अप्रैल 4, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ईयोबाच्या शरीरावर हल्ला

 सॅमी विल्यम्स

धडा ५ वा                                      

ईयोब २:१-१३ –  दुसरी कसोटी                                                                        

पहिल्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत एका दिवसात सर्व साधनसंपत्ती गमावून बसण्याचा अनुभव ईयोबाने घेतला. आता या दुसऱ्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत आपली देवाशी अघिक घनिष्ठ ओळख होईल. आपल्याला समजेल की “देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात” (रोम ८:२८). हे वचन आशीर्वादाविषयी नाही. कसोट्यांवर आहे. कसोट्यांद्वारे चार सत्ये प्रगट होतात. ईयोब या कसोटीत उत्तीर्ण झाला का? आपण त्यातून काय  शिकतो ते पाहू. आपले समर्पित हृदय देव पाहतो. आपण बाह्यदृष्ट्या त्याची सेवा करायची नसून मनापासून त्याच्यावर प्रीती करायची आहे. देव आपल्याला संकटातून नेतो म्हणजे तो क्रूर आहे असे नाही. तर तो या कृतीने आपल्याला सामर्थ्यशाली बनवतो. आपले समर्पण तो संकटाच्या भट्टीतून गाळून शुद्ध  करतो.

वचन २:१ – का बरे सैतान परत स्वर्गात आला? यहोवासमोर सादर व्हायला. देवासमोर तो एकटा नाही, ती देव मुख्याधिकारी असलेली, स्वर्गीय संसदेची, उच्च न्यायसभा, विश्वसभा आहे, त्यात देवदूतही आहेत. या खास सभेत सैतानाला उभे राहून उत्तर द्यायला पाचारण करण्यात आले आहे.                    

वचन २:२- कोणत्या विशिष्ट स्थळातून सैतान येत आहे याची देव विचारणा करतो, तेव्हा सैतान बोलू लागतो. सर्वज्ञ देवाला ती जागा माहीत आहे. पण  देव त्याच्या तोंडून वदवून घेत आहे. देव त्याला आव्हान देत आहे, तो ईयोबाला त्याच्या संसारात सतावत आहे. पण कोण जिंकलंय ते देव त्याच्या निदर्शनास आणून देउन त्याला लज्जित करीत आहे. सर्व दरबारात पराभवाची कबुली द्यावी लागेल म्हणून सैतान सरळ उत्तर देत नाही. त्याच्या सहकाऱ्यांसमोर तो उघडा पडला आहे.                  

पहिले वास्तव – देवाला आपल्याकडून समर्पित निष्ठेची अपेक्षा आहे.                                                  

वचन २:३- पहिल्या अध्यायातील देवाने ईयोबाविषयी दिलेली ती चार विशेष गुणांची साक्ष अजूनही तीच आहे, सर्व गमावल्यानंतरही बदललेली नाही.                                                 

अ- ईयोब निर्घृण छळ होऊनही सात्विक, प्रामाणिक, नीतिमत्त्वाला धरून आहे. पौल, पेत्र त्यांचे सोबती हे सुद्धा तुरुंगात घायाळ अवस्थेत असतानाही स्तुतिगीत गात असत.

ब- “त्याचा नाश करण्यास तू विनाकारण मला चिथावलेस.” देवाच्या विचारण्यातच उत्तर आहे. ती उत्तरे सूचित करतात की सैतानाने जे काही केले ते सारे व्यर्थ आहे. ईयोबाला गिळावे हा सैतानाचा हेतू आहे. आपल्यासाठीही हेच सैतान करू पाहतो. आपण ईयोबाप्रमाणे लढायचे आणि प्रभूला म्हणायचे, मी तुझ्याकडे येतो कारण या गिळण्यापासून तूच मला वाचवणारा आहेस. सैतान देवाला आपल्याविषयी म्हणतो, “ते तुला सोडतील.” देव दाखवून देतो, तू हरला आहेस. ईयोब जसा सत्त्वाला धरून राहिला तसे आपण आपल्या हातातील सारे काही हिरावून गेले तरी कणखर ख्रिस्ती म्हणून सैतानाविरुद्ध विश्वासात दृढ उभे राहायचे आहे. १ पेत्र ५:९.                                                                  

