दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. “मनात म्हणतो,” जाहीर नाही. का बरं? तो मंडळीचा हुद्देदार आहे आपल्या पदाला धक्का बसता कामा नये ना! देवाच्या इच्छेविरुद्ध वागलं तरी तो काही करत नाही. तो यहूदी आहे. पण ते त्याच्या मुखानं तो सांगत नाही. त्या देवाला काही करता येत नाही, ही त्याची धारणा. व्यवहारात प्रतिष्ठा देवापेक्षा अधिक मोठी, पैसा व अधिकार देवापेक्षा मोठा व समर्थ असतो. अधिकारानं काहीही करता येतं. देवाला याविरुद्ध काही करता येत नाही. नाहीसं केलेलं तो पुनस्थापित करत नाही. याचा अनुभव मी कितीदा तरी नाही का घेतला?
प्रथम भीती वाटली होती. पण ती भीती निराधार आहे. देव नाहीचंय मुळी. तो इतका दुर्बल की निकामीच आहे. म्हणजे नाहीच म्हणा ना! अखेर मनुष्यबळ. मताचं सामर्थ्य! हे विकत घेता येतं. त्याला देवाची गरज लागत नाही. माणसाची गरज, ऐहिक गरज, हे मताचं रहस्य आहे. पैशानं, अधिकारानं, प्रतिष्ठेनं माणसाची जगातली गरज भागवली की झालं ! साध्या जिण्यात तरी देव कुठं आहे? देव जे देणार ते कव्हातरी.. कुठंतरी… कसंतरी ….अधिकार, प्रतिष्ठा पैसा देणार .. पण ते आत्ता आपोआप सहज मिळतं.
ज्याला देव म्हणतात, तो नाहीच! अधिकार, पैसा, प्रतिष्ठा यांनी जे दिलं ते देवाला देताही येत नाही अन् काढूनही घेता येत नाही. हे त्यांचे विचार. देव असलाच तर असेना का शुष्क उपासनेपुरता! हे आपलं जिणं झाकण्यासाठी ते बरं आहे. पण मनात, एकांतात, “देव नाहीच!” अशा रीतीनं अधिकारानं, प्रतिष्ठेनं, पैशानं, मनुष्यबळानं माणसाच्या ऐहिक गरजेनं, प्राप्त झालेल्या मानवी मतानं, संघटनेनं, सहकार्यानं केलेलं देवाला नाहीसं करता येत नाही; तर आपल्या मतसामर्थ्यानं रद्द केलेलं त्याला पुनरुज्जीवितही करता येत नाही. देव कुठं आहे? तो नाहीच मुळी. मनात जरी हे असलं, पण बाहेरून आस्तिकपण दाखवलं तरी कुठं काय बिघडतंय? उलट फायदाच होतो. आपल्या अधिकाराचं शिक्कामोर्तब होतं. पराभूत अज्ञानी म्हणतात, “देवानं दिल्यावाचून अधिकार नाही.” याहून आपल्याला काय फायद्याचं आहे? थोडी वर्गणी दिली, सुवार्तेसाठी आपली गाडी, अधून मधून जेवणावळ घातली की कळसच झाला. आपली माणसं खूष, आपलं काम अबाधित ! स्वार्थी हेतू संपूर्ण सफळ ! देव हवाच कशाला? नाहीच तो. पण हे जाहीर बोलून आत्मघात कशाला करायचा? मनात ठेवलं की झालं! “ मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही.”
कोणी म्हणेल, हे सारं कशावरून ? इतकं उघडं बोडकं नास्तिकपण आहे कुठं? छाती तरी होईल का कुणाची ? असली माणसं आहेत तरी का कुठं? ती देवाच्या मंडळीत आहेत, कारण ती देवाच्या पुस्तकात आहेत. असली माणसं तिथं कशी आली? पहिल्यानं देवाचा माणूस, चतुरस्त्र दाविदासारख्या चाणाक्ष, व्यवहारचतुर, कविकोमल मनाच्या अनुभवातली माणसं आहेत ती. देवाच्या दीन लोकांच्या दिलाशासाठी ती सर्वकाळ राहावीत असं त्र्येक देवाला वाटलं. म्हणून त्याच्या जीवनचरित्रामध्ये, संतांच्या समाधानासाठी खास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं पवित्रशास्त्रात ती आली. पाहा पुढं!
