Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 4, 2020 in जीवन प्रकाश

तुमची लाडकी पापे ठार करा – त्यांनी तुम्हाला ठार करण्यापूर्वी                       ग्रेग मोर्स

तुमची लाडकी पापे ठार करा – त्यांनी तुम्हाला ठार करण्यापूर्वी ग्रेग मोर्स

“एक्स्क्यूज मी, आता जे तुम्ही म्हणालात ते परत सांगता का?”

माझी खात्री होती की मी ऐकले ते चुकीचे होते.
“…”

“ म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जर लैंगिक पापाशी तुम्ही सतत मुकाबला करत असाल तर ती कमी करत राहून तुम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकता? जर आपण आठवड्यातून समजा सहा वेळा पाप करत असू तर तुम्ही म्हणताय् की ते काही काळ आठवड्यातून पाच वेळा मर्यदित करून आणि नंतर चार, तीन दोन करत शून्यावर आणायचं?”

‘ख्रिस्ती पुरुषांची शुद्धता’ या ख्रिस्ती कार्यक्रमाचे हे मान्यवर नेते होते. त्यांनी हे वाक्य उच्चारताच माझ्या भोवतालच्या सर्वांनीच डोके हलवून संमती दाखवली होती. नाहीतरी आम्ही आताच व्हिडिओवर जिमी ची साक्ष ऐकली होती की दिवसात अनेक वेळा पाप करण्यापासून आता महिन्यातून अनेक वेळा पाप करण्यापर्यंत तो पोचला होता. हे धोरण यशस्वी व्हायला हवे होते.
आता ज्या मित्राने मला तेथे आणले होते तोही धीर करून बोलू लागला.
“मला तुम्हाला मुळीच कमी लेखायचं नाही पण पाप काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?”

त्यांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माहीत नव्हते हेच त्यामुळे उघड झाले.
त्यांच्या मते देहाला आठवड्यातून काही वेळा पापासाठी मुभा देणे पाप नव्हते कारण अखेरीस ते पवित्र होण्यासाठी फायदेशीर ठरणार होते. त्यांच्यासाठी मनाई केलेल्या झाडाच्या फळाचे दोन तुकडे खाणे तितके चुकीचे नव्हते. त्यांच्यासाठी पाप हे कह्यात आणण्याजोगे होते, त्याचा जोर कमी करता येतो, नियंत्रण करता येते. त्यांच्यासाठी आपले अवयव जिवे मारणे ही टोकाची प्रतिक्रिया होती – हळूवारपणे पापाला वश करा.

 पाप काय करते?

पाप हे-

देवाच्या गौरवाचा अनादर करते.
देवाच्या पवित्रतेची भीती बाळगत नाही.
देवाच्या महानतेची प्रशंसा करत नाही.
देवाच्या सामर्थ्याची स्तुती करत नाही.
देवाचे सत्य शोधत नाही.
देवाच्या सुज्ञतेची किंमत करत नाही.
देवाच्या चांगुलपणाचे मोल करत नाही.
देवाच्या विश्वासूपणावर भरवसा ठेवत नाही.
देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवत नाही.
देवाच्या आज्ञा पाळत नाही.
देवाच्या न्यायाला मान देत नाही.
देवाच्या क्रोधाची भीती बाळगत नाही.
देवाची कृपा ह्रदयात जतन करत नाही.
देवाच्या सान्निध्याची आस बाळगत नाही.
देवावर प्रेम करत नाही.
“ते देवाच्या न्यायाला आव्हान देते. त्याची दया तुडवते. त्याचा धीर धिक्कारते. त्याचे सामर्थ्य कमी लेखते व त्याच्या प्रेमाला तुच्छ लेखते”  – जॉन बनियन

त्या नेत्यासाठी पाप हे वेगमर्यादा मोडण्यासारखे होते – त्यात वैयक्तिक काहीच नव्हते.  त्याच्यासाठी ती सर्वात महान प्रियाला केलेली इजा नव्हती. एका सच्चा मित्राला दिलेला धोका नव्हता. आपल्या स्वर्गीय बापाचा अपमान नव्हता. आपल्या महान राजाशी केलेले बंड नव्हते. सार्वभौम देवाच्या तोंडावर थुंकणे नव्हते.

ह्यातील एकच कृती पूर्ण जगाला शाप देण्यास पुरेशी होती. पण त्यांच्यासाठी ते एका आठवड्यात अनेक वेळा करणे योग्य होते. त्याच्यासाठी पाप हे पाळीव प्राण्याप्रमाणे होते, अखेरीस त्याला टाकून देता होत होते. पण तोपर्यंत त्याला गोंजारून त्याला मेल्याचे सोंग आणणे शिकवता येत होते.

पाप हे पाळीव प्राणी नाही

पाप हे पाळीव प्राणी नाही की त्याला तुम्ही आठवड्यातून काही वेळा फिरवून आणाल. ते सिंह आहे, लांडगा आहे. ते हवे तेव्हा चावेल आणि शिकार करील. ते पिरान्हासारखे हल्ला करते. ते नरकाच्या अग्नीने पेटलेली अस्वस्थ दुष्टता आहे. त्याला प्रशिक्षण देता येत नाही, लगाम घालता येत नाही किंवा पाळता येत नाही. त्याला वाचवता येत नाही, त्याचे पुनर्वसन करता येत नाही किंवा वाचवता येत नाही. पाप कधीही पट्टा घालून घेणार नाही, ते त्याच्या खोपट्यात बसणार नाही किंवा तुमच्या गळ्याला नखे रुतवण्याचे बंद करणार नाही.

पाप आपल्याला देवाच्या क्रोधाचे लक्ष्य बनवते (कलसै ३:५-६). पाप आपल्याला मरणासाठी लायक करते (रोम १:३२). पाप हे शोधून काढले जाईल व त्याचा द्वेष केला जाईल (स्तोत्र ३६:१-२). आपण त्याच्याशी समझोता कधीही करू नये. त्यासाठी तरतूद करू नये. जर आपल्याला जगायचे असेल तर पाप आत्म्याद्वारे ठार केले पाहिजे (रोम. ८:१३).

पापाला पाळण्यापेक्षा एखाद्या वाघाला पाळणे अधिक सुरक्षित आहे.

खांद्यावरची पाल

पण अनेकांनी प्रयत्न केला आहे. सी. एस. लुईस यांनी हे तत्त्व ‘द ग्रेट डिव्होर्स’ या आपल्या पुस्तकात चांगले रेखाटले आहे. या पुस्तकात स्वर्गातून बाहेर टाकलेले एका भूत आपले लाडके पाप – एक लाल पाल – जवळ बाळगते. हे भूत त्या खांद्यावरच्या पालीला सतत रागवत असते. एक देवदूत त्या भुताला विचारतो. ह्या पालीला गप्प करायला तुला आवडेल का?

“अर्थातच”  भूत म्हणते.

तर मग मी तिला मारून टाकतो, देवदूत एक पाउल पुढे घेत म्हणाला.

“हं हं नीट बघ! तू मला जाळत आहेस. दूर हो” भूत मागे सरत म्हणाले.

“तुला ती मरायला नकोय?”

“पहिल्यांदा तू मारण्याबद्दल काहीही बोलला नव्हतास. इतकी टोकाची पायरी तू घेशील असे मला माहीत नव्हते.”

“पण तेवढाच एक मार्ग आहे” देवदूत म्हणाला. त्याचे जाळणारे हात आता पालीच्या जवळ आले होते. “मी मारून टाकू का तिला?”

“त्याचा नंतर विचार करता येईल.”

“त्यासाठी मुळीच वेळ नाही. मी मारू का तिला?”

“खरं सांगू? त्याची मुळीच गरज नाही. मी आता तिला व्यवस्थित ठेवू शकेन. तिला मारण्यापेक्षा हळूहळू शिकवणे खूपच चांगले होईल.”

“अशा हळूहळू शिकवण्याचा काहीच फायदा होणार नाही.”

भुताने अनेक सबबी दिल्या पण आता ती पाल त्याच्या कानाशी कुजबुजू लागली.

“सावध राहा” ती म्हणाली. “तो म्हणतोय ते तो करील. तो मला मारून टाकील. तुझा एक शब्द आणि तो काम फत्ते करील. मग तुला माझ्याशिवाय कायम आणि कायमचे राहावे लागेल. हे शक्य नाही. तू कसा जगशील? तू केवळ  एक भूतच राहशील. आता आहेस तसा माणूस नसशील. त्याला काही कळत नाही.  तो एक थंड, रक्तहीन वास्तवहीन बाब आहे. त्याच्यासाठी ते स्वाभाविक असेल पण आपल्यासाठी नाही. होय, आता खरा आनंद नाही फक्त स्वप्नेच आहेत हे मला समजतं. पण काहीच नसण्यापेक्षा ते चांगलं नाही का? आणि मी खरंच खूप चांगली वागेन. मागे मी जरा खूपच बहकले होते. पण मी वचन देते असं मी पुन्हा कधीच करणार नाही. मी तुला खूप सुंदर स्वप्नं देईन – सगळी गोड, नवी आणि निरागस. तूही म्हणशील किती निरागस…”

आपल्या पापाला मारून टाकण्यापेक्षा त्याला प्रशिक्षण देण्याच्या नमुन्यात पडणे सोपे वाटते.

पापाशी न लढण्याचे तुमचे सर्वात मोठे कारण जर हे असेल की कुणाला जबाबदार राहून तुम्हाला ते कबूल करायला नको आहे तर तुम्ही तुमच्या पापाला प्रशिक्षण देत आहत. जर तुम्ही ते पाप पुन्हा केले आणि त्यासाठी फक्त त्याविषयी प्रार्थना केली तर तुम्ही त्याला प्रशिक्षण देत आहात. जर तुम्ही ख्रिस्ताच्या सान्निध्याची आस बाळगत नाही, जर त्याचे वचन वाचून व प्रार्थना करून तुम्ही त्याच्याशी सहवास ठेवत नाही, जर तुम्ही इतर विश्वासीयांना आपल्या जीवनात बोलावून त्या पापामध्ये जंजीर खुपसायला मदत घेत नाही तर तुम्ही तुमच्या पापाला मारत नाही, मेल्याचे सोंग करायला लावता.

जा आणि यापुढे पाप करू नकोस

जर तुम्ही एखादे पाप जवळ बाळगून आहात तर ताबडतोब त्याचा धिक्कार करा. तुमचे तारण त्यावर अवलंबून आहे.

ज्यांच्यामागे पापाची मढी आहेत तेच फक्त स्वर्गात प्रवेश करू शकतील. “जे  भीत व कापत आपले तारण साधून घेतात आणि त्यांना ठाऊक आहे की, “इच्छा करणे व कृती करणे हे त्यांच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे” (फिली. २:१२-१३).

पण मग आपले तारण केवळ विश्वासाने होते त्याबद्दल काय?

तुम्ही केवळ विश्वासानेच नीतिमान ठरले जाता. तारणाची कड ही न्यायीकरण आणि पवित्रीकरण याद्वारे लागते. ह्या दोन्हींची सुरुवात करणे आणि टिकवून ठेवायचे काम देवाच्या कृपेद्वारे होते. “अशी एक पवित्रता आहे की जिच्याशिवाय तुम्ही प्रभूला पाहू शकत नाही” (इब्री १२:१४).  “प्रभूच्या प्रिय जनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारे होणार्‍या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे” (२ थेस्स. २:१३).

“फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल” (गलती ६:८). “पापाचे वेतन मरण आहे” (रोम ६:२३). अनेक जण त्या दिवशी त्याला म्हणतील की प्रभूची व त्यांची ओळख होती, पण तो त्यांना दूर सारील आणि त्यांना अनाचार करणारे म्हणेल (मत्तय ७:२१-२३).

ख्रिस्ती जनांसाठी सतत धोक्याचे इशारे  दिले आहेत आणि पवित्र आत्मा आपण देवाची भीती बाळगावी व पापापासून वळावे म्हणून त्यांचा उपयोग करतो.

ख्रिस्ती व्यक्ती त्याच्या हिंस्त्र श्वापदाला प्रशिक्षण देत नाही. आपण आठवड्यातून पाच वेळा मग चार मग तीन असे करत कमी जाण्याने देवाविरुद्ध जाणे कमी करण्याच्या योजना करत नाही. येशूने जेव्हा पाप्यांना क्षमा केली तेव्हा जा आणि कमी पाप कर असे सांगितले नाही. तो म्हणतो, “जा आणि पाप करू नकोस.” तुमचे हे पाळीव प्राणी ठार करा नाहीतर ते तुम्हाला ठार करतील.