कशासाठी गौरव ?
ज्या कारणास्तव तो हे वैभवी शब्द बोलतो, ते नको का समजून घ्यायला? त्यांनी असं काय केलं? म्हणून तो हे बोलतो? या महायाजकीय प्रार्थनेत तो त्यांच्याविषयी सात विधानं करतो. ती लक्षपूर्वक पाहा. आपल्याविषयी ती किती खरी आहेत बरं? जर नसतील, तर ती पुरी नकोत का करायला आपण?
(१) तुझी वचनं / बोल स्वीकारले (योहान १७:८).
(२) तुझा शब्द / येशूवर विश्वास ठेवला (१७: ८).
(३) मला दिलेलं सारं तुझ्यापासून आहे हे ओळखून चुकले (१७:७).
(४) खरोखर तुझ्यापासून मी आलो हे ओळखलं (१७:८).
(५) विश्वास धरला की तू मला पाठवलंस (१७:८).
(६) मी त्यांना जगात पाठवलं (ते जगात गेले) (१७:१८).
(७) त्यांच्या शब्दांवरून ( म्हणजे त्यांनी सुवार्ता सांगितली) माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ( १७:२०).
आपल्यामध्ये त्याचं गौरव व्हावं म्हणून या सात गोष्टींची किती गरज आहे! पण नीट विचार केला असता आपल्याला असं दिसेल की त्यांच्यामध्ये मुख्य तीनच गोष्टी आहेत. (अ) शब्द (ब) प्रभू (क) त्यांची कृती.
याचा अर्थ असा – देवानं आपलं प्रगटीकरण आपल्या पुत्रामध्ये केलं. त्या पुत्रासंबंधी आमची वृत्ती कोणती आहे ? त्याला ओळखून, प्रभू म्हणून त्याला स्वीकारून म्हणजे घेऊन, जतन करून, त्याचं आज्ञापालन करून म्हणजे तो जे सांगेल ते आपल्या कृतीत आणणं; या साध्या पण अत्यंत अवघड गोष्टींनी, “आपल्यामध्ये त्याचं गौरव होतं.” आता या सातच्या सात गोष्टी आपण समजून घेऊ या.
(अ) देवाचा शब्द – प्राचीन काळापासून देवानं आपलं स्वत:चं प्रगटीकरण आपल्या शब्दानं केलं आहे. “अमक्याला … देवाचा शब्द प्राप्त झाला!” हे देवाच्या प्रगटीकरणाचं महावाक्य, संदेश व संदेष्ट्यांचं अस्सलपणाचं प्रतीक असत आलं आहे. त्यासाठी मूळ ग्रीकमध्ये (१) शब्द (२) बोल हे शब्द वापरले आहेत. या दोन्हीतील सूक्ष्म भेद लक्षात असू द्या. शब्द याचा अर्थ मनातला स्पष्ट झालेला आशय, जे रूप घेऊन बाहेर पडतो, ते मूर्त स्वरूप म्हणजे शब्द होय. या शब्दात विशेष जोर मनातल्या आशयावर अधिक आहे. पण तो आशय अस्पष्ट, अंधुक, अव्यक्त मात्र नसतो. मग मनात तो अर्थ स्पष्ट असो की व्यक्तिरूपानं अलग शब्द बाहेर असो. असा त्याचा अर्थ आहे.
दुसऱ्या ‘बोल’ या अर्थात शब्दाचा अर्थ समाविष्ट आहेच. पण बाहेर उच्चारलेल्या शब्दावर इथं अधिक जोर दिला आहे. बोल याचा अर्थ बोललेला, योजलेला, कल्पिलेला, मनातला शब्द. हे अर्थ लक्षात आले म्हणजे येशूनं त्याच्याबाबत केलेली विधानं आपल्याला चांगली समजतील. अर्थात ती पररस्परांहून भिन्न आहेत.
(१) त्यांनी तुझी वचनं स्वीकारली – घेतली (१७:८).
