Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 29, 2020 in जीवन प्रकाश

उगम शोधताना                                                 लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण १५

माझा शेजारी कोण?  लूक १०

डोंगराळ, खडकाळ, जंगलमय अशा १५०० चौ. मैल प्रदेशात फोलोपांची १७ गावे विखुरली आहेत. एका गावात निदान ३५० लोकांची तरी वस्ती आहे. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांची वस्ती डोंगरमाथ्यावर असते. प्रत्येक गावाच्या केंद्रस्थानी एक गावावर अधिकार चालवणारे ‘आज्ञा देणारे केंद्र’ असते. तेथे पुरूषवर्ग असतो. फोलोपा गावाचे इतर गावांशी व परस्परांशी देखील तंटे चालत. ही त्यांची परंपराच होती. काही गावांशी ते मित्रत्वाचे संबंधही ठेवत. त्यांना बाळपणापासून आपले आप्त कोण ते बिंबवले जाते. बक्षीस देणे, हुंडा, मदत, संरक्षण अगर कोणतीही  जबाबदारी यासाठी ते महत्त्वाचे मानले जाई. दुसऱ्या गावात व जमातीत आपली बहीण देऊन नात्यांचे जाळे विस्तृत केले जाई.

शेजाऱ्यांच्या मैत्रीतील दुफळीला बेव्हि म्हणत. तर शत्रुत्वाला बॉएव्ही म्हणत. ऑस्ट्रेलियाने जरी नवीन कायदेकानूंनी व छाप्यांनी दहशत निर्माण केलेली असली तरी शेकडो वर्षांपासूनचे हाडवैर इतक्या सहज नष्ट होणार नव्हते. वोपोसाले येथे विमानाने आलेला अत्यावश्यक गरजांचा व्यापारी माल ताब्यात घ्यायला फुकुटाओंना एक दिवसाची चढण पायी चालत पार करावी लागे. पण फुकुटाओचे वोपोसाले गावाशी शत्रुत्व असल्याने ते तेथे रात्र घालवायला राजी नसत. नवीन सरकार येण्यापूर्वी नुकतेच फुकुटाओच्या लोकांनी जेव्हा सेटे उध्वस्त केले तेव्हा तेथील अवशिष्ट लोकांनी वोपोसालेत आश्रय घेतला होता व त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. तेथे राहण्याची वेळ आलीच तर ते पाळकाच्या घराचा आश्रय घेतात.

शहामृगाचे पंख विकायला त्यांना इरावेला तीन दिवसांची वाट तुडवत जावे लागते. सांबेरिगी व पोले या भिन्न भाषिकांच्या अवघड प्रांतांतून त्यांना जावे लागते. ते पारंपारिक वैरी होते. नंतर दोन मैत्रीची गावे लागत. पुढे इरावेला गेल्यावर काय पुढे वाढून ठेवले आहे याची त्यांना शाश्वती नसे. इरावे हा जिल्हा होता. तेथे विमानतळ, क्लिनिक व  व्यापारासाठी मोठे दुकान होते. आजुबाजूच्या सर्व गावचे लोक तेथे खरेदीला येत असत. त्यात पुरातन काळापासून असलेले शत्रूही असत. पण तेथील सरकारी बंदोबस्तामुळे परिस्थिती आटोक्यात असे. पण जादूटोण्याची दहशत असेच. तेथे मित्रांसोबतच राहून शत्रुंना टाळण्याची खबरदारी घेतली जात असे. जेव्हा मत्तय ५:४३ मध्ये येशू म्हणाला, “आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्यांचा  द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे.” तेव्हा फोलोपा या विधानशी सहमत होणार होते. पण पुढे लगेच जेव्हा “मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा” असे येशू म्हणतो; तेव्हा ही गोष्ट त्यांच्यासाठी क्रांती घडवणारी होती.
त्याच्या पारंपारिक दोन शत्रुंना मी मदत केल्याबद्दल एकदा त्यांनी हरकत घेऊन मला नापसंती व्यक्त केली होती.

