( १७२६-१७९८)
लेखांक १२
पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या हातात देऊन आपण हे बालक देवाला समर्पित करीत असल्याचे सांगितले. व त्यांच्याकडून वचन घेतले की जर त्याने पाळक होण्याची इच्छा दर्शवली तर ती पूर्ण करण्यास त्याला प्रोत्साहन देऊन त्याला योग्य ती मदत करावी. हेच बाळ ७० वर्षांनी भारतातील तंजावरमध्ये मिशनरी म्हणून मरण पावले. ते बाळ म्हणजेच ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ होय.
त्याच्या आईप्रमाणे वडीलही देवभीरू असल्याने तो लहानपणापासून गांभीर्याने वागला. पुढे हॅले विद्यापीठात पाळकीय शिक्षण घेतले. झिगेन्बाल्गनंतर भारतात २३ वर्षे सेवा करून मायदेशी परत गेलेला शुल्टझ हा मिशनरी त्याच्या संपर्कात आला. तेथे तो तामिळ भाषेतील नव्या कराराचे काम करायचा. त्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच असल्याने त्यांची चांगलीच गट्टी जमली. श्वार्टझ् त्याला ग्रंथप्रकाशनात मदत करू लागला. त्यासाठी श्वार्टझ त्याच्याकडून तामिळ भाषा शिकू लागला. त्यामुळे त्याची भारताशी नाळ जुळली. भारतीयांविषयी त्याला भरपूर माहिती मिळाली व त्यांच्याविषयी कळकळ व आस्था निर्माण झाली. त्यामुळे मिशनसेवेत जाण्याविषयी त्याला विचारणा झाली तेव्हा वडिलांच्या परवानगीने तो डेन्मार्कच्या ठाण्यावर गेला. तेथे त्याने दीक्षा घेतली आणि झिगेन्बाल्गनंतर ३१ वर्षांनी २० जुलै १७५० रोजी तो भारतात त्रिंकोबारमध्ये दाखल झाला. त्याच्या वयाच्या २४ व्या वर्षापासून पुढे ४७ वर्षे तो मायदेशी एकदाही गेला नाही तर भारत आपलाच देश मानून येथेच राहून अथक सेवा व कष्ट करीत येथेच देह ठेवला.
आतापर्यंत भारतात मिशन सेवा खूप वाढली होती. तोवर बरेच धार्मिक, एकनिष्ठ, विश्वासू मिशनरी येऊन गेले होते. झिगेन्बाल्गनंतर त्याचा सहकारी ग्रंडलर मृत्यू पावल्यावर शुल्टझ् , कोहलॅाफ व फेब्रिक्स् हे महत्त्वपूर्ण काम करणारे होते. शुल्टझ् नंतर १७४२ मध्ये मद्रासचे काम फॅब्रिक्सकडे होते. त्याने तामिळमध्ये बायबलचे भाषांतर पूर्ण करण्याची मोठी कामगिरी पार पाडली. भारतात एका वेळी चार ते आठ मिशनरी काम करायचे. ते खेडोपाडी पायी फिरून सुवार्ता सांगायचे, वाटेत भेटणाऱ्यांना धैर्याने सत्याची घोषणा करायचे व शाळा देखील सांभाळायचे. ते गरीब घरात वाढलेले असल्याने विलासी नसून साधेसुधे व निष्ठेने सेवा करणारे असायचे. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे झिगेनबाल्गच्या वेळी ३५५ बाप्तिस्मा पावलेले ख्रिस्ती होते. ती संख्या आता ८००० वर गेली. श्वार्टझच्या सेवेनंतर मद्रासमध्ये ती संख्या ११००० वर गेली. दोन स्थानिक दीक्षित पाळकही होते. तर प्रश्नोत्तररूपाने शास्त्र शिकवणारे लोक सर्वत्र विखुरले होते. त्या प्रांताबाहेरही मिशनकार्याचे जाळे पसरले होते.
