सॅमी विल्यम्स
धडा ६ वा
ईयोब ३:१-१०
आपण काव्यात्मक लिखाणाचा अभ्यास करत आहोत – ईयोबाच्या सुखी जीवनाला कशी कलाटणी मिळाली याचे कथानक आपण १ व २ अध्यायात पहिले. तो अगदी एकटा पडला. भयानक शारीरिक यातनादायी पीडा आली, पत्नीही त्याला काही मदत करत नाही. त्याचे मित्र येतात. पण ते काही उत्तम समुपदेशक नाहीत. आता अध्याय ३ मध्ये तो दु:खाने आक्रोश करत आहे. पुष्कळदा अपेक्षा केली जाते की, ख्रिस्ती विश्वासी म्हटले की त्याचे जीवन सुखासमाधानाचे व विजयाचे असते. त्याच्यावर सतत संकटांचा मारा होत नसतो. पण मंडळीच्या इतिहासातील महान विश्वासवीर खूप क्लेशातून गेलेले आढळतात. ईयोब या कसोटीतून जात असता हे माझ्यावर का आले आहे, असा प्रश्न करतो. आपण देवाला प्रश्न करू शकतो. पण या सर्व प्रसंगी तो देवाविरुद्ध चुकीचे काहीच बोलत नाही. देव स्वत:च ही साक्ष देतो. ईयोब ४२:७. पण ईयोबाने चूक काहीच केले नाही का? केले. त्याने देवाच्या योजनेबद्दल भरपूर प्रश्न केले. देवाने असे का केले असेही म्हटले. पण देवाला शिव्याशाप, दोषारोप दिले नाही. शारीरिक यातनांचा जो अनुभव तो घेत आहे त्याचा त्याच्या आंतरिक आत्मिक जीवनावर परिणाम झाला आहे. चांगले बोलावे असे त्याच्याजवळ काहीच उरलेले नाही. तो प्रामाणिकपणे आपले भाव व्यक्त करत आहे. पण तो जितका पिळला जातो तितका सुवार्तेचा रस त्यातून ओघळताना दिसतो. संकटांमध्येच आपली सुवार्ता खरी असल्याचे सिद्ध होते. सुवार्तेत काही आशा आहे का तेच आपण पाहाणार आहोत.
आपल्या यातनांमध्ये दोन प्रकारचे आक्रोश ईयोब देवासमोर घेऊन येतो.
अ- पहिला आक्रोश वचने १-१९ मध्ये आहे यामागे देवाचा काही हेतू नाही का?
ब- दुसरा आक्रोश वचने २०-२६ मध्ये आहे. त्याला देव जिवंत का राहू देतोय? यातून आपण सुवार्तेची झलक पहातो.
वचने १-१० सर्व तरुणांनी प्रश्न विचारायला हवा, माझ्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे?
वचन ३:१- ईयोब काय शाप देतो? पहिला प्रश्न विचारतो, मला जन्माला का येऊ दिलेस? म्हणत तो आपल्या जन्मदिवसाला शाप देतो. देवाला नव्हे. शाप याचा अर्थ ‘कवडीमोलाचा’ किंवा क्षुल्लक. तिरस्करणीय. तो आपल्या अस्तित्वाचाच तिरस्कार करतो. त्याच्या त्वचेचे जैविक स्वरूप अगदी तुच्छवत, तिरस्करणीय किंवा शापित होत चालले आहे.
वचन ३:२- ईयोब कोणाला ‘उत्तर देत’ आहे? म्हणाला नव्हे, उत्तर दिले असे पंडिता रमाबाई भाषांतरात आहे. म्हणजे देव त्याच्या जीवनात कार्यरत आहे, आणि प्रथमच ईयोब देवाला उत्तर देत आहे. तो देवाला प्रतिसाद देत आहे. विश्वासीयाने आपल्या दु:ख व क्लेशातून जातानाही देवाला प्रतिसाद द्यायला हवा. देवाला काय कर हे सांगत नाहीये. आपली हीच मनोवृत्ती असावी. ही संपूर्ण त्याची प्रार्थना आहे.
