जनवरी 5, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना

स्कॉट हबर्ड

वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात.

अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी आपण खूप वेळ वाट पाहतो तेव्हा आपली आशा शंभर वेळा उंचावते व आणि मरतेही. अशा वेळी अस्वस्थता ही सततची सोबती असते.

काही थोडके अनुभव असे असतात की जे आपल्या विश्वासाची अग्निपरीक्षा करतात. पण हे थोडके अनुभव आपल्याला अधिक चांगले करतात. पॉल ट्रीप यांनी म्हटले आहे; “वाट पाहणे हे अखेरीस तुम्हाला काय मिळते यासबंधी नाही तर वाट पाहत असताना तुम्ही काय बनता यासंबंधी आहे.”  वाट पाहण्याच्या ह्या अग्नीद्वारे आपला विश्वास घडवण्यासाठी, आपल्यातला गाळ वितळून टाकण्यासाठी आणि आपल्याला अधिक शुध्द रीतीने आणण्यासाठी देव दुसऱ्या बाजूला तयारीने उभा असतो.

जर तुम्ही स्वत: अशा लांबलचक आणि दु:खद मोसमात सापडले असाल तर येथे देवाला करण्यासाठी पाच प्रार्थना दिल्या आहेत – तुम्हाला येशूच्या जवळ आणण्यासाठी त्याने काम करावे म्हणून पाच विनवण्या.

१. धीर धरून वाट पाहण्यास मला शक्ती दे.

“ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की… तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे …सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे” (कलसै१:९-११).

या आधुनिक जगाचा बहुतेक प्रत्येक विभाग आपल्याला अधीर होण्याचे  प्रशिक्षण देतो. आपली संस्कृती, सामाजिक माध्यमे, सोप्या व आरामशीर व तत्काळ तृप्ती करणाऱ्या  गोष्टींची चव घेण्यासाठी आपल्याला तयार करतात.  म्हणून जेव्हा देव आपल्याला विवाह, मुले, एखादी नोकरी किंवा एखादे दुसरे स्वप्न याची आपल्या कल्पनेपेक्षा अधिक वाट पाहायला लावतो तेव्हा आपण रानात भटकत राहिलेल्या इस्राएल लोकांसारखे होण्याचे कसे टाळावे? “ज्यांचे त्या वाटेत मन अधीर झाले” व “ते परमेश्वराविरुद्ध बोलू लागले” (निर्गम २१:४-५).

देवाने आपल्याला धीर देऊन बलवान करण्याची गरज आहे. पौल कलसैकरांस दाखवतो त्यानुसार दुर्बल लोकांना जे पहिजे ते मिळण्यासाठी धीर हा कमकुवतपणा नाही. तर संकटात, निराशेत व आडमार्गात  पुढे जात राहण्यासाठी लागणारे सामर्थ्य धीर आहे. तो देवाप्रत विश्वासाचे ह्रदय व तोंडाद्वारे स्तुती पुरवतो. धीर हा योसेफाची शक्ती होता. त्याने आपल्या जीवनाची उत्तम वर्षे तुरुंगाच्या कोठडीत घालवली आणि बाहेर आल्यावर म्हटले “देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते” (उत्पत्ती ५०:२०). आपल्या सर्व निराशा व आडवळणे यांच्याकडे पाहताना धीर आपल्याला देवाशी बोलायला मदत करतो की, “बापा, तू काय करत आहेस हे मला समजत नाही. मला या ठिकाणी राहायला नकोय. मी अशा ठिकाणी पडेन असे मला कधी वाटलेही नाही, पण तू ज्ञानी आणि चांगला आहेस आणि तू काहीतरी अद्भुत गोष्ट करत आहेस असा माझा भरवसा आहे. मला धीराने वाट पाहण्यास शक्ती दे.”

२. मला आजच्यासाठी उठव.

“परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू” (स्तोत्र ११८:२४).

वाट पाहताना आपल्याला एकाच वेळी दोन ठिकाणी राहण्याचे दडपण येते. आपली शरीरे इथे आणि आता हजर असतात. पण आपल्या ह्रदयाने हे सध्याचे क्षण केव्हाच सोडलेले असतात. आपल्या बॅगा भरून आपण भावी कल्पनाविश्वात आपले तंबू ठोकलेले असतात. आपला आवश्यक कारभार आपण उरकत असतो पण आजच्या दिवसातून फारसे काही निष्पन्न होईल अशी आशा आपण करत नाही.