भारताच्या अग्नेयेसही मंडळी स्थापण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. झिगेन्बाल्गच्या पद्घतीनेच सेवेचा गाडा पुढे चालू ठेवण्याची परंपरा मिशनरींनी चालू ठेवून काम खूप वाढवले होते. आधीच तामिळ शिकून आल्याने श्वार्टझ् तर लगेच कामाला लागला. आरंभी तो संदेश वाचून दाखवत असे. पण भाषेवर रोज भरपूर मेहनत घेऊन चार
महिन्यात तो तामिळमध्ये उत्तम उपदेश करू लागला. नवीन वर्ष सुरू होताच फिरतीवर जाऊन शाळेतील मुलांना तामिळ भाषेत सुवार्ता सांगून शिक्षण देऊ शकला. लोकांच्या स्थानिक धर्माची त्याने माहिती करून घेतली. त्याचा सुवार्तेसाठी त्याला खूप उपयोग झाला. पुढे तो इंग्लिश, पोर्तुगीज व त्या काळातील भारतातील फारसी भाषाही शिकला. त्यामुळे त्याचे संपर्कक्षेत्र व्यापक बनले. बुद्धिमत्तेपेक्षाही त्याचे सद्गुण हे त्याच्या यशाचे गमक होते. तो विनयशील, शांतवृत्तीचा, काटकसरी, कनवाळू, समंजस, प्रसन्न, निरागस व आचरणात पारदर्शक होता. म्हणून लवकरच त्याने भारतीयांचे प्रेम व मर्जी संपादन केली. त्याने त्रिंकोबार, त्रिचन्नापल्ली व तंजावर अशा तीन ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये काम केले. त्रिंकोबारमध्ये मिशनरी म्हणून तर त्रिचन्नापल्लीत मिशनकार्याबरोबरच सैनिकांचा चॅप्लन म्हणून आणि तंजावर येथे ही दोन्ही कामे करून सल्लामसलतीची कामेही केली. तिन्ही ठिकाणी हा ख्रिस्ताचा दूत म्हणून उठून दिसतो.
१ ला टप्पा- त्रिंकोबार ( १७५० ते १७६६)
येथे त्याने १६ वर्षे काम केले. त्याची कर्तबगारी अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दक्षिणेकडील सर्व कामांची सूत्रे त्याच्या हाती सोपवली. मिशनरी म्हणून त्याने सर्व कामे व्यवस्थित पार पाडली. त्याचा दिनक्रम असा होता: सकाळ ते दुपार शाळेची कामे व देखरेख करून प्रश्नोत्तर पद्धतीने लोकांना शास्त्र शिकवायचे. जवळच्या खेड्यातील लोक यावेळी त्याच्याकडे एकत्र जमून हे शिक्षण घेत. सहा आठवडे तो त्यांना हे शिक्षण देत असे. दुपारी व संध्याकाळी तो फिरतीवर सुवार्ताप्रसाराला जात असे. त्यावेळी तो ख्रिस्ती लोकांच्याही भेटी घेत असे. तसेच विधर्मी व कॅथॅालिकांशीही संपर्क साधून बी पेरण्याचे काम करीत असे. यासाठी नित्यनेमाने देवाशी निकटचा संपर्क साधून तो देवाकडून ज्ञान, सुज्ञता व सामर्थ्य प्राप्त करून घेत असे. त्यामुळे देवावर त्याची अढळ निष्ठा राहून त्याला आयुष्यभर त्याची शांती व मार्गदर्शन लाभले. तोही झिगेन्बाल्गप्रमाणे कामगारांसाठी सभा घेत असे, त्यामुळे मतभेद टाळून बंधुभाव रुजून काम सुरळीत चालले. त्या काळी लोक देवाचे ज्ञान व सुज्ञतेसाठी प्रार्थना करायचे. प्रत्येक जण समाजात, शाळेत, घरी, छापखान्यात, कामावर काय घडले, आपण काय केले, हे आपापल्या ठिकाणी जमून सांगत असे. त्यामुळे सामोपचाराने संस्थेतील सर्व गैरसमज दूर करून उपाययोजना व सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग ठरवला जात असे. लोक तेथे आपल्या कामाचा अहवालच देत असत. त्यामुळे कामातील उणीवा दूर केल्या जात असत. शंभर वर्षे ही पद्धत चालू होती. श्वार्ट्झला या गोष्टीचे महत्त्व पटले होते. ही पद्धत फारच उपयुक्त होती. आज या बाबतीत अनेक संस्थांमधील कामगारांमध्ये उदासीनता दिसते ही खेदाची बाब आहे जेथे ही पद्धत चालू आहे, तेथे ही फलदायी ठरत आहे.
