दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 स्तोत्र १३३: उपासना – (।)

प्रस्तावना
देवाचं वचन काय आहे? ते गरजवंताला देवपण देणारं सामर्थ्य आहे. ते केवळ तिथंच आपण घेण्यानं मिळतं. ते प्रथम त्यातील अर्थरूप समजल्यानं, म्हणजे बुद्धीनं अनुभवल्यानं मिळतं. तो अनुभव पूर्ण, सर्वांगी अनुभव आहे. अर्थ स्पष्ट समजल्यानंतर अगर वचनाचा उलगडा होत असता, तो समज होत असताना अंत:करणाला स्पर्श होत असल्याचा अनुभव येतो. तो प्रभू येशूची व प्रभू येशू देवाची ओळख करून देतो. मग देवबाप आपलं देवपण, आपण जगतो ते सार्वकालिक जीवनच उपासक भक्ताला बहाल करतो. त्यामुळंच उपासनेमध्ये देवाच्या वचनाला व त्याच्या

उलगड्याला, खऱ्या अर्थबोधाला एवढं महत्त्वाचं स्थान आहे. त्या दृष्टीनं १३३ व्या स्तोत्राचे किती अर्थ संभवतात ?

(१) पहिला अर्थ, लेखकाचा. ज्यावेळी, ज्या जागी, ज्या परिस्थितीत दाविदानं हे स्तोत्र लिहिलं, तो त्याचा मूळ अर्थ.
(२) दुसरं, दाविदानं हे स्तोत्र लिहिलं, पण पुढं ही स्तुतीची गीतं भक्तांनी गोळा केली. व पुढं उपासनेकरता ती गीतसंग्रहात गोवली. ती कोणत्या अर्थानं
गोळा केली त्यांनी? तो त्यांचा अर्थ.
(३) आता ३ रा अर्थ, देवाच्या आत्म्याचा खोल, सर्वश्रेष्ठ, अखेरचा अर्थ.

आपल्या भक्तानं लिहिलेलं गाणं देवानं घेतलं, आणि सर्व मानवजातीसाठी, सर्वकाळासाठी त्याच्या शब्दाशब्दांत आपल्या आत्म्याची फुंकर घातली. उपासनेत ते उपयोगी पडावं म्हणून त्याची निवड केली, हा त्याचा जिव्हाळ्याचा अर्थ! शेवटी हे स्तोत्ररत्न, स्तुतीचं चिमुकलं गीत, मोलाचं तेजस्वी रत्न आहे. आपल्या सुगंधानं संतोषवणारं देवाचं तेल, आपल्या आर्द्रतेने आशीर्वाद देणारं दंव, मंगलगीत आहे. त्यातलं मांगल्य आपलसं करण्याचा आपण प्रयत्न करू या.

(१) दाविदाचा अर्थ – मथळा वाचा. हे स्तोत्र दाविदानं केव्हा, कोणत्या परिस्थितीत लिहिलं या प्रश्नांची उत्तरं गीतातला मूळ अर्थ पाहिल्यावर मिळतील. तो मनातल्या ऐक्याचा, जाहीर ऐक्याचा अर्थ तीन कडव्यांमध्ये, दोनच उपमांनी ओतून दाविदानं उभा केला आहे. कोणत्या ऐक्याचा त्याला इतका स्पर्श झाला? वाचू या.
“मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनास दाविदाकडे येऊन म्हणाले, पाहा, आम्ही तुझ्या हाडामांसाचे आहोत… आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमले” (२ शमुवेल ५:१, ३). तसंच १ इतिहास १२:३८ते ४० वाचा. “ हे सर्व … दाविदास इस्राएलावर राजा करण्यासाठी हेब्रोनास खऱ्या मनानं आले. दाविदाला राजा करावं म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले… इस्राएलात उत्सव चालला होता.”

दावीद दहा हजारात देखणा, रंगानं तांबूस, सुंदर डोळे, मनोहर रूपाचा, सुडौल देहाचा तर त्याहूनही विशेष म्हणजे मोठ्या मनाचा , कोवळ्या अंत:करणाचा, भावनेनं भारलेला, पराकाष्ठेचा प्रेमळ, शूर, तसाच दिलदार, तडफदार लढवय्या, तसाच चाणाक्ष, मुत्सद्दी होता. त्यावर कळस म्हणजे त्याची देवभीरूता. खाली खोऱ्यातली हिरवळ व वरती आभाळातली निळी निस्तब्धता यामुळे त्याच्यामध्ये मुरलेली देवनिष्ठा. तो सामान्य धनगर असला तरी देवाच्या मनास आलेला तो उमदा तरूण आहे. अगदी पोरसवदा असताच त्याला राजपदासाठी देवाचं पाचारण झालं. त्याच्या संवेदनक्षम मनावर त्याचा फार परिणाम झाला. पण त्या पदासाठी त्याला कितीतरी वाट पाहावी लागली. माणूस कितीही भला, मोठ्या मनाचा असला तरी अपेक्षित, निश्चित, वैभवी गोष्टींची त्याला वाट पाहावी लागते. तो मनातून नक्कीच थकून जातो.

