जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ईयोब १:१-५

लेखक – सॅमी विल्यम्स

लेखांक १                                         

प्रस्तावना
भाग १ ला                                                                                   

जुना करार व नवा करार ही दोन्ही आपल्याला कशी उपयुक्त आहेत, याविषयी आपण आज खास पहाणार आहोत. कारण अनेकांचा गैरसमज असतो की जुना करार आपल्यासाठी नाही  कारण तो येशूविषयी नाही; वगैरे… आपण जुन्या करारातील ४२ अध्यायांचे ईयोब हे ज्ञानाचे काव्यात्मक अवघड पुस्तक अभ्यासाला निवडले आहे. जुन्या करारातील ज्ञानाच्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे. एकेका वचनाचा आपण अभ्यास करणार आहोत. आज प्रामुख्याने तीन प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत.

१- हे पुस्तक केव्हा लिहिले? २- या पुस्तकातून आपण काय शिकतो? ३- ईयोब कोण होता?                                                          

ज्ञानाच्या पाच काव्यात्मक पुस्तकांतील हे पुस्तक ईयोबावरील भयानक संकटांविषयी असून तो काही प्रमाणात ख्रिस्ताच्या दु:खसहनाची सावली असा भासतो. विश्वासी जनांना पुष्कळ संकटे सोसावी लागतात हे लक्षात येते. या पुस्तकात प्रथम त्याचे कुटुंब, त्याच्यावरील संकटांचा वृत्तांत – अध्याय १ व २, त्याचे सांत्वन करून त्याला सल्लामसलत म्हणजे समुपदेशन करायला आलेले चार मित्र व ईयोबाचे त्यांना उत्तर- अध्याय ३ ते ३७. आणि देवाचे इयोबाशी संभाषण व इयोबाचा उद्धार – अध्याय ३८ ते४२ याचा समावेश आहे.

त्याच्या चार मित्रांची नावे आहेत: अलीफज तेमानी, बिल्दद शूही, सोफर नामाथी आणि अलीहू.                                       

हे पुस्तक केव्हा लिहिले?

हे पाहताना, कोणी लिहिले हे पाहणे देखील आवश्यक वाटते. आपल्याला वचनात ठोस माहिती नसली तरी काही पुरावे आढळतात की, अलीहू या पुस्ताकाचा लेखक असावा असे आपण म्हणू शकतो. तो एकच समुपदेशक असा आहे की ज्याच्यावर देवाने काहीच दोषारोप केला नाही; इयोब ४२:७.  हा शेवटचा समुपदेशक, चांगला समुपदेशक होता. पहिले तिघे तसे नव्हते. त्याचीच केवळ ३२व्या अध्यायात खास ओळख करून दिली आहे. पवित्र आत्मा इतर तिघांवर अशी काही प्रस्तावना करत नाही असे दिसते. ईयोब ३२: १-५.

राम हे एक प्राचीन घराणे आहे. अब्राम या नावाचा मूळ भाषेत अर्थ आहे ‘रामचा पिता.’ अलीहू या चार मित्रांपैकी एकटाच इस्राएलच्या मूळ वंशजाशी निगडित दिसतो. तो अब्राहामाच्या आप्तातील दिसतो. उत्पत्ती २२:२०-२१ वाचा. नाहोर हा अब्राहामाचा भाऊ. नाहोराचा पुत्र बूज. म्हणजे बूज हा अब्राहामाचा पुतण्या. आणि या बूजचा पुत्र अलीहू. म्हणजे अलीहू इस्राएलाच्या मूळ गोत्राच्या इ.स,पूर्व २००० च्या अब्राहाम, इसहाक, याकोब यांच्या काळातला होता. आणि असे वाटते की अलीहूने ईयोबाच्या संपूर्ण अनुभवाचा वृत्तांत लिहून अब्राहामाला वाचायला दिला असणार आणि देवाच्या कार्यपद्धतीची माहिती अब्राहामाला कळली असणार. म्हणून देवाने अब्राहामाला पाचारण करताच तो देवाला ओळखून ताबडतोब दृढ प्रतिसाद देऊ शकला. जणू एका सुवार्तेच्या पुस्तकाप्रमाणे या पुस्तकाने अब्राहामाच्या जीवनात काम केले. अब्राहाम याला पाचारण होण्यापूर्वी हे पुस्तक लिहिण्यात आले असून ते बायबलमधील सर्वात जुने मोलवान पुस्तक आहे. त्याला आणखी एक पुरावा म्हणजे या पुस्तकाची भाषा फार जुनी आहे. त्याच्या संपत्तीचे मापन गुराढोरांच्या संख्येने केले जाण्याचा काळ होता. त्यांची वयोमर्यादा सुमारे २०० पर्यंतची होती. तेव्हाचे हवामान पण चांगले होते त्यामुळे लोक भरपूर वर्षे जगत. उत्पत्ती

 १३:५-६; २५:७; ईयोब ४२:१७ वाचा. ईयोबाचे पूर्वीचे वय ६० जरी धरले तरी तो पण अंदाजे २०० च्या वर जगला. यहेज्केल १४:१४. ईयोबाला तो नोहानंतर लगतच्या काळातील धरतो. हे पुस्तक अब्राहाम, इस्राएल, नियमशास्त्र यापूर्वीच्या काळाच्या लोकांच्या रहाणीमानाची पार्श्वभूमी दाखवते. तसेच न बदलणारा देव, व तारणाविषयीच्या बायबलच्या संदेशावर प्रकाश पाडते.                                                              

आपण ईयोबाकडून काय शिकतो?                                                                         

हे पाहण्यापूर्वी आपण याविषयीचे कोणते तीन गैरसमज टाळावेत ते पाहू या.