कार्यपद्धती
येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी यावे अशी भारतात व युरोपातही त्यांना इच्छा व्यक्त करण्यात येत असे. लोकांच्या मागणीवरून श्वार्टझ् तर मद्रास, पॉंडिचरी व सिलोनलाही गेला होता. त्यामुळे कामाची झपाट्याने प्रगतीच होत होती. नवीन शाळा सुरू होत होत्या, अनाथाश्रमात अनाथांचा संभाळ होत असे. प्रश्नोत्तररूपाने शिकवायला त्याने पुढारी तयार केले होते व नवीन ठिकाणी त्यांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यामुळे पुष्कळ लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला होता. सर्व जातीचे लोक त्याचा खूप आदर करीत. धिप्पाड, दयाळू, गोड बोलून उत्तेजन देणारा व दु:खभार हलका करणारा, गरीब- श्रीमंत असा भेद न करता कोणाशीही तितक्याच आदबीने बोलून त्यांची काळजीने विचारपूस करणारा, परखडपणे पाप निदर्शनास आणून देणारा, हा देवाचा माणूस सर्वांनाच आवडायचा. जगिक जीवनावर ख्रिस्तच उपाय असल्याचे तो आवर्जून सांगे. पश्चात्तप्त व्यक्तिसाठी त्याचे मन द्रवत असे. पाप, मूर्तिपूजा, अत्याचार, अधर्म याविषयी स्पष्ट बोलताना तो जराही कचरत नसे. तेव्हा त्याची शालीनता व कळकळ पाहून कोणीच त्याच्यावर रागावत नसे. खऱ्या खोट्याची गल्लत करणाऱ्यांची तर तो भंबेरी उडवत असे. अशा निखळ चर्चेने नम्रपणे, निष्ठेने तो काम करत राहिला, आणि ख्रिस्तीतरांच्या मनातही त्याच्या स्वभावामुळे व वृत्तीमुळे त्याने आपुलकीचे स्थान मिळवले. त्या काळी फ्रेंच व ब्रिटिशांचे कारोमांडेलच्या किनाऱ्यालगत युद्ध चालू होते. पण त्यांनीही त्रिंकोबारमधील या डॅनिश मिशनरींना त्याचा उपद्रव होऊ दिला नाही.
दुसरा टप्पा: त्रिचन्नापल्लीत १७६६ ते १७७८
या काळात त्रिचन्नापल्लीत राहून मिशनसेवा करून पलटणीत चॅप्लेनची तो सेवा करीत होता. यापूर्वी येथे त्याच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या होत्या. हा ब्राह्मणांचा बालेकिल्लाच होता. तेथे श्रीरंगाचे प्रसिद्ध देवालय असल्याने धार्मिकदृष्ट्या त्याला महत्त्व होते. कर्नाटकचा नबाब महंमद अली देखील येथे वस्तीस होता. त्याची ब्रिटिशांशी मैत्री असल्याने ब्रिटिशांची येथे पाळेमुळे रुळली होती. त्यांचे ठाणे व पलटण येथेच होती. मग हेच श्वार्टझचे ठाणे बनले. ख्रिस्ती समाजाला त्याचा आधार होता. ब्रिटिश सैनिक व त्यांच्या कुटंबियांविषयी त्याला फार कळकळ होती. दुरेच्या वेढ्याच्या कामगिरीवरील सैनिकांसोबत ब्रिटिशांनी श्वार्टझलाही पाठवले होते. तेथे जखमी सैनिकांची सेवा करून त्यांना बळ व धैर्य देण्याचे काम त्याने केले. त्यामुळे ब्रिटिशांशी त्याचे उत्तम संबंध जडले. म्हणूनच त्यांनी १७६६मध्ये त्याची त्रिचन्नापल्लीस बदली केली. याचे ब्रिटिशांशी कधीच गैरसमज, फाटाफूट, विसंवाद असे प्रसंग घडले नाहीत. इंग्लंडलाही त्याच्या कार्याची व जबाबदारीची कल्पना आली होती. येथे त्याच्या कामाचा बोजा मात्र प्रचंड वाढला होता. पण त्याने आमरण, कुरकुर न करता मिशनरी वृत्ती जोपासत काम केले. विधर्म्यांमधील सुवार्ताप्रसाराला त्याने अग्रक्रम दिला होता. धर्मशिक्षणाअभावी युरोपियन बांधव विदेश्यांशी संपर्क साधण्यात अपात्र ठरू नयेत म्हणून त्यांच्यावर मेहनत घेणे त्याला महत्त्वाचे वाटले. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा कोणी विचारच केला नव्हता. सैनिक व नागरिकांसाठी उपासनामंदिर नसल्याने, देवाशी आध्यात्मिक सहभागिता नसल्याने त्यांची नीतिमत्ता ढासळून ते आपल्या दुर्वर्तनाने ख्रिस्ताला काळिमा लावून देवाच्या कार्यास ते अडखळण ठरत होते. चैनीशिवाय त्यांना दुसरे ध्येयच नव्हते. त्यामुळे देवाचे वचन ऐकून घेण्याचीही त्यांची तयारी नव्हती. त्यांचे ओझे यायला त्याला तसे अनेक अनुभव आले होते. आपल्याला आजही केवळ नामधारी ख्रिस्ती बांधवांवर मेहनत घेण्याचे असेच ओझे यायची गरज आहे. श्वार्टझला आलेला अनुभव पाहा –
एकदा एक विधर्मी वेश्येसोबत असलेला असा श्वार्टझला वाटेत भेटला. त्यांना श्वार्टझने सुवार्ता सांगून म्हटले, “दुराचारी मनुष्याला स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” ती स्त्री म्हणाली, “हो का? मग एखाद दुसराच युरोपियन स्वर्गात जाऊ शकेल असे मला वाटते.” ही टीका अत्यंत मार्मिक व खेदजनक होती.
