(१७६१- १८३४)
लेखांक १५
कठीण अंत:करणाच्या भूमिवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुवार्ताप्रसार चालू होता. दक्षिण बंगाल हिंदूंचा बालेकिल्ला होता. अफाट लोकसंख्येमुळे मूठभर लोकांच्या धर्मांतराने जागृती होणे सोपे नव्हते. उत्तम निसर्ग लाभल्याची कृपा असलेले भौगोलिक स्थान व या लोकांवरील हिंदू धर्माची छाप या दोन बाबी ख्रिस्ती धर्माला मोठ्या धोंड होत्या. गंगा नदीमुळे ते स्वत:ला फार पवित्र व लाडके मानायचे. सात वर्षे केरी एकालाही ख्रिस्तासाठी जिंकू शकला नव्हता. तरी त्याने दृढ विश्वास सोडला नाही. आपण आपले कर्तव्य व काम करत राहायचे. देव योग्य वेळी फळ देईल ही त्याची धारणा होती. १८०० साली ती वेळ आली. कृष्णचंद्र पाल नावाचा सुतारांचा एक गुरू मिशनच्या घराजवळ घसरून पडला. त्याचे खुब्याचे हाड मोडले. लोकांनी थॅामसला बोलवून घेतले. त्यामुळे त्या सुताराचा व मिशनरींचा संबंध आला व तो दृढ होत गेला आणि तो ख्रिस्ती झाला. तोच पुढे कलकत्यातील पहिला स्थानिक पाळक झाला.
आपण का ख्रिस्ती झालो हे सांगताना पालशी झालेला हा संवाद पाहा –
डॅा. थॅामस : मि. वॅार्ड व मि. केरी तुम्हाला जे सांगतात ते तुम्हाला समजते का?
मि. पाल : प्रभू येशू ख्रिस्ताने पाप्यांचे तारण होण्यासाठी स्वत:चा प्राण दिला ही गोष्ट मला समजली. माझा त्याच्यावर
विश्वास आहे. माझा मित्र गोकुळ याचाही विश्वास बसला आहे.
डॅा. थॅामस : तर मग मी तुम्हाला माझा भाऊ मानतो. चला, आपण दोन घास गोळ्याामेळ्याने खाऊ.
मि. पाल: त्या सर्वांसोबत मी व गोकुळने फराळ केला.
या दोन मित्रांच्या या उपक्रमाने संपूर्ण गावाला धक्का बसला. एका हिंदूने धर्मत्याग केला ही बाब समाजाने दुर्लक्ष करावी अशी नव्हती. लोकांनी या दिशाभूल झालेल्यांना गव्हर्नरपुढे उभे केले. कर्नल बायने त्यांना काडीमात्र दोष न देता, आपल्या मताशी एकनिष्ठ राहाण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल मुक्त कंठाने त्यांची प्रशंसा केली. केरीचा मुलगा फेलिक्स बरोबर पालचा बाप्तिस्मा झाला. काही दिवसांनी त्याच्या कुटुंबियांनी बाप्तिस्मा घेतला. पुढे एक मुसलमान ख्रिस्ती झाला. मग एक कृष्णप्रसाद नावाचा ब्राम्हण ख्रिस्ती झाला. त्या सालस तरुणाने उत्तम प्रकारे पाळकीय सेवा केली. विविध दर्जाचे, वर्गाचे, धर्माचे मिळून ही मंडळी बनली होती. ख्रिस्ताच्या मंडळीत सामाजिक भेदभाव नष्ट होतात. सर्व परस्परांचे बांधव असतात हे केरीने स्पष्ट केले. जातिभेदामुळे दक्षिणेतील मंडळीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे बंगालच्या मंडळीत जातिभेदाचा शिरकाव होऊ न देण्याकडे केरीचा कटाक्ष होता. धीराने, धैर्याने पण निकोप अशी मंडळीची वाढ झाली.
