स्कॉट हबर्ड
“हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस” (स्तोत्र ८:१).
ते मुलांनाच सहन करू शकत नव्हते.
त्यांनी झावळ्या आणि समुदायाची प्रशंसा चालवून घेतली. जेव्हा क्रय-विक्रय करणारे मंदिरातून आपले आपले चौरंग ओढून बाहेर नेत होते तेव्हा ते स्तब्ध झाले. जेव्हा शहरातले आंधळे आणि पांगळे बाहेरच्या अंगणात त्याच्याकडे बरे होण्यासाठी आले तेव्हा त्यांनी ते कसेबसे चालवून घेतले. पण त्यांनी जेव्हा उच्च स्वरातील होसान्नाचे पडसाद सर्व यरुशलेमभर ऐकले “तेव्हा मुख्य याजक व शास्त्री रागावले” (मत्तय २१:१५). किंवा ते अत्यंत चिडले. “स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे” (मत्तय १९:१३-१४), पण इस्राएलचे हे उच्चभ्रू लोक त्यांनी राजाला गायलेली गीते सहन करू शकले नाहीत. म्हणून एखादा गायनवृंद गात असताना एखादा म्हातारा मध्येच ओरडतो तसे ते येशूला विचारू लागले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय” ( मत्तय २१:१६)? आता त्याचा प्रतिसाद काय असणार याची कल्पना त्यांना होती कारण मत्तयाच्या शुभवर्तमानात (मत्तय १२:३,५, १९:४) येशू या शास्त्र पंडितांना विचारतो, त्यांनी त्यांचे शास्त्रलेख वाचले आहेत का? ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे,’ हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय” (मत्तय २१:१६; स्तोत्र ८:२)?
राज्यासाठी खूपच वृद्ध
हे तुम्ही कधीच वाचले नाही? शास्त्री व याजक यांनी स्तोत्र ८ वाचून आणखी बरेच काही केले होते. त्यांनी त्याच्या प्रती हाताने लिहिल्या, पाठ केले, शिकवले. पण इतका त्याच्याशी परिचय असूनही ते असे वागत होते की, ह्या स्तोत्रातील शब्द एक अपरिचित भाषा आहे. त्यांनी काय गमावले होते?
येशूने उल्लेख केलेल्या इतर स्तोत्रांपेक्षा स्तोत्र ८ हे जरा निराळे आहे. त्याच्यामध्ये कोणत्याच सावल्या नाहीत. दावीद त्याच्या इतर स्तोत्रांमध्ये आपल्याला विजय, निर्गमन आणि प्रलय, अजून मागे जाऊन करूबाची तळपती तलवार, एदेनचा हरवलेला प्रदेश येथवर मागे घेऊन जातो. येथे स्तोत्र ८ मध्ये अंधार नसलेले जग आहे, देवाचे गौरव उंच आकाशात वसले आहे (८:१), ते त्याच्या लोकांवर मुगुटासारखे विसावले आहे (८:५). आणि जेथे ते जातात तेथे त्याची प्रतिमा धारण करून असतात (स्तोत्र ८:१,९). विश्वाच्या प्रमाणात केवळ धुळीच्या कणासारखे असलेले स्त्री पुरुष येथे राजाचे लोक म्हणून वावरत आहेत (स्तोत्र ८: ३-६). देवाचे नाव एदेनेपासून घेऊन ते जगाच्या अंतापर्यंत नेतात (स्तोत्र ८:६-९).
परंतु एदेनमध्ये असलेल्या सापाप्रमाणे येथेही विरोधी, वैरी, सूड घेणारे, झुडुपांमागे दडलेले आहेत (स्तोत्र ८:२). ते देवाच्या नामाशी, त्याच्या लोकांशी युद्ध करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून देव त्याची सर्वोत्तम सेना, अशी सेना पाठवतो की जिने दाविदाच्या शक्तिमान लढवय्यापेक्षा अधिक सैन्याला काबीज केले आहे: “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे, वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस” (स्तोत्र ८:२).
ही कोण मुले आहेत जी त्यांच्या मुखाने युद्ध करतात? बहुतेक ती अक्षरश: नवजात बालके नाहीत पण देवाने त्यांना जसे बनवले तसे ते मानव आहेत: मर्यादित, गरजू आणि स्तुतीने भरलेली. जरी जगाच्या दृष्टीने ती केवळ बालके आहेत तरी ती सैतानांचा पराजय करतात आणि गीत गाऊन बंड करतात. “हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस” (स्तोत्र ८:१). ही बालके आहेत ज्यांचा उपयोग देव जगावर विजय मिळवण्यासाठी करतो.
तथापि मुख्य याजक व शास्त्री यांनीही त्याच आकाशाकडे पाहिले पण त्यांना गीत गाण्याच्या लायकीचे कोणतेच गौरव दिसले नाही. आणि आताही त्यांच्यापुढे स्वर्गीय गौरव, मानव म्हणून त्यांच्या पुढे उभे राहिले तरी त्या बालकांच्या गीतामध्ये होसान्नाची भर घालण्यास त्यांनी नाकारले. स्वयंपूर्ण आणि सन्मान्य प्रौढपणाने कठीण झाल्याने ते या राज्यासाठी खूपच वृद्ध झाले आहेत.