एकदा नबाब श्वार्टझला म्हणाला, “पाळकसाहेब, तुम्ही येथे येण्यापूर्वी आमची समजूत होती की, युरोपियन लोक म्हणजे देवधर्म न मानणारे, प्रार्थना न करणारे लोक आहेत.” अशी बाहेर साक्ष असलेल्या ब्रिटिश सैनिकांमध्ये काम करण्याची अवघड जबाबदारी अशा वातावरणात श्वार्टझने शिरावर घेतली होती. सेवा करता करता त्याने इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवले. आधी तो उपदेश वाचून दाखवायचा. मग तो अस्खलित इंग्लिश भाषेत उपदेश करू लागला. त्याचे संदेश फार प्रभावी असत. त्याला जसा सैनिकांच्या बराकीत, तसा अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये देखील मुक्त प्रवेश असे. तेथील एका सैनिकाच्या पत्नीने वृद्धापकाळी त्याच्याविषयी उद्गार काढले, “त्याला पाहून आज मला ५० वर्षे लोटली आहेत. पण त्याचे संदेश, त्याची विद्वत्ता, त्याचा तेजस्वी चेहरा, त्याचे उंचेपुरे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, सतत प्रभुविषयी व धर्माविषयीच त्याचे बोलत राहाणे ही सतत आठवत राहातात.” किती टिकणारा सुगंध त्याने मागे ठेवला! त्याच्या नि:स्वार्थी कार्यामुळे पलटणीतील लोकांनी पैसे जमवून तेथे मंदिर बांधले. श्वार्टझला दरमहा त्याच्या कामासाठी सरकार दरमहा १०० रुपये मानधन देत असे. ती सर्व रक्कम त्याने मंडळीच्या वृद्धीसाठीच खर्च केली. भर तारुण्यात त्याची राहाणी साधी पोषाख अगदी साधा व त्याचे कपडे जीर्ण असत. वर्षातून एकदा त्याला ७२० रुपये मिळत असत. त्याला एक छोटीशी खोली दिली होती. तिची उंची इतकी कमी होती की त्या खोलीत ताठ उभेही राहता येत नसे. तेथे तो आनंदाने राहिला. स्थानिक भाजीच्या एका ताटावर तो खूष असे. कशासाठीच त्याची कुरकुर नसे. एवढ्या ऐहिक गरजा भागणे त्याला पुरेसे असे. सुवार्तेशिवाय त्याला कशाची विवंचना नसे. तेथे त्याने १२ वर्षे तेथे अथक सेवा केली. तो सर्वांचा मित्र होता. सर्व त्याचे आदराने स्वागत करीत.
तिसरा टप्पा: तंजावरमध्ये (१७७८ ते १७९७)
वयाच्या ५२ व्या वर्षी श्वार्टझ् तंजावरला गेला. तेथे आयुष्याची वीस वर्षे घालवली. तेथील तुळाजी राजाशी त्याचे संबंध जुळले. त्या बुद्धिमान राजाने या मिशनऱ्याची कीर्ती ऐकून त्याला भेटायला बोलावले. त्यांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. त्यांचे काही संवाद पाहा –
राजा : काही युरोपियन लोक मूर्तिद्वारे देवाला भजतात. तर काहींना मूर्तीची गरज लागत नाही हे कसे?
