एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण ७
उत्पत्ती ३ व ४
फोलोपांचे जगाविषयीचे ज्ञान पाश्चात्यांपेक्षा सुस्पष्ट आहे. कदाचित आपल्याला विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी आपण धरून बसतो त्यांचा अडथळा त्यांना नाही. ते इतके जमिनीवर पाय ठेऊन तिच्या निकट राहातात की आपण तिच्यावर किती अवलंबून आहोत याची त्यांना सतत जाणीव असते. खरे तर आपली अवस्था त्याहून काही निराळी नाही पण आपण ते सतत विसरतो. ते विसरत नाहीत.
जेव्हा देव आदामाला म्हणाला, “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे;” तेव्हा हे वचन ऐकताच फोलोपांचा थरकाप झाला. काईनाने आपल्या भावाविरुद्ध पाप केल्याने देवाने काईनाला सांगितले तुला भूमी सत्त्व देणार नाही. हे ऐकताच फोलोपा मूक झाले. जेव्हा ते आतून ढवळून निघतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया अशीच असते. या अशा गोष्टी त्यांना फारच छान समजतात. त्यांच्या जमातीची ही विचारप्रणालीच असते की एखादी व्यक्ती किंवा समाज पाप करतो तेव्हा भूमी बिघडून जाते. ‘भूमी’ म्हणजे फक्त माती नव्हे तर त्याहून अधिक काही आहे. जे सर्व त्या भूमीतून निघते व गावाला गावपण देते त्या सर्वांचा त्यात समावेश असतो. फोलोपांसाठी ती भू माता असते. फोलोपात भूमी आणि मातेसाठी एकच शब्द आहे.
भूमी बिघडली की जीवन ठप्प होते. भूमी चांगली व्हावी म्हणून फोलोपा सणात एक खास विधी करतात. त्याची कित्येक आठवडे तयारी करतात. तेव्हा ते कोणतेही काम, लाकूडतोडी व कसलाही आवाज करत नाहीत. जर विधीत त्रुटी राहिल्या तर जमीन नीट होऊ शकत नाही असा आजही त्यांचा विश्वास आहे. कोणी मरायला लागले तर भूमीत बिघाड झालाय अशी त्यांची समजूत असते. मग संपूर्ण वसाहत ती जागा सोडून दुसरीकडे वस्ती करते.
अजून आम्ही उत्पत्तीच्या आरंभीच्या अध्यायात होतो.
देव म्हणाला, “तू हे काय केले? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे, तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील” (उत्पत्ती ४: १०-१२). भाषांतर पूर्ण करून मी पेन्सिल खाली ठेवली. आता देवाचे दुसरे चित्र फोलोपा कॅन्व्हसवर रेखाटले जात होते. येथे समोर येत होते की देव आदाम हवेला दिलेल्या शापांचा सर्व मानवजातीवर विस्तृत प्रमाणात सर्वसाधारण परिणाम होऊ देत नाही. तर विशिष्ट पापासाठी संबंधित व्यक्तिला शासन करतो.
इसा व हेपल फारच रुची घेऊन गोष्ट ऐकत होते.
काईन व हाबेल या दोघांनी आपल्या श्रमाच्या उपजातून अर्पण आणले होते. हाबेलाने पुष्ट मेंढरू तर काईनाने शेताचा उपज अर्पण केला होता. देवाने हाबेलाच्या अर्पणाचा आदर केला पण काईनाच्या अर्पणाचा आदर केला नाही. एदेनेबाहेर ढग जमा झाले होते आणि काईनाचा चेहरा काळवंडला होता.
जरी काईनाचे अर्पण देवाने स्वीकारले नसले तरी देवाने त्याला धीर दिला.
देव काईनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. करिता तू त्यास दाबात ठेव” ( उत्पत्ती ४:६-७). काईनापुढे आव्हान होते: पापाच्या मोहावर त्याने ताबा ठेवायचा होता. त्याने मागे जाऊन पुन्हा प्रयत्न करून हिंमत धरून नव्याने पुढे जायचे होते. अजूनही तो परिस्थितीवर ताबा मिळवू शकत होता. पण त्याने या नकारामुळे कटुता धरून ठेवली तर त्याच्यावर ही परिस्थिती मात करणार होती.
यातून ज्या संकल्पना व सत्ये बाहेर येत होती त्यावर इसा, हेपल व मी चर्चा करत होतो. त्यांच्याही लक्षात काही गोष्टी आल्या होत्या. उदा॰ आपल्या बांधवांविषयीच्या कटुतेचा प्रारंभ आपल्याच चुकांमध्ये असतो. आपल्या जीवनात देव कार्य करून काहीतरी शिकवू इच्छित असता आपण दुसऱ्यांविषयी कटुता धरून बसलेले असतो.
काईनाचा वाद खरे तर देवाशी होता पण त्याकडे पाठ करून त्याने आपल्या भावावर राग काढला.
देवाला एवढेच हवे होते की काईनाने आपल्या भावाची हत्या करण्याऐवजी पशुयज्ञ करावा. आम्ही पुढे भाषांतर करू लागलो.
मग देव काईनाला म्हणाला, “तुझा भाऊ कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणार आहे” (उत्पत्ती ४:९)? फोलोपा संस्कृतीत कौटुंबिक बंधने म्हणजे सर्वस्व असते. काईनाचे उत्तर त्यांच्यासाठी उघड अपमान करणारे होते. देवानेही त्याच नजरेने त्याकडे पाहिले. देवाने काईनाला शाप दिला.