दाविदाचं वाट पहाणं अजबच! तो भराभर एका ठिकाणाहून दुसरीकडे उडी घेणारा. शिकारी शौल मागे लागलेला. त्याला तो तित्तर, क्षूद्र संबोधतो. कधीतरी आपण शौलाच्या हातून ठार होणार असं वाटून कमालीचा रंजीस येतो. त्याची निराशा सहज लक्षात येते. त्याची देशभक्ती देवनिष्ठेतून उत्पन्न झालेली असते. आपल्या देवाच्या सहवासामुळंच आपल्या आवडत्या वतनाच्या देशात राहाणं त्याला प्रिय आहे. आपलं बरंवाईट झालं तर देवाच्या समक्षतेतच आपलं रक्त पडावं असं त्याला वाटतं (१ शमुवेल २६:२०). आपलं राजपद केव्हा मिळणार याविषयीच्या निराशेनं तो शत्रूंच्या मुलखात राहायला पळून गेल्यानं देवाच्या सहवासाला पारखा होतो. पुढं एकदाचा शौलाचा शोकांतिक अंत होतो. भावनाप्रधान, कोमल कवी, दाविदाचं ऱ्हदय हे गीत गातं. बाह्यसृष्टीत अगर अंत:सृष्टीमध्ये काही हालचाल झाली की दाविदाचं अंत:करण भरून येतं, आणि त्याच्या ओठातून मधुर गीत स्त्रवू लागतं. शौल मरण पावला, दाविदाच्या दिलाला देवभूमीची ओढ लागली. लगेच त्याच्या स्वभावत: असलेल्या देवभीरू मनानं तो देवाला विचारतो, “मी यहुद्यांच्या एखाद्या नगरात जाऊ काय?” देव म्हणतो, “ हेब्रोनास जा.”

हेब्रोनास जाताच यहुदाच्या लोकांनी त्याला लागलीच राजा म्हणून अभिषेक केला. तरी अजून पण – परंतु चालूच होतं. शौलाचा बलाढ्य सेनापती अबनेरानं शौलाचा मुलगा इशबोशेथाला महनाईम येथे अकरा वंशांचा राजा केलं. परत दाविदाचा जिव टांगणीवर! कधी आटोपणार सारं प्रकरण? लवकरच अबनेर व ईशबोशेथचं बिनसलं. अबनेराच्या मनात दाविदाला मिळण्याचं घोळू लागलं. लढवय्या शिपाईगडी असल्यानं, विचार करीत बसणारा मुत्सद्दी नसल्यानं, तो तडकाफडकी कामाला लागला व आपल्या बन्यामिनी वंशाशी कानगोष्ट करून हेब्रोनात जाऊन दाविदाशी बोलणी सुरू केली. सर्व वंशांशी बोलला नाही. दाविदानं सुटकेचा सुस्कारा सोडून साजेशी मेजवानी देऊन खूष केलं व आनंदानं निरोप दिला. पुन्हा पण – परंतु.. ! दाविदाला डोईजड झालेल्या यवाबानं वैयक्तिक द्वेषानं विश्वासघातानं अबनेराचा खून केला आणि सारा डाव विसकटला. पुन्हा दाविदाचा जीव टांगणीला लागला. पण विशाल मनाचा दावीद खचला नाही. प्रत्येक पेचप्रसंगाचा चातुर्यानं उपयोग करून घेतला. त्याच्या भावपूर्ण शोकभरानं भरलेल्या कवनानं इस्राएलांच्या मनाची पक्कड घेतली. अबनेरासाठी अन्नपाण्यावाचून राहिला. लोकांना त्याच्या प्रेमळ मनाची पारख झाली. वैरभाव विरून गेला, आदरबुद्धी बहरली. आपला एकमेव कैवारी वीर म्हणून त्याच्यावरील प्रीती प्रकर्षानं प्रकट झाली. अकरा वंशांतील साडेतीन लाखांहून अधिक लोक हेब्रोनात दाखल झाले (२ शमुवेल ५:१) . आतुरतेत दाविदाची पाच वर्षे सरली. विसकटलेले १२ वंश खऱ्या मनानं एकदिलानं एकत्र जमले. दाविदानं सुस्कारा सोडला. संपूर्ण राष्ट्रानं राजा म्हणून त्याला अभिषेक केला. तीन दिवस मेजवान्या उठल्या. उत्सवासोबतच १३३ वं स्तवनाचं, राष्ट्रीय मूर्त मिलाफानं, बंधुत्वानं बहरलेलं स्तोत्र बाहेर आलं! असा रमणीय या स्तोत्राचा जन्म झाला.