देवाने आपल्याला आजच्यासाठी उठवण्याची गरज आहे. आज सूर्योदयाबरोबर देवाची दया आली आहे (विलाप.३:२२-२३). आज आकाश देवाचा महिमा वर्णन करत आहे (स्तोत्र १९:१). आज देव त्याच्या प्रीतीची कथा सांगत आहे  (रोम ५:८). आज आपल्याला एक वधस्तंभ उचलायचा आहे (लूक ९:२३). आज आपल्याला लोकांचे ऐकायचे आहे, त्याची सेवा करायची आहे आणि क्षमा करायची आहे (कलसै ३:१२,१३). आज आपल्याला चांगली कामे करायची आहेत (इफिस २:१०).
मग ती कामे कितीही नित्याची असोत, आपल्या कल्पनाविश्वापासून कितीही दूर असली तरी चालेल. आजचा दिवस प्रभूने नेमलेला आहे. ती एक देणगी आहे जरी ही देणगी आपल्या अपेक्षेपेक्षा निराळी आहे. आपण वाट पाहत असताना आज उल्हास व आनंद करणे शक्य आहे.

३. मला मूर्खपणाने जवळचा रस्ता (short cut) निवडण्यापासून वाचव.

“मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे” (यशया ३०:१५).

आपल्या जगात असे मूर्ख शॉर्टकट्स भरपूर आहेत.  अरुंद मार्ग सोडून आपल्याला आरामदायी मार्गाकडे  देण्याच्या संधी, त्याऐवजी आपल्या शरीराला आराम देणारे मार्ग. वाट पाहायला लावणारे लांबलचक मोसम असे शॉर्टकट्स दाखवत राहतात.

बायबलमध्ये ज्यांनी वाट पाहणे बंद केले अशा लोकांची उदाहरणे आहेत. मोशेला सीनाय पर्वतावरून देवाचे वचन घेऊन येण्यास उशीर झाल्याचे पाहून रानातील इस्राएल लोकांनी आपल्यासाठी देव तयार करण्याचे ठरवले (निर्गम ३२:१). युद्धापूर्वी शौल राजाने शमुवेलाने येऊन यज्ञ करावा म्हणून वाट पाहण्याचे ठरवले होते पण नंतर त्याने स्वत:च याजकाचे काम करण्याचे ठरवले (१ शमुवेल १३:८-१०). देवाने शत्रूपासून सुटका करावी म्हणून वाट पाहताना इस्राएल लोकांनी त्याच्याऐवजी मिसर देशाची मदत मागितली (यशया ३०:१५-१६).

आपल्यालाही आपले शॉर्टकट्स असतात. अविवाहित मुलगी योग्य मुलाची वाट पाहण्याऐवजी स्वत:चा दर्जा कमी करते. विश्वासी व्यक्ती पवित्रीकरणासाठी देवाने कृपा पुरवावी म्हणून वाट पाहण्याऐवजी जगिक गोष्टींच्या मागे धावते. किंवा आपल्यापैकी कोणीही आपल्याला जे जीवन देवाने दिले आहे त्याविषयी देवाला धन्यवाद न देता दुसऱ्या प्रकारच्या जीवनाची स्वप्ने पाहतो.

आपल्याला अशा शॉर्टकट्सपासून देवाने वाचवण्याची गरज आहे. यशयाच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवाने सांगण्याची गरज आहे की आपले तारण येत आहे म्हणून स्वस्थ राहा, धावू नका आणि तडजोड करू नका. शांतता व विश्वास यात आपले सामर्थ्य आहे. कल्पनाविश्व व दिवास्वप्नात नाही.

४. तू जे भवितव्य मला देशील तेच मला आवडू दे.

“तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत” (१ पेत्र २:९).

वाढत असताना आपण नकळत आपल्या मनात आपले जीवनाचे पुस्तक कसे वाचले जावे याचे एक पुस्तक लिहीत असतो. आपण आपल्या अध्यायांची आखणी करतो, आपण आपले करीयर कधी सुरू करणार, विवाह कधी होणार किंवा मुले कधी होऊ देणार याच्या वेळेची वाट पाहत राहतो. पण आपल्या कित्येकांसाठी सरत जाणारे प्रत्येक वर्ष आणखी एक अध्याय जाळात टाकत राहते.

