दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

राजा होण्यास लायक असा पुत्र

स्कॉट हबर्ड


बायबलचे अनेक वाचक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे जातात, अगदी उत्सुकतेने आणि निर्धाराने. पण ते पहिल्या सतरा वचनांमध्येच ठेच खातात. आम्ही एका कहाणीची अपेक्षा करत होतो. एक नाट्यमय गोष्ट, देवदूत, मागी लोक, आणि बेथलेहेमेत जन्मलेलं बाळ; पण त्याऐवजी आम्ही हे पाहतो:

“अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी” (मत्तय १:१).

जर मत्तयाने संपादक म्हणून आपला सल्ला घेतला असता तर आपण त्याला सुचवले असते त्याने १८ व्या वचनापासून सुरुवात करावी.  इथे कहाणी आहे.

पण सत्य असे की मत्तयाचे हे सुरुवातीचे शब्द आपल्याला खूपच महान गोष्ट सांगतात जी आपल्याला पहिल्या दृष्टिक्षेपात दिसत नाही. कारण दाविदाच्या दिवसांपासून देवाचे लोक दाविदाच्या एका पुत्राची वाट पाहत होते. दाविदाचा राजवंश खंड न पडता चालू राहावा व अखेर त्याच्यात अभिषिक्त, ख्रिस्त, याचा दाविदाच्या गावात जन्म व्हावा याची वाट ते पाहत होते. देवाने आपले पुरातन अभिवचन पूर्ण करावे व हे रिकामे राजासन भरले जावे म्हणून ते वाट पाहत होते. दुसऱ्या शब्दांत एक राजा यावा व त्याने राज्य करावे याची वाट ते पाहत होते.

आणि इथे येशू जो दाविदाचा पुत्र त्याच्या वंशावळीमध्ये  मत्तय म्हणत आहे , “आता वाट पाहू नका.”

दाविदाचा वारस

उत्पत्ती ३:१५ पासून देवाच्या लोकांनी एका पुत्राची आशा धरली होती, जो सैतानाचे राज्य उलथून टाकणार होता. जसेजसे दिवस उलटले तशी ही आशा अधिक स्पष्ट होऊ लागली: तो फक्त नोहाद्वारे येणार नव्हता तर शेमाच्या
वंशात,  शेमाच्याच नाही तर अब्राहामाद्वारे, फक्त अब्राहाम नाही तर याकोबाद्वारे, फक्त याकोब नाही तर यहूदा; फक्त यहूदा नाही तर दावीद.

हे कळसाचे अभिवचन २ शमुवेल ७ मध्ये येते जेव्हा देवाने दाविदाबरोबर करार केला.

“ तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन”
(२ शमुवेल ७: १२-१५)

ह्या अभिवचनाचा भव्य आवाका लक्षात घ्या: दावीदाचा मृत्यू झाल्यानंतर देव दाविदाचा एक पुत्र उभा करील जो देवाच्या नामाने मंदिर उभारील. देव त्याच्या पुत्राचे राज्य स्थिर करील. आणि त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.

उरलेल्या सर्व जुन्या करारात हे अभिवचन आकाशातल्या दैदिप्यमान ताऱ्यासारखे झळकत राहाते. दुसरा कोणताही प्रकाश झाकोळून जाईल. इतर कोणताही तारा निखळून पडेल. पण ह्या अभिवचनाचा प्रकाश कधीही अपुरा होणार नाही.

इशायाचा बुंध

पहिल्यादा हे अभिवचन शलमोनामध्ये पूर्ण झाले असे वाटले. तो दाविदाचा पुत्र होता, त्याने मंदिर बांधले. – पण नंतर तो पापात पडला त्याच्या पित्याच्या पापापेक्षा घोर पापात ( १ राजे ११:१-८). प्रत्यक्ष मंदिरापेक्षा काही अधिक हवे होते आणि शलमोनापेक्षा कोणी अधिक महान असण्याची गरज होती (मत्तय १२:४२).

अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या. दाविदाच्या पुत्रांनी राज्य केले आणि दाविदाचे पुत्र मरून गेले. अनेकांनी आपल्या खांद्यावर सत्ता वाहली असे वाटले (यशया ९:६). यहोशाफाट, उज्जीया, हिज्कीया, योशीया. पण तेही त्यांच्या आसनावरून पडले. आणि प्रत्येकाचे पतन दाविदाच्या वृक्षावर कुऱ्हाडीचा घाव घालत होते. जेव्हा बाबेलच्या राजाने अखेरचा घाव घातला तेव्हा फक्त एक बुडखा राहिला होता (यशया ६:१३; ११:१).

दाविदाच्या वारसाला नबुखद्नेसर राजाने बेड्या घातल्याचे यहूदी लोक पाहत होते (२ राजे २४:११-१३) तेव्हा ते पुरातन राजासन, देवाने टाकून दिले आहे असे त्यांना वाटले. तारा रात्रीसारखा काळाठिक्कर पडला होता. एथान या स्तोत्रकर्त्याने अनेकांच्या मनातील विचार प्रकट केले:
“तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास. तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस” (स्तोत्र ८९:३८-३९).

