इ.स. १५०६ ते १५५२
प्रकरण ६
आधुनिक काळात स्थापन झालेल्या मिशनांपूर्वी आलेल्या मिशनरींपैकी ज्यांची छाप भारतातील ख्रिस्ती जगतावर पडली अशा दोन व्यक्तींची नावे घेतली जातात. प्रेषित थोमा आणि सोळाव्या शतकातील फ्रान्सिस झेवियर, थोमाला ‘भारताचा प्रेषित’ तर झेवियरला ‘इंडिजचा प्रेषित’ म्हणतात. मृत सत्पुरुषांना अवास्तव महत्व देण्याची कॅथोलिकांची प्रथा आहे. त्यानुसार त्याच्या नावे प्रार्थना करणे, यात्रा भरवणे, चांदीच्या पेटीत प्रेत जतन करणे अशा प्रकारची फाजिल उदो उदो करण्याने व त्याला मूर्तिपूजेचे स्वरूप दिल्याने त्याचा खरा थोरपणाच त्यांनी झाकून टाकला आहे. त्याला स्वतःला हे कदापि रुचले नसते. त्याच्या लिखाणातून त्याने दिलेल्या आपल्या कार्याच्या अहवालाद्वारे त्याच्या चारित्र्यावर प्रकाश पाडतो, या नोंदी १९व्या शतकात जगासमोर आल्यानेच कॅथोलिक पंथाच्या नसलेल्या जनतेला त्याचा खरा परिचय झाला. त्यामुळे ख्रिस्ती कार्याला वाहून घेणाऱ्यांना त्याच्या जीवनाचे महत्त्व पटून ते त्यापासून अनेक धडे शिकून त्याच्याकडे आदराने पाहू लागले. त्याच्याविषयीची ही भावना आजही टिकून आहे. मिशनरी वृत्ती कशी असावी हे शिकवण्यासाठी आपणा सर्वांना त्याचा परिचय व्हावा हाच या अभ्यासाचा उद्देश आहे. विश्वासणारी प्रत्येक व्यक्ती कोणताही व्यवसाय करत असली तरी ती आपापल्या ठिकाणी ख्रिस्ताची मिशनरीच आहे. म्हणून केवळ पूर्ण वेळ सेवेत असणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्वच ख्रिस्ती विश्वासियांसाठी त्याचे जीवन जे मोलाचे धडे देते, ते आपण शिकू या.
पिरिनीज पर्वताच्या पायथ्याशी नॉर्वेमध्ये सृष्टी सौंदर्याने नटलेल्या झेवियर नावाच्या किल्ल्यात फ्रान्सिस झेवियरचा १५०६ मध्ये जन्म झाला. तो राजघराण्यातील असल्याने नॉर्वेच्या दरबारात हौशी व तरुण सरदार म्हणून वाढला. १८व्या वर्षी पॅरिसमधील कॉलेजात तो चमकला. उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून ९ वर्षे तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून तो समाजप्रिय होता. तोवर त्याच्या शिक्षणाचा धर्माशी काहीही संबंध आला नाही. तो पाळक होईल असे तेव्हा कोणालाही वाटले नाही. मात्र ऐहिक गोष्टींमागे लागलेल्या जगताशी त्याचा संबंध आल्याने पुढे या गोष्टींचा त्याला फायदाच झाला; कारण तो कोणाशीही सहज जुळवून घेऊन समरस होऊ शकला; त्यामुळे पुष्कळ लोक प्रभूकडे येऊ शकले.
तो लूथरच्या धर्म सुधारणांच्या चळवळीचा काळ होता. नॉर्वे, फ्रान्स, पॅरिस, जर्मनीत त्यांचे काम जोरात सुरू होते. ख्रिस्ती शिक्षण देण्यात पाळक फारच रुची घेत होते. प्रसिध्द जॉन कॅल्विन वचनाचे उत्तम विवेचन करत होता. त्यांच्याशी झेवियरचा अजिबात संबंध आला नसेल असे आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांच्या सुधारित शिक्षणाकडे या तत्त्ववेत्याचे मन आकर्षिले गेले होते. पण कॅथोलिक इग्नेशस लॉयलाशी त्याची घनिष्ठ मैत्री जडली, ही जरा खेदाची गोष्ट घडली. त्यामुळे वरील खऱ्या सुवार्तावादी लोकांपासून तो दूर राहिला.
