जनवरी 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अन्यायाचं धन : लूक १६:९

१. प्रस्तावना – हा उतारा अवघड आहे. त्यात अवघड काय ते आधी लक्षात घेऊ.

(अ) अवघड बाब  
(१) हा दाखला असून त्यात एक कारभारी असून तो अन्यायी आहे. आपल्या मालकीची नसलेली, धन्याची असलेली मिळकत उधळून त्याने फस्त केली आहे. त्यामुळं धन्यानं मागितलेला हिशेब त्याला देता येत नाही. आपलं काम गेलंच असल्याची त्याला खात्री आहे. असा आहे हा अन्यायी कारभारी.

(२) मालक आहे, त्यालाही न्यायाची चाड नाही. आपली मिळकत आपल्या कारभाऱ्यानं उधळून टाकली, तरी या अन्यायाच्या कृतीबद्दल तो त्याची वाहवाच करतो. हा त्याच्याच जातीतला आहे.

(३) देणेकरी आहेत, तेही त्याच जातीतले. शंभर मण तेल देणं असलेला हिशेब ५० मणाचाच लावायचे सगितले जाताच क्षणाचाही विलंब लावता दुसऱ्याचे ५० मण बुडवायला तयार होतो. आणि १०० खंड्या गहू देणे असलेला संधी मिळताच मालकाचे वीस खंड्या गहू बुडवायला तयार होतो. हे देखील त्यांना अपवाद नाहीत.

(४) धन म्हणजे पैसे नव्हे, मालमत्ता. किती? एकूण ७०० गॅलन तेल आणि १५०० बुशेल गहू. ही सारी मिळकत धन्याची, अन्यायाची. त्याचं धन अनीतिचं. अन्यायी कारभाऱ्याचं धुळधाण केलेलं, उडवलेलं, अन्यायाचं. अन्यायी देणेकऱ्यांनी ज्याबाबत अन्यायानं दुसऱ्याचा घात केला, असलं म्हणजेच अन्यायाचं धन. आणखी काही मुद्यांवर प्रकाश पाडू.

वचन ६ मध्ये म्हटलंय, ‘लवकर बसून मांड’ लवकर का? धन्यानं नोकरी काढून घेतलीय ना! हिशेब देण्यापुरताच त्याला अवकाश दिला आहे. तेवढ्यात आपल्या बचावाची, सुटकेची, तारणाची काहीतरी सोय केली पहिजे म्हणून ही धडपड. या ‘लवकर’ मुळं काय झालं बरं ? निदान ३५० मण तेलाचं आणि ३०० बुशेल गव्हाचं नुकसान तर झालं! अरे वा! पण का?

थोडा विचार करा. प्रभू या सर्वांना ‘या युगाचे पुत्र’ म्हणतो. त्याचं शहाणपण आपल्या जातीसंबंधात, पिढीसंबंधात आहे. हे लक्षात घ्या. प्रकाशाच्या पुत्रापेक्षा ते धूर्त, चाणाक्ष, बुद्धिमान असतात, असंही प्रभू म्हणतो. याचा अर्थ काय?
अरे बापरे! यानं माझं केवढं नुकसान, उधळपट्टी केलीय. शिक्षा करून, कामावरून काढून टाकून थोडंच ते भरून येणार? असं करू या, कामावरून काढल्यानं स्वारी भेदरलीय. पण न्याय अन्यायाची चाड न ठेवता, बेडरपणे एवढं नुकसान केलं त्यानं आपलं! त्यालाच परत कामावर ठेऊ या की स्वारी खूश होईल. मग मला खूश करायला, त्याच बेडर छातीचा उपयोग करून, वाटेल त्याला टोपी घालून, नुकसान तर भरून काढील. आणि मला अधिक खूश करायला त्याच प्रमाणात फायदा करून दाखवील. मग न्याय अन्याय मला काय करायचा? नुकसान भरून निघणं, फायदा होणं, एवढंच आपलं उद्दिष्ट! अशा विचारानंच मालकानं चार्ज मागितला होता.
त्याविषयी अवाक्षरही न काढता अन्यायी मालकानं अन्यायासाठी त्याची पाठ थोपटून वाहवाच केली. आलं लक्षात? इथून तिथून सारा अन्यायच! अन्यायाच्या ध्येयावर उभारलेली अन्यायी कारभाराची व्यवस्था! तेराव्या वचनात प्रभू म्हणूनच ‘धनाची चाकरी’ तसेच ‘अनीतिची संपत्ती’ ‘अन्यायाची संपत्ती’ हे शब्द वापरतो.