१८१० च्या सुमारास केरीच्या मंडळीत बाप्तिस्मा पावलेले ३०० ख्रिस्ती लोक होते. दर वर्षी मंडळीत भर पडत होती. मात्र बाप्तिस्म्यापूर्वी त्यांची पक्की तयारी करून घेतली जात नव्हती. त्यांचे अज्ञान, भ्रष्ट व वेडगळ समजुतींविषयीची मन:स्थिती लक्षात घेऊन त्यांना थोडीफार सूट दिली जात असे. आणि आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे हे जाणून केवळ सर्व बाबतीत त्याच्यावर अवलंबून राहाण्याची त्यांची तयारी असल्याचे पुरेसे मानले जात असे. म्हणून बाप्तिस्म्यापूर्वी त्यांच्यावर कडक अटी लादल्या जात नसत. तरीही सर्वच लोक विश्वासात दुबळे नसत. पुष्कळ लोक चांगले खंबीर असत. त्यांचा विश्वास, दृढ भक्ती व खंबीरपणा पाहून शिक्षक संतुष्ट होत. काळ लोटला तशी त्यांची आध्यात्मिकता खोल रुजली. खुद्द सेरामपूरपेक्षा बंगाल, ब्रम्हदेश, ओरिसा व भूतान इत्यादी दूरदूरच्या भागात काम फारच वाढले. १८१७ पर्यंत कामकऱ्यांची संख्या ३० झाली. त्यात ९ ब्रिटिश, ९ युरोपियन व १२ स्थानिक सुवार्तिक व पाळक होते. स्थानिकांकडून पाळकवर्गाला प्रशिक्षण देण्याबाबत केरीने दक्षता राखली. केरीने सुरू केलेले हे काम आजही चालू आहे. भूतानमधून त्याला माघार घ्यावी लागली.
सुवार्ता प्रसारासोबत शैक्षणिक उपक्रम केले. कामाचा पसारा वाढतच होता. पुढे प्राथमिक शाळा, सेरामपूर कॅालेज, मिशनरी ट्रेनिंग संस्था काढण्यात आल्या. मिशनरी संस्था या कॅालेजचा एक भागच होता. मदनावतीच्या अनुभवावरून प्राथमिक शाळांची उपयुक्तता लक्षात आली होती. म्हणून या प्रकल्पाची व्याप्ती एवढी वाढवण्यात आली की १८१८ साली मिशनच्या १२६ प्राथमिक शाळा होत्या. त्यात १०,००० मुले शिकत होती. तेथे मुलांना ख्रिस्ती विश्वासाचे व नीतिमूल्यांचे शिक्षण दिले जात असे. स्थानिक लोकांना या शाळांचा खूपच फायदा झाला. त्यांनी शाळेत मुले पाठवली नसती तर मिशनकार्याचे सर्व श्रम व्यर्थ गेले असते, असे केरी म्हणतात. ऐपतीबाहेर खर्च होत असूनही शाळा काढण्यासाठी लोकांची मागणी वाढतच होती. ख्रिस्ती विश्वासाची सांगड घालून या वृक्षाची जोपासना होऊ लागली. झिगेन्बाल्ग व श्वार्टझच्या पद्धतीचाच त्यांनी अवलंब केला. पुढे या कार्याचे अद्भुत परिणाम दिसून आले.