दुसरे वास्तव – देव सैतानाला विश्वासीयाला संकटात पाडायची परवानगी देतो. २:४-६                                            

सैतान देवाच्या नियंत्रणात आहे. येथे बोलण्यात सैतानाचा पुढाकार नव्हता हे आपण पाहिले. देव त्याचा वापर करतो व संकटातून जाताना आपल्याला सांभाळतो देखील. आता सैतान देवाला प्रत्युत्तर देताना ‘त्वचेसाठी त्वचा’ ही कसोटी घ्यायचे कपटीपणे सूचित करतो. त्याच्या शरीराला स्पर्श केला, अधिक तीव्र हल्ला केला की तो नक्की पडेल कारण ख्रिस्ती व्यक्तीच्या प्राणाची कसोटी घेतली की त्याचा विश्वास टिकणार नाही असे त्याला वाटते. तर देव शिकवतो की ख्रिस्ती व्यक्तीचा छळ केला तर ती अधिक सामर्थ्यशाली होईल.                                                                       

सैतान असा वाद का घालतो? यातून तो खरे विश्वासी व खोटे विश्वासी यातील भेद दाखवून देऊ इच्छितो. स्वत:ला छळाच्या झळा बसल्या की विश्वासी व्यक्तीही देवाला सोडेल असे त्याला वाटते. याही कसोटीत ईयोब पतन पावला नसल्याने सैतान हरला. त्यामुळे यानंतर या पुस्तकात सैतान पुढे कोठेच दिसत नाही. त्याच्या विरुद्ध आडवे उभे राहायचे म्हणजे तो असा पळून जाईल; याकोब ४:७.                 

वचन २:५- हे तर तो देवालाच करायला सांगतो. ‘त्याच्या हाडामांसाला हात लावून पहा’ म्हणजे प्रहार कर, असा की त्याचे शरीर आतून बाहेरून चांगलेच घायाळ होईल. त्याचा आरोप आहे की ‘मग इयोब देवाच्या तोंडावर त्याचा अव्हेर करील.’                                                                       

वचन ६- देव सैतानाला शारीरिक इजा करायला परवानगी देतो पण त्याची प्राणहानी, नाश करू नये अशी अट घालतो. देवच जीवन आहे. देव सैतानाला आज्ञा देतो. आणि सैतानाला आपल्या हातातील हत्यार असे वापरतो.                                                                               

तिसरे वास्तव – देव त्याच्या गौरवासाठी संकटाची परवानगी देतो.

 वचन २:७-८ नखशिकांत गळव्यांनी पिडून हाडापर्यंत जातील अशा वेदना सैतान ईयोबाला देतो. त्याला पाहून कोणीही म्हणेल की याला देवाने शाप दिला आहे असा भयानक त्वचारोग त्याला झाला. ईयोब ७:५; ३०:१७ मध्ये त्याच्या वेदना वाचा. हाडे गळतात, देह किड्यांनी, मातीच्या ढेकळांनी भरलाय. कुरतडणाऱ्या वेदना होतात. सैतान रोग पाठवू शकतो का? नाही. कधीतरी देवाच्या परवानगीने. देवाच्या परवानगीशिवाय तो काहीच करू शकत नाही. तो आजवरची पिढ्यानपिढ्यांची मानवजात ओळखतो, मरणावर कोणाची सत्ता आहे? फक्त देवाची रोगांवर व मरणावर सत्ता आहे. प्रकटी १:१७-१८. त्याच्याशी आपण बोलायचे. येथे ईयोब सर्व गमावल्यावर या तीव्र यातनेत असतानाही धूळ व राखेत बसून पश्चातापाची कृती व्यक्त करून देवाच्या अधिक जवळ जात आहे. देवाला दोष देत नाही की अपशब्द वापरत नाही. येथेच सैतान हरलाय व देवाचे गौरव झाले आहे.            

चौथे वास्तव – देव विश्वासीयाचे चारित्र्य घडवायला व त्याच्या प्रतिमेचे बनवायला संकटे पाठवतो.

