अक्टूबर 18, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

 प्रकरण २                                          

 सुवार्ता प्रसारासाठी मंडळी ज्यांना पाठवते, त्यांच्यासाठी मिशनरी हा शब्द सध्या प्रचलित आहे. प्रे.कृत्यांमधील पौलाच्या सुवार्ता फेऱ्यांनाही मिशनरी फेऱ्या म्हणूनच संबोधले जाते. इतर देशांच्या तुलनेत विविध संप्रदायांतून, धर्मपीठांतून व देशांतून भारतात मिशन कार्य झाले.  त्यामुळे येथे उदार मतवादी, सनातनी व विविध मतप्रणालींच्या मिशनसंस्था आढळतात. हे मिशनरीही विविध मनोवृत्तीने भिन्नभिन्न प्रकारची कार्ये करणारे होते. त्यात भारतात अनेक धर्म, भिन्न चालीरीती असून प्रत्यक्षात कार्य करताना अडचणी व प्रश्नांचे प्रमाणही भरपूर आहे. गेली २० शतके भारतात मिशनकार्य चालू असूनही ख्रिस्ताच्या शिकवणीच्या फारसा परिणाम झाल्याचे आढळत नाही. खरे तर यरुशलेमातील पहिल्या मंडळीतील लोकांनी भारतात मिशनकार्य सुरू केले. पुढे पाश्चात्य, मध्ययुगीन, युरोपियन, अमेरिकन, कॅथोलिक अशा सर्व मंडळ्यांनी भारतात मिशनरी पाठवले. हा मंडळीचा इतिहास फार मनोवेधक आहे. या इतिहासातून आधुनिक मंडळ्यांनी स्फूर्ती घ्यायला हवी. या इतिहासातून हे लक्षात येईल की येशूने पाठवलेल्या प्रेषितांकडून येशूच्या आदेशानुसार अचूक काम झाले तसे मंडळ्यांनी पाठवलेल्या सर्वच प्रेषितांकडून झालेले आढळत नाही. त्यात चढउतार आढळतात. हे तुमच्या लक्षात येईलच. आजवर हजारो मिशनरी येऊन गेले. त्या सर्वांचाच इतिहास तुम्हाला उपलब्ध होईल असे नाही. तरी काही व्यक्ती ठळकपणे उठून दिसतात. त्यांनी कसे लक्षणीय कार्य केले हे आपण पाहणार आहोत.

येशूच्या खुद्द बारा शिष्यांपैकी दिदुम म्हटलेला थोमा भारतात सुवार्ताप्रसार करून गेला ही गोष्ट भारतीय मंडळीसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. एक लक्षणीय बाब म्हणजे प्रभूच्या कार्यानंतर प्रेषितांच्या कार्याच्या  तपशीलाची नोंद कोठेच केलेली आढळत नाही. १) भारतीय आध्यात्मिक २) धर्मपीठांच्या आख्यायिका ३) पुराणवस्तू संशोधनाचा आधार त्यांच्या कार्याला पुष्टी देतात. त्यांचा आपणही आढावा घेणार आहोत. त्यातही अडचण अशी की दक्षिणेत सिरियन चर्चवरील आपत्तीत अनेक दस्तऐवजांसोबत थोमाविषयींच्या नोंदीही नष्ट झाल्याचे हे लोक दावा करतात. पण दृश्य गोष्टी व आख्यायिकांमध्ये तफावत आढळत नाही. तरीही लेखी पुरावे नष्ट झाले ही फार मोठी हानीच म्हणावी. त्यामुळे त्याने कोणत्या परिसरात काम केले याच्या नोंदी प्राप्त होत नाहीत.

व्हेनिसचा युरोपियन प्रवासी मार्को पोलोच्या (सन १२८८) व अनेक पाश्चात्य प्रवाशांच्या लिखाणात या आख्यायिकांस पुष्टी देणाऱ्या नोंदी आढळतात. सन ८८३ मध्ये डॅनिश लोकांनी लंडनला वेढा दिला असता लंडनच्या राजाने देवाला नवसाची प्रार्थना केली व उत्तर मिळाल्यावर हिंदुस्थानातील थोमाच्या समाधीला नवसाचे दान पाठवल्याचीही नोंद सापडते. परदेशीय प्रवासी भारतात येण्यापूर्वीच आख्यायिकेतील दृश्य पुराव्यांना यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊन बराच काळ लोटला होता हे ध्यानात घ्यावे.

