१ ले थेस्सलनी
प्रस्तावना
ख्रिस्ती धर्म म्हणजे देवाची तारणाची महान योजना. त्या तारणाच्या योजनेतील भूमिकेत खुद्द त्र्येक देवच आहे. “सर्व काही त्याच्या द्वारे, त्याच्यामध्ये व त्याच्यासाठी आहे.” असे पौल म्हणतो. का बरं? “प्रभूचं मन कोणाला समजलं आहे? त्याला सल्ला देणारा कोण झाला आहे? त्याला प्रथम देऊन त्याची परतफेड मिळेल असा कोण आहे?” देववादाचा हा कळस आहे. या योजनेची कल्पना त्याची एकट्याचीच. तिची परिपूर्ती करणारा एकटा तोच. त्या योजनेच्या परिपूर्तीसाठी लागणारं सर्व त्याचं एकट्याचंच. हे दैवी प्रगटीकरण आहे. नित्य जगात तयार झालेली योजना संपूर्णतया देवाचीच आहे. आरंभ, स्थिती, पर्यवसान व अखेर त्याच्याकडेच चाललेली अशी ही संपूर्ण योजना आहे.
जगाचं, पातकी दुनियेचं, कल्याण करणाऱ्या अनेक काळातील, अनेक देशांतील, अनेक व्यक्तींच्या कल्पना मानवकेंद्रित, व अपूर्ण असल्याने अयशस्वी झाल्या यात नवल नाही. त्या नेहमी तशाच होत राहणार आहेत. केवळ ख्रिस्ती शास्त्रातील योजनाच पूर्णपणे यशस्वी होणार यात शंकाच नाही. तिचा उगम देवाच्या प्रीतीतून असून तिच्या मार्गदर्शनात देवाचा विचार आहे, तर तिच्या परिपूर्तीचे सामर्थ्य त्याच्या अजिंक्य इच्छेत आहे. या दृष्टीने आपण तिच्याकडे पाहून कृतज्ञतेने आभार मानले पाहिजेत. ती वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, मानवी, सार्वत्रिक, सर्व समावेशक दृष्टीनं परिपूर्ण होत राहण्याकडे कटाक्षानं पाहात आपण दक्ष असायला हवं. या कामी आपला समावेश झाल्याबद्दल कृतज्ञ असायला हवं.
१. तारण योजनेत द्वितीयागमनाचं स्थान – तिच्याबद्दलचं आश्चर्य हे आहे की ती काळ रेषेवर, अवकाशात, वस्तूत, व्यक्तीत कड लावणारा देवच सर्व बंधने तोडून पूर्ण करणार आहे. “संपूर्ण पृथ्वी त्याच्या पूर्णतेने भरून” टाकणार आहे. देवाच्या समाजाचं नित्याचं जिणं सदैव चालू राहणार आहे. तेच भरपूरीचं शाश्वत जीवन होय.
(अ) त्या योजनेचा महत्त्वाचा प्राण व बिंदू दुहेरी द्वितीयागमन होय. तारलेल्या भक्तांकरता पहिलं पुनरुत्थान. देवाच्या राज्याचा गाडा हाकण्यासाठीचे हे शिक्कामोर्तब होय. काही काळ त्यांना स्वर्गवास मिळून राज्य चालवण्यास त्यांना देवसहवास लाभावा म्हणून ते होणार.
(ब) दुसरं द्वितीयागमन शत्रुंच्या शिक्षेला आरंभ करण्याकरता, देवाने घाई केली अशी कुरकुर किंवा सबब राहू नये व पुढेही त्यांना पश्चात्तापाला अवसर मिळावा म्हणून आहे. म्हणून पहिल्या पत्राचा विषय पहिलं पुनरागमन हा आहे.
