सितम्बर 8, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

हेन्री मार्टिन

(१७८१-१८१२)

लेखांक १७

पलटणीतील काही ब्रिटिश सैनिकांचा भारतीय स्त्रियांशी विवाह झाला होता. तर काही केवळ विवाहबाह्य संबंध ठेऊन त्यांच्याबरोबर राहात होत्या. अशांची दुरावस्था जाणून त्यांना आध्यात्मिक स्पर्श व्हावा म्हणून त्याने हे खास काम केले होते. अशा अभागिनींची आत्मिक काळजी घेणारा हा पहिलाच चॅप्लेन होता. दिनापूरमध्ये त्यांच्यासाठी तो खास उपासना घेई. हिंदू, मुस्लिम दोन्ही समाजांकडे त्याने समान लक्ष दिले. स्वत:ची पदरमोड करून दोन्ही समाजांसाठी शाळा चालवल्या. पण हिंदुंची त्याला जसजशी माहिती होऊ लागली तसतशी त्यांच्याविषयीची त्याची आशा कमीकमी होऊ लागली. ब्राम्हणांची खात्री पटवून देणे कदापि शक्य नसल्याचे त्याने म्हटले. ‘एखाद्या हिंदूने विश्वास ठेवणे म्हणजे मेलेला माणूस जिवंत होण्यासारखे आहे.’ असे तो म्हणत असे.

दिनापूर पाटण्यापासून जवळ होते. पाटणा मुसलमानांचे ठाणे होते. तेथे पूर्वी ब्रिटिश राज्यकर्ते असल्याने त्यांना ख्रिस्ताकडे वळवणे त्यांना नेहमीच महत्त्वाचे वाटे. तो करणार असलेले भाषांतर मुस्लीमांच्या हाती पडणार होते. म्हणूनच मुस्लीमांसाठी पहिला मिशनरी म्हणून त्यालाच पहिला मान मिळतो. भाषांतरात मदत करायला त्याला फॅारेन बायबल सोसायटीने मिर्झा मिरूत नावाचा एक इराणी व साबस्त नावाचा एक अरब अशा दोन व्यक्ती पाठवल्या. त्यातील मिर्झा ख्रिस्ती होण्याचा निर्णय अखेरपर्यंत घेऊ शकला नाही. त्याचे हिंदीवर प्रभुत्व होते. साबस्त हा वाळवंटात जन्मलेला ख्रिस्ती होता. पण फार तापट व मत्सरी होता. त्याची चूक काढलेली त्याला खपत नसे. स्वत:च्या कामी तो फार आत्मसंतुष्ट होता. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांशी त्याला जमवून घेता येत नसे. त्याचा हा स्वभाव मार्टिनचा अंत पाहायचा. त्याने हेन्रीसोबत नक्कीच परिश्रम केले. ख्रिस्ताचा गरीब, सौम्य स्वभाव जपण्यासाठी व सहकाऱ्यांशी खटके उडू नयेत म्हणून जपण्याची हेन्रीमध्ये कमालीची नम्रता आढळते. त्याच्या डायरीतील या नोंदी पाहा –