१. भारतीय आख्यायिका

साधू थोमाने मिशनरी म्हणून प्रथम अरबस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. मग तो सोकोत्रा बेटावर गेला. तेथून जहाजाने मलबार किनार्यावरील क्रँगानोर बंदरात इ.स. ५२ मध्ये उतरला. त्याच्या कार्यातून तेथे सात मंडळ्या सुरू झाल्या. पाळकांना दीक्षा देऊन त्यांची त्या मंडळ्यांवर त्याने नेमणूक केली. मग चेन्नईच्या मैलापूर येथे तो आला. तेथील राजाला व त्याच्या परिवारांतील लोकांना बाप्तिस्मा दिला. मग काही दिवस चीनमध्ये काम करून पुन्हा मैलापूरला आला. त्याच्या सेवेला यशच येत गेले. खूप लोक ख्रिस्ती होऊ लागले. पण त्यामुळे त्याच्यावर ब्राम्हणांचा रोष ओढवला. त्याला विरोध करीत त्यांनी खूप गोंधळ माजवला. एकदा ते त्याचा पाठलाग करीत असता तो टेकडीवरील गुहेत शिरला. ती टेकडी आज यात्रेचे ठिकाण आहे. दुसरा पुरावा म्हणजे त्याला तेथे पुरले ती कबर. त्या कबरेवर संत थोमाच्या नावे मंदिर उभे आहे. या मंदिरात पुरातनकालच्या वस्तूंचा संग्रह, ज्या पेटीत थोमाच्या अस्थी ठेवल्या होत्या ती पेटी व ज्या भाल्याने त्याला भोसकले, त्या फाळाचे टोक जतन केले आहे. आजही ही आख्यायिका याच शब्दात जतन केलेली आढळते.

२. मंडळीतील धर्मपीठांच्या आख्यायिका

सर्व ठिकाणी येशू आपल्या प्रेषितांच्या सन्निध असे याविषयी त्यांच्या आख्यायिका प्रचलित आहेत. चौथ्या शतकातील जेरोम इतिहासकारही तसे उल्लेख करतो. सिरीयन मंडळीचे युफ्रेटिस नदीवरील एडेसा येथे धर्मपीठ होते. दुसऱ्या शतकात तेथे मंडळी स्थापन झाली. त्यांच्या आख्यायिकेनुसार त्यांचा राजा काळा अगबार याने येशूची कीर्ती ऐकून येशूला आमंत्रण पाठवले. त्यावर  ‘तुमच्या निमंत्रणानुसार मी स्वतः न येता माझ्या स्वर्गारोहणानंतर माझ्या शिष्यांना तुम्हाकडे पाठवीन.’ असे येशूने उत्तर पाठवले अशी आख्यायिका आहे. त्यानुसार थोमाने थडीयसला एडेसा येथे पाठवले, अशी आख्यायिका ते सांगतात. ही मंडळी थोमाला फार मानत असे. प्रेषितीय कामावर त्यांनी लिखाणही केले. थोमाच्या अस्थी भारतातून त्यांनी एडेसाला नेल्याची आख्यायिकाही ते सांगतात. ते ग्राह्य मानले जाते.

थोमा व सुवार्ता

३. काही जुन्या ग्रंथातील आख्यायिका

थोमाविषयीच्या ग्रंथावरून ते काय म्हणतात हे आपण पाहू. येशूच्या स्वर्गारोहणानंतर सर्व शिष्य यरुशलेमात जमले. चिठ्ठ्या टाकून त्यांनी आपापली कार्यक्षेत्रे निश्चित केली. थोमाच्या वाट्याला भारत आला. तो त्यासाठी फारसा राजी नव्हता. पण उपाय नव्हता. दुसऱ्याच दिवशी अब्बानेस नावाचा हिंदी व्यापारी यरुशलेमच्या बाजारपेठेत आला. भारतातून गोंडाफोरस राजाने चांगला सुतार खरेदी करण्यासाठी त्याला पाठवले होते. तेव्हा मानवी वेशातील येशूने थोमाला विकले. अब्बानेसने थोमाला विचारले, ‘हाच का रे तुझा धनी? थोमाने उत्तर दिले, ‘होय, तोच माझा प्रभू आहे.’ अब्बानेसने त्याला गोंडाफोरसच्या दरबारी हजर केले. राजाला एक मोठा महाल बांधायचा होता. त्याविषयी त्याने थोमाबरोबर चर्चा केली. खूष होऊन त्याला महाल बांधायला भली मोठी रक्कम दिली.

थोमा दरबारातून निघाला. त्याने आसपासच्या गावात सुवार्ताकार्य केले. राजाने दिलेल्या धनातून दीन, गोरगरीब, दुबळ्यांना मदत केली. पैसे संपल्यावर राजाकडून आणखी घेतच राहिला व असेच काम करीत राहिला. महाराजांना महाल कोठे दिसेना म्हणून त्यांनी थोमाला दरबारी बोलावून विचारणा केली, ‘तू महाल बांधलास का? न गांगरता त्याने उत्तर दिले, ‘होय, पण तो तुम्हाला आता दिसणार नाही. हा इहलोक सोडून गेल्यावरच दिसेल.’ हे ऐकताच राजा क्रोधाने लाल झाला. त्याचे उत्तर लबाड वाटून त्याला फाशीची शिक्षा ठोठावून तुरुंगात धाडले.