हे घडले नसते तर देवाच्या वचनाच्या सत्य व सखोल ज्ञानाने भरलेला सेवक म्हणून त्याची सेवा झाली असती. योग्य पद्धतीने योग्य ज्ञान देऊन ती कायमस्वरूपी उत्तम फळ देणारी सेवा मंडळीच्या दृष्टीने फार मोलाची ठरली असती.
पण तसे झाले नाही. इग्नेशस लॉयलाने जी रोमन कॅथोलिक मंडळीत सेवा केली त्यामुळे धर्मसुधारणा कार्याचे फार नुकसान झाले. जेसुइट पंथ स्थापण्याच्या प्रयत्नात तो होता. याच पंथाने लॅटिन देशातून धर्मसुधारणेचे उच्चाटन केले. या लॉयलाने या सक्षम, चरित्र्यशील व कुलीन झेवियरला हेरले व घट्ट धरून ठेवले आणि आपला मनसुबा पूर्ण होईपर्यंत त्याला विश्रांती म्हणून लाभू दिली नाही. ज्या सात सहकाऱ्यांना घेऊन त्याने जेसुइट पंथाची स्थापना केली, त्यात झेवियरला त्याने गोवले होते. हाती घेतलेल्या कार्यासाठी वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी, उत्साह त्याच्या ठायी होता. ह्या वृत्तीत त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. त्याच्या जीवनावरून आपल्याला हाच धडा मिळतो की देवाच्या सेवकांच्या संगतीत तुम्ही राहिला नाही, तर देवाच्या कामाला विरोध करणाऱ्यांमध्ये तुम्ही सहज कसे अडकाल हे सांगता येणार नाही व त्याचे मंडळीवर दूरगामी दुष्परिणाम होतील.
आपल्या पंथाचे कार्य दूरदेशी करण्यासाठी लॉयलाने झेवियरची निवड केली होती. त्याला तो आनंदाने मान्य झाला. तेव्हा पोर्तुगालची भारतात सत्ता रोवण्याला ४० वर्षे उलटून गेली होती. त्यांच्या भरभराटीच्या काळात आपल्या
सत्तेसोबतच चर्चमध्येही भारताला आणण्याची त्यांना उत्कंठा होती. पण त्यासाठी त्यांनी स्वीकारलेले मार्ग आपल्या दृष्टीने साफ चुकीचे होते. पण जबाबदारीने ते त्यांना करावेसे वाटले ही गोष्ट स्तुत्य आहे. प्रोटेस्टंटांना जे तोवर जमले नाही ते त्यांनी केले. सैन्याला कुमक म्हणून ते सैन्य पाठवीत, तेव्हा त्यांच्या काफिल्यासोबत त्यांच्या पंथांचे सेवकही पाठवीत. जेथे त्यांची व्यापारपेठ सुरू होई तेथे ते चर्च व मठही बांधत.
त्या भागात जुलमाने सुवार्ताप्रसार करीत इ.स.१५३४ मध्ये गोव्याला धर्मप्रांताचा अधिकार मिळाला. तेथील बिशपच्या हाताखाली अनेक पाळक नेमण्यात आले. इ.स.१५४१ मध्ये दोन सहकाऱ्यांसोबत झेवियर भारतात आला. राजाने देणग्यांचा पाऊस पडला आणि व्हाईसरॉय सोबत त्याची बडदास्त ठेवण्याचे फर्मान पाठवले. त्याला येथील सर्व मंडळ्यांवर व मिशनऱ्यावरील प्रमुख अधिकारी नेमले. त्याच्या उदर निर्वाहाची उत्तम व्यवस्था होती. पौर्वात्य देशांची पुराण मतवादाला चिकटून राहण्याची वृत्ती त्याला माहीत नव्हती. सहज आपण लोकांना ख्रिस्ती मंडळीत आणू असे त्याला वाटले. आध्यात्मिक पावित्र्य आस्था याबाबत तो अतिशय दक्ष होता. आपल्यातील दोष सेवेस अडखळण ठरू नये म्हणून ते जपत होता. स्वतःला हलके लेखणे, ऐहिक लाभ व हक्कांवर पाणी सोडणे, स्वार्थाकडे ढुंकूनही न पाहण्याची वृत्ती आपल्या सेवकांनी व सर्व विश्वासी जनांनी आपल्या ठायी आहे का याचे परीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या समाजात प्रत्येक ख्रिस्ती संस्थेतील पुढारी सेवकवर्ग यांच्यात या वृत्तीचा अभाव असल्याने भ्रष्टाचार व अंदाधुंदीचे साम्राज्य माजल्याचे आपण पाहातो. म्हणूनच झेवियर आजही आधुनिक काळातील आपल्यासाठी आदर्श म्हणून उठून दिसतो.