(ब) प्रभूची शिकवण  

(१) दाखला लक्षात आला. त्यातली अवघड शिकवण शोधून काढू या. “अन्यायाच्या, अनीतिच्या धनानं, संपत्तीनं आपणासाठी मित्र करा.” एवढंच? पुढं काहीच नाही म्हणाला प्रभू? आधी हे पाहू मग पुढचं पाहू. अनीतिच्या धनानं कुणी करायचे मित्र? कारभाऱ्यांनी, शिष्यांनी, म्हणजे आम्ही! कुणाचे कारभारी? सैतानाचे? काय करून? अन्याय, अनीती करून? आपल्या मालकाची संपत्ती उधळून, दुसऱ्यांना टोप्या घालून आपल्यासाठी मित्र ? हे ऐकूनच काटा आला ना अंगावर? येऊ द्या काटा, बसू द्या मनाला जोराचा धक्का! म्हणजे जाग येईल आपल्याला! मग परत प्रभूच्या शिकवणीबद्दल असा दुष्ट, सैतानी शंकेनं भरलेला विचार पुढं कधीही तुम्हाला शिवणार नाही.

२. शंकेचं खंडन – आपली कितीही आध्यात्मिक प्रगती झालेली असली तरी अशा कुशंका मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी दडून बसलेल्या असतात. कारण आपण हाडाचे, मुरलेले पातकी आहोत. असे दुष्ट विचार आल्यास आपलं मन भाल्यानं भोसकून घायाळ झाल्याप्रमाणं कळ येऊन उठावं! आपण संशयी विचारांना अशी खीळ घालतो? गोंडसपणे आपण मनाची समजूत घालतो, ही आपली अडचण आहे. या वृत्तीबद्दल प्रथम प्रभूची क्षमा मागून पुढं जाऊ या.

(अ) खंडनाची सुरुवात – अनीतिच्या धनानं आपल्यासाठी मित्र करा (१६:९). कसले? तर दाखल्यामधील देणेकऱ्यांसारखे अनीतिमान ? तसं जर असेल तर पुढं त्यांचं काय झालंय पाहा बरं! ‘यासाठी की’ म्हणजे कशासाठी ? ‘ते नाहीसं होईल तेव्हा’ म्हणजे काय नाहीसं होईल तेव्हा? तर हे धन नाहीसं होईल तेव्हा. म्हणजे हे धन टिकणारं नाही. ते अनीतिचं आहे. ते नाहीसं होणारं आहे. ‘त्यांनी तुम्हाला त्यांच्या अनंतकालिक वस्तीत स्वीकारावं.’ कुणी स्वीकारावं? अनीतिमान मित्रांनी. ‘वस्तीत’ साठी मुळात शब्द वापरलाय ‘डेऱ्यात.’ म्हणजे सार्वकालिक डेऱ्यात. वरच्या हकीगतीत अनंतकालाची, प्रकाशाची तर दुनियाच दिसत नाही. सारं कबरेच्या आधीचं जीवन. त्यांना शाश्वत डेऱ्यात वस्ती? प्रभू असं शिक्षण देईल? त्याची स्पष्ट शिकवण आहे की अनीती करणाऱ्यांना सार्वकालिक अग्नीच्या भट्टीत टाकतील (मत्तय १३:४१; ४२:५०).

मग? आलं का लक्षात ? ते मित्र अनीतिमान नाहीतच. त्यांची वस्ती सार्वकालिक विसाव्याच्या डेऱ्यातली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की अनीतिच्या धनानं, अनीतिनं दुसऱ्यांना टोप्या घालून हे मित्र जोडा असं प्रभू म्हणत नाहीय. त्यानं असं म्हणणं शक्यच नाही. हा संशय व प्रभूबद्दल दुर्भाषण होईल. मग अर्थ शोधलाच पाहिजे.