“लोक दुष्ट अमंगळ कामं करतात.” कोण हे लोक? दाविदाच्या अनुभवातले. “ देव नाही असं मनात म्हणणारा,” पहिला. नि नंतर त्याचे सममनस्क सहकारी… अनुयायी.. दोघंही एकाच जातीचे, धोरणी, विचारी, चाणाक्ष, मनानं नास्तिक. असल्या कामांमुळं त्यांची गट्टी झालीय. त्यांच्या कामांना पवित्र आत्मा “दुष्ट काम, अमंगळ कृत्ये म्हणतो.” म्हणेना.. म्हणेल म्हणेल अन् काय करील? असलाच तर गप्प राहील. तो नाहीचंय ना पण! व्यवहारात झालेलं काम देव म्हणवणाऱ्या पवित्र आत्म्याला जिथं बदलता येत नाही, तिथं तो आहे म्हणणं यातच वेडेपणा आहे. असं आम्हाला मनात वाटतं ! हे दुबळे, अल्पसंख्यांक आपल्या समाधानासाठी काही का म्हणेनात. आमचं आपलं प्रांजळ मत. “ देव नाही.” उघडंच कशाला म्हणायचं? सारं उघड दिसतंयच ना!
वचन एक मधलं दुसरं वाक्य म्हणतं, “लोक .. अमंगळ कामं करतात.” मंगल एकच. तो मंगल कामं करत फिरला. असं एकाबद्दल म्हटलंय. तो कोण? तर देव. नि त्याच्या जे जे विरुद्ध, ते ते अमंगळ. म्हणजे ते काय करतात? मूर्तिपूजा. काय? ख्रिस्ती मंडळीत, देवाच्या लोकांत मूर्तिपूजा आहे काय? नि:संशय. कारण पवित्र आत्मा दाविदाकरवी हे वाक्य म्हणत आहे. विल्यम जेम्स म्हणतात, “देव जर नसेल तर लोक देव निर्माण करतील.” इतके लोक देवमनस्क आहेत. मनानं देवाचा धिक्कार केला तरी निर्माण झालेल्या पोकळीत दुसरा देव स्थापला गेलाच पाहिजे. देव नसल्याने झालेल्या पोकळीत माणूस जगूच शकत नाही. मनात “देव नाही” म्हणत त्याला मनातून काढून टाकलं तरी नकळत त्या जागी स्वत:च्या इच्छा पुरवणाऱ्या देवाची त्यानं स्थापना केलीच. एका खऱ्या देवाला मनातून धिक्कारल्यावर मनुष्य एकदेववादी क्वचितच राहातो. कारण त्याच्या वास्तवात अनेक गरजा असतात. त्या सर्व पुऱ्या पाडण्यास एक देव पुरा पडत नाही. खरा देव सोडून दिल्यावर दुसऱ्या एकाच देवाची एकनिष्ठतेनं काय म्हणून उपासना करायची? मग प्रतिष्ठा, अधिकार, पैसा, लोकमत असे जेवढे म्हणून फायदेशीर तितके सारे मनाच्या देवघरात बसवायचे. हे अनेक देवत्व मनातल्या मनात असलं की झालं!