७ जानेवारी १८०८- लोकांसाठी काम केल्यावर भाषांतराचे काम करतो. ते काम जवळ जवळ झाले आहे. ते निष्फळ ठरू नये अशी इच्छा करतो. हे काम करताना मी वचनाचा पूर्वीपेक्षा खोलवर अभ्यास केला. या परिश्रमांचा मलाच फायदा झाला.
३१ मार्च १८०८ – सिरियाकमध्ये भाषांतर केलेली शुभवर्तमाने पुन्हा वाचून त्यात सुधारणा करीत आहे.
१ ते ४ जून १८०८ – फारसी भाषेतील मत्तयाचे शुभवर्तमान साबस्तला सारखे वाचून दाखवत आहे. कामात मुळीच खंड पडू देत नाही. ज्युलियस नावाचा इटालियन पाळक भेटला. त्याच्याशी फ्रेंच भाषेत बोललो.
६ जून १८०८ – फारसीतील शुभवर्तमानांच्या भाषांतराचे काम चालू आहे. रोज दवाखान्यात सैनिकांच्या समाचाराला जातो. त्यांची आत्मिक देखभाल केल्यावर मला समाधान वाटते. हुशारी येऊन अंगात चैतन्य संचारते. मत्तयकृत शुभवर्तमानाचे फारसी भाषांतर मि. ब्राऊनकडे छापायला पाठवून दिले. उरलेला भाग पूर्ण करण्याचे काम चालू आहे. आजच्या इतका माझ्या रागीटपणाचा अंत कधी पाहिला गेला नसेल. कारण पवित्र शास्त्राच्या भाषांतराच्या माझ्या योजनेला जनरलने पूर्ण विरोध केला. शेवटी माझ्या पापांचा भार वधस्तंभापाशी उतरून ठेवत माझ्या त्रस्त जिवाने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा कोठे संध्याकाळी माझ्या मनाला शांती, समाधान लाभले.
२५ ते २८ सप्टेंबर १८०८ – अरबी भाषेतील रोमकरांस पत्राचे भाषांतर चालू आहे. हिंदी भाषांतरातील चुका शोधण्याचे कामही चालू आहे. बायबल सोसायटीला भाषांतराचा अहवाल पाठवत आहे. मधून मधून तुर्की व्याकरण वाचत आहे. 

या अल्प नोंदींवरूनही तो किती अवाढव्य काम करीत होता हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळेच त्याच्या प्रकृतीवर परिणाम होत होता. तरीही त्याने आपले उद्दिष्ट गाठलेच.

१८१० च्या सुमारास हिंदी नवा करार पूर्ण झाला. काही दिवसांनी अरबी व फारसी भाषेतील नव्या कराराचे काम पूर्ण झाले. यात साबस्तची खूप मदत झाली. पण अरबी भाषा सोपी नसून विद्वत्ताप्रचुर वाटते. त्यात प्रचलित वाक्प्रचार वापरले नसल्याचे तज्ज्ञांचे मत होते. मार्टिनने देखील ते कबूल केले. आणि ते दोष काढून टाकण्याची योजना आखली. तो म्हणतो, ‘देवाने मला आयुष्य दिले तर अरबस्तानात जाऊन अरबी भाषेत व इराणला जाऊन फारसी भाषेत मी बायबलचे भाषांतर करीन. भारतीय भाषांची भारतात भाषांतरे झाली तशी त्या त्या भाषांची त्या त्या देशांत भाषांतरे व्हावीत. अरबी भाषेतील नवा करार पूर्ण करीपर्यंत मी माझे नखही कोणाला दिसू देणार नाही.’ 

हा बेडर माणूस कशापुढे हार खाणारा नव्हता. हिंदीत त्याची झपाट्याने प्रगती झाल्याने हिंदीत संदेश देण्याची त्याची पात्रताही वाढली. त्यासाठी तो संधीही उपलब्ध करून घेत असे. विशेषत: भिकाऱ्यांसमोर त्याचे संदेश देतानाचे दृश्य लोकांच्या खास स्मरणात राहिले. दर रविवारी शेकडो भिकारी, भटके साधू, बैरागी, गोसावी त्याच्या घरासमोर जमत असत. त्यानंतर त्यांना तांदळाचे वाटप केले जाई. ते त्याचा तळमळीचा संदेश ऐकत असत. 

मिसेस शेरवुड लिहितात –
“त्याच्याकडे भक्तिला येणाऱ्यांचे अनेक अवतार आहेत. लहान, थोर, तरूण, वृद्ध, स्त्री, पुरूष, सर्व गटातील धष्टपुष्ट, कृश, अंगावर कापडांची लक्तरे असलेले, किंवा अजिबातच कपडे न पांघरलेले, अंगाला शेण, राख फासलेले, चमनगोटा केलेले, तर पायांपर्यंत केसांच्या जटा वाढलेले हे उपासक असत. कुवासनांना वाव दिल्याने त्यांची दृष्टी कठोर बनलेली दिसे. तंबाखू चघळून ओठ काळे ठिक्कर पडलेले असत. पान खाऊन तोंड लाल झालेले असे. तरीही मार्टिन अशा लोकांच्या घोळक्यात बसू लागला तेव्हा ब्रिटिश अधिकारी त्याच्यावर बारीक नजर ठेऊ लागले.”