वचन ३:३- तो दिवस व रात्रीची तुलना करतो. आपल्या जन्माला दोन बाजू आहेत, रात्र आणि दिवस असे तो म्हणतो. रात्री ‘पुरुषसंतानाची गर्भधारणा’ झाली त्यासाठी मूळ हिब्रू भाषेत ‘बलवान पुरुष’ असा शब्द वापरला आहे. म्हणजे हे ईश्वरी तत्त्व तो मांडत आहे की, गर्भधारणेच्या वेळीच देव तेथे एक बालक नव्हे तर त्या संपूर्ण बलवान व्यक्तीच्या जीवनाची योजनाच जन्माला घालत असतो. त्यामुळे गर्भधारणा होणे म्हणजे तेव्हा देवाची प्रतिमा व देवाचे उद्दिष्ट व्यक्ती म्हणून त्या गर्भाला दिले जाणे. हा निर्माणकर्ता देव तुमचे संपूर्ण भवितव्यच त्या वेळी गर्भधारीत करतो. म्हणून गर्भपात करणे हे घोर पातक आहे. तो खून तर आहेच. पण तुम्ही तो पुरुष किंवा स्त्रीच देवाच्या योजनेसह मोडीत काढता. आपण किंवा आपले लोक आपल्या जीवनाची आखणी करत नसतात तर आपल्या गर्भधारणेच्या वेळीच देवाने ती केलेली असते. ईयोब किती ज्ञानी आहे, तो मरणावस्थेत असतानाही आपला ईश्वरीज्ञानाचा अभ्यास घेत आहे. असे आपणही असावे.
वचन ३:४-५- ही वचने त्याच्या जन्माच्या दिवसाचे विवरण तर ६-१० ही वचने त्याच्या गर्भधारणेच्या रात्रीचे विवरण करतात. गर्भधारणेची क्रिया खाजगीत, गुप्ततेत होते. म्हणून येथे त्यासाठी रात्रीची उपमा वापरली आहे. पण जन्म झाल्याचे कोणी गुप्त राखत नाही म्हणून त्याला दिवसाची उपमा दिली आहे.
वचन ३:४- ‘अंधार’ ही उपमा’ आपत्तीसाठी’ वापरली आहे आणि ‘दिवस’ ही उपमा ‘चांगल्यासाठी’ वापरली आहे. ईयोब दिवसाचे अंधारात रूपांतर व्हावे असे मागतो. योहान १ मध्ये येशू जगाचा प्रकाश आहे आणि प्रकाश अंधारावर मात करतो. देवाने अंधार असताना प्रकाश केला पण ईयोबाचा दिवस आपत्ती, यातना, अपत्यहीन व एकटेपण, पीडा यांनी व्याप्त झालाय. जगण्यासाठी काही राहिले नाहीये. ईयोब अपेक्षा करतो की दिवस बनवणाऱ्या या निर्मात्याने आपली निर्मिती पालटावी व त्या दिवसाचा अंधार करावा. तू मला जन्मायची मुभा देण्याचा खूप चांगुलपणा केलास, तू फार काळजी घेणारा आहेस. पण दिवसाचे चांगुलपण काही घडलेच नाहीये. माझ्या जीवनाला काही उद्देशच नाही. दिवसाचा अंधार कसा करायचा? तो आत्महत्येचा विचार करत नाही, तर देवाला त्याचे अस्तित्व संपवायला सांगत आहे.
वचन ३:५- “अंधार व व मृत्युच्छाया ही त्यावर हक्क सांगोत” (पंडिता रमाबाई भाषांतर). २३ व्या स्तोत्रात हे शब्द आहेत. अंधकाराचे वर्णन करायला ईयोब दोन वर्णने देतो. ‘ढग, आणि दिवसाचा काळोख.’ जो वादळात, काही हवामानात किंवा सूर्यग्रहणाला पडतो; आमोस ५:८. मरणाच्या उपमा सावली, दाट काळोख, अंधार आहेत. ढगाळ दिवसामुळे निसर्गात येणारा हा अंधार नाही. तर हा दाट काळोख मरणाची सावली आहे. आपल्यासाठी मरण सावली आहे कारण येशूने मरणावर प्रहार केलाय. ईयोब देवाला इच्छा करतो की देवाने त्याची निर्मिती मालिका गुंडाळून अस्तित्वाच्या दिशेने चालवणारा भूतकाळच नष्ट करावा. वेदना पापाचा परिणाम आहे म्हणून यातनांविरुद्ध आक्रोश करा. देवावर प्रेम करा. यातनांवर नव्हे. मरण तर विश्वासीयांसाठी झोप आहे.