देवाला जसे आपले भवितव्य हवे तेच आपल्याला हवे असण्याची गरज आहे – जे भविष्य त्याने आपल्या अगम्य ज्ञानाने लिहिले आहे. वाट पाहण्याचे समय आपण आपल्या गोष्टीचा लेखक होण्याची भूमिका सोडून द्यायला मदत करतात आणि देवाच्या गोष्टीत आपली भूमिका साकारण्यास मदत करतात.

ख्रिस्ती या नात्याने देवाच्या गोष्टीत आपली भूमिका काय आहे हे आपल्याला माहीत आहे: त्याचे गुण प्रसिद्ध करणे (१पेत्र २:९). कधीकधी देव समाधान व पूर्ततेमधून त्याचे गुण प्रसिध्द करायला आपल्याला बोलावतो. अशा वेळी आपण जेथे राहतो तेथून आपण सांगतो व दाखवतो की त्याच्या देणग्या नव्हेत तर खुद्द देवच आपले महान पारितोषिक आहे. आणि इतर वेळी देव आपल्याला वाट पाहत असताना, कमतरता असताना त्याचे गुण प्रसिद्ध करायला लावतो. अशा वेळी आपण जगण्याद्वारे व बोलण्याद्वारे दाखवतो की देव जरी काही गोष्टी आपल्यापासून दूर ठेवतो तरी तो आपल्याला सर्वांहून पुरेसा आहे. आपल्याला आपल्या भूमिकेत कितीही निराश वाटले तरी आपण ती साकार करतो कारण आपल्या निर्मात्याने शेवटी काय होणार त्यावर प्रभुत्व मिळवले आहे (१ करिंथ २:९).  ज्या देवाने हे जग वधस्तंभाद्वारे व रिकाम्या कबरेद्वारे तारले आहे त्याला ठाऊक आहे की आपल्या अपयशाच्या कहाण्या व वळणे घेऊन ती कशी सुंदर बनवावीत. आपली भूमिका हीच आहे की जरी आपल्याला शेवट दिसत नसला तरी त्याच्यावर भरवसा टाकायचा आणि त्याचे गुण दाखवायचे.

५. मी खरे कशाची वाट पाहत आहे याची मला आठवण दे.

“पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो” (यशया २५:९).

या जगामध्ये आपण नेहमी कशाची तरी वाट पाहत असतो. जोडीदार, नोकरी, मूल, उधळ्या पुत्र, निराशेतून सुटका, आर्थिक स्वातंत्र्य. पण ख्रिस्ती व्यक्तीसाठी ह्या प्रत्येक चांगल्या देणगीखाली यापेक्षा मोठे हादरे खालून बसत आहेत. आपण जग देऊ शकत नाही अशा आणखी उत्तम गोष्टीची वाट पाहत आहोत.

तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. २ पेत्र ३:१३.

आपण नव्या शरीराची वाट पाहत आहोत ज्याची मरण व कुजण्यापासून कायमची सुटका होईल. रोम ८:२३.

आपण नव्या सामर्थ्याची वाट पाहत आहोत जेव्हा पापाची आपल्यावरील शेवटची पकड दूर होईल. गलती ५:५.

पण याहून विशेष म्हणजे आपण आपला राजा येशू याची वाट पाहत आहोत आहोत (१ थेस्स १:१०). त्याच्या चेहऱ्याकडे एकदा पाहताच आपले दु:ख कायमचे नाहीसे होईल. त्याच्या आवाजाची एक लकेर या जीवनातली सर्व निराशा गिळून टाकील. त्याच्या सान्निध्यातील एक क्षण आपली सर्व दु:खे सागरतळी खोल बुडवून टाकील.

आपल्याला कशाची वाट पाहत आहोत याची देवाने आठवण करून देण्याची गरज आहे. या जगामध्ये सर्व वाट पाहण्यामागे एक आशा आहे जी आपल्याला कधीही निराश करणार नाही. लवकरच एक दिवशी आपला राजा येईल. आणि त्याची वाट पाहणारा कोणीही फजित पावणार नाही (स्तोत्र २५:३).

Previous Article

विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल?

Next Article

 कुटुंबात ख्रिस्त

You might be interested in …

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]

जर देवाने मला मुलगी दिली तर ग्रेग मोर्स

“ ते तिचं नाव काय ठेवणार असावेत बरं?” माझी पत्नी म्हणाली. “मला काही कल्पना नाही बुवा, पण जर आपल्याला मुलगी झाली तर मी तिचं नाव प्रथम एलिझाबेथ (अलीशिबा), यायेल किंवा अबिगेल ठेवायचा विचार करीन. माझ्या […]