कानपूरमध्ये समाज कंटकांचा एक वर्ग होता. त्यांच्यामुळे, दंगेधोपे, रक्तपाताचा सतत संभव असायचा. पण हेन्रीच्या  सभांमध्ये असे काही कधीच घडले नाही. जरी त्या वर्गात पेरलेले बी खूप सफल झाले असे म्हणता आले नाही तरी एखाद दुसरा दाणा तरी कसदार जमिनीत नक्कीच पडला. त्यातूनच एक ख्रिस्ताचा सेवक निपजला. लखनौचा शेख साले नावाचा अरबी व फारसी भाषा शिकवणारा एक मुनशी होता. त्याने या संताचे आस्थेवाईक शब्द ऐकले. तो ख्रिस्ताचा शिष्य झाला. आपल्याच लोकांमध्ये ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास त्याने स्वत:ला वाहून घेतले. बहुतेक लोक ऐकत पण त्यावर मनन, विचार करीत नसत.

पण अखेर सुवार्तेचा विजय होणारच असा हेन्रीचा दृढ विश्वास होता. तो म्हणतो – “गंगा वाहते तो भाग ख्रिस्ती झालेला, ख्रिस्ती मंदिरांनी सुशोभित झालेला असेल. ख्रिस्ती शेतकरी जमीन कसतील. झाडांखाली व सर्वत्र ख्रिस्ताच्या नामाचा घोष ऐकू येईल. असा एक दिवस नक्की उजाडेल.” आमेन.
ख्रिस्ताच्या द्वितीयागमनानंतर एक हजार वर्षांच्या राज्यात असेच दृश्य असेल. तो दिवस जवळ येऊन ठेपला आहे. वाचका, तू तयार आहेस का या राज्यासाठी?

जानेवारी १८११ मध्ये हेन्री मार्टिनने कलकत्ता सोडले. त्याचा मित्र डॅनिएल कोरीने इंग्लंडच्या मित्राला पत्र लिहिले, “हेन्री हवापालट करून पाहणार आहे. देव करो. तो खडखडीत बरा होवो. तो बरेच दिवस वाचला पाहिजे. तो किती विद्वान आहे, तुम्ही जाणताच. परिश्रमपूर्वक हस्तगत केलेली विद्या त्याने ख्रिस्ताला समर्पित केली आहे. तो जितकी सार्वजनिक कर्तव्ये बाजूला ठेवील तितका तो वाचण्याचा संभव अधिक आहे. नाहीतर सर्व आटोपलेच समजावे.” 

त्याची आयुष्यमर्यादा अल्प राहिली होती तरी उपदेशाचा व्याप कमी झाल्याने ती थोडीफार वाढणार होती हे नक्की. भारत सोडल्यापासून इहलोकी जाईपर्यंतचा त्याचा काळ सुखात गेला असेच म्हणावे लागेल. या काळात त्याने फक्त मिशनकार्यच केले. त्यामुळे त्याच्या जीवनक्रमाला सुसुत्रता आली होती. या काळात तो ख्रिस्त शिष्य, वधस्तंभाचा पुरस्कर्ता व वाली म्हणून अत्यंत प्रिय वाटतो. त्याला अनुरूप असणाऱ्या समाजाशी त्याचा क्वचितच संबंध येई. त्याचे शुद्ध गुण, व उच्च संस्कार दाखवायला त्याला वावच मिळत नसे. दिनापूर व कानपूरच्या लष्करी वृत्तीच्या लोकांमध्ये व त्याच्या समाजात तो संकोचाने वागत असे. 

