जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

माझ्या पापाने त्याला तेथे धरून ठेवले

ग्रेग मोर्स

उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो.

त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू येत होते. सैनिक त्याला मारत होते, फटके देत होते, छळ करत होते.

जसा तो यरुशलेमेच्या रस्त्यांवरून पुढे जाऊ लागला तसा त्याच्या चोपलेल्या पाठीवर तो वधस्तंभ रुतत होता. अनेकांचा ते पाहून थरकाप झाला. जे देवाचे मुख मोशे प्रत्यक्ष पाहू शकला नाही ते आता मानवी म्हणून ओळखणे अशक्य झाले होते (यशया ५२:१४). स्त्रियांनी तो रक्तबंबाळ मासाच गोळा आपल्या मुलांनी पाहू नये म्हणून त्यांना आपल्यामागे लपवले. पुरुष त्याची निर्भर्त्सना करत होते. सैनिक त्याला ढोसत होते. देवदूत भीतीने कापत होते.

त्याच्या सबंधीचे प्रत्येक भविष्य पूर्ण होत होते. खटला करून व जुलूम करून त्याला त्याब्यात घेतले. त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर हल्ला करताच त्याची मेंढरे पळून गेली. त्याच्याच एकाने त्याला विकले व चुंबन घेऊन धोका दिला. ते त्याला मारत असता, त्याच्यावर थुंकताना आणि रात्रभर थट्टा करत असताना त्यांनी त्याला विसावा घेऊ दिला नाही. सकाळी पुन्हा ज्यांनी त्याला मारले, चपराका दिल्या, दाढी खेचली. त्यांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. वधावयास जात असलेल्या कोकराप्रमाणे तो कालवरीला सामोरा गेला.

त्याची प्रीती ही “फक्त प्रौढासाठी” असलेल्या चित्रपटासारखी होती

चवदा वर्षांपूर्वी मी “द पॅशन्स ऑफ ख्राइस्ट” हा चित्रपट पाहिला. सैनिकांनी दिलेले ते खिळ्यांचे फटके त्याच्या पाठीत रुतत असताना मरीयेप्रमाणेच माझ्याही ह्रदयातून तलवार खुपसली जात आहे असे मला वाटले (लूक २:३५). ते रक्त. त्या वेदना. मी यापुढे कधीच विचार न करता ख्रिस्त तुझ्यासाठी मरण पावला असे कुणाला सांगू शकणार नव्हतो. ते सर्व भयानक, क्रूर, अंगावर शहरे आणणारे होते – फक्त प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटासारखे.

मी सहसा रडत नसतो, पण जेव्हा येशूचे रक्त त्या रोमी वाड्याच्या आवारात वाहताना पाहिले तेव्हा मला रडू आवरणे अशक्य झाले. जसे त्यांनी ठोकण्यासाठी त्याच्या हातापायावर खिळे रोखले – त्याची आई पाहत असताना – तेव्हा प्रत्येक हातोडीचा घण माझ्या ह्रदयाला भेदून जात होता. फक्त निर्दय जनच हे भावनेरहित पाहू शकत होते. यापेक्षा दु:खद देखावा कधी दिसला होता का? मी त्याच्या जखमांचा कधी पुरेसा विचार केला नव्हता. त्याच्या दु:खसहनाने मी असा पूर्वी कधी रडलो नव्हतो. पण माझ्यासारखे जे लोक उत्तम शुक्रवारी त्याच्या असह्य दु:खसहनाबद्दल शोक करतात त्यांना येशू कसा प्रतिसाद देतो? दोन हजार वर्षांपूर्वी जे त्याच्यासाठी रडत होते त्यांना तो म्हणाला;
“माझ्यासाठी रडू नका तर तुमच्यासाठी रडा.”