६ मे १५४२ हा भारतीय इतिहासातला अविस्मरणीय दिवस. १३ महिन्यांच्या प्रवासानंतर झेवियर या दिवशी गोवा या पोर्तुगीजांच्या राजधानीत उतरला. व्हाइसरॉयचे वास्तव्य येथे असल्याने येथे असल्याने तेथे पोर्तुगीज लष्करी, मुलकी अधिकाऱ्यांची गजबज व चैनबाजी होती. भारतीय व पोर्तुगीज आंतरविवाहातून जन्मलेली प्रजा होती. बळजबरीने बाप्तिस्मा देऊन सैनिकांनी येथील स्त्रियांशी विवाह केले होते. या विधीचे त्यांना काहीही ज्ञान नव्हते. पण आपल्या देशातून सैन्य न आणता अशाच प्रकारची धर्मांतरे गोव्यात सर्रास चालत. तेथे भव्य मंदिरे, मठ व सेमिनरीही होती. या कॉलेजचा ताबा झेवियरने घेतला. पुढे ते जेसुइटांच्या मालकीचे झाले.
पण झेवियरला त्याच्या लोकांमध्ये नव्हे तर विधर्मी भारतीयांमध्ये सेवा करायची होती. तो त्याचा हेतू पूर्ण होऊ शकत नव्हता. म्हणून सर्व भारतीय रीतिरिवाज शिकायला पाचच महिने पुरेसे समजून तेथे त्याने काम सुरू ठेवले. करपून टाकणाऱ्या उष्ण देशात कायम वस्ती करणे, देवाच्या कामासाठी हाल अपेष्ठा सोसणे यातच तो स्वर्गप्राप्ती मानत होता. वधस्तंभावर खरे प्रेम करणाऱ्यांना प्रभूसाठी हलाखीचे जीवन जगणे सुखद असते ही त्याची खात्री होती. स्वैरवर्तनाने मरण्यापेक्षा ख्रिस्तासाठी महत्वपूर्ण जीवन जगून मरणे तो उच्च समजत होता. स्वतःच्या इच्छेपेक्षा ख्रिस्ताच्या इच्छेचा ध्यास घेण्यात त्याला सुख वाटत होते.
या मनोवृत्तीने तो भारतात आला. शंखातून मोती काढणाऱ्या तुतिकोरीन मधील गरीब कोळ्यांसाठी तो दोन वर्षे खपला. त्याचा दरबार किंवा पॅरीसच्या सुखवस्तू जीवनापेक्षा हे जीवन अगदीच वेगळे होते. पण सर्वच मिशनऱ्यांचा हाच अनुभव होता. व्हाइसरॉयला येथेच पोर्तुगीजांची पाळेमुळे रुजवायची होती. या कोळ्यांना चाचेगिरी पासून संरक्षण दिल्याने हे कोळी पोर्तुगीजांचे सार्वभौमत्व मानू लागले व स्वतःला पोर्तुगीज प्रजा समजू लागले. ख्रिस्ती धर्म विश्वास स्वीकारणेही त्यांना मान्य होते. वाझने त्यांच्यामध्ये काम करून पुष्कळ बाप्तिस्मे दिले होते. ते काम पुढे झेवियरने पूर्ण करायचे होते. सुसंस्कृत युरोपियनांमध्ये सहा महिने काम केल्यावर या कोळ्यांमध्ये झेवियरने काम केले. ते कसे केले?
