मई 4, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

राजा होण्यास लायक असा पुत्र

स्कॉट हबर्ड

बायबल नव्यानं वाचायला लागणारे लोक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे  उत्सुकतेने व निर्धाराने धाव घेतात आणि पहिल्या सतरा वचनातच अडखळून पडतात. आम्ही तर एका गोष्टीची, नाट्यमय कथेची, देवदूत, मागी आणि बेथलेहेमात जन्मलेल्या बाळाची अपेक्षा करत इथं आलो होतो आणि त्याऐवजी आम्हाला हे दिसतयं:

“अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी” (मत्तय १:१).

जर मत्तयाने आपल्याला संपादक म्हणून आपल्याला मत विचारले असते तर आपण सुचवले असते की, त्याने अठराव्या वचनापासून सुरुवात करावी, “येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला.” इथं कहाणी आहे.

पण सत्य हे आहे की मत्तयाचे सुरुवातीचे शब्द वरवर दिसते त्यापेक्षा एक फार मोठी कहाणी सांगतात. दावीदाच्या दिवसांपासूनच देवाचे लोक दाविदाच्या पुत्राची वाट पाहत होते. ख्रिस्त जो अभिषिक्त तो येईपर्यंत दाविदाचा राजवंश अखंड पुढे चालू राहावा आणि त्याचा दाविदाच्या गावी जन्म व्हावा याची वाट ते पाहत होते. देवाने आपले पुरातन अभिवचन पूर्ण करावे आणि त्यांचे रिकामे राजसन भरावे याची वाट ते पाहत होते. दुसऱ्या शब्दांत एका राजाने यावे व राज्य करावे याची वाट ते पाहत होते.

आणि येथे दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या वंशावळीमध्ये मत्तय म्हणतो, “आता अजून वाट पाहू नका.”

दाविदाचा वारस

उत्पत्ती ३:१५ नंतर देवाचे लोक सर्पाचे राज्य उलथून टाकणाऱ्या पुत्राची वाट पाहत होते. काळानुसार ही आशा अधिक स्पष्ट होऊ लागली: तो फक्त नोहापासून नव्हे तर शेम याच्या वंशातून येणार होता. फक्त शेमाच्याच नव्हे तर अब्राहामाच्या वंशातून; फक्त अब्राहामाच्याच नव्हे तर याकोबाच्या, फक्त  याकोबाच्या नव्हे तर यहूदाच्या, फक्त यहूदाच्या नव्हे तर दाविदाच्या. हे अभिवचन २ शमुवेल ७ मध्ये शिखराला पोचते जेव्हा देव दाविदाशी करार करतो:

“तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन”
(२ शमुवेल ७:१२,१३)

या अभिवचनाच्या महान कक्षा लक्षात घ्या: दाविदाच्या मृत्यूनंतर देव दाविदाच्या एका पुत्राला उभे करील जो देवाच्या नावाने त्याचे घर बांधील. देव या पुत्राचे राज्य स्थापन करील. आणि ह्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.

सर्व जुन्या करारामध्ये हे अभिवचन आकाशातील सर्वात प्रकाशमान तार्‍याप्रमाणे चमकत राहते. इतर कोणताही प्रकाश काळवंडून जाईल. इतर कोणताही तारा निखळून पडेल. या अभिवचनाच्या प्रकाशाचा कधीही अंत होणार नाही.

इशायाचा बुंधा

प्रथमदर्शनी हे अभिवचन शलमोनामध्ये पूर्ण झाले असे भासते. दाविदाचा पुत्र आणि देवाचे मंदिर बांधणारा – पण शलमोन आपल्या बापाच्या पापापेक्षा अधिक काळ्याकुट्ट पापामध्ये घसरत गेला तोपर्यंतच ( १ राजे ११:१-८). भौतिक घरापेक्षा आणखी कशाची तरी आणि शलमोनापेक्षा आणखी कोणीतरी महान असण्याची गरज होती (मत्तय १२:४२).

कित्येक पिढ्या आल्या आणि गेल्या. दाविदाच्या पुत्रांनी राज्य केले आणि दाविदाचे पुत्र मरण पावले. त्यातील कित्येकांनी काही काळ आपल्या खांद्यावर सत्ता घेतली असे दिसले (यशया ९:६). यहोशाफाट, अजऱ्या, योवाश. पण तेही त्यांच्या राजासनावरून खाली पडले. आणि प्रत्येक पतन हे दाविदाच्या वृक्षावर कुऱ्हाडीने घाव घालत  गेले. जेव्हा बाबिलोनने शेवटचा घाव घातला तेव्हा केवळ एक बुडखा राहिला होता (यशया ६:१३; ११:१).

यहूदी लोक पाहत असताना नबुखद्नेसर राजाने दाविदाच्या वारसाला बेड्या घातल्या (२ राजे २४:११-१३). पुरातन राजासन देवाने धिक्कारले आहे असे भासत होते. तो तारा रात्रीसारखा अंधारा झाला होता. स्तोत्रकर्ता एथान याने अनेकांचे मनोगत प्रगट केले; “तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास. तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस” (स्तोत्र ८९:३८-३९).

याला देवाने धीराने एकेका संदेष्ट्याद्वारे उत्तर दिले, “ मी तुम्हांला सोडलेले नाही.” दाविदाचा वंश नष्ट होण्यापेक्षा सूर्याचे आकाशातून पतन होणे सोपे आहे (यिर्मया ३३;१९-२२). “दाविदाचे पडलेले शहर मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन” (आमोस ९:११,१२). “इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल” (यशया ११:१).