१- आपला पहिला गैरसमज असतो की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात ते ईयोबाचे पुस्तक सांगते. पण हे खरे नाही. कारण ईयोबाने तर पश्चात्ताप केला. ईयोब ४२:६. म्हणजे तो चांगला होता का? नाही. येशूशिवाय कोणीच व्यक्ती चांगली नाही. देवाने ईयोबाला त्याच्यावर ही संकटे का आली याचे कारण सांगितले का? नाही. वचनानुसार ईयोब आपल्या नीतिमत्तेचे समर्थन करूच शकत नाही. याचे पुरावे आपण पाहूच.    

२- दुसरा गैरसमज सैतान ईयोबाची परीक्षा पहातो. पण या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे की देव ईयोबाला कसोटीस लावतो. ईयोब १:८. देव त्याच्या या कृतीतही नीतिमान असतो. सैतान आपल्या जीवनाचा चालक नाही, देव आहे.                                                          

३- तिसरा गैरसमज लक्षात घ्या. १ल्या दोन अध्यायात कथानक आहे. ३ ते ४१ काव्य व पुन्हा ४२ व्या अध्यायात कथानक आहे. त्यामुळे खूप लोकांना वाटते की तो मधला भाग अभ्यासायची काही गरज नाही. पण मधले अध्यायही आत्म्याच्या प्रेरणेने देवाने लिहून घेतले आहेत, आणि तेही त्या तीन अध्यायांइतकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुस्तकाचा आरंभ व शेवट महत्त्वाचा आहे हा गैरसमज आहे. कारण मधल्या ३ ते ४१ अध्यायात ईयोबासारख्या पापी व्यक्तीला देव कसे हाताळतो याविषयीची चर्चा आहे. पहिल्या तीन मित्रांना ईश्वरी तत्त्वज्ञान पुष्कळ माहीत होते; पौल १ करिंथ ३:१९ मध्ये ईयोब ५:१३ चा संदर्भ घेउन अलीफजच्या बोलण्याला पुष्टी देतो. पण त्यांचे लागूकरण चुकीचे होते. म्हणून ईयोबाचे पुस्तक आपल्याला योग्य लागूकरण करायला शिकवते. म्हणूनच ईयोबाचे पुस्तक  ज्ञानाच्या ग्रंथांमध्ये गणले आहे.                                                                                                        

ईयोबाच्या तीन इच्छांवरून आपण काही सत्ये शिकतो.

१. पहिली इच्छा– पाप्यांना देवाकडून क्षमा प्राप्त व्हायला हवी. मला पापक्षमेची गरज आहे, इयोब ७:२१. ही ईयोबाची पहिली इच्छा आहे. ही सुवार्ता तो आपलीशी करत आहे. कोणीच पापरहित नाही हे तो मान्य करतो.

२. त्याची दुसरी इच्छा आहे – मला देव व मनुष्य या दोहोमध्ये मध्यस्थी करणाऱ्याची गरज आहे, इयोब ९:३०-३३. त्याला आपली आत्मिक नीतिमत्ताही घाणेरड्या वस्त्रासारखी आहे असे जाणवत आहे, यशया ६४:६. ही त्याची पापाची जाणीव पहा. मी अपवित्र असल्याने देवासमोर उभा रहाण्यास पात्र नाही, आणि मी स्वत:ला शुद्ध करू शकत नाही. म्हणून त्या पवित्र देवासमोर मला उभे करू शकणारा मध्यस्थ मला हवा आहे. देव व मानव या दोहोंना जोडणारा तो  देव पण असावा आणि मानव पण असावा म्हणजे देवमानव असावा. त्याला किती खोल सिद्धांत माहीत आहेत.

३. तिसरी त्याची इच्छा आहे-  या पतित जगाला अखेरच्या पुनरुत्थानाची आशा आहे. ईयोब १४;१३-१५. त्याला येशूविषयी, पुनरुत्थानाविषयी माहीत आहे? ईयोब १९:२५-२६ वाचा. मला बदलून परत नवीन शरीराने जिवंत होण्याची गरज आहे. या खात्रीलायक आशेला तो बिलगून आहे.                          (क्रमशः)                                                          

                                                             

Previous Article

उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने

Next Article

अविश्वासाला एकट्याने तोंड देऊ नका

You might be interested in …

जे विश्वासू ते सध्या मूर्ख दिसतील

जॉन ब्लूम देवाची सुज्ञता ही बहुतेक मागे अवलोकन करतानाच पूर्णपणे दिसते. जेव्हा मानवाची सुज्ञता एक टूम म्हणून दिसेनाशी होते तेव्हा देवाच्या सत्याचा पर्वत स्थिर राहतो. काळ हा मानवाचे ज्ञान उघड करतो पण तो देवाचे ज्ञान […]

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे (पूर्वार्ध) क्रिस विल्यम्स

“ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? […]

तू माझा त्याग का केलास?

लेखक: डॉनल्ड मॅकलॉड नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, ‘एलोई, एलोई, लमा सबखथनी,’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?’ मार्क १५:३४. इथपर्यंत येशूला क्रूसावर खिळण्याचा वृत्तांत त्याच्या शारीरिक दु:खसहनाकडे केंद्रित […]