ध्येयवादाची अव्यवहार्य सक्ती का स्वीकारायची? मग वर सांगितल्यापैकी एक असो की अनेक असो. मनात “ देव नाही” म्हणणारे आहोत ना? मग तो व त्याचे साथीदार दाविदाच्या व देवाच्या दृष्टीनं “दुष्ट, अमंगळ कामं” करतात. वर सांगितलेल्या समुदायामध्ये सत्कर्म करणारा कोणी नाही. सत्कर्मे म्हणजे? आपलं काम व्हायला कोणाला पैसे द्यायचे नाहीत. निवडून यावं म्हणूनही नाही. देवाचं काम आहे, त्याच्या मनात असेल तर आपण निवडून येऊ. असं तर खुळी माणसं करतात. ह्यांना मनात ‘देव नाही’ म्हणणाऱ्यांच्या समुदायात जागा नसते. दाविदाचा देव म्हणत आहे, त्यांच्यात सत्कर्म करणारा कोणी नाही. भ्रष्ट लोक आहेत. देवाच्या सहवासात राहणाऱ्या सद्भक्त दाविदाला हे दृष्य दिसतं. ख्रिस्ती म्हणवणाऱ्या नामधाऱ्यांची असली दुष्ट कामं पाहून देवाच्या मनालाही वाईट वाटतं. देवानं स्वर्गातून माणसाकडं बारकाईनं पाहिलं. काय दिसलं त्याला? कोणा एकाला तरी समज, विचार करण्याची शक्ती आहे का? तिचा उपयोग करणारा देवभक्त आहे का? देवाला आढळतं, ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत. नीतीची वाट त्यांनी सोडून दिली आहे, वाकडी वाटच धरायचं ठरवलं आहे. ते अंमलातही आणलंय. तसं वागणं चालूच ठेवलंय. एकूणएक बिघडले आहेत. सत्कर्मे करणारा कोणी नाही. चुकून एक देखील चांगला, समंजस, सरळ नसावा, सर्वांनीच मार्गभ्रष्ट होऊन वाकडी वाट धरावी याचं देवाला आश्चर्य वाटतं. कळस म्हणजे एखाद्याचंही डोकं चालत नाही, या चुकीविषयी विचारही शिवत नाही. सर्वच्या सर्व अविचारी असून व्यावहारिक शहाणपणही त्यांच्यात नाही. पातक आणि समज असणं यात जिव्हाळ्याचा संबंध आहे. पातक करणं म्हणजे समंजसपणाची रजा घेणं. येथे सांगितलेलं ज्ञान व्यवहारज्ञान, विद्या, भौतिक ज्ञान असा अर्थ नाही. तर देवासंबंधीचं, शास्त्राचं ज्ञान, त्याच्या तारणाच्या योजनेचं, वचनातून झालेलं देव, स्वर्ग, नरक, पातक, तारण इत्यादींचं ज्ञान असा अर्थ आहे. तेही केवळ वैचारिक ज्ञान नव्हे तर अनुभवाचं ज्ञान असा अर्थ आहे. इथं देव आश्चर्यानं स्वगत म्हणतो, झाडून सारेच्या सारे पातकी, ज्ञानशून्य आहेत काय? प्रश्नातच उत्तर आहे, होय.. त्यानं देवाला वाईट वाटतं. ह्या अज्ञानाचा परिणाम देवाला दिसतो. तो रंजीस येऊन दु:खी होतो.
सहज आपल्या तारलेल्यांना “माझे लोक” म्हणतो. “माझे” किती गोड समाधान साठलेला बेहद्द दिलासादायक शब्द. ‘ माझे लोक.’ देवाची प्रजा. देवाघरची माणसं. अन् कसली? दुष्ट लोक त्यांना भाकरीप्रमाणं खाऊन टाकतात, नाडतात, त्यांच्यावर जुलूम ,अडवणूक, पिळवणूक करतात. जणू हा त्यांचा नेहमीचाच कार्यक्रम. जेवणाचा रोजचा पदार्थ भाकरी ना? आवडीनं, तुकडे करून नकळत भाकरीप्रमाणं मनात ‘देव नाही’ म्हणणारे हे पातकी देवाच्या दीनांना खाऊन पचवतात. भाकर खाल्ली म्हणून कुणाला वाईट वाटलंय? रोजची भाकरी अन्नातील गोड, अवीट, पदार्थ. तो खाऊन पश्चातापाची भावना कुणाला शिवेल? नाहीच. तितके सहज ते संतांचा संहार करतात. देवाच्या दीनांना दडपून नेस्तनाबूद करतात. खाऊन पचवून टाकतात. कळस काय? खाण्यात देवाचं नाव नाही. भाकर तर देवाच्या नावे आशीर्वाद देऊन पवित्र करून तरी खातात. पण या खाण्यात त्या गरीब भाकरीला तेवढं भाग्यही लाभत नाही. यहोवाचं नाव त्यांच्या तोंडातच नाही. यहोवाचं नाव म्हणजे त्याची तारक व्यक्तिमत्ता. उद्धारक सामर्थ्य. त्याचं खरंखुरं ऐतिहासिक प्रभावी प्रकटीकरण. त्यांच्या पातकी जिण्यात देवाच्या नावाला कुठली जागा? देवाच्या दीनांना भाकरीप्रमाणं खाताना त्यांच्या जिण्यात चुकूनही यहोवाचं नाव येणार नाही. हे झालं त्यांचं पूर्वचरित्र.
(पुढे चालू)
दिनांक – २६ ॲागस्ट १९५८
Social