बंदीवासातही दाविदाची वंशावळ अबाधित राहिली. आणि देव म्हणाला की त्याच वंशामध्ये, “आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील” (यशया ९:६).

महान दाविदाचा त्याहून महान पुत्र

मग आपल्याला समजते की मत्तय आपल्या शुभवर्तमानाची एका वंशावळीने का सुरवात करतो आणि या वंशावळीचा शेवट एका वैभवी शाखेत कसा करतो (यिर्मया २३:५,६). येशूमध्ये दाविदाचा पुत्र आला होता – आणि त्यासोबतच दाविदाचा प्रभूसुद्धा.

परूश्यांबरोबर झालेल्या प्रसिद्ध वादामध्ये येशूने एक आश्चर्य उकलून दाखवले .

“ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार”(मत्तय २२:४२-४५)?

आणि त्या यरुशलेमेच्या रस्त्यावर त्या समर्थ देवापुढे – दाविदाचा पुत्र आणि प्रभूपुढे – सर्वजण निशब्द झाले (मत्तय २२:४६).

दाविदाचा पुत्र हा दाविदापेक्षा महान असण्याचीच आपल्याला नेहमी गरज होती. जो तेलाने नव्हे तर पवित्र आत्म्याने अभिषिक्त असणार होता (यशया ६१:१; लूक ३:२१-२२). जो गल्ल्याथाला नव्हे तर मरणाला ठार करणार होता (रोम १:३-४). जो आपली वधू दुसर्‍याचे रक्त पाडून नव्हे तर स्वत:चे रक्त पाडून जिंकणार होता (इफिस ५:२५-२७). ज्याचा अंत कबरेमध्ये नव्हे तर राजासनामध्ये होणार होता (प्रेषित २:२९-३६). आणि असाच राजा आपल्याला ख्रिस्तामध्ये आहे.

ये आणि राज्य कर

आपल्या वैभवी प्रभूच्या अनेक गौरवी शिर्षकांमध्ये आपण त्याला दाविदाचा पुत्र म्हणून त्याची आठवण करावी अशीच येशूची इच्छा असेल. बायबलमध्ये ज्या शेवटच्या शब्दांची नोंद आहे ते असे आहेत:  “मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे… होय, मी लवकर येतो” ( प्रकटी. २२:१६,२०).

जेव्हा आपण “आमेन. ये, प्रभू येशू, ये” ( प्रकटी २२:२०) असे म्हणतो, तेव्हा आपण केवळ एका तारणार्‍याचीच  नाही तर एक राजाची विचारणा करतो. किंवा दाविदाच्या पुत्राभोवती असलेली बायबलमधील सर्व आशा आपण गोळा करतो आणि म्हणतो, ‘ये आणि राज्य कर.’

“सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल” (२ शमुवेल २३:४). 

 “समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुझी सत्ता राहो” (स्तोत्र ७२:८).

 लांडगा व कोकरू, वासरू आणि सिंह यांना एकत्र आण आणि तुझ्या पवित्र पर्वतावर छोटी बालके सुरक्षितपणे खेळू दे (यशया११:६-९).

आमचे भटकणे थांबव, आमच्या आंतरिक बंडावर राज्य कर आणि आमची दु:खित ह्रदये बरी कर (होशेय३:३; यहेज्केल ३४:२०-२४).

आमच्या वैर्‍यांना लज्जेने वेष्टित कर आणि तुझा झळकता मुगुट धारण कर (स्तोत्र १३२:१७,१८).

होय. इशायाच्या मूळा, दाविदाच्या पुत्रा ये आणि राज्य कर.

Previous Article

आपल्याला  टाकून दिलंय असं तुम्हाला वाटतं का?

Next Article

त्याचे भग्न झालेले शरीर उठले

You might be interested in …

सर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात

लेखक – जॉन पायपर प्रभू उठला आहे! आणि त्या एका घटनेद्वारे अमर्याद आशीर्वादांची रेलचेल आपल्यापर्यंत आली आहे. संबंध विश्वाने त्याला होय म्हटले! देवपित्यानेही. कारण ह्या कृत्याद्वारे जे व्हायला पाहिजे होते ते सर्व केले गेले. तसेच […]

तुमचे भटकणारे अंत:करण उपकारस्तुतीने भरून टाका

जॉन ब्लूम वासनेपेक्षा समर्थ काय हे ठाऊक आहे? उपकारस्तुती. हे स्पष्ट करण्यापूर्वी मला त्याचे उदाहरण देऊ द्या. जेव्हा पोटीफराच्या बायकोने योसेफाला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कृतीला तो का बळी पडला नाही? तो स्पष्ट […]

ख्रिस्तजन्म आणि घरी असण्याची आपली ओढ

गेरीट डॉसन स्कॉटलंडचा एक तरुण किनाऱ्यावर असलेले आपले घर सोडून समुद्रावरच्या सफरीला गेला. कुटुंबातील लोकांना  काहीही न सागता तो अचानक निघाला. सफरीच्या  त्याच्या ओढीने आपल्या आईवडिलांना आपले अचानक जाणे कसे वाटेल याचा विचारही त्याच्या मनाला […]