आताच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासात तो सतत स्टुअर्ट एलफिन्स्टनच्या सहवासात होता. मुंबईचा गव्हर्नर, जोनाथान डंकनचा पाहुणा म्हणून राहिला होता. थोर व प्रतिष्ठित ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर रोज त्याची ऊठबस होती. त्याला भेटून सर्वांनाच आनंद वाटे. त्याची त्यांच्यावर छाप पडे. एल्फिन्स्टन म्हणतो, “हेन्री मार्टिन म्हणजे एक विद्वान रत्नच आहे. हा अत्यंत सोम्य, आनंदी, धार्मिक मनुष्य आहे. तो नाविकांशी सतत ख्रिस्ताबद्दल बोलतो. सर्वांना हसवतो व स्वत:ही मनसोक्त हसतो.” ब्रिटिशांचा इराणमधील सर गोरे आऊस्ले यांना जॅान माल्कमने हेन्रीविषयी शिफारस पत्र दिले होते. त्यावरून त्याच्या मनोवेधक वर्तनावर प्रकाश पडतो. तो म्हणतो, “हेन्रीने मला आश्वासन दिले आहे की इराणात मी सुवार्ताप्रसार व वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा करणार नाही. दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करीन. जुनी शुभवर्तमाने कोठे मिळतात का ते पाहीन आणि अरबी व फारसी भाषेत पवित्र शास्त्राचे बिनचूक भाषांतर करण्याचे तंत्र मी आत्मसात करीन. तुम्हाला हेन्री मार्टिन नक्की आवडेल. तो जेवणापूर्वी व नंतर प्रार्थना करील, तेव्हा देवाचे निष्कारण नाव घेणाऱ्यांची तो कानउघाडणी करील. त्याची विद्वत्ता तुम्हाला तृप्त व संतुष्ट करील. त्याच्या आनंदी वृत्तीने जमलेल्यांचा आनंद तो द्विगुणित करील.”

धर्मविषयक वाद न करण्याच्या प्रतिज्ञेत तो कितपत उतरला याबाबत शंकाच आहे. २१ मे १८११ रोजी तो बुशायर बंदरात आला. तोवर त्याला चांगली शक्ती आली होती. पण तेथे फार उकाडा असल्याने तो ९ दिवसांनी शिरोझला निघाला. हा प्रवास दगदगीचा असला तरी हवा पालटण्यास अनेक लोक तेथे जात असत. तेथे त्याने युरोपियन पोशाख सोडून दिला. अगदी इराणी पारंपारिक पेहराव तो करू लागला. भारत सोडल्यापासून त्याने दाढीमिशा वाढवल्या होत्या. येथे तो गालिचावर बसून हाताने जेवू लागला. शिराझमधला काळ त्याच्यासाठी सुवर्णकाळ होता. सर गोरे आऊस्ले अत्यंत दयाळू होते. त्यांचा इराणी मित्र जाफर अलिखानने मार्टिनला आपल्या घरीच ठेवून घेतले. त्याचा मेहुणा मिर्झा अलिखानने त्याला भाषांतरात खूप साह्य केले. मार्टिनने वेळ वाया न घालवता काम केल्याने भाषांतराचे काम झपाट्याने झाले. पण तेथील लोकच त्याला चर्चेला उद्युक्त करीत. चर्चेत वेळ गेल्याने त्याला विसावा मिळत नसे. इराणी लोक अथनैकरांप्रमाणे ऐकायला उत्सुक असत. पण शेवटी काहीच निर्णय घेत नसत. हा वेळ वाया गेल्यासारखा वाटे. पण संधी दवडायची नाही हा त्याचा शिरस्ताच असे. तो वादात विजयी झाल्याचे प्रतिपक्षही मान्य करीत असे. पण खरा विश्वास मान्य करायची त्यांची हिंमत नसे. त्यामुळे त्याने त्यांची आशा सोडून दिली होती. लोकांच्या तारणासाठी शर्थ करण्याची त्याची चिकाटी आपल्याला आजही हरवलेल्या आत्म्यांसाठी परिश्रम करण्याचा धडा देते.

इराणमधील मुल्लांचा आचार्य मिर्झा इब्राहिमने पत्रक काढून ख्रिस्ती धर्मविश्वासावर टीका केली. त्याला हेन्री मार्टिनने पत्रक काढूनच प्रभावी उत्तर दिले. इतिहासकार डब्ल्यू. काये म्हणतो- “परक्या देशात कोणाचाही आधार नसताना पवित्र शास्त्र घेऊन मार्टिन एकटाच मुस्लीम धर्माच्या पुरस्कर्त्यांशी चर्चा करीत असल्याचे भव्य दृश्य इतिहासात आढळत नाही. त्याच्या अंगी अलौकिक सामर्थ्य असल्याचे आढळून येत असे. शांतपणे व धैर्याने तो मतप्रदर्शन करीत असे. त्याचे ज्ञान व विद्वत्ता पाहून मुस्लीम काझी व मुल्ला तोंडात बोटे घालीत असत. आपल्या निर्मळ, गोड व सौम्य बोलण्याने तो सर्वांचा विश्वास संपादन करीत असे.”

