जनवरी 28, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स

लेखांक ५

(ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे  ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.)

धर्मजागृतीचा भारत व आशियावरील परिणाम

अनेक विद्वानांना वाटले की धर्मजागृती ही मिशनरी चळवळ नव्हती. मूळ धर्मसुधारक – लूथर, झ्विंगली, कॅल्विन, नॉक्स आणि इतर – हे सैद्धांतिक विषयात अगदी रममाण झाले होते. त्यांनी खोट्या रोमन धर्माने भ्रष्ट झालेल्या युरोपात खरी बायबल आधारित ख्रिस्ती धर्मप्रणाली पुन्हा स्थापण्यासाठी धडपड केली. सुवार्ताप्रसार हे मिशनकार्य कदाचित त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यावेळी अग्रस्थानी नसावे.

याउलटपक्षी तरीही काहींनी सुवार्ताप्रसाराच्या मिशनकार्याला चेतना दिल्याचे पुरावे आढळतात. जॉन केल्विनची मान्यता घेऊन १५५५ च्या सुमारास ह्युगेनॉट्स सुवार्ताप्रसार मोहिमेसाठी बाहेर पडून ब्राझिलला गेले. अॅनाबॅप्टिस्ट व पायटिस्ट मूव्हमेंट्स फारच मिशनरी वृत्तीच्या होत्या आणि त्यांच्या आरंभीच्या काळात सुधारित ईश्वरविज्ञानाला समर्पित होत्या.

भक्कम सैद्धांतिक पाया घालण्यात सुधारकांचा प्रमुख वाटा होता. त्यामुळे प्रारंभीच्या प्रॉटेस्टंट मिशनकार्याला प्रेरणा मिळाली. नीतिमान ठरले जाण्याचा सिद्धांत, वैयक्तिक रीतीने नवीन जन्म ग्रहण करून त्यविषयी खात्री असणे व सर्व विश्वासीयांचे याजकत्व यावर सुधारकांनी जोर दिला. देवाच्या वचनाचा अंतिम अधिकार व केंद्रभूतपणा हे पायाभूत विश्वास होते. या व बायबलमधील इतर विश्वासामुळे सुधारकांना स्फूर्ती मिळाली व त्यांच्या निष्ठांचा व पद्धतींचा आरंभीच्या प्रॉटेस्टंट मिशनवर प्रभाव पडला.

इंग्लिश प्रभाव

आशिया व भारतावरील धर्मजागृतीच्या प्रभावाची प्रशंसा करताना  धर्मजागृतीचा अॅंग्लिकन चर्चवर कसा प्रभाव पडला  याचा आपल्याला मागोवा घ्यावा लागेल. जरी वैयक्तिक कारणास्तव आठव्या हेन्री राजाने चर्च ऑफ इंग्लंडला पोपच्या गुदमरून टाकणाऱ्या पकडीतून अलिप्त  केले तरी धर्मजागृतीने इंग्लंडला लागलीच अलिंगन दिले. इंग्लंडमधील धर्मजागृतीचा आघात समजून घेणारे प्रमुख दोन पुरुष होते: थॉमस क्रॅमर आणि थॉमस क्रॉमवेल.

इंग्लिश  धर्मजागृती चेतवणारी अत्यंत बलवान व सामर्थ्यशाली व्यक्ती कदाचित क्रॉमवेलला म्हणावे लागेल. खांद्याला खांदा लावून जिवावर उदार होऊन कसोशीने परिश्रम घेणाऱ्या ह्यू लॅटिमर व निकोलस रिडली या दोघांचाही सहभाग विचारात घ्यावा लागेल. लॅटिमरने बिशप असलेल्या आपल्या भावाला अशा शब्दात उत्तेजन दिले की,  “हिंमत धरा मि.रिडली, आणि मर्दासारखे वागा. देवाच्या कृपेने आजच्या दिवशी इंग्लंडमध्ये आपण अशी ज्योत पेटवून देऊ की ती कदापि विझवली जाणार नाही.” आणि त्यांनी तसे केले. त्यांनी पेटवलेला सुवार्तेचा अग्नी भारत व संपूर्ण आशियात फैलावला.