हे देवा तू मला आपले बाहेर व्यक्त झालेले बोल दिलेस. मी ते बोल त्यांना दिले. त्यांनी ते स्वीकारले, मान्य केले, घेतले, आपलेसे करून टाकले असं प्रभू म्हणतो. व्यक्त बोल म्हणजे येशूच्या पवित्र ओठातून जे स्त्रवत होते, जे तो उच्चारत होता, ते देवपित्याचे बोल असून त्यांना येशूच्या देहावस्थेत विशेष मोल होतं. ते बोल हे शिष्य आपलेसे करत होते. ते बोल ( अनेकवचन ) आत्मा ( एकवचन) व जीवन ( एकवचन ) होते. त्यातला प्रत्येक बोल.. प्रत्येक शब्द… व संपूर्ण वाक्य… त्यांच्या शब्दांची बेरीज ही एक आत्मा अशी होती. जीवनच होती. म्हणूनच पूर्वीच शिमोनानं ग्वाही दिली होती की “प्रभू आम्ही कुणाकडं निघून जावं? सार्वकालिक जीवनाचे बोल तर तुझ्याजवळच आहेत” (योहान ६:६८). ते देवबापानं पुत्राला दिलेले बोल … पुत्रानं उच्चारलेले व शिष्यांनी घेतले ते बोल! म्हणूनच प्रभू म्हणतो; “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” का बरं? एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये काय, कसं आणि का झालं?
गर्दीनं गच्च भरलेली सारी दुनिया गजबजली होती माणसांनी ! त्यातल्या या थोडक्यांनीच ते बोल घेतले होते. पुढं प्रभूचं गौरव कुणासमोर झालं ते आपण पाहाणारच आहोत. तेव्हा त्यातलं सौंदर्य समजेलच. पण हे बोल स्वीकारल्यानं आपल्यामध्ये त्याचं गौरव होतं. एवढं तूर्त लक्षात ठेऊ या. पण मन किती आनंदानं भरून जातं बरं!
(२) “त्यांनी तुझं वचन जतन करून ठेवलं आहे” (योहान १७:६, ८).
(अ) जेव्हा हा शब्द एकवचनी वापरला जातो, तेव्हा तो देवाची संपूर्ण सुवार्ता, तारणाची योजना या अर्थानं येतो. म्हणजे शिष्यांनी तुझी प्रगट केलेली सुवार्तेची योजना समजून घेऊन जतन करून ठेवली आहे, असा अर्थ होतो. देवपुत्र येशू ख्रिस्त हाच खुद्द देवाचा शब्द, तारणाची योजना, जिवंत तारण आहे. त्याला स्वीकारून जतन करून ठेवल्यानं ख्रिस्ताचं गौरव झालं आहे.
आपण काय केलंय? त्याची संपूर्ण सुवार्ता मान्य केलीय? ख्रिस्त येशूलाच मनात स्थान देऊन सांभाळून जतन करून ठेवलंय ? हे केलं, तर “त्याचं गौरव झालं आहे.” आपल्याबाबत हे झालं तर प्रभूला आनंदच होईल.
( ब ) प्रभू – त्याचा शब्द स्वीकारून जतन करून ठेवण्यानं शिष्यांनी त्याचं गौरव केलं.
आता या मूर्त शब्दाचं त्यांच्याकडून कोणत्या बाबतीत गौरव झालं? ते पाहू.
(३) “त्यांनी ओळखलं आहे की तू जे मला दिलंस ते तुझ्यापासून आहे” ( योहान १७:७).
याचे दोन अर्थ होतात.
(।) ज्या गोष्टी तू मला दिल्या आहेस, त्या तू मला दिल्या आहेत व त्यांचा उगम तू आहेस व त्या तिथून मला मिळाल्या आहेत.
(॥) तुझ्यापासून उगम म्हणून मला त्या मिळाल्या एवढंच नाही तर त्या तुझ्याजवळ असताना माझ्याजवळ होत्याच. काळजीपूर्वक पाहू हे विधान:
पहिली गोष्ट आपल्याजवळ जे आहे ते दैवी आहे, हे प्रभू सांगत आहे. त्यानंतर ते आलं कुठून? तर बापाकडून. हे स्पष्ट करतो. पण मग देणारा निराळा अन् घेणारा निराळा असा नाही का अर्थ होत? होतो. पण त्यामुळं प्रभूच्या देवत्वाला धक्का नाही बसत. त्याच्याजवळ असलेल्या साऱ्या गोष्टी दैवीच आहेत. तो बापापासून भिन्न आहे एवढाच अर्थ त्यातून निघतो. त्र्येकत्वात तो आहेच. पण काळाच्या दृष्टीनं केव्हा दिल्या त्या गोष्टी? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा स्पष्ट झाला नाही तर त्याच्या देवत्वाला बाध येईल. काळाच्या दृष्टीनं देणारा आधी अन् घेणारा नंतर अस्तित्वात असेल तर प्रभू अस्सल देव राहाणार नाही. तर उत्पन्न केलेला देव होईल. ही शंका राहू नये म्हणून प्रभू अतिशय स्पष्ट करून सांगत आहे. म्हणून तो शेवटी हा वाक्यांश घालतो. “ तुझ्याजवळ असताना.. तू मला दिलेलं”… तुझ्याजवळ असताना म्हणजे समकालीन व शाश्वत असा तो आहे असा अर्थ होतो. म्हणजे देण्याघेण्याची गोष्ट तशीच चालू आहे. ते भिन्न आहेत, पण काळानं नाहीत. हे शिष्यांनी ओळखलं आहे. कारण त्यांना त्यानं ते स्पष्ट करून सागितलं आहे ( योहान १०:३०; व १४:९). तेव्हा या गोष्टीमुळं आता “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” मनात ठसायला ही विधानं नीट मांडू. ज्या गोष्टी माझ्याजवळ आहेत, त्या तू मला दिल्यास. तुझ्याजवळ मी असत आलो आहे. तेव्हाच तू त्या मला दिल्यास. आपलं देवत्व, बापापासून भिन्नत्व असतानाच एकत्व अबाधित आहे हे येशू स्पष्ट करीत आहे. हे आपल्याला स्पष्ट झालं तर, “आपल्यामध्ये त्याचं गौरव झालं आहे” असं प्रभू म्हणतो.