(ब) संशयाचं खंडन करणारा प्रभूचा अर्थ  
‘मित्र करा’ ही सूचना कुणाला दिलीय? तर आपल्या शिष्यांना (१६:१). कुणी दिली? खुद्द प्रभूनं. त्यांचं प्रभूशी नातं काय आहे? तो त्यांचा प्रभू आहे (योहान १३:१३). ते त्याचे दास, गुलाम आहेत. मग त्या दाखल्यात दोन धनी, दोन गुलाम झाले. सर्वच बाबतीत! पाहू बरं खरंच आहे का तसं? देव व संपत्ती हे दोन धनी झालेच (१६:१३). धनही दोन प्रकारचं झालं. अन्यायाचं धन अन् अस्सल धन (१६:११). दुसऱ्याचं धन अन् स्वत:चं धन हेही दोन प्रकार झाले (१६:१२). विश्वासू कारभारी व अन्यायी कारभारी हे नोकरही दोन प्रकारचे झाले (१६:१०). या युगाचे पुत्र व प्रकाशाचे पुत्रही दोन प्रकारचे झाले (१६:८). प्रीती – द्वेष या दोन भावना. निष्ठा – तिरस्कार या दोन भावना (१६:१३). हे सारं स्पष्ट आहे. या जोड्या कोणत्या ? संपत्तीचा देव…या युगाचा देव – सैतान (२ करिंथ ४:४). त्याचे कारभारी, या युगाचे पुत्र. अन्यायाचं धन, या युगाच्या मालकाचं धन. ही सारी संस्था, दुनिया, व्यवस्था अनीतिची.

याउलट, देवाची दुनिया. प्रकाशाचे पुत्र. त्याचं अस्सल धन. त्यांचा विश्वासाचा कारभार. तेव्हा प्रभूनं त्यांना अनीतिनं वागायला नक्कीच सांगितलेलं नाही, हे प्रकाशाइतकं स्पष्ट आहे. मग एका बाबतीत तरी या युगाच्या पुत्रांचं अनुकरण करायला अप्रत्यक्षपणे सांगितलं की नाही? होय. तशी स्पष्ट शिकवण नाही, अनुमान आहे.

३. प्रभूची शिकवण
प्रभूची शिकवण समजायला (अ) लूकाच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी (ब) ह्या उताऱ्याचा त्याच्याशी संबंध (क) उताऱ्याचं स्पष्टीकरण, या मुद्यांनी अभ्यास करू.

(अ) लूकाच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी – या पुस्तकाचा लेखक येशूच्या १२ शिष्यांपैकी कोणी नसून लूक नावाचा ग्रीक डॅाक्टर आहे. ते अतिशय उच्च दर्जाचं सुसंस्कृत काव्यपूर्ण ग्रीक लिखाण आहे. त्या काळच्या वाड्.मयाशी या लेखकाचा परिचय दिसतो. त्यात काव्याची बरीच अवतरणं दिसतात. वैद्यकीय व्यवसायात तो पारंगत दिसतो. तो बहुश्रुत विद्वान वैद्य होता (कलसै ५:१४). आणि पट्टीचा पर्यटक होता. पौलासोबत त्याने आख्खा युरोप पायाखाली घातला आहे. स्वभावानं अत्यंत प्रेमळ आहे. पौलही त्याला प्रिय संबोधतो. या वृद्ध संताला इतर सर्वांनी सोडलं (२ तीम ४:१६), तरी यानं सोडलं नाही (२ तीम. ४:११). अशा या व्यक्तीनं लुकाचं शुभवर्तमान लिहिलं आहे. कोणत्या वाचकवर्गासाठी लिहिलं?  लिहिलं एकासाठी, पण ते लिखाण झालं लाखोंसाठी. थियफिल नावाच्या आपल्या एका मित्रासाठी एवढे श्रम घेणारा तो किती प्रेमळ असावा बरं! हा मनुष्यही ‘महाराज’ संबोधावं अशा योग्यतेचा मोठा घरंदाज ग्रीक आहे (लूक १:३).

