अप्रैल 28, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आशीर्वादित म्हणजे काय?

जॉन पायपर

जॉर्डनचा प्रश्न

पास्टर जॉन, गेले काही दिवस मी मित्रांसोबत आशीर्वादित याचा अर्थ काय यावर चर्चा करत आहे. आशीर्वादित हा शब्द बायबलमध्ये बऱ्याच वेळा वापरला आहे आणि तो आपण इतरत्र बोलतानाही वापरतो. मला वाटतं की, हा शब्द बायबलमध्ये देव जसा वापरतो त्यापेक्षा आपण आता फार वेगळ्या अर्थाने वापरतो. मला असं दिसतं की आशीर्वाद हा शब्द  भौतिक साधने अथवा आरोग्य या अर्थाने वापरला जातो. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी असू शकतात. पण आपण असाही वाद घालू शकतो की, हे आशीर्वाद आपल्याला देवापासून दूर नेतात. आणि ते खरे आशीर्वाद नाहीत.

याउलट येशूने म्हटले, “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य” (मत्तय ५:३). “नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य” (मत्तय ५:१०). “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य” (मत्तय ५:११). पण अशा आशीर्वादाबद्दल कोणी बोलताना मी ऐकले नाही. तर या सर्वाचा विचार करता खरे आशीर्वादित असणे म्हणजे काय हे स्पष्ट कराल का?

उत्तर

मत्तय ५ मधील धन्यवाद देऊन जॉर्डनने ह्या समस्येवर नेमके बोट ठेवले आहे. आणि हे त्याच्या प्रश्नाला सार्थ उत्तर आहे, याची हमी मी त्याला देणारच आहे. पण प्रथम मला जुन्या करारात इतक्या मोठ्या प्रमाणात जगिक आशीर्वादांचे अभिवचन का दिले आहे याचे तत्त्व मांडू दे. उदा. जमिनीचे वतन (स्तोत्र ३७:२२), शत्रूंपासून सुटका (स्तोत्र ४१:१), आपल्या कुटुंबात व शेतात फलद्रूप (उत्पत्ती १७:२०, ४८:३-४) . याउलट नव्या करारात जगिक आशीर्वादांचे अभिवचन फारच थोडे आहे; पण त्याऐवजी छळ /संकटाचे अभिवचन दिले आहे.

ते तत्त्व असे आहे: देवाच्या सुज्ञतेने जुन्या कराराचा यहूदी धर्म “या आणि पहा” असा होता. इतर राष्ट्रांमध्ये इस्राएल राष्ट्र हे देवाच्या आशीर्वादांचे प्रदर्शन होते. 
“परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली… शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली” (१ राजे १०: १, ४-५).

याला मी जुन्या करारातील देवाच्या लोकांना मिळालेल्या आशीर्वादाचे प्रदर्शन असे म्हणतो.

सर्व जगामध्ये
नवीन करारामध्ये असे काही नाही. देवाच्या सुज्ञतेमध्ये येशू ख्रिस्ताची नव्या करारातील मंडळी ही कोणत्याही वंशाची, राजकीय तत्त्वाची, भौगोलिक भागाची किंवा देशाची नाही. ती सर्व वंश, भूगोल, राज्यशास्त्र, राष्ट्र यांना पार करते.

            ख्रिस्तीत्वामध्ये कोणतेही भौगोलिक केंद्र नाही.
            ख्रिस्तीत्वामध्ये कोणतेही भव्य मंदिर नाही.

            ख्रिस्तीत्वामध्ये यात्रा करण्याचे ठिकाण नाही.
            देवाकडे जाण्यासाठी कोणत्याही संत किंवा याजकामार्फत जाता येत नाही तर येशूद्वारेच जाता येते.
आणि जगाला आमच्याकडे या – मी माझ्या लोकांना कसा आशीर्वाद देतो-  असे सांगण्याऐवजी देव आपल्याला म्हणतो, “जगामध्ये जा. आणि त्यासाठी तुम्हाला जिवाची किंमत द्यावी लागली तर द्या. येशू स्पष्ट सांगतो,  “त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही” (लूक १४:३३). “ते माझ्या आणि माझ्या कार्याच्या कारणी लावा.”  इतके तडफदार जीवन जगण्याचे पाचारण आपल्याला नव्या करारात केले आहे.

तर इथे तत्त्व आहे. आणि देवाची इस्राएल लोकांसाठीची योजना व नव्या करारातील मंडळीसाठीची योजना यातला फरक न समजल्याने बरेच लोक आज जगिक आशीर्वादावर भर देतात.

अनंतकालिक सुख

ख्रिस्ती या नात्याने आपल्याला किती अनंत आशीर्वाद मिळाले आहेत हे १ करिंथ ३:२१-२३ मध्ये दिले आहे. “म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.”

हे नीट मनात रुजू द्या. ख्रिस्ताचे असणे म्हणजे देव आपला बाप असणे आणि त्याचे जे काही आहे ते आपल्याला वतन म्हणून मिळते. पौल म्हणतो, “ जग तुमचे आहे , सर्वकाही तुमचे आहे.”  येशूने म्हटले, “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील ” (मत्तय ५:५). सगळे कोट्याधीश एकत्र करा; ते सर्व एका सौम्य ख्रिस्ती व्यक्तीशी तुलना करता भिकारी आहेत.

पण हे लक्षात घ्या की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या यादीत मरण सुद्धा आहे.  मरण तुमचे आहे, याचा अर्थ या जीवनात तुम्हाला तुमचे सर्व आशीर्वाद मिळणार नाहीत, पण मरण हे एक तुमचे एक पारितोषिक आहे. ते अनंत, सार्वकालिक  अमाप आशीर्वादाचे दार  आहे. मरण तुमचा दास आहे कारण ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला आहे. प्रेषित योहानाला स्वर्गातून एक वाणी ऐकली ती म्हणाली, “प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” 
(प्रकटी. १४:१३). हे काय आहे?  पौल याचे उत्तर इफिस १:३ मध्ये देतो. “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.” स्वर्गामध्ये अनंतकालच्या  सुखासाठी जे काही आहे ते आपले आहे.

परंतु येशूने आपल्याला स्पष्ट शिकवले की, याची अपेक्षा आता करू नका. उदा. लूक १४:१३-१४ मध्ये त्याने म्हटले; “तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा.” येशूचे तर्कशास्त्र मला आवडते.  “म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”  हा नव्या कराराचा नमुना आहे. त्याग करून उदारपणा आणि सेवा आता करा. अवर्णनीय आशीर्वाद पुनरुत्थानानंतर. हाच विचार याकोबाने असा मांडला आहे: “जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल” (याकोब १:१२)

आमचे महान पारितोषिक

आता जॉर्डनने जे डोंगरावरील आशीर्वाद सांगितले तिकडे वळू या. येथे स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे (मत्तय ५ :३,१०) असे लिहिलेल्या दोन आशीर्वादांच्या मध्ये  दिलेले सहा महान आशीर्वाद आहेत. हे सहा आशीर्वाद देवाच्या स्वर्गातील अधिकारामध्ये राहणे म्हणजे काय आहे हे थोडक्यात सांगतात.

१. आपण देवाला पाहू. “जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय ५:८).

२. आपल्यावर दया करण्यात येईल. “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल” (५:७).

३, आपण देवाच्या कुटुंबाचा भाग होऊ. “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील” (५:९).

४. देवाचे सांत्वन  आपल्याला प्राप्त होईल. “जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल” (५:४)

५.सर्व  जगाच्या वतनाचा भाग आपल्याला मिळेल. “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील” (५:५).

६. आपण वैयक्तिक व वैश्विक धार्मिकतेने तृप्त होऊ. “जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील”  (५:६)

याचा सारांश-  १) ख्रिस्तासमवेत देवाच्या सान्निध्याचा आनंद घेता येईल. २) आपली सर्व पापे त्याची दया झाकून टाकेल. ३) आपल्याला त्याची मुले म्हटले जाईल. ४) या जगातील सर्व हानी व दु:ख यांच्यामुळे आपले सांत्वन केले जाईल. ५) या जगाचे व विश्वाचे वतन. ६) नव्या जगात व रचनेत सर्व काही यथास्थित केले जाईल.

हे आपले महान पारितोषिक आहे. आशीर्वादित असणे याचा खरा अर्थ हा आहे.

Previous Article

हजार छोट्या परीक्षा

Next Article

जेव्हा प्रीती हे युद्ध असते

You might be interested in …

सर्वोच्च त्याच्या गुडघ्यावर

ग्रेग मोर्स सेवेची मानसिकता “तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस […]

देवाचे गौरव येशू

जॉन मकआर्थर “परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे […]