दु:खाइतके दुसरे काहीही आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाही. वेदनेकडे दुर्लक्ष करणे कठीण असते – फक्त ते सहन करणाऱ्यांसाठी नाही तर ते पाहणाऱ्यांसाठी सुद्धा. आपले डोळे आणि ह्रदय आपोआपच दु:खासाठी स्वत:ला बंद करून घेतात.
ख्रिस्ती या नात्याने दु:ख हे आपला विश्वास इतरांना सांगण्यासाठी एक महान संधी देते. आपण असे वेगळे का आहोत हे जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्कंठा होते. आपल्यामध्ये कटूपण का नाही, ह्या ज्वालांनी आपल्याला उद्ध्वस्त कसे केले नाही – विशेषकरून जेव्हा ही आग असह्य झाली होती तेव्हा.
एलिझाबेथ इलियट, जॉनी एरिक्सन टाडा आणि जेराल्ड सित्सर यांच्यासारख्या विश्वासीयांनी जगाला चकित करून सोडले आणि अगदी उष्ण अग्नीमध्येही ख्रिस्त पुरेसा आहे हे जाहीर केले. एलिझाबेथ यांना दोन नवऱ्यांच्या अंत्यविधींना तोंड द्यावे लागले. एकाचा मिशन क्षेत्रात खून झाला तर दुसरा त्यांच्या विवाहानंतर चार वर्षातच कॅन्सरने मरण पावला. जॉनीचा एकदा डायव्हिंग करताना अपघात होऊन तिचे दोन्ही हातपाय निश्चल झाले. आता तिला दोनदा कॅन्सरला तोंड द्यावे लागले असून तिला सतत असह्य वेदनांचा त्रास होतो. सित्सर यांना कारच्या अपघातामध्ये आपली आई, बायको व दोन मुली यांना गमवावे लागले.
या संतांनी अशा हादरवून टाकणाऱ्या हानीमध्येही देवाची प्रीती, चांगुलपणा व कृपा जाहीर केली, माझ्यासारख्या लक्षावधी लोकांना त्यांनी आपल्या दु:खात येशूवर भरवसा टाकावा म्हणून प्रेरणा दिली.
जग याकडे दुर्लक्ष करू शकत नाही
जॉन न्यूटन (१७२५-१८०७) यांना दु:ख सहन करणाऱ्या विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीची मोशेने पाहिलेल्या जळत्या झुडूपाशी तुलना करायला आवडत असे. त्यांनी लिहिले “काही ख्रिस्ती लोकांना दु:खाचा अमाप वाटा सहन करावा लागतो. असे ख्रिस्ती जण या नष्ट न होणाऱ्या जळत्या झुडुपासारखे मंडळीसाठी दिसणारे कृपेचे दृश्य आहेत. आणि मोशेप्रमाणे आपल्याला विचारायला भाग पाडतात की, “ हे झुडूप जळत का नाही?” ह्या विश्वासीयांची शक्ती व स्थिरपणा याचे एकच उत्तर आहे – देवाच्या टिकवून ठेवणाऱ्या कृपेचा चमत्कार. जो देव ख्रिस्ती लोकांना अत्यंत वेदनेच्या काळात ज्या कृपेने टिकवून ठेवतो तोच देव माझ्या सध्याच्या दु:खात मला टिकवून ठेवतो. आपण देवाच्या सततच्या कृपेबद्दल नवल करत राहतो आणि तो आपले जीवन चालवत असताना त्याच्यावरील विश्वासामध्ये आपण वाढत जातो.
विश्वासी व्यक्ती कसे सहन करते व कसे चांगल्या रीतीने मरण पावते हे पाहून दु:ख टाळणारे जग बदलू शकते. ख्रिस्ती व्यक्ती समृद्धीत सुखी असणे यामध्ये काही विशेष नाही. ही नैसर्गिक बाब आहे. हे अपेक्षित सुद्धा असते. पण सहन करताना आनंदित असणे हे अलौकिक आहे. जग याची दखल घेते. जळते झुडूप पाहणाऱ्या मोशेसारखे ते बाजूला थांबून पाहतात की ह्यांचा नाश का होत नाही (निर्गम ३:२-३).
आपल्या काळ्याकुट क्षणांमध्ये, तीव्र आगीमध्ये, आणि खोल दु:खामध्ये आपल्याला देवाची सुवार्ता सांगण्याची सर्वात महान संधी असते. आपल्या आशेचे कारण काय हे लोकांना जाणून घ्यायचे असते (१ पेत्र ३:१५). मी स्वत: शारीरिकदृष्ट्या फार कमकुवत आहे. आणि जेव्हा मला तीव्र वेदना होतात आणि निराशादायी थकवा जाणवतो तेव्हाच लोक मला माझ्या विश्वासाबद्दल विचारतात. त्या क्षणांमध्ये मला अत्यन्त अपुरे वाटते यासाठी की “ सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही” (२ करिंथ ४:७) हे मी सांगावे.
आपण बोलल्याशिवाय राहूच शकत नाही
जेव्हा मी वेदनेमध्ये असलेल्या व्यक्तीशी बोलते तेव्हा त्यांच्या त्या क्षणाच्या भावनांशी संवेदनशील असावे असे मला वाटते. कदाचित ती वेळ बोलण्याची नसेल. ईयोबाच्या पुस्तकात आपण पाहतो की दु:खसहन हे एक गूढ आहे. सर्वात मदतशील प्रतिसाद म्हणजे फक्त बसून ऐकणे. “देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात” (रोम ८:२८). हे माझ्यासाठी मुलभूत सत्य आहे, पण अशा क्षणी मी ते क्वचितच वापरते. माझ्या मुलाच्या अंत्यक्रियेच्या वेळी याची आठवण नकोशी वाटली, जसा काही माझा शोक आध्यात्मिक नव्हता.
त्याच वेळेला जर आपण देवाच्या चांगुलपणाचा आणि समाधानाचा अनुभव आपल्या दु:खात घेतला असेल तर “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.” (प्रेषित ४:२०). आपण तुरुंगात जाऊ किंवा आपल्याला मारून टाकले जाईल हे माहीत असूनही शिष्यांनी सुवार्ता सांगणे बंद केले नाही (प्रेषित ५:४०-४१).
जर आपण सांगितले नाही तर लोकांना आपल्याला प्रभूपासून सामर्थ्य व मदत येते हे कसे कळेल? नाहीतर ते आपल्या या आनंदी वृत्तीचे श्रेय आपले मनोधैर्य, सकारात्मक प्रवृत्ती, किंवा कदाचित वास्तवाला तोंड न देण्याची वृत्ती आहे असे समजतील. आपण त्यांना सांगायला हवे की ख्रिस्ताने आम्हाला बदलले आहे. म्हणजे त्यांना समजेल की हा संवेदनशील आनंद त्यांचाही होऊ शकतो.
दु:खसहनामध्ये आपली महान प्रार्थना
आपल्या जीवनातील प्रत्येक बाब ही सुवार्ता सांगण्यासाठी संधी आहे. पौलाने हे असेच पाहिले. सुवार्तेचा प्रसार व्हावा ह्या एकाच भिंगातून तो प्रत्येक बाब पाहत होता.
मी कबूल करते की जेव्हा मी वेदनेत असते तेव्हा माझा पहिला विचार सुवार्ता सांगणे हा नसतो. माझा पहिला विचार असतो, “प्लीज, असे होऊ देऊ नको.” माझा दुसरा विचार असतो, “मला मदत कर, मला वाचव, माझी सुटका कर.” हे प्रतिसाद बायबलनुसार असू शकतात (स्तोत्र २२:१९-२१). पण ह्या आरोळ्यांमध्येही आपण दुसऱ्यांना साक्ष देऊ शकतो. पौलाची दु:खे जितकी वाढली तितक्याच (विरोधाभासाने) वेगाने सुवार्ता पसरली गेली (२ तीमथ्य. २:८-१०). तुरुंगात असताना आपली दु:खे कमी व्हावी व सुटका करावी असे त्याने विचारले नाही तर सुवार्ता स्पष्टपणे सांगता यावी अशी विनंती केली (कलसै. ४:३-४).
बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या बहिणीने मला एका इराणी पाळकाबद्दल सांगितले की त्याच्या विश्वासामुळे त्याला तुरुंगात टाकले व अखेरीस मारून टाकले. जेव्हा त्याच्या भावाने इथे अमेरिकेत भेट दिली तेव्हा इकडचे लोक जशी प्रार्थना करतात ती ऐकून ती चकित झाला. त्याने विनंती केली, “या ख्रिस्ती लोकांची तुरुंगातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करू नका – ते सुवार्तेसाठी आपला प्राण आनंदाने देतील. प्रार्थना करा की त्यांच्या जेलरचे परिवर्तन व्हावे.”
“प्रार्थना करा की त्यांच्या जेलरचे परिवर्तन व्हावे.” मला माझ्या दु:खसहनामध्ये हीच वृत्ती हवी आहे. मला जे काही घडते ते मी शुभवर्तमानाच्या प्रकाशात पहावे अशी माझी इच्छा आहे.
मोलवान आणि वेदनामय संधी
आपल्यातील काही थोडके जण सुवार्तेसाठी अखेर प्राण देतीलही. आपल्यातील काही जण वर्णन न करता येईल अशा असामान्य दु:खसहनामध्ये ख्रिस्ताची घोषणा करतील. पण आपण सर्वच जण आपल्या नेहमीच्या, दररोजच्या परीक्षांमध्ये ख्रिस्ताचे अढळ मोल दाखवू शकतो. आपल्यातील काही जण आपले अपंग मूल, आपले नेहमीचे जुनाट दुखणे, आपला आर्थिक समस्यांशी झगडा, आपले वृद्ध आजारी आईवडील, आपला नकोसा अविवाहितपणा हे कसे हाताळतो? आपली परिस्थिती जी वेगळी असायला हवी अशी आपण अपेक्षा करतो त्यामध्येच इतर लोक आपल्याला अगदी जवळून न्याहाळत असतात. अशी प्रत्येक परिस्थिती ख्रिस्त आपल्या दु:खात कशी मदत करतो हे सांगण्यासाठी संधी आहे.
तुमची दु:खे वाया जाऊ देऊ नका. ती फार मोलवान आहेत. तुम्हाला कधी दिसणार नाही अथवा समजणार नाही अशा हजारो प्रकारे देव त्यांचा उपयोग करून घेत आहे. पण एक मार्ग आहे त्याच्या शुभवर्तमानाचा फैलाव (फिली. १:१२). तुमच्या आशेबद्दल लोकांना सांगा. देवाने तुमची कशी भेट घेतली, तुमच्या संकटात तुमच्या विश्वासाने तुम्हाला कसे वेगळे बनवले आहे. हीच तुमची सर्वात समर्थ साक्ष आहे.
Social