२- थेस्सलनीकाकरांच्या १ ल्या पत्राचा संदेश
(अ) रोजच्या तारणाचं ख्रिस्ती जीवन
रोजचं तारण ख्रिस्तामध्येच शक्य आहे हे आपण देवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. आता वैयक्तिक रित्या मानवी दृष्टिकोनातून पाहाणार आहोत. ज्यांचा सुवार्तेमुळे तारण योजनेत प्रवेश झाला, ज्यांच्या विश्वासाचं वर्तमानही सर्वत्र पोहंचलं, त्यांच्या ख्रिस्ती जिण्यासाठी यात धडा आहे. अशा थेस्सलनीकाच्या लोकांचं रोजच्या तारणात वाढत जाणारं जीवन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा हा अनुभवच आपल्यासाठी निरोप आहे. तो वैयक्तिक अनुभव आहे यात शंकाच नाही. पण त्यांची चाकोरी सामाजिक आहे. सामाजिक जबाबदारीची त्यांना पार्श्वभूमी आहे. ख्रिस्ती विश्वासी व्यक्ती एकटी नाहीच. तिचा आपल्या विश्वासी बंधुजनांशी संबंध आहे. ख्रिस्ती व ख्रिस्तीतर यांच्यात येथेच मोठा फरक आहे. ख्रिस्ती व्यक्ती पाप करू शकणारच नाही. तो आपल्या बांधवांसाठीच जीवन जगणार. म्हणून त्याला कुटुंब असलंच पाहिजे. कारण पातक म्हणजे स्वार्थ. मी, माझं, मला दुसऱ्यांची संपत्ती, प्रतिष्ठा हवी. पण तो दुसरा माझा आहे, माझ्या घरचा, माझा भाऊ, बहीण आहे, असं वाटलं नाही तर पाप होणारच. म्हणून मत्तय २३ मध्ये प्रभूची बिजली कशी कडाडली पाहा.
(ब) दैनंदिन ख्रिस्ती जिण्याचं स्वरूप
पहिल्या पत्रात विश्वास, प्रीती व आशा हे तारणाचे तीन घटक पौल सांगतो. पण त्यांना अर्थभरीत करायला त्या प्रत्येकाला एक जोडशब्द दिला आहे. ते असे: विश्वासाचे काम … प्रीतीचे श्रम… आशेचा धीर.
विश्वासाचं काम – ख्रिस्ती जीवनाचा आरंभ, मध्य नि शेवट म्हणजे विश्वास होय. तेच त्याचं काम. जिणं म्हणजे कामाचं भेंडोळं. जीवन म्हणजे कृतींची मालिका. आपण जगण्याकरता, विसाव्याकरता, उपभोग घेण्याकरता जी कामं करतो त्याला प्रभू कामं म्हणत नाही. तर देवानं देवाच्या कामाची शाश्वत प्राप्तीसाठी घालून दिलेली व्याख्या म्हणजे “ येशूवर विश्वास ठेवणं” ही होय.
प्रीतीचे श्रम – रोज रोज, घटको घटकी, क्षणोक्षणी पहिल्यानं देवाची, नंतर आपल्या घरच्यांची, नि अखेर मंडळीची, कुटुंबाबाहेरच्यांची सेवा करणं. त्या सेवेसाठी दु:खसहन करणं. आपल्याला मिळालेलं तारण दुसऱ्यांना देण्यासाठी सुवार्ता सांगणं. त्यांची वृद्धी करणं, त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रभूची प्रीती, सेवा, दु:खसहन जागती व आयुष्यभर वाढती ठेवणं. ही प्रीती मात्र काळजीपूर्वक पारखणं गरजेचं आहे. देहाची ओढ व ख्रिस्ती प्रीती यातील भेद ओळखणं गरजेचं आहे. पवित्रतेसाठी हे तिखट इशारे समजावेत. देवाच्या प्रीतीचं लक्षण म्हणजे ही प्रीती करायला देवच शिकवतो (१ थेस्सल. ४:९). तोच ती प्रीती करण्यास आरंभ करतो (१ थेस्स. १:४). तोच ती प्रीती वाढवतो व विपुल करतो (१ थेस्स. ३:१२). तोच पवित्रतेत व निर्दोषतेत स्थिर करतो (१ थेस्स. ३:१३). पवित्रता व निर्दोषता या शब्दांवर लक्ष द्या. पवित्रता म्हणजे आतील न दिसणारं शील होय. पण तेवढंच मंडळीत पुरेसं नाही. सर्व लोकांसमोरही निर्दोष असावं लागतं. ते आवश्यक आहे.
