या आज्ञेची पुनरावृत्ती केली? (पान ३)                                  
५- मानवाने मानवाची हत्या न करण्याची आज्ञा देवाने का दिली?                                          
६- मनुष्यहत्या करणार्‍यांवर कोणी शिक्षा मोर्तब केली? उत्पत्ती ९:४-६                                                   
७- नोहाच्या करारात देव कोणती हमी देतो? उत्पत्ती ९:१५ ; २ पेत्र ३:१०-१५                                            
८- नोहाचे कुटुंब वाचवण्यामागे देवाचा कोणता महत्त्वाचा हेतू होता? पान२                        
९- अब्राहामाच्या करारातील ३ टप्पे कोणते? पान२                                        
१०- अब्राहामाला दिलेल्या अभिवचनात देव कोणत्या ५ गोष्टी सांगतो?                       
११- येशू मानवधारी झाला तेव्हा कोणी अब्राहामाच्या कराराचे स्मरण केले? पान ३                       
१२- मरीया व जखर्‍या कोणत्या आशा व्यक्त करतात? पान ३                                
१३- अब्राहामाच्या कराराची देवाने त्याला किती वेळा पुनरावृत्ती केली? उत्पत्ती १२-२२ अध्याय         

प्रश्न २ रा. चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करा.                              

१- नोहाच्या करारानंतर देव पुढील एकेक कराराने त्याची योजना उलगडत कार्यरत असलेला दिसतो—-
२- देव पुन्हा जलप्रलयाने पृथ्वीचा नाश करील——                                       
३- देवाने नोहापुढे आदामाला दिलेल्या आज्ञेची पुनरावृत्ती केली——-                            
४ – मानव निर्मितीपासून मांसाहारी होता—–                                             
५ – निसर्ग देवाची आज्ञा मोडतो——                                                                              
६ – आजवर देवाने एकही करार मोडलेला नाही——                                          

७- अब्राहामाच्या करारात देवाने दाविदाच्या राजघराण्यावर प्रकाश टाकला आहे. ——                    
८ – सुंता हे अब्राहामाच्या कराराचे चिन्ह आहे. ——-   पान ३                                           
९- अब्राहाम सुंता झाल्यानंतर नीतिमान ठरला.——                                        
१०- अब्राहाम फक्त इस्राएलांचा पिता आहे. ——                                          
११- मानवजात भ्रष्ट करून मशीहा जन्माला येऊच नये ही सैतानाची योजना देवाने जलप्रलयाने उधळून लावली-

प्रश्न ३ रा- कंसातील योग्य संदर्भ पुढील करारांसमोर लिहा.
( निर्गम २४:६-८; लूक २२:२०; उत्पत्ती ६:१८ व ९: ९-१७; यिर्मया ३१:३१-३४; २ शमुवेल ७:९-१२;
  उत्पत्ती १२:१-३; गणना २५:१०-१३)        

१- नोहाचा करार—— २- अब्राहामाचा करार—- ३- मोशेचा करार—- ४- याजकीय करार—-          
५- दाविदाचा करार—-६- नव्या कराराचे भाकीत——– ७- नव्या कराराची पूर्तता——          

प्रश्न ४ था – पुढील कंसातील वर्णंनांपुढे खालीलपैकी योग्य संदर्भ लिहा.
१- इस्राएल व विदेश्यांना आशीर्वादित करण्याची वचने——–
२- अब्राहामाचा उपयोग विदेश्यांच्या तारणासाठी ——  
३- पृथ्वी अग्नीसाठी राखली आहे—–
४- तारणाने विदेश्यांचा मंडळीत प्रवेश——
५- अब्राहामाच्या कराराचे चिन्ह——                                                                           

(अ- २ पेत्र ३:१०-१३;  ब- उत्प १२;१-३;  क– उत्प १७:१-७;  -उत्प २२;१२-१८;  ई- रोम ४:३ व
गल ३:७-९) 

Previous Article

पुनरुत्थानदिन दहा प्रकारे सर्व काही बदलतो

Next Article

आपल्या प्रार्थना देवदूत देवाकडे नेतात का?

You might be interested in …

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा

दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

वनिथा रिस्नर आपण लवकरच मरणार आहोत हे ठाऊक असताना आपण कसे जगावे? अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक दिवस आपण मरणार आहोत. पण आपल्याला लवकरच मरण येणार आहे – आपल्याला जर काही आठवडे, महिने […]