परभाषा शिकण्याची कला त्याला नव्हती. त्यामुळे तमिळ भाषा शिकणे त्याला जिकरीचे झाले. भारतात पाऊल टाकताच त्याने धर्मसिद्धांत संग्रह (मतांगिकार) प्रभूची प्रार्थना, मरीयेचे स्तोत्र, दूतांची प्रार्थना, दहा आज्ञांचे तामिळमध्ये भाषांतर करून घेऊन ते तोंडपाठ केले. वर्षभर या जिल्ह्यातील ३० खेड्यांमध्ये आळीपाळीने त्याने प्रत्येकी १५ दिवस घालवले. घंटा वाजवून तो जमाव जमवीत असे. दिवसातून दोन वेळा हेच पाठ केलेले त्यांना शिकवून पाठ करून घेत असे. त्यांना ते इतरांकडून पाठ करून घ्यायला सांगत असे. दर रविवारी मंदिरात त्यांना जमवत असे. ते उत्कंठेने जमून त्याचे पाठांतर ऐकून घेत. धर्म सिद्धांताचा प्रत्येक मुद्दा म्हणून घेतल्यावर यावर तुमचा विश्वास आहे का? काही शंका नाही ना? असा प्रश्न करीत असे. हे सर्व पाठांतर झाल्यावर तो त्यांना बाप्तिस्मा देत असे. आपण केलेले काम टिकून राहावे म्हणून तो कोणाला तरी त्या खेड्यावर नेमत असे. त्याला व्हाइसरॉय कडून मुशहरा ठरवून दिला होता. एका वेळी त्याने दहा हजार बाप्तिस्मे केले होते. बाप्तिस्मा देणे हा त्याचा मुख्य उद्देश असे. त्यात त्याला समाधान असे आणि भाषेच्या अडचणीमुळे आपण त्यांच्या भाषेत संदेश देऊन विवेचन करू शकत नसल्याची त्याची खंत दूर होत असे. दुभाष्याशिवाय काम करणे त्याला गैरसोयीचे व अवघड होते. त्याचे बोलणे श्रोत्यांना व श्रोत्यांचे बोलणे त्याला समजत नसे. पण तरीही तो कामात फार व्यस्त होता. स्त्रिया अर्भकांना बाप्तिस्म्यासाठी घेऊन येत. उपाशी, दरिद्री यांची सेवा करायला त्याने स्वतःला वाहून घेतले होते. त्यामुळे आपला वेळ वाया जात नाही अशी तो स्वतःची समजूत करून घेत असे. तेव्हाच त्याच्या मनातील अडचणींची सल कमी होत असे.
एक वर्षभर ज्या आस्थेने त्या पाणबुड्यांमध्ये त्याने काम केले, ती आस्था डोळ्यात भरण्याजोगी आहे. त्यानंतर त्याने त्रावणकोरमध्ये काम केले. तेथेही मंडळी वाढली तरीही तो पारदर्शकतेने सांगतो की, ख्रिस्ताचा स्वीकार करून देखील ही मंडळी बाल्यावस्थेत आहे. तरी पूर्वीपेक्षा त्यांच्यातील दोष कमी झाल्याचे त्याला आढळले. आपल्या सहकाऱ्याला तो म्हणतो, “या देशात काम करताना देव तुला धीर व सामर्थ्य देवो. मी पूर्वीच्या दुष्कृत्यांचा झाडा देऊन क्षालन करीत आहे अशा वृत्तीने वाग, दुर्वर्तनी मुलांशी एखाद्या बापाने वागावे, तसे या लोकांशी वाग. त्यांच्यात कितीही दुष्टपणा आढळला तरी निराश होऊ नको. हे असंस्कृत अडाणी, पृथ्वीतील गाळ, खरवड आहेत असे समजून कळवळ्याचे वर्तन ठेव. अशी मी तुला हात जोडून विनंती करतो.” तरीही काळ लोटू लागला तशी भारतातील ख्रिस्ती जगताविषयी त्याची आशा मावळू लागली. तीन वर्षे लोटल्यावर सिलोनच्या उत्तरेकडे त्याने लक्ष वळवले. पण त्यातही त्याला यश आले नाही. व्हाइसरॉयने ते स्वारी करून जिंकण्याचा प्रयत्न केला. तोही फसला आणि बहुसंख्य लोक ख्रिस्ती करण्याची योजना धुळीस मिळाली. मग हिंदी महासागरातील बेटांकडे त्याने मोर्चा वळवला. तीन वर्षांनी सर्वत्र पाळक नेमून त्याने भारत सोडला. त्याबद्दल त्याच्यावर टीकाही झाली. कारण तो पौर्वात्य धर्मप्रांताचा कर्णधार होता. बेटांवरही त्याने वरील पद्धतीनेच सेवा केली. त्यात यशही आले. तीन वर्षांनी तो भारतात परतला.
त्याची कार्यपद्धत चुकीची असली तरी त्याची मनोवृत्ती व ख्रिस्तावरील निष्ठा आपल्याला लाजवणारी आहे. व आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. आपण मरगळ टाकून आवेशाने सेवा करायला उद्युक्त करणारी आहे.