त्याला देवाने संदेष्ट्यानंतर संदेष्ट्याद्वारे शांतपणे उत्तर दिले, “ मी सोडले नाही.” आकाशातून सूर्य खाली कोसळणे सोपे आहे पण दाविदाचा वंश नष्ट होणे शक्य नाही  (यशया ३३:१९-२२). “दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन” (आमोस ९ ११-१२). आणि योग्य वेळी “इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल” (यशया ११:१).

बंदीवासात सुद्धा दाविदाचा वंश अखंड राहिला. आणि त्याच वंशातून देवाने म्हटले की, “आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील” (यशया ९:६).

महान दाविदाचा त्याहून महान पुत्र
तर आता आपल्याला समजते की मत्तयने आपल्या शुभवर्तमानाची सुरुवात एका वंशवृक्षाने का केली व शेवट त्याच्या एका गौरवी फांदीवर का केला (यिर्मया २३:५-६). येशूमध्ये दाविदाचा पुत्र आला होता – आणि तसेच दाविदाचा प्रभूही. हे आश्चर्य येशू परूशी लोकांबरोबर झालेल्या त्यांच्या एका प्रसिद्ध संवादात उघड करतो. “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” येशूने विचारले. त्यांनी २ शमुवेल ७ आणि संदेष्टे वाचलेले होते. त्यांना याचे उत्तर ठाऊक होते. “ दाविदाचा पुत्र” ते म्हणाले. आतापर्यंत सर्व सुरळीत होते. पण आता येशू स्तोत्र ११० :१ कडे वळतो. त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” (मत्तय २२:४२-४५).

आणि तेथे त्या यरुशलेमच्या रस्त्यावर समर्थ देवापुढे शांतता भरून उरते –  दाविदाचा पुत्र आणि प्रभू (मत्तय २२:४६).

आपल्याला दाविदाहून महान असणाऱ्या दाविदाच्या पुत्राचीच गरज होती  (यशया ६१:१, लूक ३:२१-२२). जो गल्ल्याथाला नव्हे तर मरणावर वार करणार होता (रोम १:३-४). जो दुसऱ्या मनुष्याचे रक्त पाडून नव्हे तर स्वत:चे रक्त पाडून आपली वधू जिंकणार होता (इफिस ५:२५-२७). ज्याचा शेवट कबरीत नव्हे तर राजासनामध्ये होणार होता (प्रेषित २:२९-३६). आणि असाच राजा आपल्याला ख्रिस्तामध्ये  लाभला आहे.

ये आणि राज्य कर

आपल्या वैभवी प्रभूच्या सर्व वैभवी नावामध्ये ‘ दाविदाचा पुत्र’ म्हणून आपण त्याची आठवण ठेवणे येशूला आवडेल. शास्त्रलेखातले त्याचे शेवटचे शब्द असे आहेत:
“मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे… होय, मी लवकर येतो”
(प्रकटी २२:१६,२०)

जेव्हा आम्ही म्हणतो “ये, प्रभू येशू ये”  ( प्रकटी २२:२०) तेव्हा आपण फक्त एका तारणाऱ्यालाच विचारत नाही तर एका राजाला.  बायबलमधून दाविदाच्या पुत्रासबंधी  काही आशा गोळा करून आपण म्हणतो, “ये आणि राज्य कर.” “सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल” (२ शमुवेल २३:४)

ये ,आणि सत्ता चालव. त्याच्या कारकिर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो (स्तोत्र ७२:८).

ये आणि लांडगा व कोकरा, वासरू व सिंह  एकमेकाजवळ आण, आणि तुझ्या पवित्र डोंगरावर छोटी मुले सुरक्षितपणे खेळू देत  (यशया ११: ६-९).


ये आणि आमचा भटकेपणा काढून टाक, आमच्या  आतल्या  बंडखोरपणावर राज्य कर आणि आमची दुखणारी ह्रदये बरी कर (यहेज्केल ३४:२०-२४).


ये आणि तुझ्या वैऱ्यांना लज्जेने वेष्टित कर आणि तुझा झळकता मुकुट धारण कर ( स्तोत्र १३२ :१७-१८).

होय. इशायाच्या मुळा, दाविदाच्या पुत्रा, ये आणि राज्य कर.

Previous Article

मानव होणारा राजा

Next Article

ख्रिस्तजन्म – गव्हाणीचा अर्थ

You might be interested in …

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

“इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव […]

“ माझं गौरव”  (II)

योहान १७:१० – “ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” ३) कुणामध्ये गौरव ? – “ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” असं प्रभू म्हणतो. “ त्यांच्यामध्ये” म्हणजे कुणामध्ये? त्याच्या शिष्यांमध्ये. त्याच्या शिष्यांच्या ठायी. इथं थोडं थांबून […]