वचने ८-१० ईयोब, पेत्र, यांना पिडण्याची देव सैतानाला का परवानगी देतो? देवाच्या गौरवासाठी. हे माझ्या सुखापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. देव यासाठी ईयोबाचे सर्वस्व हिरावून घेतो की सैतानाला हे समजावे की मी या लोकांना काही करू शकत नाही. आणि आम्हाला समजावे की, “देवा, स्वर्गात मला तुझ्याशिवाय कोण आहे? आणि पृथ्वीवर तुझ्याशिवाय मला कोणी प्रिय नाही” (स्तोत्र ७३:२५). देव आपल्यात धीर व सहनशीलता बाणायला सैतानाच्या नव्हे तर त्याच्या स्वत:च्या अधिपत्याखाली संकटे येऊ देतो यासाठी की आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेचे होत जावे. सैतान हा निर्मिती आहे, तो सर्वसामर्थ्यशाली नाही; वचन २:८. ईयोब खापरीने अंग खाजवत राखेत बसला आहे. कचऱ्यात फेकायच्या वस्तूचा वापर करतोय. कचरा जाळायच्या जागी ही श्रीमंत व्यक्ती बसली आहे. अशी गेहेना नावाची खास जागा यरुशलेमात होती. अशा जागी एके काळी ईयोब बसला होता. येथे तो का बसला आहे? यावरून त्याच्या मनावर झालेला परिणाम लक्षात येतो. देवाशी तो भांडून वादही घालत नाहीये. तो नम्रता धारण करत आहे. पूर्वी धूळ व राखेत बसून लोक पश्चाताप व्यक्त करीत असत.                                                    

वचन २:९- इयोबाची पत्नी

१- सैतानाप्रमाणे देवाचा अव्हेर करण्याचे शब्द ती वापरते (१:११; २:५). सैतानाचे भाव प्रगट करते. ती नीतिमान संबोधण्याच्या पात्रतेची नाही. ही मदतनीस पतीला काहीही आत्मिक साथ देणारी नाही. ती भरभराटीच्या सुवार्तेची री ओढत म्हणते की, देवाच्या एवढे निकट राहूनही त्याने तुला काय दिले?  तुम्हाला जास्त दु:ख सहन करावे लागते हाच मुद्दा भरभराटीच्या सुवार्तेचा असतो. आशीर्वादाऐवजी मला शाप का? अशा प्रश्नांना आपण काय उत्तर देऊ शकतो? लूक ९:२५ नुसार उत्तर हेच की, मनुष्याने सर्व जग मिळवले पण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय लाभ?

२- ती देवाच्या चारित्र्यावर हल्ला करते. कठीण समयी देव आपल्यावर प्रीती करत नाही असे तिला म्हणायचेय.    

देव पिडीत व्यक्तीला त्याच्या प्रतिमेचे बनवत त्याचे चारित्र्य घडवतो.                         

वचन १०- पत्नीच्या आत्मिक दुर्बलतेत ईयोब स्वत: अत्यंत यातनेत असताना बोध करून तिला मदत करतो. मसलत देताना आपण प्रेमाने असा बोध करायला शिकावे. तिनेही त्याला योग्य प्रतिसाद दिला असणार, म्हणून ४२ व्या अध्यायात तिलाही आशीर्वादच मिळालेले आढळते. तो तिला सांगतो, देव प्रेमळ आहे. मानवी दृष्टीने तू विचार करू नकोस तर देवकेंद्रित विचार कर. आपण काय देवाकडून सुख, दानेच घ्यावीत दु:ख घेऊ नयेत काय? देव अधर्म करतो का? नाही. पण दु:खे, संकटे आपत्ती, ही सुद्धा देवाची आत्मिक दानेच आहेत. आपत्ती आल्या तरी देवाचे बरोबरच असते. तो चुकत नसतो. तो आपल्यावर प्रीती करतो, म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे जे योग्य ते आपल्या जीवनात करण्याचा त्याला अधिकार आहे. जरी आपल्याला जे काही चाललेय त्याची कारणे माहीत झाली नसली तरी विश्वास धरायलाही तोच आपल्याला साह्य करतो. आणि कठीण प्रसंगीही आपण मोठ्याने स्तुतिगीत गाऊ शकतो. ईयोब किती आपल्याला शिकवतो. तो कसोटीस उतरला का? होय. वचनच सांगते, या सर्व प्रसंगी त्याने आपल्या मुखाने पाप केले नाही. आपण सैतानाला प्रतिकार कसा करू शकतो? वचनाचे नित्य मनन करण्याने व आपला देवावर अढळ विश्वास ठेवण्याने. जॉन बनियन १२ वर्षे तुरुंगात होता, तिथे त्याने ‘यात्रेकरूचा प्रवास’ हे पुस्तक लिहिले. सैतानाविरूध्द आडवे व्हा आणि विश्वासात अढळ रहा. अदृश्य देवाकडे लक्ष लावा. तो तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल.                                                                     