जपानहून परतल्यावर झेवियरने भारतातील जे मिशनरी अयोग्य व नालायक असल्याचे सिद्ध झाले, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना बडतर्फ केले. काही कार्यकर्त्यांची कानउघडणी केली व कडक इशारा दिला. ह्यात त्याने कसलीच तडजोड केली नाही. काहींची पत्राद्वारे खरडपट्टी काढली. एका फादरला असेच कडक पत्र लिहिल्यावर स्वहस्ताक्षरात खालील मजकूर लिहिला तो असा –
“माझ्या लिखाणावरून माझे तुमच्यावर किती प्रेम आहे, याची तुम्हाला कल्पना आली असेल तर तुम्ही माझे आभारच मानाल. तुम्हाला भेटण्याची मला किती उत्सुकता व तळमळ लागली आहे; हा विचार मनात आल्यास तुमच्या डोळ्यांत अश्रूच येतील. मला आपले ह्रदय उघडून दाखवता आले असते तर किती बरे झाले असते. माझ्या अंतःकरणातील तुमचे स्थान तुम्हाला कळले असते. कुशल असो.”
आपल्या चुकलेल्या सहकाऱ्याबद्दलची त्याची ही वृत्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. या सर्व कामी झेवियरला शारीरिक, मानसिक, बौद्धिक परिश्रम पडले. पण त्याविषयी तो चकार शब्द काढत नाही. आपल्या मिशनऱ्याच्या अंगी सेवेविषयी आस्था, निष्ठा, स्वार्थत्याग, भक्ती हे मूलभूत गुण जोपासले जावेत, हीच त्याची कळकळ होती. आपण लोकांपुढे आदर्श ठेवावा याला तो महत्व देत असे. लोकांची अपेक्षा हीच असते की, तुम्ही सौम्यतेने वागवून त्यांच्यात सुधारणा घडवावी, हेच तो आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
तीन महिने या प्रकारे सर्व ठाकठीक करण्यात घालवून १५५२ च्या एप्रिल महिन्यात तो गोव्याहून चीनकडे निघाला, ते भारतात परत न येण्याच्या निर्धारानेच! पोर्तुगालच्या राजाला त्याने पत्र लिहिले की, ‘चीनच्या बलाढ्य, रानटी राजाकडे सत्याचा संदेश घेऊन जाण्यास देवानेच मला बुद्धी, सामर्थ्य व धाडस दिले आहे. देवाचे गौरव होण्याखेरीज दुसरे काहीच मला सुचत नाही. देवाच्या अमर्याद कृपेवर माझी निष्ठा आहे. जगातील सर्व राज्यांपेक्षा देव सामर्थ्यशाली आहे; या खात्रीने मी आपल्या देवाच्या दयेवर विश्वास ठेवतो.’
चीनमध्ये ख्रिस्ती मिशनरी म्हणून जाण्यास त्या देशाची परवानगी नसल्याने परवानगी यथावकाश येईलच या खात्रीने परवानगी हाती पडली नसताही तो प्रवासाला निघाला. पण या वकीलातीस पोर्तुगीज गव्हर्नरने परवानगी दिली नाही व त्याला पुढील प्रवासास मनाईही केली. याविषयी त्याने गव्हर्नरपुढे आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे गव्हर्नरने झेवियरला बडतर्फ करण्याची वरिष्ठांस विनंती केली. झेवियरला खूप विरोध झाला. तरीही मालवाहू जहाजातून उरलेला प्रवास करण्यासाठी त्याने जागा मिळविली. चीन जवळील बेटावर तो उतरला. समोर चीन दिसत होते. पण प्रवेश करण्याबाबत विचार करण्यात त्याला बरेच आठवडे घालवावे लागले. शेवटी ३०० पौंड लाच घेऊन एक व्यापारी त्याला घेऊन जाण्यास कबूल झाला. तरी ऐनवेळी त्याने माघार घेतली. सोबतच्या अदीक्षित बंधुनेही त्याला तोंडघशी पाडले. त्या रुक्ष बेटावर झोंबणाऱ्या थंड वाऱ्यांनी तो मेटाकुटीस आला. धैर्य खचले, शरीरात त्राण उरले नाही. ताप भरला. झाडांच्या डहाळ्या शाकारून बनवलेल्या बांबूच्या झोपडीत तो राहू लागला. उन्हापासून वा दंवापासूनही त्याचे रक्षण होत नव्हते. शुश्रुषा करायला जवळ कोणी मायेचे माणूस नव्हते. शेवटी पोर्तुगीज व्यापाऱ्यांना तो शेवटच्या घटका मोजत असता तेथे आढळला. प्राणोत्क्रमणाची वेळ आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकू लागले. “मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी कदापि फजित होणार नाही” असे म्हणत २ डिसेंबर १५५२ रोजी तो सार्वकालिक सुख भोगावयास निघून गेला. प्रतिकूल परिस्थितीपुढे न झुकता काम करण्याचे या मिशनरीचे सर्व परिश्रम कायमचे थांबले.