जरी काईन उत्तम शेतकरी असला तरी आतापासून भूमी त्याला उपज देणार नव्हती. त्याला शेती करणे इतरांना मिळालेल्या सर्वसामान्य शापाप्रमाणे केवळ कठीण जाणार नव्हते तर अशक्य असणार होते.
भूमीने हाबेलाचे रक्त प्राशन केले होते. पण काईनाचे रक्त गोठून गेले होते. त्याचे भावी जीवन भूमीवर भटकण्यात जाणार होते.
आम्ही ही वचने संपवली तेव्हा इसा म्हणाला, “छान. फारच सुंदर. पण एक गोष्ट मला सतावते. रक्ताला वाचा नसते. आणि भूमीला तोंड नसते.”
त्याचा मुद्दा बरोबर होता. पण बायबल तेच म्हणते. तेथे व्यक्तिवाचक भाषा वापरली आहे. अचराला चराची गुणवैशिष्ट्ये वापरली आहेत. अनेक भाषा व संस्कृतींमध्ये अशी भाषा वापरण्याचा प्रघात आहे आणि ती अत्यंत प्रभावी ठरते. पण फोलोपांसारख्या भाषेत असा वापर नसेल तर भूमीने तोंड उघडणे व रक्ताने बोलणे परिकथा समजले जाते व देवाची शिकवण बाजूलाच राहाते.
ते दोघेही माझ्याकडे अर्थपूर्ण उत्तरासाठी आशाळभूतपणे पाहात होते. मी देवाकडे पाहात होतो. ते देवाचे शब्द होते व असेच होते.
मी प्रार्थना केली, “हे देवा, आमच्यापुढे समस्या आहे. तू हे बोलला आहेस. तू व्यक्तिवाचक वापर केलास. ते या रचनेत चपखल बसते. तुला याचा अर्थ माहीत आहे. पहिल्या हिब्रू भाषिकांना त्याचा अर्थ स्पष्ट समजला होता. आम्हालाही त्याचा अर्थ समजतो. पण या फोलोपांना कसे समजावून सांगू? जर तू व्यक्तिवाचक भाषा वापरली नसतीस तर तू हे कसे बोलला असतास ते मला सांग. किंवा आम्ही आता हे कसे मांडावे ते अचूक सुचव.”
चर्चा करीत असता आम्हाला उत्तर मिळू लागले होते. हेपल व इसाला मूलभूत संकल्पना समजली होती.
काईनाने आपल्या भावाची हत्या केली होती आणि हे काही गुपित नव्हते. त्याला वाटले असेल की ते गुप्त राहिले आहे. तो ढोंग करीत होता की त्याचा भाऊ कोठे आहे हे त्याला माहीत नाही. पण जो देव सर्व पाहतो त्याच्यापासून तर काहीच गुप्त नव्हते. हाबेलाचे रक्त जमिनीत शोषले गेले होते. तो काईनाच्या गुन्ह्याचा पुरावा होता. कोर्टातील दाव्याप्रमाणे हे सारे होते. देव न्यायाधीश होता आणि हाबेल दावेदार होता (हाबेलाचे रक्त). तो न्यायासाठी व बदला घेण्यासाठी विनवणी करत होता.
जणू हाबेल देवाला म्हणत होता, “देवा, तू संपूर्ण जगाचा न्यायाधीश आहेस. काहीतरी कर.” निरपराध्याची हिंसा झाली होती. हे योग्य नव्हतेच. अपराधाला न्याय्य शिक्षा व्हायलाच हवी होती. न्यायाची मागणी योग्य होती. ही तर पापुआ न्यु गिनी संस्कृतीची मूलभूत संकल्पना होती. ते तिला ‘परतफेड’ म्हणतात. देव पापाला भरपाई केल्याशिवाय सोडत नाही. जरी हाबेल आता दुर्बल असला तरी देव दुर्बल नव्हता.
आम्ही भाषांतर लिहीत असता आम्ही ‘परतफेड’ शब्द वापरला.
देव म्हणाला, “काईना, तू गुप्तपणे तुझ्या भावाची हत्या केलीस पण मी पाहिले. आता तू जे केलेस त्याची भरपाई कर. तू तुझ्या भावाची हत्या केलीस. आणि त्याचे रक्त जमिनीत गेले. आता तू जे केलेस त्यामुळे मी भूमीला शाप देतो.” भावी काळी कदाचित व्यक्तिवाचक भाषा त्यांना समजेल पण सध्या ती भाषा त्यांना गोंधळात पाडत होती. आम्ही ते कसेही लिहिले तरी सत्य अबाधित राहत होते. देव सर्व काही पाहतो व चुकीची गोष्ट सहज खपवून घेत नाही. उत्पत्ती हा प्रारंभ आहे, शेवट नव्हे. गोष्ट चालू राहणार होती. इतिहास चालू आहे. त्यानंतर दुसऱ्या कोणाचे तरी रक्त भूमीवर सांडले गेले. इब्री लोकांचे पत्र म्हणते, त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे. वधस्तंभावरील मनुष्यापासून रक्त खाली वाहिले. भूमीने आपले तोंड उघडले. पुन्हा रक्त बदला घेण्याविषयी बोलले. पण यावेळेस ते दयेविषयीही बोलते. सूड घेतला गेला. भरपाई, परतफेड करण्यात आली .
पण आम्ही अजून उत्पत्तीच होतो. उत्तम ते अजून यायचे होते.
Social