वचन ११-१३  आता ईयोबाच्या मित्रांचा प्रवेश होतो. विश्वासात दृढ व्हायला देव संकटाना परवानगी देतो. आणि संकटात खरे व खोटे मित्र उघड होतात. हे तीन मित्र ईयोबाला काही उपयोगाचे होत नाहीत. ते त्याला दोषी ठरवतात. अलीहू चांगला समुपदेशक असल्याने यांच्या यादीत तो दिसत नाही. अलीहू ईयोबाच्या प्रांतातलाच होता. ईयोब खूप नावाजलेला असल्याने, दुरून त्याला भेटायला आलेली ही उच्च व महत्त्वाची माणसे होती.

१- अलीफाज तेमानी हा इदुमच्या महत्त्वाच्या तेमानातील होता.

२- बिल्दद शूही अब्राहामाची पत्नी कटूरेपासूनच्या घराण्यातला होता.

३- सोफर नामाथी हा कनानाच्या घराण्यातला होता. नामा ही लामेखाची मुलगी होती.                                                                   

त्यांच्या भेटीचा उद्देश – ईयोबाचे सांत्वन करायचे होते. त्यांनी नियोजित भेटीसाठी वेळ मागून घेतली होती. त्याला बोध करायला ते आले होते, पण ते त्याची कानउघाडणीच करतात.                            

वचन १२-१३ – त्यांचे प्रतिसाद:

१- दुरून पाहतात. त्याला ओळखत नाहीत. पूर्वी तो मान्यवर मोलाचा होता. २- मोठ्याने रडतात. ३- शोकाचे चिन्ह म्हणून झगा फाडतात. धूळ उडवतात, डोक्यात धूळ घालतात. त्यांच्या मते ईयोब मेल्यात जमा आहे. शापित आहे. त्याची कारणे शोधायला आलेत. ४- काही न बोलता आठवडाभर जमिनीवर बसले. ती सहानुभूतीची शांतता नाही, तर त्यांना काय बोलावे तेच कळत नाही. ईयोब कसोटी जिंकलाय, पण त्यातून त्याची सुटका झालेली नाही.                                                

येशूही वधस्तंभाच्या वाटेवर एकटाच होता. पित्यानेही सोडले होते. तरी तो खात्रीपूर्वक म्हणतो, ‘तुम्ही मला एकटे सोडले तरी मी एकटा  नाही. पिता माझ्याबरोबर आहे,’ योहान १६:३२. त्र्येकत्वातील प्रत्येकाला पाराक्लेत म्हणजे सांत्वनदाता/कैवारी म्हटले आहे. त्यामुळे त्र्येक देव सांत्वनदाता आहे. दु:खाशी झुंजत असताना आपल्यासाठी ही मोठी जमेची, आशेची बाजू आहे.          

Previous Article

त्याचे भग्न झालेले शरीर उठले

Next Article

पवित्रस्थानातील पडदा

You might be interested in …

तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व 

जोनाथन वूडयार्ड                              मी एक गर्विष्ठ माणूस आहे. खरंच. या विभागातला मी एक प्रमुख तज्ज्ञ आहे. मी ढोंग करत नाहीये. मला प्रामाणिक आणि नितळ व्हायचे आहे. गर्वामुळे येणाऱ्या समस्या मी प्रत्यक्ष  अनुभवल्या आहेत. मी […]

“मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो”

मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.                                                       योहान १४:२७ लेखक: ऑस्वल्ड चेंबर्स आपल्या वैयक्तिक जीवनात काही  समस्या […]

उगम शोधताना नील अॅन्डरसन व हयात मूर

  एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  लेखक :  नील अॅन्डरसन व हयात मूर    […]