त्याच्या आयुष्यातील दहा वर्षांच्या कार्य-काळातील अवघी साडेचार वर्षे भारताच्या वाट्याला आली. पण त्याच्या इतकी प्रसिद्धी तेव्हाच्या कोणा मिशनरीच्या वाट्याला आली नव्हती. मिशनरी व्यवस्थापक म्हणून त्याने काम केले. या काळात ४०,००० बाप्तिस्मा पावलेल्यांची मंडळीत भर पडली. त्याच्या चुकीच्या सुवार्ताप्रसार पद्धतीमुळे व बाप्तिस्म्याला दिलेल्या फाजिल महत्त्वामुळे वरपंगी, दिखाऊ, नामधारी, ख्रिस्ती तत्त्वांचे मुळीच ज्ञान नसलेली मनुष्ये घिसाडघाईने मंडळीत आली. हा त्याच्या कार्यातील मोठा दोष असल्याने कॅथोलिक पंथाला उच्चस्थान प्राप्त होऊ शकले नाही. अर्थात हा झेवियरचा नव्हे तर त्याच्या चर्चचा दोष होता. तो तर ख्रिस्ताचा खराखुरा अनुयायी होता. पण कॅथोलिक चर्चने त्याचा वापर केल्याने व त्यांच्या मोहिनीमुळे त्याच्या सेवेत हे दोष दिसतात. त्यामुळेच सेवा करताना झेवियरला खऱ्या सेवेचे समाधान मिळत नव्हते. तो म्हणतो, “१४ वर्षांच्या आत मृत्यू न आलेल्यांपैकी फारच थोड्यांना स्वर्गप्राप्ती झाल्याचे आढळून येईल.” भारतीयांचे वर्णन करताना तो म्हणतो, “भयंकर पापामुळे ख्रिस्ती धर्माचा विषय काढताच तो घ्यायलाही ते तयार होत नाहीत, एवढा त्यांना या विषयाचा तिटकारा आहे. ख्रिस्ती होणे त्यांना सुळावर चढण्याइतके भयंकर वाटते. आहेत त्या ख्रिस्ती लोकांना दृढ राखणे आपले काम आहे. येथील लोकांच्या अंध पध्दती, पूर्वग्रह, रीतीभाती ख्रिस्ती मार्गातील धोंड आहेत.” खरेखुरे ख्रिस्ती लोक घडवणे अशक्य असल्याचे पाहूनच त्याने लवकर भारत सोडला. ख्रिस्ती मंडळीला त्याच्याकडून झालेले फायदे आपण पाहू.