अशी आख्यायिका आहे की, त्याच रात्री राजाचा भाऊ गाद याला अचानक देवाज्ञा झाली. प्राण जाताच एका देवदूता समवेत जात असता त्याला एक भव्य महाल दिसला. त्यात राहण्याची त्याने देवदूताला विचारणा केली. पण देवदूताने म्हटले, “त्या ख्रिस्ती माणसाने तो त्याच्या भावासाठी बांधला आहे. त्यात तुला राहता येणार नाही.” तेव्हा थोमाच्या फाशीविषयीचा त्याला सर्व उलगडा झाला आणि ‘तातडीने माझ्या भावाला याविषयी सांगायला मला पृथ्वीवर धाडा’ अशी त्याने देवदूताला विनवणी केली. ती त्याने मान्य केली. दफनविधी समयी त्याच्या आत्म्याने कलेवरात प्रवेश केला. राजा त्याला पाहून चकित झाला. त्याने राजाला महालासंबंधी नेमके काय घडले याचा खुलासा केला. राजाने त्वरेने थोमाला तुरुंगातून बाहेर काढले व त्याची क्षमा मागितली. त्याने ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.

त्यानंतर थोमा मिसद्युस नावाच्या हिंदुस्थानी राजाच्या दरबारी गेला. त्याच्या राणीने व परिवाराने ख्रिस्ताचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेतला. त्यामुळे राजाने त्याला देहांत शासन केले.       

जरी या आख्यायिका आहेत तरी त्यांच्या वृत्तांतावरून निष्कर्ष निघतो की:

१) थोमाने अविभक्त हिंदुस्थानात सेवा केली याला दुजोरा मिळतो.
२) गोंडाफोरस व मिसद्युस या राजांची नावे हिंदुस्थानी राजांच्या नामावलीत असल्याने वृतांताला पुष्टी मिळते.
३) १९ व्या शतकात गोंडाफोरस राजाच्या मुखवट्याची नाणी पुराणवस्तू संशोधनाच्या उत्खननात सापडल्याने
    वृत्तांतास पुष्टी मिळते. तो इ.स. २१-६० पर्यंत गादीवर होता.
४) ते कार्यक्षेत्र पंजाब असल्याचा ते निर्वाळा देतात.
५) मिसद्युस हा हिंदुस्थानचा दाक्षिणात्य राजा होता. मैलापूर त्याच्या राज्यात होते. तेथेच थोमाची हत्या झाली.
    याविषयी भरपूर पुरावे असल्याचे ते सांगतात.

साधू थोमाचा संदेश काय होता?

ख्रिस्ताविषयीची सत्ये, त्याच्या पुनरुत्थानाचे सत्य हा त्याच्या सुवार्तेचा गाभा होता. त्यावरच तो संदेश देई. ‘तुझ्याजवळचे असेल नसेल ते विकून गरीबांना वाटून दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात साठवा. स्वर्गाचे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून माणसाने या भूतलावर असताना धनावर भिस्त ठेवू नये. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी माशासारखे तडफडावे हे त्याच्या संदेशाचे सार होते. मरतेसमयी त्याच्या तोंडून उद्गार निघाले, ‘माझा प्रभू माझा देव.’

आज प्रभू येशूच्या संदेशाची भारताला गरज आहे. पुनरुत्थित व वैभवी ख्रिस्ताला थोमाने उंचावून दाखवले. ख्रिस्ताचा प्रकाश पाडण्याचे काम त्याने केले. चर्चनेही तेच करायचे आहे. थोमाने मूर्तिपूजा व त्याच्या परिणामांवर टीका न करता फक्त ख्रिस्ताला उंचावले. आपणही ख्रिस्ताचे देवत्व लोकांच्या बुद्धीला पटवून अंतःकरणावर ठसवायचे आही. इतर असत्य गोष्टी आपोआप गळून पडतील. प्रभूपुढे कशाचाच टिकाव लागत नाही. ‘माझा प्रभू माझा देव’ हीच साक्ष मंडळीने आपल्या बोलण्यातून व आचरणातून भारतापुढे सादर करायची आहे. हे आव्हान थोमा मंडळीसमोर ठेवत आहे.

Previous Article

भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास

Next Article

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

You might be interested in …

संपादकीय

ख्रिश्चन जीवन प्रकाश वाचण्यामध्ये तुम्हाला आनंद लाभत आहे अशी माझी खात्री आहे. हा अंकही नेहमीप्रमाणेच विविध प्रकारचे लेख, वृत्त, मुलांचे पान अशा सदरांनी युक्त असून या नव्या वर्षात पाऊल टाकताना तुम्हांला प्रेरणादायी ठरेल अशी आशा […]

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स

  ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात? •           हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित […]

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना लेखक : स्कॉट हबर्ड

वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात. अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी आपण खूप […]