Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 3, 2019 in जीवन प्रकाश

तुम्ही विश्वास ठेऊ शकाल अशा सात लबाड्या मॅट रीगन

एका आजारी मुलाला त्याचे आजोबा प्रिन्सेस ब्राईड हे गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवत होते. त्यामध्ये ह्या राजकन्येवर अन्यायामागून अन्याय घडत जातात व एका दुष्ट राजपुत्राशी लग्न करण्याची बळजबरी तिच्यावर केली जाते याचे वर्णन होते. तो मुलगा चिडून म्हणाला, “हे न्याय्य नाहीये” त्याच्या आजोबांनी सुज्ञतेने उत्तर दिले, “कोण म्हणते जीवन हे न्याय्य आहे? कुठं लिहिलंय असं?”

अगदी साधा आणि बुद्धिमान विचार.

सध्याच्या काळात उत्स्फूर्तपणे मान्य होणारी व सत्याचा दावा करणारी सात विधाने खाली दिली आहेत व बायबलनुसार त्यांची पारख केली आहे.

१.  सर्व काही ठीक होईल.

कोण म्हणतंय असं? जर असे बोलणाऱ्याचा अर्थ रोम ८:२८ नुसार “देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात,” असा असेल  तरच. आणि हे खास करून त्यांनी “आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून” (रोम ८:२८) आहे. हे लोक यावेळी “आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत” असतात (तीत २:१३). नाहीतर तो फक्त आशावाद ठरेल.

सर्व काही ठीक होईल हा काही मंत्र नाही. जेथे एड्सचा रोग अनावर फैलावत आहे अशा आफ्रिकेतल्या राज्यासाठी किंवा जेथे कायम दहशतवादाची भीती आहे अशा सिरीयासाठी पण नाही. फक्त बायबलच अशी स्थिर आणि निश्चित आशा देऊ शकते जी वास्तव असून खोल पायावर उभारलेली आहे.

२. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे आरोग्य.

कोण म्हणतंय असं? देव याकोब ४:१४ मध्ये स्पष्ट म्हणतो की, “तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.” जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा पौल तुम्हाला आठवण देतो की, “आमचा बाह्य देह क्षय पावत आहे” (२ करिंथ ४:१६).

ह्या वाफेसारख्या जीवनात अगदी निकोप जीवन जगत राहणे सर्वांत महत्त्वाची बाब आहे का? देवाचा तसा विचार नाही. त्याचे गौरव दिसले जावे ह्यासाठीच तो समर्पित आहे (यशया ४३:७). आणि तुम्हीही हेच ध्येय कवटाळावे म्हणून तो तुम्हाला आमंत्रण देतो (१ करिंथ १०:३१). त्याच्या देहधारी मुलाच्या जीवनात त्याचे आरोग्य ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे असा देवाचा कधीच विचार नव्हता.

३. ते एका चांगल्या ठिकाणी आहेत.

कोण म्हणतंय? अनेक कारणामुळे दफनविधी वेदनामय असतो. पण असे म्हणण्यामागचे एक मार्मिक कारण म्हणजे शहामृगासारखे जमिनीत डोके खुपसून बसणे. आणि हे नेहमीच घडते. जे आत्मकेंद्रित जीवन जगले आहेत आणि ख्रिस्ताला नाकारले आहे त्यांना बेधडकपणे स्वर्गात गेले आहेत असे बहुतेक दफनविधीच्या वेळी जाहीर केले जाते.

पण देवाचा पुत्र म्हणतो “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो” (योहान ३:३६). अशा वेळी ख्रिस्ताने जे कार्य केले त्यासंबंधी सामान्य विधान करणे चांगले. ते विधान ह्या व्यक्तीबाबत  खरे आहे असा आशावाद करून नव्हे.

४. ज्यावर तुम्ही तुमचे मन केंद्रित कराल ते तुम्ही पार पाडू शकाल.

