जनवरी 7, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्तजन्मदिन तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस

प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल.

खरी ख्रिस्तजन्म दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही. जर आपण पहिल्या ख्रिस्तजन्माची गोष्ट बायबल उघडून वाचली तर आपल्याला दिसते की तेथे सर्व आनंदीआनंद आणि लख्ख नव्हते.  उत्सवाची झलक दिसते ती गोंधळ आणि यातनांच्या पार्श्वभूमीवर. पहिली प्रकाशाची किरणे गाढ अंधाराच्या प्रदेशात चमकली गेली.

हजारो वर्षे देवाचे निवडलेले लोक त्याच्या अभिवचनाच्या पूर्तीची वाट पाहत होते.  चारशे वर्षे देव नि:शब्द होता असे वाटत होते. आणि अचानक बालक म्हणून बेथलेहेमात त्याचा आक्रोश ऐकू आला. त्या पहिल्या ख्रिस्तजन्माच्या यातना, दु;खे आणि भीती यावर विचार करा.

मरीया आणि योसेफ

प्रथम मरीयेचा विचार करा. देवदूताच्या घोषणेबरोबर खूप खळबळ माजली असणार आणि अपेक्षाही असणार – सोबत खूप गोंधळ आणि गैरसमजही. लवकरच ती गर्भार दिसणार होती. मागणी झालेली पण अजून लग्न नाही झाले. तिच्या नाझरेथ गावच्या लोकांसाठी तो कुजबुज करून न्याय करण्याचा विषय होणार होता. तीन दशकानंतरही तिच्या पुत्राचे शत्रू त्याच्याविरुद्ध हाच एक्का खेळणार होते. ते त्याला म्हणाले, “आमचा जन्म जारकर्मापासून झाला नाही” (योहान ८:४१). जर येशू अशा अफवा दूर करू शकत नव्हता तर मरीयेसाठी हे  किती अधिक असणार!

आणि योसेफाचा विचार करा. त्याची भावी वधू त्यांच्या विवाहापूर्वी  गरोदर आहे (मत्तय १:१८) ह्या बातमीने त्याची किती मानहानी झाली असेल. ती किती सुंदर, शुध्द, देवावर प्रेम करणारी होती. त्याची सर्व स्वप्ने क्षणात भंग पावली असतील. तिची बातमी ऐकून देवदूत स्वप्नात येईपर्यंत त्याला किती मनस्ताप सोसावा लागला असेल. “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे” (मत्तय १:२०). देवदूताच्या शब्दावर विश्वास ठेवताना त्याला स्वत:च्या जिवाशी सामना करावा लागला असेल. आणि त्याच्या स्वप्नाने भोवतालच्या अफवा थोपवल्या गेल्या नाहीत.

तो पाप घेण्यासाठी आला

मरीया आणि योसेफ यांच्या यातनांपेक्षा येशू  ज्या यातना, पाप, दु:खसहन आणि नाश वाहण्यासाठी आला ते विशेष लक्षणीय आहे. देवदूताने योसेफाला सांगितले की, “त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील” (मत्तय १:२१).

प्रत्येक यहूदी व्यक्तीला मान्य होते की देवाच्या लोकांची रोमी साम्राज्य व त्यांच्या तावडीतून सुटण्याची गरज आहे. देवाच्या पहिल्या कराराच्या या लोकांना त्यांचे पाप, अंधार व आतील असणार्‍या भ्रष्टतेपासून सुटण्याची गरज होती. जर तसे नसते तर खिस्तजन्म झालाच नसता. ख्रिस्त इतिहासात काही ठसा उठवण्यासाठी, देखावा करण्यासाठी आला नाही. तो मृतांना जीवन द्यायला, नाश पावत असणाऱ्यांना वाचवायला, रोग्यांना बरे करायला आणि सैतानाची कामे नष्ट करायला आला. कित्येक शतके अंधार व यातनांनी घर केले होते. अशा भ्रष्ट आणि विरूप जगात आल्यानेच आशेच्या आगमनाचा इशारा दिला गेला.

नम्र करणारे बेथलेहेम

जेव्हा बालकाचा जन्म होण्याची वेळ आली तेव्हा बेथलेहेम गावाने त्याचे फारच साधे स्वागत केले हे नवल आहे. देवदूताने सांगितले होते की हाच मशीहा आहे. तुम्ही इतका दीर्घकाळ वाट पहात असलेला राजा आहे. तरीही त्याचे राजेशाही स्वागत झाले नाही. जागा नाही. यरुशलेम नाही. त्याऐवजी सहा मैलांवर असलेल्या दविदाच्या एका छोट्याश्या गावातील गोठा ह्या महान राजाचे जन्मस्थान झाले. त्यांच्यासाठी जागा नव्हती हे स्पष्ट आहे (लूक २:७). मग मरीयेने आपल्या प्रथम पुत्राला गव्हाणीत झोपवले. ही काही आदर्श जागा नव्हती.

पुढची नमवणारी बाब म्हणजे भेटायला कोण आले नाही आणि कोण आले. आपल्याला माहीत आहे की कोणीही स्थानिक मान्यवर व्यक्तींनी तेथे भेट दिली नाही. काही काळानंतर परदेशी भविष्यवादी येणार होते आणि त्यावेळी ती गोंधळात टाकणारी बाब झाली. मेंढपाळांची भेट, त्यांचा आदर, देवदूतांच्या घोषणेची वार्ता ऐकून त्या जोडप्याला खूप चालना मिळाली असेल.  मरीया या सर्व गोष्टींचे मनन करून मोठ्या आनंदाने त्या आपल्या अंत:करणात ठेवणार होती (लूक २:१९). सध्यासुध्या  मेंढपाळांच्या भेटीने हाच वचनदत्त मशीहा आहे यावर शिक्कामोर्तब झाला. त्याच्या नेमलेल्या गौरवापर्यंत जाण्याचा किती लांबलचक, दु:खमय रस्ता हा!