वचने ३:६-१०- ईयोब आपल्या गर्भधारणेच्या रात्रीविषयी अशीच इच्छा व्यक्त करतो.
वचन ३:६ मध्ये तो इच्छा करतो की दाट उदास काळोखाने त्या रात्रीचा ताबा घ्यावा आणि ती दिनदर्शिकेमध्ये दिसूही नये.
वचन ३:७- बायबल नुसार देव गर्भाशय उघडतो किंवा बंद करतो. इथे तो इच्छा करतो की ती रात्र त्याच्या मातेसाठी वांझपणाची असावी, तिच्यात हर्षाचा गजर नसावा. त्याला वाटते देवाला काळाचे काही बंधन नाही. तो मागे जाऊन हे करू शकतो.
वचन ३:८- माझ्या गर्भाचा नाश करायला लिव्याथान या श्वापदाला चेतविले जावे असे तो म्हणतो. हे समुद्र श्वापद शाप देण्यासाठी प्रसिद्ध आहे. लिव्याथान हा शब्द डायनोसोरसाठी वापरला असावा, त्या काळात ही प्रजाती विख्यात होती. त्याचा उल्लेख इथे का केला आहे? ईयोब ४१:३३-३४ वाचा. हे देव बोलत आहे. देवाने त्याला निर्मिले आहे. कारण तो नाशकारक शक्ती आहे, आणि ईयोब देवाला सांगतो माझे गर्भधारण नाहीसे कर.
वचन ३:९- ही गर्भधारणेची रात्र घडूच नये हे दर्शवण्यासाठी तो कोणती तीन चित्रे वापरतो?
१-प्रभाततारे– हे दिवस उगवल्याचे जाहीर करतात. ती रात्रच येऊ नये व दिवसही जाहीर होऊ नये. असे तो इच्छितो.
२- अंधकारमय रात्र असावी.
३- उषानेत्र – म्हणजे प्रभातेच्या प्रकाशाने पापण्या उघडणे. म्हणजे पहाट होऊ नये, आपले डोळे उघडू नयेत व आपले गर्भधारण पूर्ण पुसले जावे असे तो इच्छितो.
वचन ३:१०- त्या दिवसाला व रात्रीला शाप द्यायला ईयोब कोणती दोन कारणे देतो?
अ- आईचे गर्भस्थान बंद झाले नाही.
२- तिच्या प्रसूतीयातनांच्या थकव्याने त्याच्या जन्माला अटकाव केला नाही.
येथे ईयोब देवाला शाप देत नाही तर त्याच्या कसोटीला व अस्तित्वाला शाप देतो. ईयोब देवाला म्हणतो, माझ्या आईच्या प्रसूतीयातनांप्रमाणेच माझ्या वेदनांनी मी थकून गेलो आहे, मला विसावा दे.
सुवार्तेच्या सत्यांची झलक – देव जीवन व मरणावर सार्वभौम राजा आहे. त्याच्याशी जडून रहा. अनुवाद ३२:३९. म्हणून बरे किंवा वाईट घडो आपण देवावर आशा ठेवावी. विश्वास स्थिर राखावा. त्याच्या इच्छेच्या अधीन व्हावे. देवाला आपण आज्ञा देऊ नयेत. यातनांनी रडा पण बायबल आधारित दृष्टिकोन ठेवून रडा. केवळ भावनिक होऊ नका.
यातना आपण एकट्याने सहन करण्याची बाब नाही. देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. २ करिंथ १२:८
येशूने आपल्या मरणाची नांगी काढून टाकली; १ करिंथ १५:५५. म्हणून आपण स्वर्गाची ओढ जागती ठेवायला हवी.
Social