(४) त्यांनी खरोखरच ओळखलं आहे की मी तुझ्यापासून निघून आलो आहे” ( योहान १७:८).
या वाक्यात प्रभू आपल्याजवळ असलेल्या गोष्टींविषयी बोलत नाही तर आपल्या जगात येण्यासंबंधी बोलत आहे. तुझ्याजवळ असताना मी स्वतंत्र, अलग, तू जसा देव तसाच होतो. तुझ्याजवळचं तुझ्यापासूनच देवत्व मला सतत मिळत होतं अन् मी सतत घेत होतो. मी स्वत: आपणहून बाहेर म्हणजे जगात आलो. असं प्रभूचं म्हणणं आहे. जगात, उद्धार कार्यासाठी देहधारणेनं येणं ही माझ्या इच्छेची गोष्ट होती. माझी प्रीती स्वतंत्र होती. माझ्या स्वतंत्र इच्छाशक्तीनं ते काम पत्करून मी बापाजवळून निघून आलो. हे येशू म्हणत आहे, ते शिष्यांना चांगलं समजलं आहे (योहान १६:२७). म्हणून तो म्हणतो, “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”
(५) “त्यांनी विश्वास धरला आहे की तू मला पाठवलंस” (योहान १७:८). मी स्वत: आपण होऊन, आपल्या स्वतंत्र इच्छेनं आलो हे अगदी अक्षरश: खरं. पण त्या येण्याचा बापाशी काही संबंध नाही असं मुळीच नाही. माझं येणं दैवीच आहे, “कारण माझा बाप माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि त्यानंच मला पाठवलं आहे.” ही गोष्ट ज्ञानानं, बुद्धीनं ओळखण्याची नसून विश्वास ठेवण्याची आहे. मी जे सांगतो, त्यावर विश्वास ठेऊन तुम्ही ते स्वीकारता नि त्यामुळं प्रभूचं गौरव होतं. उद्धारकार्यासाठी मजजवळ असलेलं सर्व देवाचं, दैवी, देवापासून आहे. ह्यावर शिष्यांनी विश्वास ठेवला. ही अद्वितीय, अद्भुत, आजवर गुप्त गोष्ट त्यांनी ओळखून, समजून कृतज्ञतेनं, ममतेनं विश्वासाने पत्करून कबूल केल्याचे पाहून प्रभू कृतज्ञतेनं गहिवरून आनंदून जातो (योहान १७:१३). म्हणून सद्गदित होऊन तो आनंदानं बापाला सांगतो, “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”
प्रियांनो, किती मन भरून येतं ना? आपण आपल्या जवळच्या फुगीर आरशात आपलं इटुकलं मिटुकलं चित्र पाहाण्याच्या सवयीनं “माझं तारणच झालं नाही” म्हणत उगीचंच रडत बसतो. असं काहीच्या काही बरळून आपण कितीदा प्रभूचा अपमान करतो. फेकून देऊ या बरं तो मानवी आरसा! आणि प्रभूच्या बोलांच्या आरशातील आपलं चित्र पाहू या. आपलं ह्रदय गहिवरानं भरून येईल. “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे!”
