दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ – आनंद

डेरिल गुना

जेव्हा बायबल आपल्याला आनंदित राहायला सांगते तेव्हा त्याच अर्थ असा होतो का की आपला चेहरा सतत हसरा दिसावा? जर एखादी व्यक्ती दु:खातून जात असेल तर ती हे कसे करू शकेल? बायबल आपल्याला शोक करू नका असे का म्हणते?

येशूला तर दु:खाचा पुरुष (यशया ५३:४), ‘सहन करणारा सेवक’ असे म्हटले आहे. इब्री ५:७ मध्ये म्हटले आहे, “आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली”

गेथशेमाने येथे “अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता” (लूक २२:४४).

तरी अशा वेळीही तो आनंदाने भरलेला होता. “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री १२:२). प्रेषित पौल सुद्धा स्वत:बद्दल सांगतो, दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो” (२ करिंथ ६:१०).

ख्रिस्ती लोकांचे चिन्ह शोक (शोक करणारे ते धन्य – मत्तय ५:४), आणि न लोपणारा आनंद (अनिर्वाच्य व गौरवयुक्त आनंद – १ पेत्र १:८) ही दोन्ही आहेत.

बायबलनुसार हा आनंद परिस्थितीवर अवलंबून नसतो. तर ती एक खोलवरची खात्री असते की देवाचे माझ्या संपूर्ण जीवनावर नियंत्रण आहे आणि कशीही परिस्थिती आली तरी ती माझ्या कल्याणासाठी, देवाच्या गौरवासाठी असणार.

आत्म्याच्या फळाचा दुसरा पैलू आनंद हा पाहण्यासाठी आपण फिली ४:४-७ मधील काही सत्यांवर  विचार करू या.

आनंदाची तीन तत्त्वे

१ येशूमध्ये नेहमी आनंद करा
प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा (व.४).

*आनंद हे आपले कर्तव्य आहे. आनंद हा पर्याय नाही. ते आपले कर्तव्य आहे. देवाच्या लोकांना आनंद करण्याची आज्ञा दिली आहे आणि आनंद हा त्यांचे गुणलक्षण आहे. “तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा” (फिली. २:१८).

* आनंद हा परिस्थितीवर अवलंबून नाही. नेहमी आनंद करा.

तुम्हाला कामात यश असते, तुमच्या योजना पार पडतात, तुम्हाला आरोग्य असते अशा वेळी किंवा लग्न समारंभ, पार्टी अशा वेळी तर आपण आनंद करतोच. पण या वचनानुसार हानी अथवा लाभ होवो, आरोग्यात – आजारात, श्रीमंतीत – गरिबीत, यशात – अपयशात  सर्व प्रसंगी आनंद करण्याची आज्ञा दिली आहे. हे पत्र वाचताना आपल्याला वाटू शकते की पौल एखाद्या आरामशीर हॉटेलमधून हे पत्र लिहीत आहे. पण तो रोमी तुरुंगात होता, साखळ्यांनी बांधलेला होता.

*हा आनंद आपल्यावर अवलंबून नाही.

स्वत:मध्ये आनंद मानू नका. आपल्याला वाटते की मला जर चांगली नोकरी असली असती, यू एस चा व्हिसा मिळाला असता, सहा आकडी पगार असता, हवा तसा जोडीदार असेल  तर मी आनंदी असेन. पण उपदेशकाने काय अनुभवले? “माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही” (उपदेशक २:१०,११).

आपल्यामधले काहीच आपल्याला कायम आनंदी ठेवू शकत नाही.

तारणाचे पाचारण हे तर याउलट आहे. “त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (लूक ९:२३).

मत्तय १०:३९ मध्ये येशूने म्हटले, “ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील.”

येथे येशू आपल्याला संन्यासी बनण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये महान आनंद मिळावा म्हणून पाचारण करीत आहे.

*खरा आनंद हा येशू मध्ये आहे.

जेव्हा येशू आपला महान आनंद बनतो तेव्हा दु:खे ही आनंद देणारा अनुभव असतात. “ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले” (प्रेषित ५:४१).

“ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच” (फिली.१:१८).

येशू हा आपली तृप्ती करतो. “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही” (योहान ६:३५).

 “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र १६:११).

येशूच्या प्रभुत्वाखाली, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे.

१. हा पूर्णानंद आहे. “माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत” (योहान १५:१०). “ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही” (योहान १६:२२).

जसजसे आपण येशूच्या मागे जातो, त्याला जाणतो तसे स्वर्गीय आनंदाची चव आपण घेऊ शकतो. स्वर्ग हा स्वर्ग आहे कारण तेथे येशू आहे.

२. तुमच्या आचरणातून येशू दाखवा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. (व.५)

तुम्ही आता सौम्य आहातच. ही सौम्यता प्रत्येकाला दिसू द्या. सौम्यता म्हणजे कृपाळूपणा, दयाळू, सहन करणे, समाधानी असणे.

पौल १ थेस्स. ५:१५ मध्ये म्हणतो, “कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा.”

३. तुमच्या चिंता प्रभूवर सोपवा.

जगात अशा गोष्टी घडतच राहतील की तुम्हाला चिंता करायला प्रवृत्त करतील. पण तुम्ही आपल्या मागण्या प्रभूपुढे मांडा. उपकारस्तुती हे विश्वासाचे प्रकटीकरण आहे. कारण प्रभू तुमची काळजी घेतो.
*देव आपली अंत:करणे राखतो.
मानवाच्या समजण्यापलीकडे असलेली शांती देतो. दु:ख टाळण्याच्या आपल्या सुज्ञतेपलीकडचा उपाय: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल” (नीती ३:५,६).

या वचनावर गंभीरपणे विचार करा: “कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील” (अनुवाद २८:४७,४८).  

Previous Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

Next Article

जर तुम्ही पकडले गेलात तर तुम्ही पश्चात्ताप करू शकाल का?

You might be interested in …

अनपेक्षित आणि गैरसोयीसाठी देवाची योजना जॉन ब्लूम

  जेव्हा लूकाने (लूक११:२-४) मधील प्रभूची प्रार्थना नमूद केली तेव्हा त्याने येशूने केलेला त्या प्रार्थनेचा उलगडाही नमूद केला. यावेळी येशूने एक जुना दाखला वापरला. तो ऐकून त्यावेळचे त्याचे  श्रोते आतल्या आत दचकले असतील: “मग त्याने […]

मुलांच्या जीवनात संपूर्ण बायबल कसे आणावे?   जिमी नीडहॅम

  दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एक ब्लॉग वाचला. एक आई आपल्या मुलांसोबत दररोज बायबलचा एक अध्याय वाचत होती. छोट्या मुलांसाठीच्या बायबलमधून नाही तर बायबल मधून. ते अगदी लहान असताना तिने सुरुवात केली आणि आता सर्व […]

माझ्या पापाने त्याला तेथे धरून ठेवले लेखक : ग्रेग मोर्स

उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू येत होते. […]