१८१३ मध्ये ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीशी केलेल्या नवीन करारात स्थानिक वाड्.मयाची वृद्धी करण्यास १०,००० पौंड खर्च करण्याची व मिशनरींना ना हरकत भारतात प्रवेश मिळावा ह्या अटी घालण्यात आल्या. पण मिशनरी कार्याला शह देण्यास हिंदू कॅालेज काढल्याचे लक्षात येताच केरीने सेरामपूरमध्ये कॅालेज सुरू केले. ते उत्कृष्टच असावे असा या निधड्या छातीच्या त्रिकुटाचा आरंभापासून प्रयत्न राहिला. रात्रंदिवस काबाडकष्ट करून स्वार्थत्यागाने १५,००० पौंड उभारून भव्य इमारतीला साजेसा अभ्यासक्रम तेथे सुरू केला. इंग्लिश व पौर्वात्य भाषा सक्तीच्या होत्या. तेथे विज्ञान, इतिहास, व तत्त्वज्ञान हे विषय शिकवले जायचे. गव्हर्नरच्या देणगीतून वैद्यशास्त्रही शिकवण्याची तरतूद करण्यात आली. डेन्मार्कच्या राजाने पदवीदानाचा अधिकार देऊन या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला. कोणत्याही जातिधर्माच्या, वर्गाच्या विद्यार्थ्यांस येथे प्रवेश होता. मिशनकार्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले होते. १८२१ मध्ये कॅालेज सुरू झाले तेव्हा १९ ख्रिस्ती व १८ हिंदू विद्यार्थी होते. कॅालेजची पटसंख्या मोठी नव्हती पण त्यांचा बहुउद्देश सफल झाला होता. तो असा –
वसतीगृहात न राहाणाऱ्यांना परधर्मीय शिक्षण देणे. वसतीगृहात राहाणाऱ्यांना ख्रिस्ती शिक्षण देणे. स्थानिक ख्रिस्ती लोकांना मिशनरी बनवण्याची पूर्वतयारी करणे. युरोपातून मिशनरी पाठवण्यास अवाढव्य खर्च येई. म्हणून स्थानिक मिशनरी तयार करणे अत्यावश्यक होते. मिशनकार्यात एकसूत्रता आणून ते नेटाने चालू ठेवणे गरजेचे असते.
धर्मांतरितांना सुशिक्षित करून, ज्ञान देऊन त्यांची निगा राखायची होती. त्यासाठी स्थानिक लोकांना प्रशिक्षित करायचे होते. स्थानिक पाळकांनी समाजाची आध्यात्मिक धुरा वाहाणे गरजेचे होते. म्हणून पाळक लोकांच्या अंगी ख्रिस्ती चारित्र्य, नीतिमत्त्व, शुद्धता, ज्ञानाची प्रगती बिंबवणे अत्यावश्यक होते. या उद्दिष्टांवर आजही ख्रिस्ती संस्थांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे वाटते. हे सर्व काम पाहून सर्व ख्रिस्ती क्षेत्रात आहे ते टिकवण्याबाबतही आपली मान लाजेने खाली जाईल.
विल्यम केरीने आणखी महत्त्वाची जी कामगिरी बजावली ती म्हणजे हिंदू धर्मातील सती व बालहत्या या अघोरी चालींचे निर्मूलन केले. या चालींविरोधात कोणाला काही करण्याचे धाडस होत नव्हते. पण भारतात आल्यापासून या चालींविरोधात केरीने निषेध करणे चालू केले होते. १७९९ मध्ये एका विधवेला मृत पतीच्या चितेवर बांबूंनी ढोसून दाबून जबरदस्तीने जाळल्याचे ऱ्हदय फाडणारे दृश्य त्याने पाहिले होते. त्याचा त्याला कधीच विसर पडला नव्हता. पण त्याच्या व इतरांच्या तक्रारींना ३० वर्षांनी दाद मिळाली. १८२९ मध्ये लॅार्ड बेंटिंगने कायद्याने सतीची चाल बंद केली. त्यावेळी केरी सरकारी कागदपत्रांच्या भाषांतराचे काम करायचा. रविवारी हा हुकूम त्याच्या हाती आला, तेव्हा त्याने पाळकाचा झगा उतरवून लागलीच या हुकूमाचे भाषांतर केले. तो म्हणाला, “आज मी उपासना घेणार नाही. या कामाला उशीर झाला तर तोपर्यंत कित्येकांचे बळी जातील.” म्हणून ते भाषांतर पूर्ण करून छापखान्यात रवाना करून तातडीने त्याने ते प्रसिद्ध केले.
दरसाल शेकडो बालके लोक गंगेला अर्पण करीत. जगन्नाथाच्या रथाखाली शेकडो लोक आत्महत्या करीत. या चाली बंद पाडण्यात विल्यम केरीचा मोठा वाटा होता.
