Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 30, 2023 in जीवन प्रकाश

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

 लेखांक ८

मोशेशी केलेला करार

अ- वचनदत्त कनान देशात राष्ट्र म्हणून जाण्यासाठी इस्राएलांस योग्य आचरण ठेऊन शासन चालवण्यासाठी देव मिसरातून सुटका झाल्यावर मोशेद्वारे इस्राएलाशी हा करार करीत आहे. निर्गम १९:५- ६. अध्याय २४ मध्ये रक्त शिंपडून ७० वडील जनांसह देवाच्या सन्निध्यात हा करार प्रत्यक्ष करण्यात आला. अध्याय १९:१६-२५ मधील घटनेत देवाच्या सान्निध्यात राष्ट्र आले. २०:१-१७ मध्ये देवाने त्यांना दहा आज्ञा दिल्या. तेव्हा पवित्र देवाच्या सान्निध्याच्या अनुभवाने आदरयुक्त भयातून त्यांच्या विनंतीनुसार त्यांच्या ७० प्रतिनिधींसोबत २४ व्या अध्यायात हा करार झाला. यात लोकांवर देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची अट होती. म्हणून हा एकच मानवाशी अटीसह केलेला करार होता. २१-२३ अध्यायांमध्ये राष्ट्र म्हणून त्यांना समाजजीवनाचे नियम देवाने दिले. अध्याय २५-३१ अध्यायांमध्ये उपासनापद्धत आखून दिली. सुमारे ६१३ आज्ञा यात आहेत. त्या सर्वांचे सार दहा आज्ञांमध्ये आहे. शब्बाथ हा त्या कराराचे चिन्ह होता.

ब- इस्राइल राष्ट्र व देव अशा दोन पक्षांत अटी घालून केलेला हा करार इस्राएलांनी देवाची आज्ञा मोडल्यास रद्द होऊ शकणार होता. या कराराचे आज्ञापालन करणे इस्राएल लोकांस अब्राहामाच्या करारातील आशीर्वादांशी जडून राहण्यास साधन  ठरणार होता. देवावर प्रेम करीत त्याच्या आज्ञा पाळल्यास देव त्यांची आत्मिक व भौतिक भरभराट करणार होता. पण अवज्ञा केल्यास त्याचा परिणाम इतका भयंकर होणार होता की त्यांच्यावर देवाचा न्याय येऊन देवाच्या भूमीतून काढून टाकण्यात येऊन त्यांची जगभर पांगापांग होणार होती. अनुवाद अध्याय २८,२९ .

क- मोशेचा करार हा कृपेचा होता. तो तारणाचे साधन नव्हता. तर इस्राएलांनी आपले देवावरील प्रेम व समर्पित निष्ठा दाखवण्याचा तो मार्ग होता. निर्गम २४:१-८  मध्ये इस्राएलांनी आज्ञा पाळण्याचे वचन दिले. पण वचनाच्या नोंदी सांगतात की त्यांनी देवाची अवज्ञा केली. त्यामुळे करारातील शाप त्यांच्यावर आले. दोन प्रकारे त्यांनी अवज्ञा केली एक म्हणजे करारातील साधनांचा वापर करून सत्कृत्यांनी तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. रोम ९:३०-३२. दुसरे म्हणजे पुष्कळांनी देवावरील प्रीतीने, आत्म्याने व खरेपणाने विधी व अर्पणे केली नाहीत. मत्तय ६:६-८. मोशेचा करार पवित्र व उत्तम होता. रोम ७:१२. लोकांचे अंत:करण हीच खरी समस्या होती. मोशेचा करार लोकांचे पाप व अधर्म उघड करत होता. रोम ३:१९-२०; ५:२०; गलती ३:१९; यिर्मया ३१:३१-३२ .

मोशेचा करार येशूच्या रक्तार्पणाने संपुष्टात आला. कारण येशूने मोशेच्या करारातील सर्व अपेक्षा पूर्ण करून स्वत:च्या रक्ताने नवा करार स्थापन केला. लूक २२:२०. ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकास नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. रोम १०:४; २:१४-१५; इब्री ८:१३. मोशेचा करार फक्त इस्राएलांना दिला होता.

येशूने तो पूर्ण करून त्याची समाप्ती केल्याने येशूच्या पुनरुत्थानानंतर स्थापन झालेली ख्रिस्ती मंडळी मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. रोम ६:१४-१५: गलती ५:१८. पण याचा अर्थ ख्रिस्ती माणसे पापमुक्त आहेत असे मुळीच नाही. ते ख्रिस्ताशी जडलेले असून नव्या कराराच्या अधीन आहेत. १करिंथ ९:२०-२१; रोम ७:६. पवित्र आत्म्याच्या साह्याने ते नवीन प्रकारे देवाची सेवा करतात. ख्रिस्ती व्यक्ती कायदेकानूंविरहित नसून नव्या कराराच्या नियमांखाली आहेत. स्वेच्छेने देवाचे आज्ञापालन करायला पवित्र आत्मा त्यांना साह्य  करतो.
म्हणून मोशेचा करार आजच्या काळाला लागू नाही असे म्हणता येणार नाही. कारण संपूर्ण बायबल ईश्वरप्रेरित आहे. ते सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. २ तीम ३:१६. मोशेचा करार देवाचे न बदलणारे गुणविशेष व देवाविषयीची सत्ये उलगडून सांगतो. जीवनाच्या सिद्धान्तांची ती मूलभूत सत्ये आहेत. योग्य जीवन जगण्यासाठी नव्या करारात त्यातील संदर्भ ज्ञानवचने म्हणून दिले आहेत. इफिस ६:१-२. शिवाय देव जी नीतिमूल्ये जुन्या करारात अपेक्षितो त्याचे सातत्य या युगातील विश्वासीयांनीही चालू ठेवावे ही अपेक्षा नव्या करारातही आढळते. दहा आज्ञांमधील चवथी शब्बाथाविषयीची आज्ञा सोडून इतर नऊ आज्ञांचा नव्या करारात पाठपुरावा केला आहे. इस्राएलांनी जरी त्या आज्ञांना वेळोवेळी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली तरी देवभीरू जीवन जगण्यासाठी पाठपुरावा करण्यास विश्वासीयांना त्या प्रेरणा देत राहतात. १ करिंथ १०:६ मध्ये इस्राएलांच्या भटकंतीवरून आपल्याला बोध केला आहे की, “ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.” तर रोम १५:४  मध्ये जाहीर केले आहे की, “धीराच्या व शास्त्रापासून मिळणार्‍या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले, ते आपल्या शिक्षणाकरता लिहिले.

४- याजकीय करार

हा करार गणना २५ मध्ये आहे. तेथे देवाने वचन दिले की प्रभूच्या या भूतलावरील एक हजार वर्षातील मंदिरापर्यंत फिनहासाचे याजकीय घराणेच मुख्य याजकाच्या पदावर सेवा करीत राहील. १ इति. ६:५०-५३. त्या वेळी पुष्कळ लोक बाल पौराच्या नादी लागले असता देव इस्राएलांचा समाचार घेत होता. तेव्हा फिनहास याजकाने एक इस्राएली पुरुष व एक मिद्यानी स्त्री यांचा त्यांच्या अनैतिक कृत्याबद्दल हाती भाला घेऊन संपूर्ण इस्राएल मंडळीसमोर समाचार घेतला. देवाच्या पक्षास राहून आवेशाने केलेल्या या कृत्याबद्दल देवाने त्याचा सन्मान म्हणून या कराराने त्याचेच संतान मुख्य याजकपदावर चालू ठेवण्याचा हा शांतीचा करार केला. गणना २५:१०-१३. सादोकाचे म्हणजेच हे घराणे एक हजार वर्षांच्या राज्यात मंदिरात सेवा करील. यहेज्केल ४४:१०, १५; ४८:११. याजकीय करार हा स्वतंत्र आहे. मोशेच्या कराराचा तो भाग नाही.

अ- याची भाषा नोहा, अब्राहाम, दावीद व नव्या करारासारखी आहे.
ब- मोशेचा करार नव्या करारात रद्द होऊन अप्रचलित झाला. तरी हा करार तसाच आहे.
क- दाविदाशी केलेला करार व यिर्मयातील नवा करार जोवर दिवस रात्रीचे चक्र चालू आहे तोवर राहतील. तसेच या कराराचे आहे. असे यिर्मया ३३:२०-२१ वरून स्पष्ट होते.