२४ फेब्रुवारी १८१२ मध्ये फारसी भाषेत नव्या कराराचे भाषांतर पू्र्ण झाले. त्याबद्दल तो कमालीचा समाधानी होता. इराणच्या शहाला व भावी राजाला आपल्या भाषांतराची एक प्रत सादर करण्याची त्याची इच्छा होती. पण वजिराच्या पलीकडे त्याचा प्रवेशच होऊ शकला नाही. तेथील दोन वितंडवादी मुल्लांमुळे त्याची विनंती वजिराने मान्यच केली नाही. त्यामुळे त्याची ही प्रबळ इच्छा अतृप्तच राहिली. या प्रसंगाविषयी मार्टिन लिहितो –
“इराणच्या राजाला सादर करण्याच्या अपेक्षेने माझा ग्रंथ मिर्झासमोर पडला होता. त्याच्या मागून सारेच तेथून निघाले. तो ग्रंथ ते तुडवतील या भीतीने त्यांच्यात घुसून मी तो ग्रंथ टॅावेलात गुंडाळला. तेव्हा त्या ग्रंथाकडे त्यांनी तुच्छतेने कटाक्ष टाकला. मी एकटाच तिथून निघालो व माझा तंबू गाठला. ख्रिस्ताविषयी ग्वाही दिल्याबद्दल त्या तंबूत व घाणीत सारा दिवस उकाड्यात काढावा लागला. त्या विचारात प्रार्थनेत असता ख्रिस्ताच्या शांतीदायी अभिवचनांनी माझ्या त्रस्त जिवाला समाधान मिळाले.” त्यानंतर दोन वर्षांनी सर गोरे आऊस्लेंच्या औदार्यामुळे व मेहरबानीमुळे तेव्हा नाकारण्यात आलेली ही ग्रंथरूपी भेट राजाच्या हाती पडली. त्याने तिचा मन:पूर्वक स्वीकार केला. तोवर हेनरी मार्टिन प्रभूकडे केव्हाच विसावला होता.

ग्रंथाचे काम झाले तेव्हा हेन्रीमध्ये त्राण उरले नव्हते. कधी मायदेशी जाईन असे त्याला झाले होते. शिराझवरून तो पश्चिमेस ताब्रिझला गेला. अर्ध्या रात्री मदतीला धावून येणारा सर गोरे आऊस्ले जेथे होता, तेथेच त्याचा अंत होण्याची चिन्हे दिसू लागली. महिनाभर तो तापाने अंथरुणाला खिळला. अखेर त्याचा ताप उतरला. पण त्याच्या हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. तरी तो हिंडफिरू लागला. पुढील प्रवास करण्याची त्याला आतुरता लागली होती. सर आऊस्ले व इतर अधिकाऱ्यांनी त्याला खूप मदत केली. त्यांनी त्याला राजदरबारीचा एक वाटाड्या व दोन अर्मेनियन नोकर दिले. २ सप्टेंबर १८१२ रोजी घोड्यावर स्वार होऊन तो कॅान्स्टॅन्टिनोपलला निघाला. तो १३०० मैलांचा प्रवास होता. खरे तर त्याची प्रकृती पाहाता एवढ्या मोठ्या प्रवासाची जोखीम स्वीकारणे शुद्ध वेडेपणाच होता. त्यात वाटाड्या हसन त्याला दयामाया न दाखवता पुढच्या प्रवासाला लावीत होता. तेव्हा उद्याचे मरण आजवर ओढवण्याची चिन्हे दिसू लागली. रात्रन् दिवस हसन अथक प्रवास करायला भाग पाडीत असे. २ ॲाक्टोबरला त्यांचा जेथे मुक्काम पडला होता, तेथे आराम मिळेल असे त्याला वाटले. पण त्याला भलताच ताप भरला. डोळ्यांची जळजळ होऊ लागली. तंबुतील विस्तवामुळे त्याच्या जिवाची लाहीलाही होऊ लागली. विस्तव विझवा नाहीतर मला तरी बाहेर काढा अशी त्याने हसनला विनंती केली. पण तीही त्याने मानली नाही. शेवटी सामानासुमानात डोके खुपसून तो कसाबसा झोपला. त्याचे डोळे कायमचे मिटायची वेळ जवळ येऊन ठेपली. 

