Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 5, 2021 in जीवन प्रकाश

आपला देव ऐकतो

आपला देव ऐकतो

डेव्हिड मथीस

जो सर्वसमर्थ, विश्वाचा देव त्याच्याशी बोलण्याचे आपल्याला आमंत्रण आहे. तो केवळ महान समर्थ नव्हे तर सर्वसमर्थ आहे. सर्व सामर्थ्य त्याचे आहे आणि त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे व तुमचे अस्तित्व तो राखतो.

हा देव – जो एकच देव – सर्वसमर्थ, निर्माता, वाचवणारा- आपल्याशी बोलतो व स्वत:ला प्रकट करतो. यासाठी की आपण त्याला खरेखुरे जाणावे. पण तो केवळ बोलतच नाही. या जगाचे एक मोठे आश्चर्य म्हणजे हा देव ऐकतो. प्रथम तो बोलतो आणि नंतर आपला प्रतिसाद काय ते पाहतो. मग तो थांबतो, तो वाकून पाहतो, तो त्याचा कान त्याच्या लोकांकडे लावतो. आणि तो आपले ऐकतो. या आश्चर्याच्या बाबीला, आपण झटपट बोलून ज्याला प्रार्थना म्हणतो ते अगदी गृहीत धरून चालतो.

प्रार्थनेआधी काय येते

आपण स्वर्गाच्या देवाला ‘डायल’ करण्यापूर्वी या प्रार्थनेचे आश्चर्य एका महत्त्वाच्या वास्तव्याला डावलून जाऊ देईल. त्याचे आणि आपले बोलणे आणि ऐकणे यासाठी एक अनुक्रम आहे. तो देव आहे. आपण नाही. हे दररोज आणि कायमचे लक्षात ठेवा. तो प्रथम बोलतो मग ऐकतो. आपण प्रथम ऐकतो आणि मग बोलतो.

प्रार्थना हे आपण सुरू केलेले संभाषण नाही. तर देव हा पुढाकार घेतो. प्रथम तो बोलला आहे. त्याने स्वत:ला  आपल्याला प्रकट केले आहे – या जगामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये. आणि त्याच्या वचनामधून त्याच्या आत्म्याद्वारे प्रकाशित होऊन तो बोलत राहतो. “जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा” (इब्री १२:२५). त्याचे वचन मेले आणि गेले असे नाही. तर “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे” (इब्री ४:१२). आणि त्याच्या वचनामध्ये आणि वचनाद्वारे तो आपल्याला ही थक्क करणारी देणगी देऊ करतो: त्याचे ऐकणारे कान.

सोन्याचा राजदंड

जेव्हा एस्तेरने यहूदी लोकांना नष्ट करण्याचा हमानाचा कट ऐकला तेव्हा तिच्यापुढे एक महान अडथळा उभा होता. मर्दखयाने तिला सांगितले की, तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकळूत करावीस (एस्तेर ४:८).

एस्तेरला माहीत होते की हा तिच्यासाठी जीवन मरणाचा मामला होता. फक्त यहूदी लोकांसाठी नाही तर तिच्यासाठी.

“कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार” (एस्तेर ४:११).  तिच्यापुढे असलेला धोका तिला माहीत होता तरीही अखेरीस विश्वासाने आणि धैर्याने तिने ठराव केला. “असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले”  (एस्तेर ४:१६).

महान राजाच्या पुढे “राजाने बोलावल्याशिवाय” कोणी सहजपणे जाऊच शकत नाही. त्या सर्वसमर्थ देवासमोर तर किती विशेषकरून हे खरे आहे. कारण जगिक राजाप्रमाणे  हा एक  मोठा धोकाच नाही तर देवापुढे शारीरिक दृष्ट्‍याही हे शक्य नाही. तो काही जगातला एक मानव नाही की द्वारपालांची नजर चुकवून आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. त्याच्या पुढे जाणे तर अशक्य आहे – “त्याने बोलावल्याशिवाय.”

तरीही ख्रिस्तामध्ये स्वर्गीय राजासनाने पुढाकार घेतला आहे आणि आता तो सोनेरी राजदंड आपल्या पुढे धरतो.

आपण त्याच्याजवळ का जाऊ शकतो

इब्रीकरांस पत्राचे ५-१० अध्याय हे त्या पत्राचे हृदय आहेत. व त्यातील दोन अध्यायांचे शेवट (४:१४-१६; १०:१९-२५) आपण त्याच्या जवळ का व कसे येऊ शकतो हे स्पष्ट करतात.