बायबलचे भाषांतर ही तर केरींची सर्वोच्च कामगिरी होती. तो हाडाचा प्रॅाटेस्टंट होता. आणि पवित्र शात्र सर्वात उत्तम मिशनरी आहे असा त्याचा विश्वास होता. कामाचा कितीही पसारा असला तरी लोकांच्या मायबोलीत पवित्र शास्त्राचे भाषांतर करण्याच्या कामाला तो सर्वोच्च प्राधान्य देत असे. विविध भाषाज्ञानाची देवाने त्याला देणगीच दिली होती. त्याची उद्योगप्रियता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याची त्याची हातोटी, बुद्धीची कुशाग्रता, आवेश या गुणांमुळे त्याच्या कार्याला भरघोस यश आले. इतकी प्रचंड कामे सांभाळून त्याने बायबलच्या भाषांतराचे हे अफाट काम भाषाज्ञान संपादन करण्यापासून केल्याचे पाहून आपण थक्क होतो. संस्कृतवर प्रभुत्व मिळवल्याने त्याला हे शक्य झाल्याचे सांगताना केरी म्हणतात, संस्कृतमुळे कोणत्याही भाषेचे व्याकरण कळून दोन महिन्यात त्या भाषेतील पुस्तकाचा अर्थ समजू शकतो. तरी परमेश्वराच्या सहाय्यानेच हे शक्य झाल्याचे केरी आवर्जून सांगतात. भारतातील सर्व लोकांना आपल्या मायबोलीत पवित्र शास्त्र उपलब्ध व्हावे हा त्यांना ध्यास लागला होता. त्यात वॅार्डला छपाईचा मोठा उत्साह असल्याने त्याचा दांडगा पाठिंबा केरींना मिळाला. “नवा करार कधीच न पाहिलेल्या, सतत असत्याचेच वाचन करीत असलेल्या व्यक्तींच्या हाती देवाची सत्य वचने पडणे, देवाला संतोषवणारे व माझे परमपवित्र धन्यवादित कर्तव्य आहे.” असे वॅार्ड म्हणत असे. यावरून या त्रिकुटाची तळमळ लक्षात येते. आजच्या मंडळीला ही किती लाजिरवाणी आणि आत्मपरीक्षणास भाग पाडणारी गोष्ट आहे.
१८११ मध्ये २० छापखाने चालू होते. तेथे पवित्र शास्त्र व धर्मविषयक साहित्य छापून प्रसिद्ध करण्याचे काम सतत चालू असायचे. १८१२ साली छापखान्याला आग लागून तो जळून भस्मसात झाल्याने या कामी मोठे विघ्न आले. केरींची अनेक हस्तलिखिते त्यात जळून खाक झाली. पण या हानीमुळे अधिकच प्रगती झाली, कारण भारतातील व इंग्लंडमधील त्याच्या चाहत्यांनी या कामासाठी देणग्यांचा पाऊस पाडला. सेरामपूरमधून केरींच्या कारकीर्दीत बायबलची पूर्ण किंवा अंशत: ३६ भाषांमध्ये भाषांतरे प्रकाशित झाली. बंगाली, हिंदी, संस्कृत, पारसी, मराठी भाषांतरे केरीने स्वत: केली व ही ३६ भाषांतरे तपासून व सुधारित करून पुन्हाही छापली. आरंभी ती अगदी अचूक, निर्दोष नसली तरी पुढे त्यात सुधारणा होत गेल्या; पण त्याने केलेले मूलभूत काम बहुमोल ठरले. केरीने बंगाली बायबलची आठवी आवृत्ती काढली होती. हे त्याचे शेवटचे काम होते. तेव्हा त्याने उद्गार काढले होते, “माझी कामगिरी संपली आहे. मला बोलावून घेण्याचे देवाच्या मनात येण्याच्या क्षणाची वाट पाहण्याखेरीज दुसरे काही करण्याचे आता राहिले नाही.”