श्वार्टझ : पवित्र शास्त्रात मूर्तीला सक्त मनाई आहे. पण देवाचे वचन त्यांना वाचून समजून घेऊ दिले जात नाही, म्हणून त्यांच्या हातून मूर्तिपूजा होते.
राजा : माणसाला देवाचे ज्ञान कसे होऊ शकेल?
या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने निसर्गात, पवित्र शास्त्रात व ख्रिस्तात देवाने स्वत:ला कसे प्रगट केले आहे, ते स्पष्ट केले. मग मूर्तिपूजा कशी चूक आहे, आणि ती कशी थांबवली पाहिजे, हे सांगून बोलणे आटोपते घेतले. युरोपियन लोकही ख्रिस्ती होण्यापूर्वी मूर्तिपूजा करत असल्याची कबुलीही त्याने दिली. ते ऐकून तर राजाला मोठी गंमत वाटली. निरोप देताना राजा पुन्हा पुन्हा म्हणाला,
राजा: पाळकसाहेब, तुम्ही अगदी स्पष्ट बोलता. तुम्ही माझेही पाळकसाहेब आहात हे सतत लक्षात ठेवा बरं का?
आणि अखेरपर्यंत या राजाला सल्लामसलत देण्याचे काम श्वार्टझने अखेरपर्यंत केले. यापूर्वी हिंदुंच्या विरोधामुळे तो येथे वास्तव्याला येऊ शकला नव्हता. पण आता वरचेवर त्याची राजभेट घडू लागली. स्थानिक लोकांसाठी त्याने तेथे मंदिरही बांधले. त्यानंतर काही ऐतिहासिक घडामोडी झाल्या. ब्रिटिशांशी श्वार्टझचे उत्तम संबंध होते. त्याचा राजालाही फायदा झाला. मधल्या काळात राजाने गमावलेली गादीही त्याला परत मिळू शकली होती. ‘लाच न घेणारा पाळक’ म्हणून राजाचा त्याच्यावर दृढ विश्वास होता.
१७५८ मध्ये त्रिचन्नापल्लीत दुसऱ्या मिशनरीची नेमणूक झाल्याने तो या ठिकाणी राहून सलग सेवा करू शकला. तुळाजी राजाचे राजधानीचे नगर त्याचे ठाणे बनले होते. मिशनकार्य आद्य कर्तव्य म्हणून बजावताना त्याखेरीज आणखी व्यापक क्षेत्रात त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याचा लौकिक वाढला. ब्रिटिशांचा वकील म्हणून म्हैसूरचा राजा हैदर अली याजकडे श्रीरंगपट्टमला बोलणी करायला जायची गव्हर्नरने त्याला विनंती केली. तेव्हा हैदर वरचढ होता त्यामुळे मद्रासच्या सेंट जॅार्ज किल्ल्यात थोडेच सैन्य तैनात असल्याने व तटबंदी नाजुक असल्याने ब्रिटिश धास्तावले होते. तेथे हैदर चाल करून येणार आहे, अशी अफवा पसरली होती. शक्य तो त्याने हल्ला करू नये असे ब्रिटिशांना वाटत होते. ब्रिटिशांवर हैदरचा विश्वास नसल्याने त्यांच्याशी बोलायला हैदर तयार नव्हता. तरी ब्रिटिशांनी बोलणी करायला विनवले तेव्हा “माझ्याकडे ‘त्या’ ख्रिस्ती गृहस्थाला (श्वार्टझला ) पाठवा. तो मला फसवणार नाही,” असा हैदरने आग्रह धरला. ही नवलाची विनंती श्वार्टझला कळवली असता हे आपले काम नाही याची खात्री असूनही अपवाद समजून केवळ देवावर हवाला टाकून त्याने हे काम स्वीकारले. निष्कपट शांतता टिकवण्याच्या हेतूने देव आपला साधन म्हणून उपयोग करीत आहे हे ओळखून तो या कामास तयार झाला. स्वसंरक्षणासाठीही तो देवावर अवलंबून होता. त्यावेळी संबंधात येणाऱ्यांना सुवार्ता सांगण्याचा त्याचा मूळ उद्देश होता. सरकारने त्याला वेळोवेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची त्याला ही उत्तम संधी वाटत होती. देव आपल्या सेवकांना त्याच्या इच्छेत राखतो व मार्गदर्शन करून त्याच्या गौरवार्थ त्यांचा कसा वापर करून घेतो ते आपण पुढे पाहू.
Social