मुलांना येऊ द्या
या मुलांमध्ये असे काय आहे की देव त्यांना निवड करून आपले सैनिक बनवतो? स्तोत्र ८ ने आपल्याला याचे उत्तर दिले आहे. ज्या देवाने आपल्या बोटाने आकाशगंगा तयार केल्या त्याला जगातील समर्थ लोकांच्या मदतीची गरज नाही (स्तोत्र ८:३). जे त्याच्या सामर्थ्यात आनंद मानतात आणि स्वयंपूर्णता सैतानाकडे सोडून देतात त्यांच्यामध्ये तो आनंद करतो.
बालके ही अक्षरश: व अलंकारिक रीतीने सुद्धा शुभवर्तमानात येशूची आवडती आहेत. ती खऱ्या महानतेचा आदर्श आहेत (मत्तय १८:१-४). त्यांची स्वर्गीय पित्याशी खूप जवळीक आहे (मत्तय ११:२५). स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे (मत्तय १९:१३-१४).
मुलांसाठी असलेली येशूची खास आवड ही स्पष्टपणे मत्तय ११: २५-२६ मध्ये दिसून येते: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.”
जगाच्या दृष्टीने शहाणे समजणाऱ्या लोकांप्रमाणे मुले असा दावा करत नाहीत नाहीत की आम्हांला समंजसपणा, सामर्थ्य आणि प्रभावाने देवाचे राज्य मिळाले आहे; कारण त्यांच्याकडे यातील काहीच नाही. जो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू आहे त्याच्यावरच केवळ त्यांची आशा आहे. तो जगातील कमकुवत अशा पात्रांद्वारे स्वत:चे नाम गाजवण्यात आनंद मानतो. कारण असे लिहिले आहे की “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ( १ करिंथ १:३१).
येशू या जगाच्या गर्विष्ठ लोकांना ‘त्यांना या राज्यात प्रवेश करण्यास आवडेल का’ असे विचारून त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास आला नाही. तो त्यांना गोंधळात टाकायला आला. तो त्यांना लज्जित करायला आला. आणि तो जे जखमी आणि अशक्त, गरीब आणि गरजू, सर्व असहाय आणि टाकलेले त्यांना गोळा करायला आला. ज्यांना आपल्या स्वत:च्या महत्त्वापासून फिरून पश्चात्ताप करण्याची इच्छा आहे ते या मुलांसोबत गातील की, होसान्ना ! मला वाचव.
स्तुती जगाला जिंकणार आहे
यरुशलेमच्या मुलांना सामील होऊन, देव दुर्बलतेचा गौरवासाठी कसा उपयोग करतो हे पाहात नवल करण्यासाठी हा पवित्र आठवडा आपल्याला आमंत्रण करीत आहे.
पवित्र आठवडा हाच, दुर्बलपणा सामर्थ्याला कसा मारतो या कथेचा कळस आहे. बालक असताना येशूने राजाला गोंधळात पाडले आणि सर्पाच्या तोंडातून आपली सुटका केली (मत्तय २:१३-१८). सेवा करताना येशू आंधळे, पांगळे, बहिरे , कुष्टरोगी, गलीच्छ यांच्यामध्ये मिसळला (मत्तय ८:१-१७). आणि जेव्हा त्याची घटका अखेरीस आली तेव्हा त्याने स्वत:ला वैरी, शत्रू, सूड घेणाऱ्यांच्या हातात सोपवले आणि दुर्बल असा वधस्तंभावर मारला गेला (२ करिंथ १३:४).
या जगाच्या अधिपतींना आपण काय करतो हे समजले असते तर “त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते” ( १ करिंथ २:८). दुर्बलतेतून येशूने जगिक सामर्थ्याला त्याच्या आसनावरून खाली ओढून आणले. त्याने त्या श्वापदाला ठार मारले. जे पाप आपला नाश करते त्याला त्याने त्याच्या रक्तात बुडवून टाकले. आणि जेव्हा दुर्बलता त्याला पुरण्यास पाहत होती तेव्हा तो अविनाशी जीवनात सामर्थ्याने पुन्हा उठला.
अशा रीतीने देव आपले तारण करतो. आणि अशा रीतीने आपण जग जिंकण्यासाठी पुढे जातो. आपल्या हातात तलवार घेऊन नाही तर आपल्या मुखात गीत घेऊन. आणि आपण प्रत्येकाला आमंत्रण देतो की, आपली स्वत:ची सगळी किंमत, मी पुरेसा आहे हा मंत्र, आपल्या सौंदर्याची, सामर्थ्याची प्रत्येक प्रतिमा बाजूला ठेवा आणि ख्रिस्त राजाची उपासना करत या मुलांच्या राज्यात सामील व्हा.
Social