अँग्लिकन भक्तिगीतांमधून मी व्यक्तिश: पुष्कळ ईश्वरविज्ञान शिकलो. मी मोठा होत असता ती गीते भारतातील अँग्लिकन चर्चमध्ये गायली गेली. ही भक्तिगीते अत्यंत अद्भुत होती. कृपेच्या सिद्धांतांनी भरलेली होती. मला ख्रिस्ताची ओळख नव्हती, पण मला विश्वासाची ही महान भक्तिगीते ठाऊक होती. कॅल्व्हिनचा जिनिव्हा आणि मोरेव्हियनांचा अँग्लिकनांवर व मेथडिस्ट जनांवर प्रभाव पडला आणि त्यांच्यामुळे ही ख्रिस्तकेंद्रित, कृपाकेंद्रित, परिवर्तन केंद्रित भक्तिगीते भारतात आली. भारतावर सुवार्तेचा जो आघात झाला त्याचा मागोवा घेताना या महान भक्तिगीतांचीही तुम्हाला दखल घ्यावी लागेल. सुधारक व सुवार्तावादी गीतकारांनी  ख्रिस्ती बोध आपल्या लेखणीद्वारे या गीतांमध्ये उतरवला आणि साधेभोळे लोक या गीतांमधून खूप काही शिकले. मेथडिस्ट व मेनलाईन अॅंग्लिकन मंडळ्यांचे उत्कृष्ट गायकवृंद असायचे व ते सुरेल संगीत सादर करायचे. १७६३ मध्ये रेव्ह. ऑगस्टस मॉंटेगन टॉप्लेडी यांनी लिहिलेल्या “सनातन खडका, हो आश्रय सेवका” ह्या महान गीताने कृपेच्या सिद्धांताचा प्रसार करण्यात नक्कीच फार मोठा वाटा उचलला आहे. अर्मेनियन मेथडिस्टांनी आपल्या लेखणीतून उतरवलेल्या गीतांना कॅल्व्हनिस्ट अॅंग्लिकनांनी चाली लावल्या व सर्व भारतीय मंडळ्यांमधून ही उत्साहाने जयघोष करणारी भक्तिगीते आवडीने गायली जातात. ख्रिस्ती विश्वास ख्रिस्ती संगीतातून फैलावला. रॉबर्ट ग्रांट हे “O worship the King ”  या भक्तिगीतासाठी प्रसिद्ध आहेत . त्यांची कबर भारतातील माझ्या पुणे शहरात आहे.

या मोरेव्हीयन, अॅंग्लिकन्स व मेथडिस्ट लोकांनी सुवार्तावादी विश्वास आशियात व भारतात आणला. आशियातील मंडळ्यांचे भक्तिगीत संग्रह या गीतांच्या स्थानिक भाषांतरित गीतांनी भरली आहेत आणि ती मूळ चालींवरच गायली जातात. गीतांखेरीज या सुवार्तावादी मिशनरींनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, बायबल शाळा, सेमिनरीज्, अनाथालये, वसतीगृहे प्रस्थापित केली आणि प्रचंड लोकसमुदायाला सुवार्तावादी ख्रिस्ती विश्वासात आणले. दुर्दैव हे आहे की त्यांच्या पुढील पिढीने आपल्या वाडवडिलांच्या विश्वासाचा त्याग केला.

असे नेहमीच म्हटले जाते की बायबल खालोखाल वाचलेच जावे असे एकमेव दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे जॉन बन्यन लिखित “यात्रेकरूंचा प्रवास.” तो जॉन ओवेनचा जिवलग मित्र होता. ब्रिटनच्या घाणेरड्या तुरुंगात असताना त्याने हे पुस्तक लिहिले. जगभर व भारतातही या पुस्तकाचा असामान्य प्रभाव पडला. भारतातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांमध्ये त्या पुस्तकाचे भाषांतर झाले. एवढेच नव्हे तर ते कॉमिक, चित्रफित, चलत्चित्रपट, मुलांसाठी, तरुणांसाठी आणि दर्जेदार साहित्य अशा विविध स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. जिवावर उदार होऊन या उपदेशक – लेखकाने धर्मजागृतीचे हे सिद्धांत या प्रकारे सादर करून किती भारतीयांना व आशियातील जनतेला ख्रिस्ताला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारण्याच्या विश्वासात आणले हे सार्वकालिक जीवनाचा काळच उघड करील.

धर्मजागृतीत युरोपियन प्रमुख व वरचढ होते. पण प्रारंभीच्या काळी ब्रिटिशांमधून आलेल्या प्युरिटनांद्वारे सुवार्तावादी चळवळ उदयास आली. मिशनरी कार्यात संपूर्ण जगाचे सर्व संस्कृतीपार जाण्याचे धाडस करण्यात प्युरिटन व पायटिक चळवळीचा महान वाटा आहे. पायटिस्ट मोरेव्हीयन भारतात आले आणि संस्कृतीची बंधने तोडण्याच्या मिशन कार्यामागे  लागले. इंग्लिश बॅप्टिस्टांनी विल्यम केरीला भारतात पाठवण्यास मनाई केली तरी तो भारतात आला.

