डेव्हिड मॅथीस
बेथलेहेम हे आपण एक योग्य शहर असल्याचे दाखवणार होते.
पुरातन इस्राएलला या वचनदत्त जन्मासाठी याहून चांगले ठिकाण नव्हते. – हा राजकीय वारस एका क्षुल्लक खेड्यात वाढणार होता पण राजधानीत मरण्यासाठी तो आला होता.
बेथलेहेम हे गाव काही फार मोठे नव्हते, ते नाझरेथच्या खेड्यासारखेच होते. पण त्याच्या क्षमतेचे ते प्रतिक होते -दाविदाचे नगर. येथे इस्राएलचा सर्वात महान राजा जन्मला व वाढला होता. बेथलेहेमाचे वैभव जसे झाकलेले होते तसेच येशूच्या जन्माचा दिवसही. हे अर्भक सामान्य, मातीतले, बाळंत्याने गुंडाळलेले, आणि जनावरांना खाऊ घालायच्या गव्हाणीत निजवले होते. त्याचे पहिले पाहुणे पण साधे गावंढळ लोक: मेंढ्यांची रात्री देखरेख ठेवणारे धनगर .
तरीही त्याच्या जन्माची वार्ता सांगण्यास स्वर्गातून वैभवी दूत आले – काहीतरी भव्य दिव्य घडणार होते- पण सावकाश, धीराने, नम्रतेने. कारण यरुशलेम ह्या मोठ्या शहराला त्यासाठी तीन दशके वाट पहावी लागणार होती.
बेथलेहेम: वैभवातून शून्याकडे
ख्रिस्तजन्मदिनाने अनंतकालिक पवित्र पुत्राला स्वर्गाचे वैभव सोडायला लावले असे म्हटले जाते. खरं तर तो पृथ्वीवर स्वर्ग न सोडता आला. देव असणे न थांबवता आला, त्याने मानवता धारण केली. “तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले” (फिली २:६,७). त्याने स्वत:ला रिकामे केले ते देवपण गमावून नाही तर आपले मानवपण धारण करून. आणि तो खाली बेथलेहेमात हे वैभव झाकून आला इतकेच नव्हे तर आपले बालपण नाझरेथमध्ये घालवून अधिकच खाली गेला.
म्हणूनच यशयाने भाकीत केले होते, “कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते”
(यशया ५३:२)
त्याला रूप नव्हते याचा अर्थ तो कुरूप होता असा नव्हे तर तो अगदी सामान्य होता. “ त्याचे शरीर कमावलेले नव्हते, लक्ष वेधून घेण्यासारखे सौंदर्य नव्हते. आपले दैवी वैभव मानवीपणात झाकून तो आपल्यामध्ये तीस वर्षे राहिला .
गालील : मानवातून वैभव
तीस वर्षांच्या अप्रसिद्ध जीवनानंतर येशू लोकांमध्ये गेला समुदायाचा शिक्षक आणि शिष्य घडवणारा म्हणून. जे त्याच्या मागे गेले ते त्याच्या श्रीमंती किंवा राजकीय सामर्थ्यामुळे नाही तर त्याच्या अलोकिक शिकवणीमुळे, तसेच त्याच्या चमत्कारांमुळे गेले. लूक ९:४२, ४३ नमूद करते; “येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले.”
आणि धक्का देणारी बाब म्हणजे अशा परिस्थितीत तो स्पष्ट शब्दांत आणि नम्र आचरणाने सांगतो की, समुदायाला आश्चर्यचकित करणारे हे देवाचे वैभव आहे – त्याचे नाही. यामुळे समुदाय चकित झाला. वैभव हेच करते: ते चकित करते, ते थक्क करते, ते भारावून टाकते. ते भीतीयुक्त आदर निर्माण करते आणि मानवी ह्रदय नवल करते. ते अशी भव्यता चितारते की त्याची भक्ती करण्यास भाग पाडते (प्रेषित १९:२७). तरीही येशू किती साधा, किती सामान्य, किती मानवी होता. “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही” (योहान ७:४६). त्याने जे केले ते युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते (योहान ९:३२). तरीही तो सतत स्वर्गाकडे निर्देश करत होता. जेव्हा जेव्हा समुदायाला त्याचे भय वाटले, त्याच्या सामान्यतेने ते अस्वस्थ झाले तेव्हा तेव्हा देवाच्या वैभवाने ते चकित झाले.