(२) संग्राहकांचा अर्थ – स्तोत्रसंहितेत एक चिमुकला १२१ते १३४ अशा पंधरा स्तोत्रांचा संच आहे. त्यांना निरनिराळी नावं असली तरी ती उपासना हा एकच मुख्य विषय दर्शवतात. सणासुदीची खास, जाहीर, राष्ट्रीय उपासना असा तो विषय आहे. देवाची आज्ञा होती की, “दरवर्षी ३ वेळा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्तकाचा सण, आणि मंडपाचा सण या तिन्ही पर्वणीस तुझ्या सर्व पुरुषांनी तुझा देव यहोवा जे स्थान निवडील तिथं त्याच्यासमोर जावं, कोणीही रिक्तहस्ते यहोवासमोर जाऊ नये” ( अनुवाद १६:१६). इस्राएल राष्ट्र देवाची शिक्षा होऊन परागंदा होण्याअगोदर, सर्व राष्ट्रांतून परागंदा होऊन इतर राष्ट्रांत विसकटल्यानंतर त्या सर्व देशांतून … देवानं निवडलेल्या स्थळी … यरुशलेमात … हे तीन सण पाळण्यासाठी त्यांनी एकत्र व्हावं अशी ही आज्ञा आहे. त्या आज्ञेच्या पालनार्थ चोहीकडून उपासक जाहीर उपासनेसाठी यरुशलेमात जमत असत. यरुशलेम व विशेषत: तेथे ज्या सीयोन डोंगरावर मंदिर होतं, ते समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर होतं. तेव्हा उपासनेला जायचं असेल, तर उपासकांना भौगोलिक दृष्ट्या चढून जावं लागत असल्यानं, ‘चला आपण वर जाऊ’ असं म्हणत असत. ह्या बोलांना शब्दश: उंच देवाजवळ जाऊ असा खोल आध्यात्मिक अर्थ आहे.

दरवर्षी उपासनेसाठी या तीन वेळेस शिरस्त्याप्रमाणे उपासकांच्या झुंडी वर चढून जात असत. त्यापूर्वी तळवटीत गाडेतळावर सर्व एकमेकांची वाट पाहात एकत्र जमत असत. मग सर्व एकत्र वाट चढू लागत. त्या वेळी ही पंधरा आरोहणस्तोत्र उत्तर प्रत्युत्तरांनी म्हणत असत. म्होरक्यानं पुढं म्हणायचं अन् मागच्या समुदायानं झील धरायची. अशा थाटात, गीतांच्या तालावर, संगीताच्या नादावर भक्तिभावानं भारून, तल्लीनतेनं हेलकावे खात, आस्तेकदम ते वर.. वर.. चढून जात. त्यांना यात्रेकरूंची स्तोत्रं, उत्क्रमण स्तोत्रं, चढावाची स्तोत्रं, पायऱ्यांची स्तोत्रं अशी नावं असत. त्यातील काही स्तोत्र पाडावपणातून परतल्याच्या आठवणींनी भरलेली आहेत (उदा.१२६). यावरून पाडावातून परतल्यानंतर हा संच तयार केला हे सूचित होतं. हे ध्यानात ठेवावं की स्तोत्रांचं हे पुस्तक राष्ट्रीय उपासनेचं असल्यामुळं राष्ट्राच्या आयुष्याच्या आरंभापासून त्यात एकसारखी भर पडत गेली.

या पंधरा स्तोत्रांचा विषय, त्यांचा परस्पर संबंध, त्यांच्यातील आंतरिक संगती काय आहे, याचा मागोवा घेतल्यावर दिसून येईल की त्यात एक धागा गोवला असून मध्यवर्ती कल्पना म्हणजे उपासना. जाहीर उपासना. संतांच्या समुदायाची राष्ट्रीय सणांनिमित्त झालेली. ..होणारी… जाहीर उपासना. या कल्पनेभोवती ही उपासनेची १५ फुलं गुंफली आहेत. त्यांची रूपरेषा पाहू.

( पुढे चालू)

Previous Article

विश्वासाची संधी फक्त इथेच

Next Article

 स्तोत्र १३३ – उपासना (॥)

You might be interested in …

येशू सांताक्लॉजसारखा असता तर  जिमी नीडहॅम

  काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमधून तिने मला विचारले “डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का?” ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. कारण विश्वासी म्हणून […]

देव तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये  राखील

डेव्हिड मथीस पुढच्या दहा वर्षात तुम्ही प्रभूला धरून असणार याबद्दल तुमची किती खात्री आहे? अखेरीस निश्चितपणे विश्वासात  टिकून राहण्यासाठी देवच आपली आशा आहे. तोच आपल्याला राखतो(१ थेस्स.५:२३-२४; यहूदा २४). तरीही ख्रिस्ती चिकाटी ही निष्क्रीय नसते. […]

ईयोब -धडा २ रा

   लेखक – सॅमी विल्यम्स प्रस्तावनाभाग २ रा    .                                                         ईयोब १:१ ते ५ प्रस्तावनेच्या पहिल्या भागात आपण दोन प्रश्न अभ्यासले. आता ३ रा प्रश्न अभ्यासू.                                                                            प्रश्न ३ रा – ईयोब कोण होता?                                                                वचन १-  ईयोब […]