स्वत:ला समजलेल्या ख्रिस्ती विश्वासाच्या स्फूर्तीनेच त्याला भारतात येण्यास भाग पाडले. इंग्लिशांनी त्याला भारतात प्रवेश करण्यासही विरोध केला. डॅनिश लोकांनी त्याचा मार्ग सुरक्षित व  खुला केला आणि त्याच्या आरंभीच्या काळात भारतातील पश्चिम बंगालमधील सेरामपूर मिशन कार्यात त्याला उत्तेजन दिले. इंग्लंड व युनायटेड स्टेट्समधील महाजागृतीचाही प्रॉटेस्टंट मिशनसेवा कार्यात मोठा वाटा आहे. आशिया व भारतातील प्रत्येक मिशनरी अशा चळवळींचे फळ होते. त्यांचा मागोवा घेतल्यास थेट ३१ ऑक्टोबर १५१७ रोजी मार्टिन लूथरने व्हिटेनबर्ग येथे खिळलेल्या त्याच्या ९५ प्रबंधांपर्यंत त्यांची मुळे जातात.

देवाच्या कृपेच्या शुभवर्तमानाचा भारतात प्रवेश

भारतात सर्वात शेवटी प्रॉटेस्टंट लोकांनी प्रवेश केला – रोमन कॅथॉलिक आधीच आलेले होते. जरी प्रेषित थोमा पहिल्या शतकात भारतात आल्याचे ठासून सांगितले जाते तरी बराच काळ लोटल्यावर खऱ्या अर्थाने सुवार्ता प्रसारावर आघात झाल्याचे आढळते. युरोपने लावलेल्या व्यापारमार्गाच्या नवीन शोधामुळे पोर्तुगीज भारतात आले व त्यांनी गोव्यात वसाहती केल्या. रोमी साम्राज्यानंतर एकदम  १४९७ मध्ये वास्को द – गामा या पहिल्या युरोपियन व्यक्तीने थेट भारताशी व्यापारसंबंध जोडले. तो प्रथम कालिकतला आला. आता ते केरळ राज्याचा भाग आहे. कॅथॉलिक पोर्तुगीजांमागून प्रॉटेस्टंट डच, डॅनिश व नॉर्वेजियन्स, फ्रेंच व इंग्लिश व्यापारी आले. त्या प्रत्येकासोबत त्यांच्या विशिष्ट नामाने ख्रिस्ती विश्वासही आला. १६६१-१६६३ मध्ये आलेल्या डच प्रॉटेस्टंटांनी पोर्तुगीजांविरुद्ध असलेला प्रक्षोभ पाहिला आणि खऱ्या सुवार्तेला भारतात प्रतिसाद मिळू लागला.

जर्मन प्रभाव

डच किंवा नंतर आलेल्या ब्रिटिशांच्या तुलनेत मागून आलेल्या डॅनिश लोकांचा प्रभाव फारसा परिणामकारक नव्हता. डॅनिश लोकांनीच प्रथम प्रॉटेस्टंट मिशनरी भारतात पाठवले. १६९९ मध्ये चवथा फ्रेड्रिक डेन्मार्क व नॉर्वेचा राजा झाला.

फ्रेड्रिक हा हान्स एगेड व थॉमस वॉन वेस्टेन या ग्रीनलॅंडच्या मिशनरींपासून खूप प्रभावित झाला. कॅथॉलिक चर्च मिशनरी पाठवत होती आणि प्रॉटेस्टंट मिशनरी पाठवत नाही या विचाराने तो फार अस्वस्थ झाला. डेन्मार्कमधून पाठवण्यासाठी त्याला कोणी मिशनरी मिळेना. म्हणून त्याने जर्मनीतील व्हिटेनबर्गच्या हॅले विद्यापीठातून मदतीची विनंती केली.  तेथून बार्थलोम्यु झिगेनबाल्ग व हेनरिच प्लुट्शॉ हे दोघे त्याला मिळाले व त्यांना त्याने भारतात डॅनिश वसाहतीत पाठवले. भारतातील प्रॉटेस्टंट मिशनरी साहसी योजनेचे मूळ कोठे आहे याचा मागोवा घेतल्यास ते ९ जुलै १७०६ मध्ये सापडते. त्या दिवशी ह्या दोघांचे भारतभूमीला पाय लागले. ह्या व आरंभीच्या इतर मिशनरींवर धर्मजागृतीचा खोल प्रभाव पडला होता. व्हिटेनबर्गच्या जर्मनांचे अतिथ्य करण्याची भारतीयांना ही सुवर्णसंधी होती.

द रॉयल पॅलेस ऑफ डेन्मार्कच्या अधिपत्याखाली ४८ मिशनरींनी भारतात परिश्रम केले. बार्थलोम्यु झिगेनबाल्ग व हेनरिच प्लुटशॉ यांच्या खेरीज बेंजामिन श्वाझ, जॉन फिलिप्प फॅब्रिक्सम, ख्रिस्तोफर थिओडॉसिअस वॉल्टर व ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्ट्झ हे देखील मिशनरी होते. देवाची अद्भुत कृपा भारतात येऊन पोहोंचली व खऱ्या आस्थेने प्रथमच धर्मजागृतीचे सिद्धांत शिकवण्यास सुरुवात झाली.

मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा इंग्लिश विल्यम केरी भारतात आला, तेव्हा त्याला डॅनिश मिशनने दत्तक घेतले, कारण भारतातील ब्रिटिश राज्यकर्ते  त्याला अटक करून हद्दपार करण्याच्या तयारीत होते. मिशन कार्यात सहभागी झाल्यास आपल्याला तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल व आपला व्यापार धोक्यात येईल असे त्यांना वाटले.

लूथरियन

जर्मन व लूथरियन लोकांनीच प्रथम भारतात प्रॉटेस्टंट विश्वासाची ओळख करून दिली व तो प्रस्थापित केला. भारत भूमीवर धर्मजागृतीचा एवढा प्रचंड आघात झाला की अशी नोंद सापडते की १७११ मध्ये झिगेन्बाल्गने  हॅलेच्या मार्टिन लूथर विद्यापीठात तामीळ हा एक भाषाविषय अधिकृतपणे अभ्यासायला ठेवला. बार्थलोम्यु  झिगेनबाल्गने छापखाना टाकला तेथे प्रथम तामीळ पुस्तके  छापली. संदेश संग्रहाचे पुस्तक, लूथरचा विश्वासांगिकार, तामीळमधील नवा करार, जुन्या कराराची काही पुस्तके यांचा समावेश होता. १७१९ मध्ये झिगेन्बाल्गचे देहावसान होईपर्यंत नव्या कराराचे पूर्ण भाषांतर संपवले होते. उत्पत्ती ते रूथ पर्यंत पुष्कळ अध्यायांचे तामीळ मध्ये भाषांतर केले होते. लूथरने केलेल्या जर्मन भाषेतून त्याने हे भाषांतर केले. दक्षिण भारतातील तामीळांच्या प्रचंड लोकगटाला देवाचे वचन उपलब्ध होऊ लागले. संपूर्ण अग्नेय आशियातील लोकसमुदाय देवाचे वचन वाचू लागला. कारण भारत, श्रीलंका, सिंगापूर, म्यानमार व दक्षिण आफ्रिका सोडल्यास संपूर्ण अग्नेय आशियात तामीळ लोक राहतात. शुभवर्तमानाच्या आघाताने व सुधारित विश्वासाने तारण आणले आणि भारतीय भाषा समृद्ध करून मोठा सामाजिक बदल घडवून आणला.

आता विरोधक लूथरच्या धर्मजागृतीच्या आघाताविषयी ज्या चिथावण्या देतात तसे काही नसून आरंभीच्या डॅनिश हॅले मिशन व जर्मन लूथरियन मिशनरींनी आपल्या  ईश्वरीज्ञानात सुधारणा केली होती व त्यांना समजले होते की सर्व मानवी समस्यांचे मूळ सामाजिक, आर्थिक किंवा व्यवस्थापनात नसून सैद्धांतिक विषयात आहे. म्हणून त्यांनी बायबलवर संदेश देण्यात व खोल सैद्धांतिक शिक्षणात लोकांना स्थिरावण्याच्या कामी स्वत:ला समर्पित केले होते. त्यांच्या उपदेशांनी तामिळनाडूमधील लोकांचे तारण होऊन त्यांचे जीवन बदलले. आणि मंडळ्या विस्तारण्याची प्रक्रिया अनेक वर्षे चालू राहिली. मोठ्या संख्येच्या लोकगटाला  तारणाचा अनुभव आला. 

Previous Article

बंडखोरीविषयी मुलांना ताकीद देणे

Next Article

विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल?

You might be interested in …

स्वर्गाची उत्कट इच्छा

माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या देवाघरी गेल्यानंतर व माझ्या अत्यंत मोठ्या आणि कधीही न भरून येणाऱ्या हानीच्या तीव्र दु:खांतून जात असताना जी गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली व जिने मला खोलवर विचार करावयास भाग पाडले […]

ख्रिस्ताचं मन : फिलिपै २:५ (।)

 “ असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो.” फिलिपै २:५ वर्षातून एकदा येणाऱ्या दु:खसहनाच्या सणात वधस्तंभाच्या आठवणींची शांत सावली पडलेली असून मन:शुद्धी व मन:शांती प्राप्त करण्याची जणू वर्षातून एकदा देव ही विशेष संधी […]

धडा ७.   १ योहान २:३ – ६ स्टीफन विल्यम्स

  फरक पहिला – आज्ञापालन व आज्ञाभंग ख्रिस्ती जीवनात आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील विधानावर चर्चा करा. “स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही देवाचे आज्ञापालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” सत्य की असत्य ते सकारण सांगा. •           पापाविषयीचे तीन […]