झेवियरचे ख्रिस्ती मंडळीला झालेले फायदे
झेवियरचे कार्य मिशनरी चळवळी पुरतेच मर्यादित नसून मिशनच्या व्यवस्थापनाचाही त्यात मोठा वाटा आहे. या बाबतीत त्याला भारतीय मिशन कार्याच्या उत्क्रांतीत अग्रस्थान आहे. मुठभर लोकांच्या कार्याचे स्वरूप पालटून त्याला चर्चने चालवलेल्या कार्याचे स्वरूप आले. तुरळक प्रसंगानुसार चाललेल्या कार्याला झपाट्याने चाललेल्या मिशन कार्याचे स्वरूप आले. एका विशिष्ट पद्धतीने एका केंद्रातून मिशन कार्याचे जोरदार संचलन होऊ लागले. याचे उगमस्थान युरोपात होते. ख्रिस्ती सार्वभौमत्व स्थापन करण्याची पोर्तुगालच्या राजाची महत्वाकांक्षा व जेसुइट सोसायटीने नव्या उत्साहाने केलेले आर्थिक सहाय्य आणि आत्मसमर्पित लोकांचा पुरवठा यांची त्यात भर पडली. पण हे अर्थसहाय्य व या समर्पित लोकांचा उपयोग करून घेण्याच्या नियोजनाचे काम झेवियरवर सोपवले होते. ही कामगिरी त्याने उत्तम रीतीने बजावली. त्यामुळेच त्याची कीर्ती पसरली. तो कॅथोलिक मिशनांचा संस्थापक नाही, पण त्याच्या धोरणानेच पुढे कित्येक वर्षे ही मिशने जोमाने जोर टिकवून राहिली. त्याने अलौकिक बुद्धिमत्तेने धोरणे आखली. त्यामुळे युरोपियन चर्चच्या अंतःकरणात मिशनरी आवेशाची ज्योत पाजळत राहिली. मिशन कार्यपद्धतीच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त ठरणाऱ्या मिशनकार्याकडे पाहाता भावी पिढ्यांना त्याचा फार उपयोग झाला नाही. कारण त्याच्या कार्यपद्धतीला सदोष धर्मतत्त्वे व कर्मकांडांची झालर असलेले धर्मविधी यांना दिलेल्या फाजील महत्त्वाची कीड लागलेली होती. त्याच्या दोन संकल्पनांचा उपयोग झालेला आढळतो. त्या म्हणजे:
१- स्थानिक लोकांना शिक्षण देऊन त्यांच्यात पुढारपणाची क्षमता आणायला त्याने मन:पूर्वक, आस्थेने, यशस्वी प्रयत्न
केले.
२- ख्रिस्ती समाजातील मुलाबाळांची काळजी घेण्यावर त्याने सतत भर दिला. त्याने योग्य वयात मुलांना धार्मिक शिक्षण
देण्यावर भर दिला. नित्यनेमाने मुलांना शिकवता यावे म्हणून खेडोपाडी शाळा बांधण्यावर भर दिला. आपल्या या
उपदेशाप्रमाणे आपल्या हाताखालच्या मिशनर्यांच्या कार्यपद्धतीला वळण लावण्याचा प्रयत्न केला. सर्व मिशनांना
लहान मुलांना शिकवण्याचे धोरण एकदम पसंत पडले.
व्यक्ती म्हणून झेवियर
खरेतर त्याच्या हातून झालेल्या चुका व त्याचे दोष ही त्याला मिळालेल्या धार्मिक शिक्षण प्रणालीचे परिणाम आहेत. म्हणून आपण एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहू या. तो अत्यंत एकनिष्ठ व आस्थेवाईक दिसतो. देवाने त्याला भारताकरता पाचारण केल्यापासून एका ओसाड बेटावर त्याच्या कुडीतील प्राण जाईपर्यंत त्याला एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे मी उत्तम रीतीने मिशनकार्य करावे आणि देवाच्या आशीर्वादाने पुष्कळ जिवात्म्यांचे तारण व्हावे, हीच त्याची प्रार्थना सतत असे. ही पवित्र कामगिरी बजावताना त्याने हाल अपेष्टांना व संकटांना जुमानले नाही. उलट आणखी संकटे येऊ दे, अशीच प्रार्थना तो करीत राहिला. युरोप सोडल्यापासून तेथील कोणत्याही आकर्षणांचा मोह त्याला झाला नाही की त्यांचे सामर्थ्य त्याच्यावर गाजवले गेले नाही. तेथील आप्त, मित्रमंडळ, सहभागिता यांना मुकल्याची खंत किंवा तळमळ त्याने दाखवली नाही. आपण केलेल्या त्यागाचा, आत्मसमर्पणाचा त्याला कधीच पश्चाताप झाला नाही. उलट ती वाढतच गेली. वधस्तंभाची सुवार्ता व त्यामुळे मिळणारे सांत्वन याविषयी घोषणा करायला तो दूर देशी जातच राहिला. या त्याच्या वृत्तीविषयी अत्यंत आदर व कौतुकच वाटते. त्याच्या अंतर्यामातील प्रभूविषयीचे प्रेम ओसंडून वाहताना दिसते. लहान वयातच अन्नवस्त्राबाबत देहदंडन, आत्मशासन घडूनही त्याची प्रकृती ठीक होती. लोकांनी त्याला छळले. त्याच्यावर बाणांचा पाउस पडला, त्याच्या राहत्या घराला आग लावली, त्याची हत्या करण्याचा ३-४ वेळा प्रयत्न झाला, कित्येक रात्री जागरणे करून काढल्या, तेव्हा तो २ तीम: २: ३-४ मधील ख्रिस्ताचा शिपाई शोभून दिसतो. त्याची कर्तबगारी, कळवळा, तळमळ, पाहता तुलनेने तो मार्टिन लुथरच्या तोडीचा वाटतो. लोकांशी तो इतक्या प्रेमाने, सहानुभूतीने, आपुलकीने, आनंदी व प्रेमळ भावाप्रमाणे, विनयाने, सह्र्दयतेने वागे की त्यांना सहज जिंकून आपल्या कार्याकडे तो वळवू शके. त्यांच्या भल्या बुऱ्या सर्व गोष्टीत लक्ष घालून, त्यांच्यात रुची घेऊन त्यांना मोहून टाकीत असे.