तुझ्या जिवातून तलवार भोसकून जाईल

जेव्हा मरीयेने आपल्या नवजात मुलाला मंदिरात अर्पण करण्यासाठी नेले तेव्हा तिला धक्का बसला असेल. शिमोन नावाच्या एका वृद्धाने ते बालक ख्रिस्त असल्याची खात्री दिली; पण मरीयेकडे तिच्या डोळ्याला डोळा भिडवून भविष्यवाणी केली, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे; ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल” (लूक २:३४-३५). याचा अर्थ एक महान दु:खद घटना नेमली गेली आहे. त्याच्या मरणाने तिचा जीव भोसकला जाणार होता.

हेरोद आणि कत्तल

आणि शेवटी ख्रिस्तजन्माशी संबंधित असलेली सर्वात भयानक सत्यकथा. दोन वर्षांखालील अनेक मुलगे त्यांच्या आईवडिलांच्या कवेतून हिसकावून घेऊन ठार मारण्यात आले – एका दुष्ट, असुरक्षित हुकुमशहामुळे.
“हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले” (मत्तय २:१६). ही निर्दोष बालकांची कत्तल होती. पहिल्याच ख्रिस्तजन्मदिनाच्या दरम्यान किती दु:खाचा डोंगर कोसळला.

देवाच्या दुताकरवी देवाने आपल्या पुत्राची या कत्तलीपासून सुटका केली – त्याला पुढे येणाऱ्या याहून भयानक मरणासाठी राखून ठेवण्यासाठी. योसेफ आणि मरीयेला त्या दुष्ट राजापासून मिसर देशात पळून जाण्यासाठी किती गैरसोय, यातना घ्याव्या लागल्या असतील.

दु:खापेक्षा खोल आनंद

त्या पहिल्या ख्रिस्तजन्माच्या दिवशी जगात आलेले जीवन सोपे असणार नव्हते. जन्माच्या वेळी नाही, बालपणात नाही आणि प्रौढपणातही नाही. खरं तर योहानाच्या शुभवर्तमानातील आरंभीची काही वचने येशूच्या संपूर्ण जीवनाची वेदना पकडतात. “तो जगात होता व जग त्याच्या द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही” (योहान १:१०,११).

यशयाने सुद्धा भविष्य केले होते की “ख्रिस्त हा तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा होईल” (यशया ५३:३). आणि तो तसा झालाच. पण हे दु:खमय जीवन जरी आव्हानात्मक होते तरी त्याचा खूप गहन, अशा आनंदाशी परिचय होता ज्यामुळे त्या दु:खी पुरुषाला राखले गेले.

आनंदोत्सव येणार

पहिल्या ख्रिस्तजन्माच्या वेळी देवदूतांनी पुकारलेला महान आनंद आपल्यालाही राखू शकतो. ख्रिस्तजन्म आपल्या अनेक यातनांकडे दुर्लक्ष करत नाही किंवा आपल्याला त्यामध्ये  तसेच सोडून देत नाही. ख्रिस्तजन्म ते गंभीरपणे घेतो, इतर कोणत्याही निधर्मी सोहळ्यापेक्षा अधिक. आणि आपल्याला आठवण करून देतो की आपल्या देवाने आपले दु:ख पाहिले आहे आणि मदतीसाठी आपण मारलेल्या  हाका ऐकल्या आहेत (निर्गम २:२३-२५; ३:७-९; ६:५). आणि तो स्वत:च आपली सुटका करण्यास आला आहे.

या युगामध्ये ख्रिस्तजन्मदिन हा उत्सव आणि प्रकाशाची हमी देत नाही. अजून तरी नाही. पण तो आपल्याला अभिवचन देतो की उत्सव आणि प्रकाश येत आहे. ख्रिस्तजन्म हा येणाऱ्या सततच्या आनंदामध्ये डोकावून पाहण्यास संधी देतो. आणि जेव्हा दुरून आपण त्याची झलक पाहतो तेव्हा आपण त्याचा पूर्वानुभव घेतो.  प्रेषित पौल किंवा त्या दु:खाच्या पुरुषाप्रमाणे आपण दु:खी तरी आनंदी (२ करिंथ ६:१०) आहोत. ख्रिस्तजन्मदिनी आपण दु:खात बुडून गेलेले असू तरी ख्रिस्तामध्ये त्याच्या आत्म्याद्वारे देव आपल्याला आनंद करण्यास कारण देवो.

Previous Article

ईयोब -धडा २ रा

Next Article

ख्रिस्तजन्मदिनी भग्न जनांची कशी काळजी घ्याल?

You might be interested in …

देवाने तुम्हाला आठवणी दिल्या आहेत कॅथरीन बटलर

जी ठिकाणे आपल्याला विसरून जातात आणि ज्या क्षणांची इतर कोणी फिकीर करत नाही त्यांच्याशी आठवणी आपल्याला बांधून ठेवतात. नुकतेच मी आमच्या शाळेचे मासिक वाचत असताना असेच विचार मला पछाडू लागले. हडसन नदीच्या किनाऱ्याला असलेले गुलाबाचे […]

नव्या वर्षासाठी आठ प्रश्न

डॉन व्हिटनी देवाशी अगदी विश्वासू असलेल्या लोकांनाही  थांबून आपल्या जीवनाची दिशा काय आहे याचा आढावा घ्यावा लागतो. खरं तर न थाबता, एका व्यस्त आठवड्यातून दुसऱ्या आठवड्यात जाणे आणि आपण कुठे चाललोत याचा विचार न करणे […]