कोण म्हणतंय असं? अशी विधाने शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या जाहिरातीसाठी चालतील पण ती आत्मप्रवृत्त दृढनिश्चयी लोकांची आहेत. स्वयंचालना (अक्षरश: स्वत:चे राज्य) हा आपल्या आजाराचा उगम होऊ शकतो पण तो आपल्याला निरोगी करणारा रस्ता नव्हे. आपण मर्यादित आहोत ही कल्पना आपल्याला आवडत नाही. पण आपल्याला मर्यादित असेच निर्माण केले आहे. इयोबाच्या पुस्तकाच्या ३८ ते ४१ अध्यायांमध्ये देव इयोबाचे ज्ञान व सामर्थ्य किती कमी आहे हे अवाक् करणारे स्वत:चे प्रकटीकरण देऊन सांगतो. आणि रोम ३:१९ मध्ये स्वत:च्या नियमानुसार पापी मानवांना जेव्हा तो गप्प करतो तेव्हा जास्त परखडपणे ते तो सांगतो. यामुळेच आपण असहाय व गरजू आहोत व आपल्याला तारणारा हवा आहे हे आपल्याला समजते (रोम ३:२०, गलती ३:२२). आपल्याला नक्कीच देवाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केले आहे आणि अद्भुत निर्माणक्षमता दिली आहे. पण काहीही करण्यावर आपले मन केंद्रित करताना आपल्याला सत्याची नितांत आवश्यकता आहे (रोम ८:७,८).

५. “तो चांगला माणूस आहे.”

कोण म्हणतंय असं?

एका बाजूला यामागची भावना आपल्याला समजते. या जगात देवाच्या प्रतिमेची थोरवी आहे आणि त्यापलीकडे ख्रिस्ती लोकांना देवाने पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रण केलेली ह्रदये दिली आहेत.

पण त्याउलट येशूने जो सूर धरला तो निराळाच होता. येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही” (मार्क १०:१८). हाच न्याय पौल पुन्हा ध्वनित करतो आणि स्वत:ला पाप्यांमधला मुख्य म्हणतो (१ तीम १:१५). आपण देवाच्या कृपेने तारलेले पापी आहोत ही आमची ओळख आपण कधीही गमावू नये अगदी अनंतकाळातही.

६. तुमचं ह्रदय काय म्हणतय तसं करा.

कोण म्हणतंय असं? आपल्या ह्रदयानुसार वागणे ह्याला बायबलने कुठेच पुष्टी दिलेली नाही. पौल स्वत:च्या दुभंगलेल्या ह्रदयाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील” (रोम ७:२४)?  तो काही स्वत:वर भरवसा ठेवण्यासाठी समर्थन करत नाही.

स्वत:ला न कवटाळत बसता स्वत:ला मरण्यानेच आपले जीवन वाचू शकते (लूक ९:२३, मत्तय १६:२५). म्हणून जेव्हा दृढतेने आपल्या ह्रदयानुसार वागण्याचा मोह तुम्हाला होतो तेव्हा येशूने पेत्राला म्हटलेले शब्द आठवा, “तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये” (योहान २१:२२).

७.  सर्व चांगल्या गोष्टींचा कधीतरी शेवट होतोच.

कोण म्हणतंय असं? प्रचलित असलेले हे विधान केवळ सर्वांचे अनुकरण करण्याची पद्धत आहे. ह्या भग्न जगात वेदना आहेत म्हणून आपण आपल्याला छिन्नविछिन्न होण्यापासून वाचवण्यासाठी शोधून काढलेले हे शाब्दिक भूल देणारे साधन  आहे.

पण ही लबाडी आहे. देवाच्या मनात असलेला शेवट हा निराळा आहे. “‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या” (प्रकटी२१:४). देवाच्या योजनेनुसार सर्व वाईट गोष्टी एक दिवस संपुष्टात येतील पण सर्वोत्तम गोष्टी अनंतकाळभर टिकून राहतील.

तुमच्या मनाचे नवीकरण करा.

ह्या जगाच्या आत्म्यापासून सावध राहा. त्याच्या ओठातून मध वाहतो. ते तुमच्या कानाला गोड वाटेल पण अखेरीस त्याचा शेवट मृत्यू आहे.

म्हणून जेव्हा गोड वाटणारी, उघड वाटणारी, स्पष्ट दिसणारी विधाने तुमच्या कानावर पडतात तेव्हा “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या” (रोम १२:२).