ते लिहिण्याचा उद्देश- हा मित्र ग्रीक मनुष्य आहे, पण तो धर्म सोडून तो ख्रिस्ती झाला आहे. या नवीन ख्रिस्ती व्यक्तिला, त्या वेळच्या ख्रिस्ती मंडळीला, त्याच्यासारख्या अनेक नवीन ख्रिस्ती लोकांना विश्वासात स्थिर करायला, त्यातील शिक्षणाचा निश्चितपणा लक्षात आणून द्यायला तो हे लिखित शिक्षण देत आहे. प्रियांनो, आजची आपली मंडळी काय करीत आहे? सर्व ग्रीक लोकांसाठी नीट शोध करून अनुक्रमानं तो लिखाण करीत आहे. मग या पार्श्वभूमीवर आपल्याला वरीलपैकी शंका घ्यायला जागा तरी आहे का? या नवशिक्यांचा विश्वास बळकट करताना तो तसलं लिखाण करील का? आता लाज वाटते ना आपण घेतलेल्या शंकांची, प्रियांनो? एक विद्वान ग्रीक दुसऱ्या मान्यवर ग्रीकाला त्याचा ख्रिस्तावरील धर्मविश्वास दृढ व्हायला लिहीत आहे. हे चांगलं लक्षात ठेवा.

लिखाणाचा विषय- ग्रीक लोक सौंदर्याचे चाहते, उत्तुंग तत्त्वज्ञानी, स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे, लढवय्ये, साऱ्या युरोपसाठी लोकशाहीचं मूळ असलेले, निकोप, प्रमाणबद्ध शरीरसौष्ठवाचं कौतुक करणारे, मानवाच्या सर्वांग परिपूर्ण विकासाची कास धरणारे होते. नि त्यातल्या या दोघांनी तो धर्म सोडून दिलेला. का बरं? तर तो धर्म प्राधान्यानं केवळ ऐहिक, क्षणभंगुर, कबरेच्या अलीकडचा, इथला, जगातला, म्हणून. पलीकडची दुनिया तिथं नाहीच. त्यांचे अनेक देव. ती या दुनियेशी सममनस्क असलेली माणसंच! मानवाशी त्यांचा कसला सहवास, की संबंध? त्यांनी कोपू नये म्हणून यज्ञयागांनी त्यांना संतुष्ट ठेवलं की संपलं. असला धर्म सोडला त्यांनी ! त्यातला ख्रिस्ती धर्मविश्वासात मुरलेला एक संत आपल्या नवशिक्या ग्रीक बंधुसाठी या नवीन देवाचं सर्वांगसुंदर चित्र रेखाटतो. या देवमानवाचं पुराव्यांसह शुद्ध ध्येय पुढं ठेवतो. त्यानं आपल्या शिकवणीत प्रगट केलेल्या त्या पलीकडच्या दुनियेचं दृश्य दुरून दाखवतो. त्याचे मरण, पुनरुत्थान, स्वर्गारोहणानं या नरश्रेष्ठावर चढलेल्या कळसाचं वर्णन करतो. आता या उताऱ्याचा अर्थ लावताना ही पार्श्वभूमी मनात सतत रेंगाळत राहू द्या.

(पुढे चालू)

Previous Article

संतापाचं भांडण: पौल व बर्णबा (॥)

Next Article

अन्यायाचं धन  (॥)

You might be interested in …

देव त्याचे वैभव उघड करतो

डेव्हिड मॅथीस बेथलेहेम हे आपण  एक योग्य शहर असल्याचे दाखवणार होते.पुरातन इस्राएलला या वचनदत्त जन्मासाठी याहून चांगले ठिकाण नव्हते. – हा राजकीय वारस एका क्षुल्लक खेड्यात वाढणार होता पण राजधानीत मरण्यासाठी तो आला होता. बेथलेहेम […]

तुमच्या सर्वस्वाने स्वर्गाकडे नेम धरा

मार्शल सीगल  जर स्वर्गात संपत्ती कशी साठवावी हे जर तुम्ही शिकला नसाल तर अर्थातच तुम्ही जगात संपत्ती साठवण्यात जीवन घालवाल – आणि एक अपार अक्षय आणि समाधानकारक गोष्ट गमवाल. जेव्हा “स्वर्गात संपत्ती साठवा” हे आपण […]

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत

ग्रेग मोर्स आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच  दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून […]