Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जुलाई 20, 2021 in जीवन प्रकाश

विस्कटलेल्या कुटुंबातील मुलांसाठी आशा

विस्कटलेल्या कुटुंबातील मुलांसाठी आशा

जॉन पायपर

एका चवदा वर्षांच्या मुलाचा प्रश्न-

पास्टर जॉन, भीतीसंबंधी मला एक प्रश्न आहे – स्पष्टच सांगतोय की मला बायबल आणि प्रार्थनेद्वारे देवाजवळ जाण्यास भीती वाटते. मला देवाशी संबंध जोडावा अशी खूप इच्छा आहे पण तरीही सतत त्याच्यापासून मी दूर जातो. मला जी जवळीकतेची भावना वाटावी ती वाटत नाही. ह्याचे कारण माझ्या आईवडिलांसोबत माझे चांगले संबंध नाहीत हे असावे. माझी आई पूर्वी व्यसनाधीन असायची. आणि माझा अगदी आतापर्यंत वडिलांशी काहीच संबंध नव्हता. ते पण अस्थिर आहेत. आमच्या कुटुंबाचा विचका झाला आहे. अशा कुटुंबावर देवाशी संबंध ठेवताना कसा परिणाम होतो?

उत्तर

आपला तरुण विचारतो विस्कळीत कुटुंब देवाशी नात्यावर कसा परिणाम करते? यासाठी बायबलमधून ५ छोटी निरीक्षणे तुमच्यासमोर मांडतो. यामुळे त्याला आशा आणि स्थिरता मिळू शकेल अशी मी आशा करतो.

. पालकांचा दोष मुलांमध्ये उतरत नाही.

तुमच्या मनात आणि ह्रदयात हे पक्के ठसू द्या की अधार्मिक पालकांचा दोष देवभीरू  मुलांना चिकटून राहत नाही. “जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही” (यहेज्केल १८:२०). आता अनुवाद ५:९ मध्ये  देव म्हणतो की, “मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो.” या वचनाशी वरील वचनाची गल्लत करू नका. याचा अर्थ असा आहे की जेथे बापाच्या दोषाचे पाप  मुलामध्ये चालूच राहते तेव्हा देव न्याय करणार आहे. याचे प्रमुख विधान आहे “जे माझा द्वेष करतात” जेव्हा बापाच्या दुष्टतेचे पडसाद मुलांच्या द्वेषामध्ये पडतात तेव्हा न्याय होणारच.

म्हणून आपल्या तरुण मित्रासाठी हे अद्भुत सत्य आहे की त्याच्या आईचे किंवा वडिलांचे पाप त्याला चिकटून राहिलेले नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही. तो देवासमोर ख्रिस्तामध्ये त्याच्या स्वत:च्या विश्वासाद्वारे उभा आहे. ख्रिस्तामुळे त्याचा स्वीकार झाला आहे, त्याच्यावर प्रीती केली आहे, त्याची क्षमा केली आहे आणि त्याचा दोष दूर केला आहे. हे निर्णायक आहे. आता त्याला एक स्थान आहे. दृढ स्थान – ज्यावर तो उभा राहून आव्हान स्वीकारू शकतो.

२. अपयशी पालकांना सुद्धा नीतिमान मुले असू शकतात.
बायबलमध्ये दिलेले २ राजे व २ इतिहास  या पुस्तकातील वृत्तांत लक्षात घ्या. दुष्ट राजे आणि यहूदाचे अपयशी राजे यांना मुले झाली आणि ते चांगले राजे बनले.

  • आसाने देवाच्या दृष्टीने योग्य ते केले, पण त्याचा बाप अबीयाम दुष्ट होता.
  • उज्जीयाने योग्य ते केले पण त्याचा बाप अमस्या त्याच्या उतारवयात चुकला.
  • हिज्कीयाने देवाच्या दृष्टीने योग्य ते केले पण त्याचा बाप आहाज हा दुष्ट होता.
  • योशियाने योग्य ते केले पण त्याचा बाप आमोन दुष्ट होता.

दुसर्‍या शब्दात बायबल साक्ष देते की देवाच्या जगात अनेक अपयशी बापांना नीतिमान आणि उपयोगी पडणारी मुले झाली. येशूने म्हटले, “मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास… एका घरातील ‘मुलाविरुद्ध बाप’ व ‘बापाविरुद्ध मुलगा’… अशी फूट पडेल.”
(लूक १२:५१, ५३).

विश्वास ठेवल्यामुळे कुटुंबामध्ये असेच घडेल. म्हणून आत्मघातकी विचार करू नका. अपयशी पालकांची संतती नेहमीच अपयशी असते म्हणून मला आशा नाही असा विचार करू नकोस.

३. ख्रिस्त हा कोणतेही वांशिक शाप मोडून टाकतो.

आता याचे कारण असे आहे: वांशिक शाप ख्रिस्तामध्ये मोडले जातात. पाप आणि बिघाड यामुळे कुटुंबांच्या कित्येक पिढ्या नाश पावत असतील, इतके की लोकांना असहाय वाटू लागते. “ आमच्यावर शाप आहे” असे मला लोक सांगतात. एकदा एकाचे मूल ३१ डिसेंबरच्या रात्री मरण पावले.  मी लगेचच त्यांना भेटायला गेलो. बाकी सगळे जण चर्चमध्ये नवे वर्ष साजरे करत होते. मला त्या पित्याने हॉलमध्ये थांबवले आणि विचारले, “देव कुटुंबाना शाप देतो का? आमच्या कुटुंबात सतत समस्या येत आहेत. आम्ही शपित आहोत. आम्हाला काही आशा नाही. यामुळेच आमच्या कुटुंबात सारखे काहीतरी चुकीचे घडत राहते.” त्यांचे म्हणणे काहीसे असे आहे, “बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले” (यिर्मया ३१:२९). आणि यिर्मया म्हणतो, “असे म्हणू नका. इस्राएल असे बोलत नसतो”

ख्रिस्त हा महान शाप भंग करणारा आहे कारण गलती ३:१३ मध्ये पौल म्हणतो, “आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. “आता जर देवाने त्याच्या नियमशास्त्रामध्ये नेमलेल्या शापापासून ख्रिस्ताने आपली सुटका केली आहे तर तुमच्या कुटुंबावर असलेल्या कित्येक पिढ्यांचा प्रत्येक शाप, मायाजल, मोहिनी, मंत्र हे तो किती विशेषकरून मोडून टाकील?