डोंगरावर : मानवाचे वैभव
तरीही लोकांनी त्याच्याद्वारे जे पवित्र वैभव पहिले ते लवकरच शिष्य त्याच्यामध्ये पाहणार होते. त्याच्या आतल्या वर्तुळातील पेत्र, याकोब व योहान हे जे उघड वैभव येणार आहे त्याची झलक पाहणार होते.
रूपांतराच्या डोंगरावर पित्याने त्यांना येशूचे येणारे वैभव दाखवले जे त्याच्या मानवी रूपात झाकलेले होते. नंतर पेत्र त्या दृश्याबद्दल सांगणार होता. याकोब व योहान यांच्या वतीने बोलताना तो म्हणतो, “कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली” (२ पेत्र १: १६-१८).
वधस्तंभापलीकडे असलेले त्याचे वैभव या तिघांना पाहण्याची संधी मिळाली.
त्याच्या पुनरुत्थित गौरवी स्थितीमध्ये हा देवमानव त्याच्या अतुलनीय मानवी वैभवात येईल. ज्याला अनंतकालापासून त्याचे दैवी वैभव (स्वर्गात) होते, तो दीन होऊन वैभव नसलेला मानव बनला (बेथलेहेम व नाझरेथ) आणि त्याने दैवी वैभवाकडे निर्देश केला (गालीलात). तो लवकरच यरुशलेमात त्याच्या दैवी वैभवात चमकणार आहे. आणि तो कायम दैवी वैभवी पुरुष असा असणार आहे.
यरुशलेम : क्रूसावरचे वैभव
रूपांतराच्या वेळी त्याच्या पुढे अजूनही वधस्तंभ होता. अपमानास्पद आणि गौरवी, भयानक आणि अद्भुत. येथे यरुशलेमात त्याची शेवटची आणि अपमानास्पद कृती ही योग्य वेळी त्याला उंचावण्याची व वैश्विक वैभवाची पहिली महान कृती होईल. त्याने योहान १२:३१-३२ मध्ये म्हटले, “आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” आणि मग योहान लिहितो, “आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला.”
त्याचे क्रूसावर उंचावले जाणे ही त्याची नम्र होण्याची शेवटची महान कृती होती व त्याच वेळी वैभवात उंचावले जाण्याची पहिली कृती होती.
सियोन : राजासनावरचे वैभव
तीन दिवसांनी आच्छादन दूर केले गेले. त्याच्या पित्याने त्याला उठवले – पूर्ण मानव, गौरवी, नव्या जीवनात. नंतर चाळीस दिवस त्याचे दैवी मानवी वैभव पूर्ण सामर्थ्याने प्रकाशत होते. नंतर तो पुन्हा उंचावला गेला आता स्वर्गात अंतिम मानाच्या जागी – “उर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे” (इब्री १:३) तो बसलेला आहे.
त्याचे कार्य पूर्ण झाले आहे, पापासाठी शुद्धीकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या वैभवाने वर्तुळ पूर्ण केले आहे: स्वर्गातून पृथ्वीवर, नाझरेथ आणि गालीलकडे , अखेरीस यरुशलेमकडे, पुन्हा स्वर्गात. आता तो एका शेवटच्या हालचालीची वाट पाहत आहे: नवे यरुशलेम स्वर्गातून पृथ्वीवर खाली येणार आहे. तेथे येशू आपल्याला कल्पना नाही अशा वैभवाने राज्य करील. येथे तो मीखा ५ मध्ये सांगितलेले बेथलेहेमाचे भाकीत अखेरीस पूर्ण करील.
“हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.
तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. हा पुरुष आम्हांला शांती होईल (मीखा ५:२, ४-५)
मानव आणि देव. तो दाविदाचा पुत्र आहे तरीही त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे? इस्राएलमध्ये तो सर्व राष्ट्रांवर राज्य करील. तो सर्वसमर्थ देवाच्या सामर्थ्याने सर्वसमर्थ देव म्हणून आपल्या कोकरांना सांभाळील. अखेरीस राजा आला आहे. “देव त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतो” (स्तोत्र २१:५). “आपल्या वैभवामध्ये हा मशीहा सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयी होतो” (स्तोत्र ४५:४).
अशा जन्मासाठी बेथलेहेम अगदी परिपूर्ण होते. तो अचानक आणि शांतपणे आला आणि तो दिवस काळामध्ये सर्व काही बदलून टाकणार आहे. तसेच स्वर्ग आणि पृथ्वी पुन्हा तयार करणार आहे.
आता विश्वासाने आपण त्याला उंचावलेले पाहतो. लवकरच आपल्या डोळ्यांनी आपण त्याचे पूर्ण वैभव पाहू.
Social