केरीच्या कामाला तोड नाही, इतके ते अपूर्व व प्रशंसनीय आहे. त्याच्या मिशनकार्याच्या अफाट पसाऱ्यात त्याची श्रेष्ठता व योग्यता दर्शवणारे त्याच्या जीवनातील कसोटीचे प्रसंग नजरेतून निसटून जातात. देव अल्प मनुष्यबळ वापरूनही किती अफाट सेवा करून घेतो हेच त्याच्या जीवनावरून लक्षात येते. केरीप्रमाणे शील असणाऱ्या नम्र, उद्योगशील, आज्ञाधारक, त्यागी, कष्टाळू, वेळेचा व कलागुणांचा सदुपयोग करणाऱ्या पुढाऱ्यांकडून देव त्याची मंडळी रचण्याचे काम तडीस नेतो. ते काम सर्वकाळ टिकते. ख्रिस्ती पुढाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन नम्रपणाने देवाच्या अधीन होऊन हातातील मंडळीचे पालन केले तर फार उच्च सेवा घडेल. केरीच्या जीवनात खूप विघ्ने आली असा केलेला उल्लेख आपण वाचलात. कधीकधी सरकारची मिशनविरोधी वृत्ती उफाळून येत असे; इतके की संपूर्ण मिशनकार्यावर पाणी पडते की काय असे भय वाटावे. १८०६ मध्ये वेलोरमध्ये झालेल्या दंग्यामुळे सुवार्ताप्रसार बंद पाडण्याचा सरकारकडून प्रयत्न झाला. कलकत्यात मिशनरी उतरले की त्यांना परत पाठवले जाऊ लागले. मिशनऱ्यांना उपदेश करण्यास मनाई होऊ लागली. सेरामपुरचा छापखाना बंद करून तो सरकारी मुद्रणालय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कलकत्यास चालू करण्याचाही जोरदार प्रयत्न झाला. डॅनिश गव्हर्नरच्या धाडसी हस्तक्षेपामुळे ही महान आपत्ती टळली.
केरी अनेकदा मिशनचा वाली ठरला. या काळात प्रचंड आर्थिक तणाव आले. सरकारी कॅालेज तर पुढे बंदच करण्यात आले. केरीचा वृद्धापकाळ जवळ येत असता त्याचे भक्कम स्नेही रायलंड व फुलर हे इंग्लंडमधील मिशनरी देवाघरी गेले. त्यांच्या जागी नवीन लोक आले असता फारच मोठी कसोटी झाली. ते अननुभवी तरुण अधिकारी लोकांच्या टीकेला अकारण महत्त्व देऊन नको त्या शंकाकुशंका काढू लागले व कानउघाडणी करू लागले. सर्व बरेवाईट निर्णय त्यांनी आपल्या हाती ठेवले. मिशनच्या इतिहासातील ही अत्यंत दु:खद व कटू बाब होती. केरी व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी या गोष्टींमुळे हाय खाल्ली. शेवटी केरीने स्वदेशातील सोसायटीशी संबंधच तोडून टाकले व स्वत:ला योग्य वाटणाऱ्या दिशेने काम चालू ठेवले, तेव्हाच हे सारे प्रकरण मिटून शांतता लाभली. या सर्व गोष्टींशी मुकाबला करताना केरी आपल्या चाकोरीपासून ढळला नाही की टीकेला भिऊन आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. देवाचे काम शांतपणे गाजावाजा न करता तो करतच राहिला. हे सर्व करताना तोल ढळू न देता, तो सर्वांशी सौजन्याने वागला. त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला.
त्याचे गृहजीवन पाहता त्याची वेडी झालेली पत्नी १८०७ मध्ये मरण पावली. त्याने दुसरे लग्न केले. ती अत्यंत कुलीन घरातील बुद्धिमान स्त्री होती. तिचे वाचन दांडगे होते. तिचे मन सुसंस्कृत व स्वभाव मनमिळाऊ होती. पण तिची प्रकृती तोळामासाच होती. भारतात तिला थोडेफार स्वास्थ्य लाभले. या गरीब मिशनऱ्याची शार्लेट एमिला केरी ही आदर्श पण आजारी पत्नी होती. त्यांना तिची १३ वर्षे सोबत लाभली. हा काळ त्यांच्या जीवनात अगदी आनंदात गेला.
गृहजीवनाखेरीज केरींना बागकामाचा नाद होता. तो अत्यंत नावाजलेला वनस्पती शास्त्रज्ञ व प्राणिशास्त्रज्ञ होता. सेरामपूरमध्ये एक एकरात बाग लावून त्याने तिची उत्तम निगा राखली. ती विज्ञानाचा बहुमोल ठेवा ठरली. सेरामपूर व कलकत्याचे ती अभिमानाचे स्थान बनली. कृषिविज्ञानाची आवड असणाऱ्यांची भारतातील संस्था म्हणून ती अस्तित्वात येण्यास केरीच कारण झाला. इंग्लंड व इतर देशातील विद्वानांनी या नम्र वनस्पती शास्त्रज्ञावर पदव्यांचा वर्षाव केला. इंग्लंडमधून आणलेले बी त्याने येथे पेरून जोपासले. तेथील डेझी येथे फोफावल्यावर त्याला अतिशय आनंद झाला.
यानंतर तो १४ वर्षे जगला. त्याच्या परिश्रमांमुळे अधिकाधिक मिशनरी मज्जाव न होता भारतात येऊ लागले. त्यांना केरी पित्यासमान वाटत असे. ही जबाबदारीही त्याने उत्तम प्रकारे बजावली. या वयोवृद्ध, ज्ञानसंपन्न, अनुभवी व्यक्तीची सहनशीलता व बोध लाभणे त्यांना विशेष मोलाचे वाटे. ही त्याची योग्यता फारच मोठी होती. त्याचा सल्ला मिशनरींना उदात्त, उचित, व्यवहार्य व स्फूर्तिदायी वाटे. मिशनरींना त्याचा बोध असा: “स्थानिक भाषेला प्रभुत्व मिळण्यासाठी परिश्रम घ्यावेत. लोकांमध्ये मिसळावे. त्यांच्याबरोबर फिरायला जावे. दिसेल त्या वस्तूचे नाव त्यांना विचारून लिहून घ्यावे. घरी जाऊन क्षेमकुशल विचारावे. त्यांचे कोणी आजारी असल्यास समाचारास जावे. रोज ऐकलेले शब्द रात्री वहीत टिपून ठेवावेत. हळूहळू बोलताना त्यांचा वापर करावा. आपण त्यांच्यापैकीच एक आहोत असे वर्तन ठेवावे. मायाळूपणे सेवावृत्ती दाखवावी. म्हणजे त्यांचा विश्वास संपादता येईल व लोकांचे कल्याण करण्याची संधी मिळेल. भाषेचे पुरते ज्ञान झाले की त्या भाषेचे व्याकरण लिहून काढावे. त्या भाषेत पवित्र शास्त्राच्या एखाद्या शास्त्रभागाचे त्या भाषेत भाषांतर करून आमच्याकडे तपासायला पाठवावे.” आजचे सुवार्तिक व मिशनरींनाही हा सल्ला मोलाचा वाटेल.
पैशांच्या विनियोगाबाबत त्याचा सल्ला असा असे:
“तुम्ही खर्च करीत असलेला पैसा तुमचा स्वत:चा नाही. आमचाही नाही. तो देवाच्या कार्याला वाहिलेला आहे. ऐहिक गोष्टींसाठी तो खर्च केल्यास देवाचा पैसा आपण लुबाडल्यासारखे होईल. तुम्ही ख्रिस्तासारखे त्यागाने व गरीबीने राहण्याचे व्रत घेतले आहे. मिशनरींच्या हातातील पैसा कोणत्याही व कोणाच्याही संपत्तीपेक्षा महत्त्वाचा व पवित्र असतो.” आज कित्येक मंडळ्या व ख्रिस्ती संस्थांचा आर्थिक व्यवहार पाहता हा बोध फारच बोलका व डोळ्यात अंजन घालणारा आहे.
सदाचाराविषयी तो बोध करतो:
“सर्वांनी प्रेमाने व सौजन्याने वागावे. कोणाच्या पुढे पुढे करून हांजी हांजी करू नये. आपणही इतरांसारखेच मानव असल्याची भावना मनात बाळगून इतरांना प्रतिष्ठेने, सत्याने, कळकळीच्या भावनेने वागवावे. ऐहिक गोष्टीत दंग असलेल्या व्यक्तींशी संबंध आल्यास आचरणात शिष्टाचार पाळावा. इतिहास व भूगोल व लोक याविषयीचा अभ्यास करून परिश्रमपूर्वक आपल्या प्रदेशाची माहिती मिळवावी. बाह्य पेहराव व रूपापेक्षा समंजसपणा व लाघवी स्वभावाला महत्त्व असते.
तो मिशनरी पेशा सर्वश्रेष्ठ मानत असे. त्यामुळे त्याचा पुत्र फेलिक्स ब्रम्ह देशातील मिशनकार्य सोडून ब्रम्ही राजदरबारी ब्रिटिशांचा वकील म्हणून रुजू झाला. तेव्हा केरीने लिहिले, “फेलिक्सचे व्यक्तिमत्व संकुचित झाले आहे. म्हणून मिशनरी काम सोडून तो परदेशी वकील झाला आहे”
विल्यम या आपल्या मुलाला तो लिहितो :
“प्रिय विल्यम,
आपल्या प्रिय तारकाच्या कार्याचे पाऊल पुढे पडावे म्हणून जगायचे नाही, तर मग कशासाठी जगायचे? ते काम चालू असताना दुसरे काही मिळवण्याचा विचार करण्याची इच्छाच नसावी. एक आत्मा प्रभूकडे आणण्याचे भाग्य तुला लाभले नाही तरी प्रभूच्या कार्यामुळे जो आनंद तुला होणार आहे, तो कोणत्याही आनंदापेक्षा उच्च असणार…”
ज्या मिशनऱ्यांना त्याचे सल्ले मिळत ते स्वत:ला धन्य समजत असत. डेविड ब्राऊन, हेन्री मार्टिन, डॅनिएल कोरी, डॅनिएल विल्यम यांचे तो आदराचे स्थान होता. ॲलेक्झांडर डफ हा पहिला स्कॅाटिश मिशनरी खास त्याच्या समाचाराला गेला. दोघांनी अनेक योजनांवर चर्चा केली. डफ निघू लागताच मरणाच्या बिछान्यावर असलेल्या केरीने त्याला बोलावले व हा सत्पुरुष म्हणाला, “तुम्ही या केरीविषयी सारखे बोलत होता. पण मी हा इहलोक सोडून गेल्यावर या केरीविषयी अवाक्षरही बोलू नका; तर डॅा. केरीच्या तारकाविषयी बोलत राहा.” ही सूचना डफ कधीच विसरला नाही.
१८३३ पासूनच डॅा केरीच्या अंतकाळाची चाहुल लागू लागली. त्या काळाविषयी लोक बरेच काही सांगतात. पण एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. त्यावरून या नम्र व्यक्तिच्या अंत:करणातील गुप्त कप्प्यावर प्रकाश पडतो. त्याच्या अंतसमयी लंडन मिशन सोसायटीचा मिशनरी मि. गॅागली त्यांच्यासोबत अर्धा तास घालवीत असता त्यांनी विचारले, “ मृत्युसमय नजीक असता आता तुमच्या मनात कोणते विचार आहेत?” प्रश्न ऐकताच डोळ्यांवरची झापड उडून त्यांनी डोळे उघडून म्हटले, “मला स्वत:च्या तारणाविषयी तिळमात्र शंका नाही. माझा विश्वास कोणावर आहे हे मी जाणतो. तो माझ्या आत्म्याचे रक्षण करायला समर्थ आहे. पण त्याच्या पवित्र सान्निध्यात उभे राहण्याची मला जाणीव झाली की, माझ्या पापदोषांचे स्मरण होऊन माझा थरकाप होतो.” पुढे त्यांना बोलवेना. त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. आणि पुन्हा डोळ्यांवर झापड आली.