हे कोणी वाटसरू आमच्या फुकुटाओमधून जात असता माझ्याकडे काडीपेटी मागायला आले असता मी ती मदतीच्या विचाराने दिली. वास्तविक फुकुटावोत सतत विस्तव पेटता असतो. काडीपेटी केवळ डोंगरात रात्र  घालवायची असल्यासच लागत असे. खरे तर तेथेही ते काडीपेटीशिवाय जाळ तयार करू शकत असत. पण काडीपेटीने काम लवकर होत असे. ह्या लोकांना खरे तर डोंगरावर रात्र घालवायची होती; हे त्या कृतीतून ते सूचित करत असल्याचे मला समजले नव्हते. त्यांचे शत्रुत्व असल्याने त्यांना फुकुटाओतून अतिथी म्हणून काहीच मदत मिळणार नव्हती ह्याची कल्पना असल्याने त्यांनी माझ्याकडून चतुराईने ही मदत मिळवली होती. अर्थात मी त्यांना काहीही झाले तरी मदत दिलीच असती हे नक्की. पण गावकऱ्यांना हे समजताच एका वृद्धाने मला म्हटले की मी ही मदत द्यायला नको होती. मी कारण विचारले असता ती माणसे त्यांचे जुनाट शत्रुत्व असलेल्या हाला गावाची असल्याचे समजले.

लूक १० चा व चांगल्या शोमरोनीचा अभ्यास करताना आम्ही अशा परिस्थितीत होतो. जुना नियम व येशूचा नियम अशा कात्रीत आम्ही सापडलो होतो.

मग पाहा कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?’ त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?” त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस. हेच कर म्हणजे जगशील.”  पण स्वत:स नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला,  “पण माझा शेजारी कोण” (लूक १०: २५-२९)?  माझ्या लक्षात न आल्याने आता गोष्टीत गोष्ट सुरू होत असल्याचे, संभाषणातून स्पष्टीकरण देण्याचे माझ्याकडून राहून गेले व आम्ही पुढे काम चालू केले.

येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मार दिला. आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले” ( लूक १०:३०). आतापर्यंत एक सत्य त्यांना कळले होते की इतर संस्कृतीत लोकांना लुटले जाते पण ठार केले जात नाही.

“ मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला” (लूक १०:३१). त्यांच्याकडचे रस्ते फारच अरुंद असल्याने तो याजक त्या बळी पडलेल्यांना कसा ओलांडून गेला असेल हे चित्र ते डोळ्यांसमोर आणू शकले असतील. “तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला” ( लूक १०: ३२). लेवी म्हणजे कोण याविषयी यापूर्वी त्यांना सांगितले होते.

“मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला” (लूक १०:३३).

आता आम्ही थांबलो व  त्यांचे पूर्वापार हाडवैर असलेल्या शेजारचा प्रांतातील शोमरोन्याविषयी चर्चा करू लागलो. “त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या” (लूक १०: ३४). अचानक आम्ही येथे अडकलो. जखमांसाठी मला शब्द सापडेना. म्हणून परत परत वाचून मी स्पष्टीकरण करू लागलो.

“त्या चोरांनी त्याच्यावर  झडप घातली. त्याला खाली पाडले त्यामुळे त्याला हे सर्व झाले म्हणजे नेमके काय? त्यांनी काय वापरले? त्यामुळे काय झाले?”
“त्यांनी काय वापरले ते सांगितल्याशिवाय त्याला काय झाले ते आम्ही सांगू शकत नाही.’

“का नाही?”

“कारण त्यांनी भाला वापरला असेल तर आम्ही सांगू शकू की त्याच्या घावामुळे काय झाले; बाण वापरला असेल तर तो कोठे रुतला असेल ते आम्ही सांगू शकू. कुऱ्हाड वापरली असेल तर त्यासंबंधी सांगू शकू.”

वचनात त्यांनी काय वापरले ते दिलेले नसल्याने जखमेसाठी शब्द शोधणे कठीण झाले. म्हणून आम्ही कल्पना करू लागलो.

“समजा तो भाला असता तर?”

“तो माणूस जिवंत राहिला का?” एका अनुभवी मनुष्याने विचारले.

“हो; तो जिवंत राहिला.”

“मग तो भाला नसणार कारण भाल्याने तो जिवंत राहिला नसता.”

“मग तो बाण असेल का?”

“नाही. कारण रुतलेले बाण काढले असते. पण तशी नोंद नाही ना?”

“मग तो खंजिर असेल का?”
“खंजिर वापरल्यासही तो वाचला नसता.”

“मग कुऱ्हाड असेल का?”

“कुऱ्हाडीने तर तो जागीच गतप्राण झाला असता.”

“म्हणजे त्यांनी हातांनी मार दिला असेल.” मी म्हणालो.

“नाही. जर त्यांनी लाथा बुक्क्या घातल्या असत्या तर औषध ओतावे असे काहीच उघडले गेले नसते.”

“मग तुम्हाला काय वाटते?”

“तो रक्ताने माखलेला अर्धमेला असा वाटेत पडला होता म्हणजे त्याला लाठ्या, काठ्या दंडुक्यांनी मारले असणार.” आम्ही पुढे लिहिले, “त्याच्या लाठ्यांच्या मारांवर त्याने तेल व द्राक्षारस ओतला.” आणि पुढचे लिहू लागलो.
आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, “ह्याची काळजी घ्या. आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन” ( लूक १०:३४-३५). हे पण सोपे नव्हते. सगळे माझ्याकडे शून्यातून पाहात होते. त्यांना काहीतरी समजले नव्हते. मला समजले की त्यांना ‘उतारशाळा’ हा शब्द समजला नसेल कारण त्यांच्याकडे असा काही प्रकारच नसतो. पाहुणचार अतिथ्य याला स्थान असले तरी त्यांचे राहणे, खाणेपिणे याची गावात स्वतंत्र व्यवस्था करण्याची संकल्पना त्यांच्यामध्ये नव्हती. पैसे देऊन आदरातिथ्य करणे ही संकल्पना तर दूरच राहिली. पण आम्ही पुढे काम करत राहिलो. आता कथेच्या तात्पर्याकडे आम्ही आलो. “तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाच्या शेजारी या तिघांपैकी कोण झाला (लूक १०:३६)? हे लोक आता मला हवे तेच म्हणतील  या खात्रीने त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी मी उत्सुकतेने पाहू लागलो. पण माझा अंदाज साफ चुकला.

“उतारशाळेचा मालक?” अवियामे अली उद्गारला. मी पेचात पडलो.

“ कायदेतज्ञ?” दुसरा कोणी उद्गारला.

मग मला कळले काय समस्या आहे. येशू तीन पात्रांविषयी बोलत होता. याजक, लेवीय आणि शोमरोनी.

येशूचे संपूर्ण संभाषण त्या शास्त्र्यासोबत म्हणजे नियमशास्त्र्याच्या तज्ज्ञासोबत चालू होते. ते स्पष्ट व्हावे म्हणून आम्ही अधिक स्पष्टता आणण्यासाठी लिहिले.  नियमशास्त्राच्या तज्ज्ञाने उत्तर दिले, “ त्याच्यावर दया करणारा तो.”  तेव्हा येशूने त्याला म्हटले, “जा; आणि तूही जाऊन तसेच कर.” व्याकरणाच्या दृष्टीने  हे स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे आमच्या लक्षात आले. आता बायबल खोलीतील सर्वांना कळले की कोण, कोणाला, काय म्हणत आहे; कोणाला कोणत्या प्रकारच्या जखमा होत्या, पाहुण्यांची खास जागा म्हणजे उतारशाळा कशी असते, शोमरोन्याने तेथे उतारशाळेच्या मालकाला का पैसे दिले. आता शेवटचे तात्पर्य आचरणात कसे आणायचे हे त्यांच्या गळी उतरवणे अवघड होते. आपला शेजारी कोण आणि आपला शत्रू कोण? येशूने स्पष्ट केले होते की आपला शत्रू आपला शेजारी आहे. किंवा अधिक स्पष्ट करायचे तर जो अजूनही आपल्याला आपला शत्रू समजतो तो आपला शेजारी आहे.

 

ह्या मूलभूत पण उच्च संकल्पना होत्या. आपण त्या कितपत आपल्याशा केल्या आहेत? तरी मी येथील विश्वासीयांमध्ये प्रगती झाल्याचे पाहिले आहे. ते आपल्या शत्रुंसाठी काहीही कारणास्तव दयेची कृत्ये करण्यास देवावर विश्वास ठेऊन त्यांच्या गावी जातात. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या अनुवादाची स्पष्टता तपासण्यासाठी आम्ही फोलोपांच्या अनेक पूर्वीपासून हाडवैरी असलेल्या गावांमधून सुवार्ता प्रसाराला जात असू. तेव्हा हे लोक निर्भयपणे त्यांच्यात  मिसळून वचन वाचून दाखवत असत. कोणत्याही प्रकारचा जादुटोणा करणाऱ्या शत्रुंना धैर्याने ते प्रभूची प्रीती दाखवत असत. हा तर सुवार्तेचा मुळारंभ, ‘बेटे’ होता.