बेट्सी हॉवर्ड
“तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या” (लूक २३:५४-५६).
तो सर्वात दुःखद दिवस होता. जो शब्द देहधारी झाला आणि आपल्यामध्ये राहिला होता तो कबरेत थंड पडला. ज्याने मेलेल्यांना उठवले तो स्वतःच मेला तर तुम्ही तरी काय करणार?
गालीलाहून यरुशलेम तेथून गुलगुथा मग कबरेपर्यंत येशूच्या मागे आलेल्या स्त्रिया दुःखाने भरून गेल्या होत्याच पण त्या गोंधळातही पडल्या होत्या. ज्या मनुष्याला त्यांनी तारणारा मानले होता तो मेला होता. ह्या सर्व वेळी त्यांचे चुकलेच होते का?
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ (निर्गम २०:८). त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे नव्हती, पण त्यांच्याकडे देवाची आज्ञा होती. “सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे” (निर्गम २०:९-१०). आणि म्हणूनच, या विश्वासू महिलांनी मोशेच्या काळापासून त्यांच्या आई-वडिलांनी आणि इस्राएली लोकांनी जे केले तेच केले. त्यांनी शब्बाथ पाळला.
जेव्हा दुःखद घटना, अनुत्तरित प्रार्थना किंवा देवाबद्दलच्या निराशेमुळे आपल्यावर अंधाराचा पडदा पडतो, तेव्हा या भग्न हृदयाच्या स्त्रियांच्या उदाहरणाचे अनुसरण करू शकतो. आज्ञा पाळत चाला.
जेव्हा मार्ग स्पष्ट नसतो तेव्हा विश्वास आज्ञा पाळतो
जेव्हा पुढे जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, तुरुंगातून बाहेर पडण्याचा दरवाजा नाही, वादळाच्या पलीकडे शांतता नाही असे दिसते तेव्हा विश्वासू अनुयायी आज्ञा पाळतात. आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही समस्या देव कसा सोडवणार याचा आराखडा करण्यासाठी विश्वासाला कल्पना करण्याची आवश्यकता नसते.
जेव्हा आपल्याला निराशेत बुडण्याचा मोह होतो, तेव्हा आपण त्याऐवजी, एलिझाबेथ इलिएटने दिलेला संस्मरणीय सल्ला वापरावा, “पुढील गोष्ट करा.” देव आपल्याला खड्ड्यातून कसे बाहेर काढेल हे आपल्याला कदाचित समजू शकणार नाही, आणि आपल्याला तसे समजण्याची गरजही नाही. आज त्याने आपल्याला जे काही करण्याची आज्ञा दिली आहे, त्याचे पालन करण्याची आपल्याला परवानगी देण्यात आली आहे.
देव आपली वचने कशी पूर्ण करेल हे त्या स्त्रियांना माहीत नव्हते, तरी त्यांना हे माहीत होते की मृत शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. तरीही, येशूच्या भग्न शरीराला देखील त्यांच्या या सेवेसाठी वाट पाहावी लागली. त्यांना शब्बाथ आहे हे आठवले आणि त्यांनी तो पाळला. त्यांच्यासाठी, “पुढील गोष्ट” म्हणजे विश्रांती होती.
जेव्हा आज्ञापालन करणे सोपे असते तेव्हा आपण आज्ञा पाळली तर देव कसा आशीर्वाद देईल याची कल्पना आपण करू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला त्यातला मुद्दा दिसत नाही तेव्हा ते खूपच कठीण असते. जेव्हा तुम्ही सर्वात खालच्या बिंदूवर असता, तेव्हा असे वाटू शकते की देव तुम्हाला ज्या प्रवासात घेऊन जात आहे त्याच्या शेवटापर्यंत तुम्ही टिकून राहू शकत नाही. परंतु देव तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा करतो की तुम्ही आज्ञा पाळत चालत असताना एक पाय दुसऱ्याच्या पुढे ठेवा.
तुम्हाला हे माहीत असण्याची गरज नाही की तो तुम्हाला कुठे घेऊन जात आहे. ते त्याला माहीत आहे.
आज्ञापालन ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यात आहे
देवाचे लोक सुटकेपासून खूपच खूप दूर गेलेले आहेत असे वाटणारा दिवस कधी आला असेल तर तो आजचा उदास शब्बाथ होता. काही दिवसांपूर्वीच, जमावाने ओरडून म्हटले होते, “ परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो” (लूक १३:३५). आता कोण सुज्ञ माणूस येशूला धन्य म्हणू शकेल? तो केवळ मेलाच नाही तर त्याला झाडावर टांगण्यात आले होते. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, तो शापितांच्या मृत्युने मरण पावला होता (अनुवाद २१:२३).
पण सर्व काही जसे दिसते तसे नव्हते. निर्मितीच्या कामानंतर देवाने विश्रांती घेतली तशीच देवाच्या पुत्राने आपल्या सुटकेच्या कामानंतर विश्रांती घेतली. देवाने त्याच्या निर्मितीकडे पाहून आणि ती चांगली आहे असे म्हटल्यानंतर विश्रांती घेतली. त्याच्या पुत्राने आपले अपराध स्वत:वर घेऊन, “पूर्ण झाले आहे” असे घोषित केल्यानंतर विश्रांती घेतली (योहान १९:३०).
त्या शनिवारी त्यांचे विश्रांतीचे विधी नेहमीप्रमाणेच दिसले असतील, परंतु सर्व काही बदलले होते. देवाने त्याचे लोक करू शकत नसणारे काम केले होते. ते आता देवाच्या पूर्ण झालेल्या कामात विश्रांती घेऊ शकत होते. त्या दिवसापर्यंत त्यांनी ठेवलेले सर्व शब्बाथ आध्यात्मिक विश्रांतीची पूर्वसूचना देत होते. ती विश्रांती त्यांच्या पापांची किंमत चुकती झाल्यावरच त्यांना मिळू शकणार होती. त्या दिवशी त्यांनी पाळलेला शब्बाथ, येणाऱ्या जीवनात आपल्या सर्वांसाठी वाट पाहणाऱ्या शब्बाथाच्या विश्रांतीची पूर्वकल्पना देत होता (इब्री लोकांस ४:९-११).
त्या सर्वात दुःखद दिवसांची कल्पना करताना मला वाईट वाटत नाही. देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या आणि शब्बाथाचा आदर करणाऱ्या स्त्रियांकडून मी प्रेरणा घेते, जरी त्यांना हे समजले नाही की देव त्यांच्या शोकाचे नृत्यात रूपांतर कसे करू शकतो. त्यांना माहीत नव्हते की शनिवारच्या दुसऱ्या बाजूला, दफन करण्यासाठी कोणताही मृतदेह नव्हता.




Social