म्हणून आपल्या ह्या मित्राने अशी मानसिकता ठेवावी : देवाने मला बोलावले आहे – १४ वर्षांच्या मला – त्याच्याकडे बोलावले आहे. ह्या शापित, भग्न आणि विस्कटलेल्या कुटुंबातून. ही माझी वेळ आहे. हे माझे पाचारण आहे. त्याने  मला हा शाप मोडून टाकण्यासाठी उभे केले आहे. आतापासून मी येशूचा आहे. मला स्वर्गात एक पिता आहे जो परिपूर्ण आहे. मी त्याच्या सामर्थ्याने नवी पिढी उभारेन. अशी मानसिकता त्याने बाळगावी.

४. पापामुळे  प्रत्येकाचा देवाविषयीचा आणि स्वत:विषयीचा दृष्टिकोन डागाळला जातो.

हे लक्षात घ्या की आपण सर्वजण देव कोण आहे, ख्रिस्त कोण आहे याविषयीची एक विकृत प्रतिमा घेऊन देवाकडे येतो हे देवाला गृहीत आहे. दुसर्‍या शब्दांत तुमच्या विकृत पालकत्वामुळे तुमचा देवाविषयीचा दृष्टिकोन विकृत झाला आहे हे बरोबर नाही असा विचार करू नका. ते नेहमीपेक्षा वेगळे नाही. ते सार्वत्रिक आहे. पापाने सर्वांचा देवाविषयी नि स्वत:विषयीचा दृष्टिकोन बिघडवून टाकला आहे. प्रत्येक जण येशूकडे येतो तो एक देवाविषयीचा विकृत, अकार्यक्षम, क्षुद्र दृष्टिकोन घेऊन. पापाने हेच केले आहे. मग सर्व जीवनभर आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो.

याचा अर्थ आपण सर्वानीच आपल्या मनात आणि अंत:करणात देवाच्या भूमिकेसंबंधी आपण जो विचार करतो त्यासंबंधी एक प्रचंड क्रांतीचा अनुभव घ्यायला हवा. काही लोकांमध्ये देवासंबंधी एक विकृती असते तर काही लोकांमध्ये दुसरी. आणि होय, यामध्ये आपल्या पालकांचा याच्याशी काही सबंध आहे आणि तसेच दुसर्‍या अनेक गोष्टींचाही. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी पवित्रीकरणाची क्रिया हीच आहे  “प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत” (२ करिंथ ३:१८). याचा अर्थ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने प्रत्येक विचारासाठी, आपल्या मस्तकासाठी शास्त्रलेखांनी न्हाऊन घ्यायला हवे. प्रत्येक विचार शुद्ध होण्याची गरज आहे, प्रत्येक विचाराचे समायोजन होण्याची गरज आहे. पौल म्हणतो, हे ख्रिस्ताकडे पाहण्याने आणि पाहण्याने आणि पाहण्यानेच आणि ख्रिस्तामध्ये देव पाहण्याने होते.

म्हणून आपल्या तरुण मित्राला मी म्हणतो, “आम्हा सगळयांना सामील हो आणि बायबल जसे देवाला तुझा पिता, तुझा मेंढपाळ, तुझा मित्र म्हणून वर्णन करते तसे त्याच्याकडे तुझे डोळे स्थिर कर. आणि तुझ्या विचारात एवढी क्रांती होण्याची गरज आहे म्हणून तू इतरांपेक्षा वेगळा आहेस असा विचार करू नकोस. तू वेगळा नाहीस तू सामान्य आहेस.

५. जरी आपण बरे झालो असलो तरी व्रण कायम राहतात.

आणि शेवटची गोष्ट मला सांगायची की आपल्यातील बहुतेक सर्वजण आपल्या पूर्वीच्या अनुभवामुळे अपंग झालेलो आहोत.  – लज्जा, धिक्कार, सर्व प्रकारचा अनुचित व्यवहार किंवा आघात यांच्या खोल अनुभवामुळे. मी लहान असतानाचे काही  भयानक अनुभव मला आठवतात – माझ्या आईवडिलांमुळे नाही पण इतरांमुळे.

आपल्याला या जखमांचा वास्तव दृष्टिकोन असायला हवा. हे त्या याकोबाचा जांघेचा सांधा  उखळल्यासारखे आहे (उत्पत्ति३२:२५). आपण आपले उरलेले आयुष्य एका भावनिक अधूपणात लंगडत चालणार आहोत. याचा अर्थ असा नाही की, आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याशी येशूद्वारे एक खोल, समाधानकारक प्रीतीत चालण्याचा अनुभव येणार नाही. याचा एवढाच अर्थ की आपण वास्तववादी असायला हवे. जखमा बऱ्या झाल्या तरी व्रण राहतीलच आणि जरी त्यामुळे आपण लंगडे झाले असलो तरी त्या आपल्याला  ख्रिस्ताच्या गौरवाकडे वळवू शकतात.