६ ॲाक्टोबर १८१२ एका डोंगराच्या खिंडीजवळील खेड्यात त्याच्या रोजनिशीत त्याने शेवटचे शब्द लिहिलेले आढळतात ते असे – “आज पाठाळच मिळेना म्हणून अनपेक्षितपणे मला विसावा मिळाला. बागेत बसलो. माझा मित्र, सांगाती, सांत्वनदाता माझा देव, याच्यावर शांत चित्ताने मनन केले. सार्वकालिक जीवनाचे युग केव्हा येईल ते येवो. पण तो नवा स्वर्ग, नवी पृथ्वी मला केव्हा दिसेल? अनितीच्या जगातून सुटका होऊन तेथे कधी प्रवेश मिळेल? अशा विचारात मी सतत होतो…” 

हेन्रीचा अंत नेमका कधी झाला हे समजणे कठीण आहे. पण त्या समयी त्या भागात प्लेगने कहर माजवला होता. तरी ॲाक्टोबर १८१२ मध्ये त्याचे देहावसान झाले हे नक्की. तोकात येथील अर्मेनियन चर्चच्या कबररस्तानात त्याला सन्मानाने मूठमाती देण्यात आली. अवघ्या ३१ वर्षाच्या वयात त्याची जीवन यात्रा संपली. पण अत्यंत तत्परतेने त्याने आपल्या पिढीची फलदायी सेवा केली.

सुवार्ताप्रसार करणारे अनेक मिशनरी आपल्यामागे मंडळीसाठी अनेक बहुमोल देणग्या ठेवून गेले. हेन्रीचे अल्पायुष्यातील काम पाहून माणूस थक्कच होतो. पौर्वात्य देशातील चर्च, त्याच्या मायभूमीतील मूळ चर्च व अनेक ख्रिस्ती मंडळ्यांना त्याने ऋणी करून ठेवले आहे. पौर्वात्य मंडळ्यात भारताला, इराण व अरबस्तानातील मंडळ्यांना पवित्र शास्त्राच्या भाषांतराची तो देणगी देऊन गेला आहे. लोकांना आपल्या भाषेत पवित्र शास्त्र उपलब्ध करून द्यायचा त्याला ध्यास लागला होता. त्यापुढे त्याला काहीच महत्त्वाचे वाटत नव्हते. हेच बी पेरता येऊन भरपूर फळ घेता येण्यासारखे असल्याचे त्याने हेरले होते. भाषांतरित ग्रंथांची यादीच पाहा:

• १८०७ मध्ये भारतात येऊन जेमतेम एक वर्ष झाले ना झाले तोच चर्चच्या उपासना विधींच्या पुस्तकाचे
   प्रकाशन केले.
• त्याच वर्षी प्रभूच्या दाखल्यांवरील भाष्यसंग्रह प्रसिद्ध केला.
• दोनच वर्षांनी १८०९ मध्ये चार शुभवर्तमानांचे हिंदीत भाषांतर केले.
• १८१०मध्ये नव्या कराराचे हिंदी भाषांतर पूर्ण केले.
• नव्या कराराचे अरबी भाषांतर पूर्ण केले.

कालपरत्वे भाषा बदलत जाते. त्यामुळे त्यात बदल होत गेला. तरीही त्याच्या पिढीतील लोकांना त्याचा फायदाच झाला व त्यांना आशीर्वाद मिळाला. हेन्रीची सर्वोच्च देणगी म्हणजे इंग्लंडच्या चर्चला त्याने आध्यात्मिक निद्रेतून खडबडून जागे केले. तिच्यात चैतन्य आणले व आध्यात्मिक बलशाली चर्च बनवले. त्याचे देहावसान झाल्यापासून आजवर मिशनकार्य चालूच आहे. ह्या मंडळीला मिशनरी चर्च बनवण्यात मार्टिनचा मोठा वाटा आहे. भारतीयांविषयीची त्यांची उदासीनता त्यानेच दूर केली. त्यामुळे त्यांचे मिशनरी भारतात येत राहिले. त्यांनी डॅनिश, जर्मन व ब्रिटिश चॅप्लेन्सना थोडीफार मदत केली होती. पण स्वत: मिशनसेवेत भाग घेतला नव्हता. हेन्रीमुळे त्यांची ही वृत्ती बदलली.