रंगमंचावर शांतता

कालवरीच्या अनेक भयाण प्रसंगात सर्वात कमालीचा प्रसंग म्हणजे त्या सर्वामध्ये असलेली लज्जा. त्याचा सार्वजनिक मृत्यूदंड होता. दोषी बहुधा नग्नावस्थेत असत. ह्यातच भर घालत भविष्य म्हणते की, “मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, वाकुल्या दाखवतात, थट्टेने डोके डोलवतात” (स्तोत्र २२:७). वेदना सहन करणे ही एक बाब, पण ती सर्व राष्टापुढे, ते तुमची थट्टा करत असताना सहन करणे हे वेगळेच.

पण त्याच्याविरुद्ध थट्टेचाच फक्त आवाज नव्हता. स्त्रियांचा घोळका त्याच्यामागून जात, या मरणाऱ्या संदेष्ट्यासाठी आक्रोश करत होत्या. आपल्यातील अनेक जण करतात तसेच येशूच्या ठिपकणाऱ्या रक्ताच्या थेंबांना त्या अश्रू गाळून प्रतिसाद देत होत्या.

पण त्यांचे हुंदके ऐकून मोडलेला, मारहाण झालेला येशू त्यांच्याकडे वळून हे धक्कादायक व कृपेचे शब्द बोलतो, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा” (लूक २३:२८). चित्रपटामध्ये हा भाग दाखवला नव्हता.

त्या पहिल्या उत्तम शुक्रवारी त्याला मोठ्याने सहानुभुती दाखवणाऱ्या जमावाकडे – त्याला शाप न देणाऱ्या त्याची थट्टा न करणाऱ्या पण त्याच्याऐवजी रडणाऱ्यांना वळून त्याने शांत केले. त्यांच्या अश्रूंनी त्याचे यापुढे रक्षण करू नये अशी तो त्यांना आज्ञा करतो. त्यांच्या दु:ख व्यक्त करण्याशिवाय पुढे जाणे तो पसंत करतो.

माझ्यासाठी रडू नका

दोन हजार वर्षांपूर्वी येशूला त्यांच्या अश्रूंची गरज नव्हती आणि हे जरी लोकप्रिय वाटत नाही तरी आजसुद्धा येशूला आपल्या अश्रूंची गरज नाही. त्यामुळे त्याचे दु:ख विश्वासाच्या नजरेतून पाहायला हे सत्य आपल्याला भाग पाडते.

माझ्यासाठी रडू नका तो म्हणाला, जणू त्याला म्हणायचे होते:

मी माझ्या लोकांचे तारण करीत आहे. हे कनवाळू जिवांनो मी प्रार्थना केली आहे. ह्या प्याल्यासबंधी माझ्या पित्याची इच्छा काय आहे हे मला ठाऊक आहे – हा मी पिऊ नये का? ह्या खांबाला मी माझ्या इच्छेने पकडले आहे कारण पित्याची इच्छा करणे हेच माझे अन्न आहे (योहान ४:३२,३४). आणि त्याची इच्छा ही वैभवी आहे. माझ्या लोकांची सेवा करावी व बहुतांसाठी मी खंडणी भरावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. माझे शरीर तुमच्यासाठी मोडले जात आहे, माझे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे (लूक२२:१९-२०). आपल्या मित्राकरता जीव द्यावा यापेक्षा मोठी प्रीती नाही. तुम्हाला अढळ आनंद देणाऱ्या व तुमच्या तारणाला जन्म देणाऱ्या या प्रसुतीच्या कळांसाठी रडू नका (योहान १६:२०-२२).

माझ्यासाठी रडू नका, जणू त्याला म्हणायचे होते:

मी काही एक असहाय बली नाही. मी एक लढवय्या राजा आहे. मी बोलावताच माझ्या तैनातीला हजारो देवदूत सादर होतील (मत्तय २६:५३). मी एक शब्द टाकला तर हा सर्व भयपट संपुष्टात येईल. मी एक शब्द बोललो तर सर्व रोम नष्ट होईल. मी एक शब्द बोललो तर सर्वांना कायमसाठी दंडाज्ञा होईल. पण मला जगाचा न्याय नाही तर त्याचे तारण करण्यासाठी पाठवले आहे (योहान ३:१७). कोणताही मनुष्य – किंवा सैन्य, माझ्यापासून माझा जीव हिरावून घेऊ शकत नाही ह्यावर भरवसा ठेवा. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे  (योहान १०:१८).

माझ्यासाठी रडू नका, जणू त्याला म्हणायचे होते:

मी विजय मिळवत आहे. माझी टाच फोडलेली पाहून तुम्ही दु:ख करत आहात – पण विश्वासाच्या नेत्रांनी पाहा की, सापाचे डोके ठेचले गेले आहे (उत्पत्ती ३:१५). जरी मी कोकरासारखा चालत असलो तरी मी सिंहासारखा विजय मिळवतो. शिकारी वधस्तंभावर टांगला जाईल – सावज नाही (प्रकटी ५:५-६). मी राजा आहे व या झाडावरून मी राज्य करणार आहे. आणि हा वधस्तंभ मी माझा राजदंड बनवीन. मला ते जसे उंच करतील तसे माझे वैरी माझे पदासन केले जातील (स्तोत्र ११०:१). माझ्या विजयी प्रवेशातूनच माझे विजयाने बाहेर जाणे होईल. माझ्या गौरवाच्या घटकेस तुम्ही का रडावे (योहान १२:२७-२८)?

माझ्यासाठी रडू नका, जणू तो म्हणत होता:

रविवार येत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगितले होते की तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन (मत्तय १६:२१; १७:२२,२३, २०:१८-१९). जरी आज उच्चार न करता येण्यासारखा गडद काळोख आहे, अनाकलनीय दु:ख आहे, विचार न करता येण्यासारखी दहशत आहे, तरी रविवार येत आहे. माझ्या पित्याचा परिपूर्ण हात मला चिरडून टाकत आहे, दुष्ट लोक माझा खून करत आहेत, माझे शिष्य मला सोडून पळून गेले आहेत. पण मी खरेच सांगतो की रविवार येत आहे. माझ्यापुढे आनंद ठेवला आहे आणि त्यामुळे दु:ख सहन करायला मला सामर्थ्य मिळत आहे. मुगुट माझी वाट पाहत आहे, एक अखंड उत्सव माझी वाट पाहत आहे. रक्ताने विकत घेतलेले माझे लोक माझी वाट पाहत आहेत. अनंत गौरव माझी वाट पाहत आहे. माझा पिता माझी वाट पाहत आहे. माझ्यासाठी रडू नका.

तुमच्यासाठी रडा

येशू त्यांच्या अश्रूंना पूर्णपणे बांध घालत नाही तर त्यांना दिशा देतो. “देवाचा क्रोध लवकरच लोकांच्या पापामुळे  येत आहे. ज्या राष्ट्राने त्यांच्या मशीहाला धिक्कारले त्याची कींव करायला हवी “कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका” (लूक २३:२९-३०).

तुमच्यासाठी रडा” जणू त्याला म्हणायचे होते:

मी माझा प्याला सहन करीन पण तुम्हाला तुमचा सहन करता येणार नाही. रोम तुमची मुले तुमच्या डोळ्यांदेखत ठार करील. ज्या श्वापदाबरोबर आज तुम्ही कट रचला आहात ते उद्या तुम्हाला वेढून टाकील. तुमच्या यातना इतक्या भयाण होतील की तुमचे अश्रू बुधलीत भरून त्या भयंकर दिवसासाठी राखून ठेवाल तर बरे.

माझे दु:खसहन मृत्यूच्या वेळी संपेल. तुमचे कदाचित नाही. तुमच्यातील कित्येक जण डोंगरांनी आपल्यावर पडावे असा आक्रोश करतील. ते तुम्हाला फक्त रोमी न्यायापासून वाचवेल – पण ते तुम्हाला देवाच्या न्यायापासून सोडवू शकणार नाही. त्याचा न्याय मरणापाशी थांबत नाही.  देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो मीच आहे  (प्रेषित १०:४२). सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन (इब्री १०:३०). जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे (इब्री १०:३१).

कनवाळू मुलींनो, तुमच्या पापांसाठी रडा. माझ्यासाठी माझ्या दु:खसहनासाठी गाळलेले अश्रू व्यर्थ आहेत जर ते पापासाठी गाळले जात नाहीत. अनेक जण माझ्या दु:खसहनाबद्दल शोक करतात, पण ज्या पापामुळे ते आले त्यासाठी नाही. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे (२ करिंथ ५:२१). यामुळे ही भयाणता तुम्ही पाहत आहात. जर तुम्ही रडत असाल तर जी वासना हे खिळे खोल रुतवते तिच्यासाठी रडा, जी लबाडी भुवईत काटा खुपसते, मला काल्वरीच्या मार्गावर ठेवणारा हा जो गर्विष्ठ तोरा त्यासाठी रडा.

ते माझे पाप होते

द पॅशन्स ऑफ द ख्राइस्ट हा चित्रपट मी सलग चार वर्षे पाहिला – प्रत्येक वेळी अश्रूंनी भारून जात- ह्या सर्ववेळ माझा पुनर्जन्म झालेला नव्हता आणि रडण्याने मला बरे वाटत होते. जसे काही वल्हांडणासारखे माझ्या अश्रूंनी माझी पापे ओलांडून गेली असती. येशूच्या दु:खसहनासाठी रडण्यास पुनर्जीवन झालेल्या ह्रदयाची आवश्यकता  नसते. पण माझ्या पापांसाठी रडण्यासाठी पुनर्जीवन झालेले ह्रदयच लागते (याकोब ४:८-१०).

आणि दोन हजार वर्षापूर्वी ज्यांनी येशूचा वध पाहिला त्यांनीही वधस्तंभावर त्यांचे पाप पाहिले नव्हते (यशया ५३:८).

ती भयानकता तेथेच राहिली जोपर्यंत ते निर्दोष बघे होते. त्यांनी पूर्ण मुद्दा आणि वधस्तंभाचे सौंदर्य गमावले. ते रडले, शोक केला पण त्यात प्रीती नव्हती. जोपर्यंत आपण म्हणत नाही की माझ्या पापाने त्याला तेथे खिळले तोपर्यंत आपले अश्रू व्यर्थ आहेत.

त्याऐवजी आपण क्रूसाच्या पायथ्याशी रडायला हवे, कणवेने नव्हे तर विश्वासाने. हे अश्रू ईस्टरच्या सोमवारी कोरडे पडत नाहीत. हे अश्रू ज्या पापाने त्याला खिळले त्याच्यासाठी रडतात. ते त्या विजयी राजासाठी गातात. आणि हे अश्रू तो येईपर्यंत त्याचा मृत्यू साजरा करत राहतील.

Previous Article

वधस्तंभावरचा तो मनुष्य पहा

Next Article

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

You might be interested in …

स्वर्गाची उत्कट इच्छा

माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या देवाघरी गेल्यानंतर व माझ्या अत्यंत मोठ्या आणि कधीही न भरून येणाऱ्या हानीच्या तीव्र दु:खांतून जात असताना जी गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली व जिने मला खोलवर विचार करावयास भाग पाडले […]

कृपा आणि वैभव: ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव –  लेखांक २

स्टीव्ह फर्नांडिस अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ […]

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना? लेखक : स्टीफन विटमर

ख्रिस्तजयंतीच्या वेळी मार्काच्या शुभवर्तमानाकडे दुर्लक्ष केले जाते. इतर शुभवर्तमाने येशूच्या जन्माची तपशीलवार हकीगत सांगतात (मत्तय आणि लूक) किंवा त्याचा उल्लेख तरी करतात (योहान). मार्क आपल्याला यातले काहीच देत नाही – गव्हाणी नाही, मेंढ्या नाही, मेंढपाळ […]