९ जून १८३४ रोजी त्यांच्या कुडीतील प्राण तारकाकडे निघून गेला. त्यांच्या विनंतीनुसार साधेपणाने सेरामपूरला त्यांची प्रेतक्रिया झाली. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची दुसरी पत्नी शार्लेट एमिला केरीच्या कबरेपाशी त्यांना पुरले. तिच्याच शिळेवर “विल्यम केरी : जन्म :१७ ॲागस्ट १७६१; मृत्यू : ९ जून १८३४ ; एक दीन, लाचार, आगतिक कीटक तुझ्या दयाघन बाहुंवर अंग टाकतो.” असे शब्द कोरले आहेत. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी नम्रता सोडली नाही. केरींकडून स्वदेशात व भारतातही अतुलनीय, असामान्य, अलौकिक काम झाले. नंतर आलेल्या मिशनरींमध्ये भारतातील सेवेत त्यांचा अग्रक्रम लागतो. त्याची तीन कारणे दिसतात –
(१) त्याच्यानंतरचे मिशनरी मंडळीच्या आमंत्रणावरून आले होते. तर केरीने असे निमंत्रण देण्यास मंडळीला भाग पाडले होते. चैतन्यहीन मंडळीला त्याने खडबडून जागे केले होते. मूर्तिपूजकांमध्ये काम करण्याचे कर्तव्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे ‘आधुनिक मंडळीचा तो जनक’ ठरतो. यासाठी देवाने त्याला बुद्धी व प्रेरणा देऊन पाचारण केले होते.
(२) त्याने असंख्य मिशनरींना या सेवेत वाटेकरी करून घेतले होते. योग्य वेळी मिशनरी वृत्तीची आग पेटवून ती धगधगत ठेवली होती. इंग्लंडमधील व त्या बाहेरील लोकांना सुवार्ता प्रसाराची स्फूर्ती मिळून अनेक संस्था स्थापल्या गेल्याने महान कार्य झाले.
(३) केरींच्या कामाचे प्रमाण पटल्याने भारतात मिशनरींना मुक्त प्रवेश खुला झाला. भारतातील ब्रिटिश सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांशी केरींचे उत्तम संबंध होते. मिशनरी कार्याचा दर्जा व महत्त्व वाढण्यास व या कार्याची आवश्यकता पटण्यास त्याचा खूपच फायदा झाला.
केरीच्या अफाट सेवेचे थोडक्यात वर्णन करणे अवघड आहे. त्याने अनेक सेवा कित्तादर्शक ठेवल्या. पवित्र शास्त्राचे भाषांतर व ख्रिस्ती शिक्षणास त्याने अग्रक्रम दिला. त्याच्या कल्पकतेची दूरदृष्टी, प्रतिभासंपन्नता व धैर्याची त्यावरून पुरेपुर कल्पना येते. अखेर ४० भाषांमध्ये बायबलचे पूर्ण वा अंशत: भाषांतर करण्याचे त्यांचे काम अलौकिक आहे. ते तर पुढेही आजवर चालूच आहे. शालेय पाठ्यपुस्तके, विज्ञानाचे ग्रंथ, धर्मविषयक विविध शब्दकोश संग्रह,
नियतकालिके, त्यांनी प्रसिद्ध केली. सुसंस्कृत हिंदू समाजाच्या ज्ञानार्जनाच्या गरजा भागवण्याची तरतूद केली. त्यामुळे विस्तृत हिंदू समाजाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्यात नवे वारे वाहू लागून चैतन्य आले. त्यांच्या कार्याचे दूरगामी परिणाम होऊन ख्रिस्ती भारताचा तो शिल्पकार ठरला.
आज खरी ख्रिस्ती मंडळी तयार होण्यासाठी अशा वृत्तीचे पुढारी हवे आहेत व त्याचा बोध घेऊन त्यांनी मंडळीच्या रचनेचे कार्य करण्याची गरज आहे. तरच निवडलेल्यांचा आकडा वेगाने पूर्ण होऊन प्रभूचे शांतीचे राज्य पृथ्वीवर लवकर स्थापन होईल.
“हे प्रभू, आमच्या मंडळ्या खडबडून जाग्या होऊ देत. मंडळ्यांमध्ये असे पुढारी निपजू देत. तुझी मंडळी, तुझ्या संस्था शुद्ध कर.”
Social