आशेचा धीर – पुढं आम्ही देवासोबत नीतिमत्त्वाचं राज्य करणार आहोत. हे कध्धीही विसरू नका. कुजबुजण्यापलीकडे आपलं शील आंतरबाह्य पवित्र व निर्दोष असायलाच हवं (१ थेस्स.२:१०). याबाबत येशूचे व पौलाचेही बोध व इशारे पाहाणं महत्त्वाचं आहे. १ पेत्र १: ३-५ नुसार आम्ही पातकी असल्यानं या देहाला अविनाशीपणाचं वतन मिळणं शक्य नाही. म्हणून त्याने आपल्या मेलेल्यातून झालेल्या पुनरुत्थानानं आम्हाला नवीन जन्म दिला. आता तो आपल्या या नीच अवस्थेत गेलेल्या देहाला स्वत:च्या गौरवी अवस्थेतील देहाचं रूप देणार. त्याचं संपूर्णपणे रूपांतर करून सोडणार. वैभवाच्या प्रकाशानं वेढून टाकणार. अविनाशी वतन, न कोमेजणारं वतन, त्याच्या देहासारखा देह आपल्याला देणार. ते स्वर्गात त्यानं जतन करून ठेवले आहे. आमच्या विश्वासाच्या अटीवर ते आम्हाला तो देणार. तोपर्यंत आपल्या सामर्थ्यानं तो स्वर्गात ते संभाळून ठेवणार. ख्रिस्त आमची जिवंत आशा, आशेचा धीर आहे. आपण धीरानं वाट पाहात राहायचं.
३ – पहिल्या थेस्सलनीच्या निरोपाचा कळस
देवाच्या सहवासासाठी आवश्यक असणारं पावित्र्य आपल्याला कसं प्राप्त होणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याची दोन अंगे आहेत. प्रेषितांनी दिलेल्या आज्ञा पाळा, विधी आचरा. पवित्रतेसाठी ही कसरत आयुष्यभर अथक चालू द्या. पण शुद्धतेसाठी सतत चाललेल्या त्या आध्यात्मिक मेहनतीनं व दमछाकीनं पावित्र्य प्राप्त होत नाही ते नाहीच. पावित्र्य देणारा, समेट करणारा, तारण बहाल करणारा, देव स्वत: आहे. आमच्याविषयीचे सर्व हेतू तो पूर्ण करणार. इतकं पवित्र करणार की आपला आत्मा, मन, शरीर, यांचा अणू रेणू पूर्ण निर्दोष करील व कायम संभाळीत राहील. पाचारण त्यानंच केलं ना? मग हे देखिल तोच करीत राहील (१ थेस्सलनी ५:२३). त्याला युगानुयुग गौरव असो.
२ रे थेस्सलनी : दुसरे द्वितीयागमन
प्रस्तावना
१ल्या पत्राचा अभ्यास करतानाच २ऱ्या पत्राच्या लिखाणाचं कारण आपल्याला समजलं. १ ल्या पत्रानं वाचकांच्या मनात घोटाळा निर्माण झला. त्याचं कारण नीट पाहू या. पहिलं व दुसरं आगमन ही निरनिराळी आहेत. ती येशूचीच आगमनं आहेत. तारण करण्याकरता, मानवधारी होऊन, वधस्तंभावर प्राणार्पण करून, इतर मेलेल्यांना तसंच टाकून, स्वत: पुनरुत्थानानं कबरेवर विजय मिळवून तारणावर शिक्कामोर्तब करण्याकरता पहिल्यानं आला. हे माणसासारखं होऊन येण्याचं पहिलं आगमन होय. त्याचं द्वितीय पुनरागमन हे राज्य करण्याकरता आहे. ते दिव्य, पुनरुत्थित, अमर देहानं अनंतकालच्या राज्याच्या तयारीसाठी होणार. हे खरे की त्यामध्ये दोन स्पष्ट निरनिराळे भाग आहेत. तरी ते एकच आहे म्हणून त्याला द्वितीयागमन म्हणतात व त्या भागांना पहिलं द्वितीयागमन व दुसरं द्वितीयागमन म्हणतात.