(क) (आमची ) कृती – देवाचे शब्द ऐकून आम्ही मनात जतन करून ठेवले. देवपुत्राच्या देवत्वाला, देहधारणाला, क्षमतेला, आम्ही पुरतं ओळखलं. आम्ही त्याच्यावर विश्वास देखील ठेवला. पण एवढ्यानं भागलं का? त्याच्या देहधारी देवत्वाच्या जिण्याला आमच्या इच्छाशक्तीचं प्रत्युत्तर काय? आमच्या कृतीच्या जिण्यावर त्याचा परिणाम काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याविषयी प्रभू अप्रत्यक्ष, सहजपणे महत्त्वाची ग्वाही तो आपल्या प्रार्थनेत देतो. आपल्या बापाशी केलेल्या जिव्हाळ्याचे हितगुज गंभीर आहे.
(६) “ मी त्यांना पाठवलं” ( योहान १७:१८).
ज्याप्रमाणं तू मला जगात पाठवलंस त्याप्रमाणंच मी देखील त्यांना जगात पाठवलं हे प्रभू सांगतो. व अप्रत्यक्षपणे शिष्यांनी काय केलं हे त्यावरून स्पष्ट होतं. प्रत्यक्ष विधानात ही ग्वाही महत्त्वाची आहे. कसं पाठवलं? “जसं तू मला पाठवलं तसं!” किती गंभीर आहे हे वचन! ते विधान करणाऱ्याच्या व्यक्तिमत्तेमुळे त्यात मोठा अर्थ समाविष्ट आहे. बापानं पुत्राला जगाच्या तारणासाठी पाठवलं. मालकानंही आपल्या शिष्यांना पाठवलं. पण प्रभूनं त्यांना जे सांगितलं ते अधिक महत्त्वाचं आहे. त्या विधानावरून शिष्यांच्या कृतीचं महत्त्व अधिक वाढतं. प्रभूनं पाठवल्याप्रमाणं, त्याची आज्ञा पाळून खास तारणासाठी ते आपल्या कामगिरीकरता जगात गेले. सैतानखान्याचा प्रभू म्हणजे सैतानावर आक्रमक स्वारी करायला ही खास रवानगी होती. आपल्या सरसेनापतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ते चालू लागले. सारा सैतानखानाच काबीज करायचा त्याचा हा कार्यक्रम होता. हा त्याची माणसं मात्र मुठभरच… पण अंतिम विजयाच्या खात्रीनं सुवार्तासेनेची हा सरसेनापती रवानगी करत असताना त्यांचं आज्ञापालन पाहून सद्गदित होऊन म्हणत आहे;
“त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”
(७) “त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवत आहेत” (योहान १७:२०).
त्यांना सांगितलेल्या कामगिरीचा हा कळस आहे. तारणाचा सरदार देवपुत्र येशूख्रिस्त (हबक्कूक ३:३; ११-१३), सैन्याचा यहोवा यानं पाठवल्यावर काम का बरं फत्ते होणार नाही? सैतानखान्यातून… दुष्मनाच्या कोथळ्यातून.. कर्दनकाळ जबड्यातून पातक्यांना ओढून काढण्याचं सामर्थ्य त्यांना का व्यापून राहाणार नाही? त्यानं पाठवलं… त्यांनी थेट सैतानखान्यात जाऊन प्रीतीनं प्रीतीची अद्वितीय सुवार्ता सांगितली … त्या रमणीय तारकाच्या नवलकथेनं काम फत्ते करूनच शिष्य परतले! त्या शिष्यांकडं, त्यांनी सैतानखान्यातून मुक्त करून खेचून आणलेल्या मुक्ती पावलेल्यांकडं, आपल्या शिष्यांच्या सुवार्तेच्या शब्दांवर विश्वास ठेवणाऱ्यांकडं, डबडबलेल्या डोळ्यांनी पाहात आपल्या महायाजकीय प्रार्थनेत आमचा सरसेनापती आपल्या बापाला विनवून म्हणतो, “ मी माझ्या शिष्यांसाठीच प्रार्थना करतो असं नाही … तर त्यांच्या शब्दावरून ( ग्रीक) जे माझ्यावर विश्वास ठेवीत आहेत ( ग्रीक) त्यांच्यासाठीही विनंती करतो.” त्यांची ही कामगिरी पाहून गहिवरून प्रभू गहिवरून बापाला म्हणतो, “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” सुवार्ता सागितल्यामुळं, त्याला फळ आल्यामुळं आपल्या सरसेनापतीचं गौरव होतं. हे आपल्या मनात आपण जतन करून ठेऊ या.
(पुढे चालू)
Social