एकदा धर्मांतरित लोकांवर टोळीहल्ला झाला असता त्या भेदरलेल्यांचे पुढारपण करीत तो त्या टोळीवर धावून गेला. तेव्हा हल्ला थांबवून टोळीने पळच काढला. यावरून त्याचा बाणा व धैर्य दिसून येते. लोकांच्या पापांविषयी त्याला नेहमी काळजी वाटे. एका पोर्तुगीज बांधवाला त्याच्या पापाची जाणीव करुन देऊन, कानउघाडणी करून देउनही त्याने दाद दिली नाही तेव्हा त्याने स्वत:लाच त्याच्यासमोर पट्ट्याने कंबरेखाली असे बडवून घेतले, की तो भाग रक्तबंबाळ होऊन काळानिळा पडला. त्यानंतर तो त्याला म्हणाला, “ख्रिस्ताने तुझ्यासाठी जे सोसले त्याला या यातनांनी काडी इतकी सर येणार नाही. मग त्या ख्रिस्ताच्या यातना आठवून तुझे मन द्रवत नाही का? ही त्याची कृती तुम्हाला पटो वा न पटो. पण त्याचे उत्कट मनोभाव पहा. मंडळीपेक्षाही त्याचे अंत:करण ख्रिस्ताशी प्राधान्याने निगडीत होते. त्याच्यामधील ख्रिस्ताविषयी असलेली श्रेष्ठत्वाची भावना वाढतच गेली. ज्या वर्षी तो मृत्यू पावला त्यावर्षी लॉएलाला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो “जपानी लोकांचे माझ्यावर अवर्णनीय उपकार आहेत. त्यांच्याद्वारे देवाने माझ्या अंगाच्या असंख्य पापांची मला जाणीव करून दिली आहे. इतके दिवस माझे भटकते मन स्वत:वर विचारच करत नव्हते. पण माझ्यात खोलवर दुष्टतेची गर्ताच होती. तिचा मी कधीच शोध घेतला नव्हता. पण जपानमधील संकट क्लेशांनी माझे डोळे खाडकन उघडले. सर्व प्रकार देवाच्या कृपेने स्पष्टपणे पाहाण्याचे सामर्थ्य मला लाभले.” असे पाप निवेदन करणाऱ्याला कोणताही प्रोटेस्टंट व्यक्ती कडकडून मिठीच मारील. भेदभाव नष्ट करून ख्रिस्तावर प्रेम करणारे त्याच्यात एकरूप होतात.
आपल्याला ख्रिस्ताने दिलेल्या महान तारणाच्या अनुभवाच्या प्रमाणात आपण ख्रिस्ताला किती समर्पित आहोत बरे? ख्रिस्त त्याच्या प्रत्येक शिष्याकडून आपापला वधस्तंभच उचलून घेउनच त्याला अनुसरण्याचे आव्हान करतो हे विसरून कसे चालेल? आवेशी प्रेषितांनंतर बराच काळ उलटून गेलाय आणि आपण शिथिल झालो आहोत. ती शिथिलता झटकून टाकून या बदलत्या जगात प्रेषितांप्रमाणे न बदलणाऱ्या आदर्शांचे ख्रिस्ती जीवन जबाबदारीने जगत ख्रिस्ताला सर्वोच्च प्राधान्य देत कुडीत प्राण असेपर्यंत २ तीम.२:३-१० नुसार समर्पित जीवन जगणेच अपेक्षित आहे. त्यात तडजोडीला वाव नाही, हेच हे मिशनरी आपल्याला निदर्शनास आणून देतात.
Social