पहिल्या पत्रात ही दोन्ही द्वितीय पुनरागमनं सांगितली आहेत. १थेस्सलनी ४:१३-१८ मध्ये १ ले द्वितीयागमन. व १ थेस्सलनी ५: १-११ मध्ये दुसरे द्वितीयागमन दिले आहे. पहिलं द्वितीयागमन अंतराळात प्रभूची भेट होत असलेलं, त्याचं नाव “अंतराळातील भेट.” दुसरं द्वितीयागमन, पृथ्वीवर शत्रुंचा सूड घेण्यासाठी असलेलं, त्याचं नाव “प्रभूचा दिवस”! २ थेस्सलनी २:१-११ मध्ये पौल “ख्रिस्ताचं आगमन नि त्याच्याजवळ आपलं एकत्र होणं” (२:१) असे सांगतो, व नंतर “ मग तो अधर्मी पुरूष प्रगट होईल… प्रभू त्याला नाहीसं करील “ (२:८) असं सांगून स्पष्ट दोन भाग दाखवून देतो. त्याचकरता हे दुसरं पत्र त्याला लिहावं लागलं. १ थेस्स ४:१३-१८ व १ थेस्स ५:१-११ या दोन उताऱ्यांच्या वाचनानं थेस्सलनीकाकरांचा गोंधळ झाला. त्यात खोट्या शिक्षकांचीही भर पडली. त्यांनी काही बोगस पत्रं त्यांना दाखवली व ती पौलाकडूनच आली आहेत असं भासवलं (२ थेस्स. २:२). त्यामुळं त्यांच्या गोंधळात भर पडून कळसच झाला. पहिलं द्वितीयागमन आधी व मग दुसरं द्वितीयागमन ही पौलाची शिकवण होती. पण खोट्या शिक्षकांमुळं ती दोन्ही एकच झाली. आणि प्रभूचं न्यायासाठी, शिक्षेसाठी होणारं दुसरं द्वितीयागमन लवकरच होणार अशी त्यांची कल्पना झाली, ती या खोट्या शिक्षकांनी करून दिली. आता त्याचा परिणाम काय झाला ते पाहा. प्रभू येणार! तो न्याय करायला येणार! तो लवकर येणार! मग आपलं कर्तव्य, त्याच्यासाठी तयार राहिलं पाहिजे. जागं राहिलं पाहिजे. जगाच्या संसारात गुंतलं नसलं पाहिजे. नाहीतर त्यात आपण गुंतू अन् प्रभू अकस्मात येईल या धाकानं अनेकांनी कामधाम सोडलं, घरोघर फिरणं सुरू केलं, सर्वत्र विषय तोच. प्रभूच्या येण्याचा. जेवणाची वेळ होईपर्यंत दुसऱ्यांच्या घरी चकाट्या पिटायच्या. त्या सर्वांच्या घरी चुली थंडच. मग जिथं असतील तिथं जेवणासाठी आग्रह केलाच की बसायचं जेवायला. यथेच्छ जेवायचं. घरी घरकरीण, मुलंबाळं, संसाराबद्दलच्या, त्यांच्याबद्दलच्या, तिच्याबद्दलच्या जबाबदारीचं खोबरं झालेलं! आणि परत या द्वितीयागमनाच्या संवादासाठी हे परत तयार! असा हा सारा गोंधळ माजला. चुकीचं शिक्षण खोडून, सर्व दुरुस्त करून, द्वितीयागमनाचं सत्य, ते केव्हा होणार, त्याची लक्षणं काय, त्याचं प्रयोजन काय, हे शिक्षण देण्यासाठी, त्यांच्या या अव्यवस्थित वागण्यावर प्रहार करून त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी आणि अखेर त्यांनी आपापले सर्व संसाराचे व्यवहार नीट दक्षतेनं करून, त्याच्या द्वितीयगमनाची वाट पाहात आयुष्य कंठावे म्हणून पौलानं हे दुसरं पत्र लिहिलं. आणि विषय सुस्पष्ट केला.
(क्रमश:)
Social