                                                
                                                          प्रश्नावली                                                                                  


प्रश्न १ला- पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                          
१- इस्राएलांनी मोशेच्या कराराला काय प्रतिसाद दिला होता? निर्गम २४:१-८                                   
२- इस्राएलांनी कोणत्या दोन प्रकारे देवाची अवज्ञा केली? पान१                                             
३- या करारात खरी समस्या कोणती होती? पान१                                                 
४- मोशेचा करार कसा होता? तो कोणते कार्य करत होता? पान१                                               
५- मोशेचा करार कोणी, कसा संपुष्टात आणला?  पान१                                                     
६- ख्रिस्ती व्यक्ती कोणत्या कराराच्या अधीन आहेत? का?                                                     
७- मोशेचा करार या काळाच्या लोकांना लागू आहे का? का? पान२  व २ तीम ३:१६                                   
८- दहा आज्ञा आज्ञापालनास कशी प्रेरणा देतात? पान २                                                          
९- दहा आज्ञांपैकी किती आज्ञांचा पाठपुरावा नव्या करारात केला आहे?
१०- याजकीय कराराची ३ वैशिष्ट्ये कोणती?                                                      

प्रश्न २रा – धड्यावरून पुढील विधाने चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करा.                                   
१- मोशेचा करार तारणाचे साधन होता——-                                                               
२- मोशेचा करार त्यांची धार्मिकता उघड करत होता——–                                                               
३- मोशेच्या नियमशास्त्राला सध्याची मंडळी बांधील आहे——-                                              
४- मोशेचा करार सध्याच्या मंडळीला लागू नाही——-                                          
                                                                             

प्रश्न ३रा – अ गटाचा क्रमांक ब गटातील योग्य वर्णनापुढे लिहा                                                      
अ गट: १- कराराचे चिन्ह, २- दहा आज्ञा, ३- इस्राएलांनी आज्ञा मोडल्यास, ४- इस्राएलांनी आज्ञा पाळल्यास,
५- देवावर प्रेम व आज्ञापालन, ६- अवज्ञेचा परिणाम.                                   
ब गट : क- आत्मिक व भौतिक भरभराट—— ख- अब्राहामाच्या करारातील सर्व आशीर्वाद—–                         
ग- सर्व आज्ञांचा सारांश—— घ- देवाचा न्याय व जगभर पांगापांग——-म- मोशेचा करार रद्द —                
स – शब्बाथ—-                                                                                         

प्रश्न ४ था – पुढील संदर्भ योग्य वर्णनापुढे लिहा.
निर्गम २०;१-१७, निर्गम १९:५-६, निर्गम २४:३-८, निर्गम अध्याय २५-३१, निर्गम अध्याय २१-२३,  अनुवाद अध्याय २८-२९.                                                              
१- दहा आज्ञा——-२- मोशेच्या कराराची घोषणा— ३- इस्राएलांच्या ७० वडिलांसोबत प्रत्यक्ष करार—–
४- समाजजीवनाचे नियम—- ५- करार पालन / मोडल्याच्या अटी—– ६- उपासनापद्धत——–             

प्रश्न ५ वा – दिलेले संदर्भ वापरून रिकाम्या जागा भरा.
रोम२:१४-१५; १०:४; ६:१४-१५; १५:४; ७:६व १२; ३:१९-२०; ९:३०-३२; गलंती ५:१८; इफिस ६:१-२                                             

१. तुम्ही आत्म्याच्या —– चालवलेले असाल तर तुम्ही ——– च्या —- नाही.                  
२. —— द्वारे कोणी नीतिमान ठरत नाही कारण ——– ने —– ची —- होते.                  
३. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे की,  आपला बाप व आपली————                               
४. जे काही शास्त्रात पूर्वी   ————— लिहिले.                                                   
५. ते —- तील —- आपल्या —— लिहिला आहे असे दाखवतात, त्यांची ——- ही त्यांना साक्ष देते.  
६. आपण —- पासून  —– झालो आहो, म्हणून जुन्या —- धरून नव्हे तर —– च्या —— ने आपण सेवा     
     करतो                                                                       
७. ——- ठेवणार्‍या प्रत्येकाला —— प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त —— ची —— असा आहे.               
८. त्यांना —- म्हणजे —– च्या द्वारे मिळणारे —-   प्राप्त झाले.                                                                    
९. तुम्ही —- नाही तर —— च्या —– आहा म्हणून —– तुम्हावर —- चालवणार नाही. म्हणून आपण —- 
    करावे काय?—- नाही.                                                   
१०. ——पवित्र आहे आणि —– पवित्र, —– व —– आहे.