इब्रीकरांस पत्राची पार्श्वभूमी देवाने मोशेद्वारे त्याच्या लोकांना  दिलेल्या पहिल्या करारासबंधी आहे. निर्गम, लेवीय, आणि गणना ही पुस्तके देवाच्या ‘जवळ जाणे’ त्याच्या ‘समीप येणे’ याबद्दल जे म्हणतात ती विचारात टाकणारी बाब आहे. पहिले म्हणजे निवासमंडप व सीनाय पर्वतावर दिलेली उपासनेची व्यवस्था यामुळे लोकांना पापामुळे  त्यांच्यात व  देवामध्ये असलेले अंतर, देव व त्यांच्यामध्ये असलेला अडथळा याबद्दल शिकवले गेले. लोकांनी मागे राहावे नाहीतर देवाचा भीतीयुक्त क्रोध त्यांच्यावर पडला जाईल (निर्गम १९:२२,२४). प्रथम एकट्या मोशेलाच जवळ जाण्यास परवानगी होती (निर्गम २४:२). आणि नंतर याजक म्हणून सेवा करणारा मोशेचा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र जवळ जाऊ शकत होते (निर्गम २८:४३, ३०:२०). फक्त समर्पण झालेले याजक त्यांच्यासाठी  व लोकांसाठी प्रायश्चित्त करण्यास जवळ जाऊ शकत होते (लेवीय ९:७) – आणि तेही देवाने सूचना दिल्याप्रमाणेच. नादाब व अबीहू (लेवीय १०) आणि कोरहाच्या बंडामुळे झालेल्या भयाण वृत्तांताच्या आठवणीने ते हे पक्के शिकले होते (गणना १६,१७).

पण आता ख्रिस्तामध्ये  “आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे (इब्री ४:१४). “त्याच्यामध्ये त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे” (इब्री १०:१९-२१). आपल्या वतीने ख्रिस्त फक्त देवाच्या सान्निध्यात प्रवेश करतो एवढेच नाही पण तो आपले त्याच्यामध्ये स्वागत करतो. तो आपल्यापुढे गेला आहे जो आपला मार्ग प्रकाशित करतो. ख्रिस्ताने त्याच्या जीवन मरण व पुनरुत्थान यांद्वारे जे साध्य केले त्यामुळे आता आपण देवाच्या “समीप” त्याच्या कृपेच्या आसनाजवळ जाऊ शकतो.

आपण कसे जवळ यावे

आता या आश्चर्यात आणखी आश्चर्याची भर म्हणजे आपण ख्रिस्तामध्ये देवाजवळ येतो एवढेच नव्हे तर आपल्याला त्यासाठी आमंत्रण दिले आहे, तशी अपेक्षा केली आहे आणि हे धैर्याने करण्यास सांगितले आहे.

धैर्याने आणि पूर्ण खात्रीने. कारण आपल्याला इतका महान याजक असल्याने “आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ” (इब्री. ४:१६). “त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ”  (इब्री १०:१९). आपल्या किंमतीमुळे, दर्जामुळे, कामगिरीमुळे नाही तर त्याच्या. आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ शकतो (१०:२२). अशा विश्वासाने की देवाच्या दयासनासमोर जाण्यास “मी लायक आहे का असे स्वत:कडे पाहत विचारत नाही तर “ख्रिस्त लायक आहे का?” असे विचारत.

अधिक वाट पाहू नका

देवाजवळ आपण जाऊ शकतो (इफिस २:१८) हे खरे आहे असे मानणे आणि तेही धैर्याने (इफिस ३:१२) जवळजवळ अशक्य आहे. ख्रिस्तामध्ये तो विश्वाचा राजा राजदंड पुढे करतो.  आता प्रश्न असा नाही की आपण येऊ शकतो का, तर वारंवार किती वेळा येऊ शकतो असा आहे.

आपल्याला प्रवेश आहे. त्याच्या पुत्राला विश्वासाने घ्या. आणि धैर्याने त्याच्या दयासनासमोर यावे अशी देवाची अपेक्षा आहे. आपला देव ऐकतो. तो आपल्या प्रार्थना ऐकतो.

तुम्ही कशाची वाट पाहात आहात?