हेन्री कानपूरहून निघताना त्याची डायरी जाळून टाकणार होता. पण मि. कोरीने तू येईपर्यंत मी ती सांभाळीन या अटीवर ती ठेवून घेतल्याने त्याच्या मृत्युनंतर त्याचे चरित्र लिहिता आले.

हेन्री श्रेष्ठ, विद्वान, निष्काम बुद्धीने सेवा करणारा देवभक्त होता. आपली शक्ती, वेळ व प्राण खर्चून त्याने अल्पायुष्य वेचले. त्याच्या मृत्यूने सारे इंग्लंड शोकाकुल झाले. त्याच्याविषयीचाअभिमान, भूषण व कौतुकाने मन भरून येऊन कित्येकांना त्याचे अनुकरण करावेसे वाटू लागले. तेथील मंडळ्यांचे परस्परात भेद असूनही हेन्रीबाबत सर्वांचे मतैक्य होते.

दिनापूरच्या बंगल्यात बसून एकांतात पवित्र शास्त्राचे भाषांतर करणारा, ५०० भिकाऱ्यांच्या जमावापुढे सुवार्ता सांगणारा, शिराझच्या इस्लामी काझी व मुल्लांशी वाद घालून त्यांच्या मतांचे खंडन करणाऱ्या हेन्रीचे नाव घेताच ते सद्गदित होत असत. त्यानंतर जे मिशनरी आले, त्यांचा तो कुलगुरूच ठरला. त्याच्या अंत:करणातील प्रज्ज्वलित ज्योत अनेकांच्या अंत:करणात तशीच पेटली. त्यामुळे बराच काळ त्यांचे चर्च मिशनरी चर्च म्हणून गाजले.

इंग्लंडच्या चर्चखेरीज इतर मंडळ्यांसाठी देखील त्याची कामगिरी मोलाची ठरली. ॲंग्लिकनांप्रमाणे स्कॅाटिश, प्रेस्बिटेरियन, इंग्लिश नॅान कन्फर्मिस्ट, जर्मन ल्युथरियन व अमेरिकन मंडळ्यांवरही त्याचा प्रभाव पडला. त्याने दाखवून दिलेल्या प्रकाशात ते हर्षाने काम करीत होते. सर्व मंडळ्या आपला बंधू मानून त्याचा आदर करतात. डॅनिएल कोरी म्हणतो, ‘त्याच्यासारखा सर्वांगसुंदर मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही व येणारही नाही.’ थॅामसन सारखा असाच एक निष्ठावंत मिशनरी म्हणतो, “हेन्रीसारखी विनयशीलता, शालीनता व प्रेमळपणा माझ्या अंगी कधी येईल असे मला झाले आहे. तो सतत स्वर्गीय गोष्टींविषयीच बोलायचा. त्यामुळे त्याच्याशी बोलणे म्हणजे स्वर्गीय सुखाचा लाभच असे. त्याच्याशी बोलल्याने त्रस्त मनाला मलमपट्टी केल्यासारखे वाटे. त्याची डायरी वाचून देवाच्या माणसाचा सहवास लाभल्यासारखे वाटते. त्याच्या ठायी दोष होते, ते तो कबूलही करायचा. पण तसे असूनही सत्याला जागून सर्व काही सहन करणारा देवाचा माणूस हीच त्याची तेजस्वी प्रतिमा समोर दिसते. त्याने देवाच्या सामर्थ्याचाच प्रभाव पाडला.”

हेन्री म्हणजे ध्यानमग्न दृष्टीने, कान उघडे ठेवून देवाची वाणी ऐकणारा, तीक्ष्ण दृष्टीचा, कृतिशील व्यक्ती होता. स्वत:तील दोष व अन्यायाशी तो सतत लढा देत राहिला. अहंकार दूर सारून कमीपणा घेऊन, बहुमोल देणग्याही त्याने तुच्छ मानल्या व प्रभुचरणी त्या अर्पण केल्या. फ्रान्सिस झेवियर प्रमाणे तो जीवन जगला, आणि रणरणत्या उन्हात प्राण सोडला. झेवियरप्रमाणे शेवटी शुश्रुषा करण्यासही त्याच्याजवळ आपले माणूस नव्हते. दोघांच्या विश्वासात मात्र दोन धृवांचे अंतर होते. ऐहिक गोष्टींवरील दृष्टी काढून त्याने स्वर्गीय गोष्टींवर आपली दृष्टी खिळवली होती. रात्रन् दिवस स्वर्गच त्याचे ध्यान व अन्न होते. विश्वासाच्या जोरावर नेहमीच आनंदात डुंबणाऱ्या या संतामुळे लोकांना स्वर्गाची द्वारे सतत खुली असत. यातना, शंकाकुशंका, गुप्तदोष, अपराधांची जाणीव असतानाही प्रभूच्या अभिवचनांमुळे प्राप्त होणाऱ्या टिकाऊ आनंदाचा त्याने अनुभव घेतला. आपले डोळे लवकर झाकणार हे जाणून इस्लामी धर्मविश्वासाच्या असत्याला तोंड देण्याचा त्याचा निर्धार होता. शक्य तितक्या लवकर अनेकांचे तारण होण्याची उत्कंठा त्याला चैन पडू देत नव्हती. जिच्यावर त्याचे प्रेम होते तिने सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या जीवनाशी समरस होऊन दोघांनी मिळून देवाला वाहून घेणे नाकारले. त्याच्या बहिणीही स्वर्गसुख भोगायला गेल्या. त्यांची या प्रियजनांशी कधीच भेट झाली नाही. विश्वास व सुवार्ताप्रसारासाठी जगणे याशिवाय त्याच्यापाशी काहीच नव्हते. अस्थिंचा पिंजरा झिजेपर्यंत, जराशी विश्रांती घ्यावी असे वाटेपर्यंत त्याने देवाच्या कार्यासाठी धडपड केली. पुरे म्हणेपर्यंत हाडांची काडं केली.

ख्रिस्तावर किती महान अत्युच्च प्रीती! आज ऐहिक जीवनाच्या संसारात रममाण होणाऱ्या, हरवलेल्या आत्म्यांविषयी उदासीन असणाऱ्या, सत्याचा संदेश आपल्या नित्याच्या जीवनातून सांगण्याची कर्तव्यदक्षता नसणाऱ्या, स्वार्थी जीवन जगणाऱ्या, सुवार्ताकार्याचे भान नसणाऱ्या, जगिक ज्ञानामुळे खऱ्या देवाविषयीच्या केवळ शंकाकुशंकांत गुंतून पडलेल्या, देवाच्या अत्युच्च प्रीतीचा विचार दूर सारणाऱ्या मंडळीची ख्रिस्ती आध्यात्मिक वृद्धी रोखणाऱ्या, अशा आमची कानउघाडणी करणारा संदेश हेन्री मार्टिन आपल्या जीवनाने देत आहे. लवकरच देवाचा क्रोध पृथ्वीवर ओतला जाणार असल्याचे भान ठेवून आजच्या मंडळीने आत्मपरीक्षण करून देवाच्या मार्गात राहाण्याची खटपट करायला हवी.

Previous Article

हेन्री मार्टिन

Next Article

डॅा. ॲलेक्झांडर डफ

You might be interested in …

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का? लेखक: स्टीफन विटमर

येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार. १९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. तसे काही घडले […]

तुमच्या सर्वस्वाने स्वर्गाकडे नेम धरा

मार्शल सीगल  जर स्वर्गात संपत्ती कशी साठवावी हे जर तुम्ही शिकला नसाल तर अर्थातच तुम्ही जगात संपत्ती साठवण्यात जीवन घालवाल – आणि एक अपार अक्षय आणि समाधानकारक गोष्ट गमवाल. जेव्हा “स्वर्गात संपत्ती साठवा” हे आपण […]