दिसम्बर 26, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 कुटुंबात ख्रिस्त

 लेखांक १

“तो घरात आहे असं ऐकण्यात आलं” (मार्क २:१)

ख्रिस्ती घर! ख्रिस्ती कुटुंब! कुठल्याही घरासंबंधी किती किती गोष्टी ऐकण्यात येतात, बऱ्या अन् बुऱ्याही! बऱ्यांपैकी सर्वात चांगली गोष्ट कोणती? ‘ख्रिस्त या घरात, कुटुंबात आहे.’ हीच ती गोष्ट. केवढंसं वाक्य! पण अर्थानं किती खोल! किती साधं तरी किती अवघड! मार्क २:१ -१२ एक सुंदर गोष्ट आहे. त्याची प्रस्तावना या चिमुकल्या वाक्यात आहे.

ख्रिस्त घरात आहे. त्याच्याभोवती असलेल्या गर्दीला चुकवण्याकरता तो क्षणभर घराचा आसरा घेतो. पण गरजवंत दुनियेला तो असेल तिथे वाटा ! ही दुनिया वाटा पाडीतच तिथं जाते. ‘असं ऐकण्यात आलं.’ गरजवंतांनी ऐकलं.
ऐकणारंच ते. त्यांच्या गरजेला ते ऐकण्याखेरीज गत्यंतरच नाही. सारं जग लोटतं त्या घरी. त्या कुटुंबाकडं. दारात खेचाखेच होते. रीघ नाही मिळत माणसाला. पण गरजवंतांना शब्द नाही थोपवू शकत! कौलं काढतं जग! छप्पर
उतरवून आपल्यासाठी वाट तयार करतं. पण ख्रिस्ताच्या पायाजवळ पोहंचतंच.
त्या घरातून, कुटुंबातून सुवार्ता दुथडी भरून वाहू लागते. धन्य ते धर!
धन्य ते कुटुंब!

‘कुटुंबातली उपासना’ हा आहे आपला विषय. उपासनेचा प्राण म्हणजे आपलं पवित्र शास्त्र. त्या शास्त्रावर प्रीती करणाऱ्या दावीद राजावर आपण विचार केला. त्याउलट त्या शास्त्राचा अनादर करणाऱ्या यहोयाकीमचा कसा नाश झाला ते आपण पाहिलं. ह्या शास्त्रानं देव-मानवाची भेट होते. ती प्रथम कुठं होते? कुठं व्हायला पाहिजे? हे आता आपण पाहू या.
तारणाचं पहिलं केंद्रस्थान म्हणजे हे घर अथवा कुटुंब! त्या घरात तो असला की तारणाला सुरुवात झाली. प्रथमत: घरातल्या मंडळीला स्पर्श होतो. तारणानं, त्याच्या शांतीनं घर भरून जातं. भरून वाहू लागतं. शेजाऱ्यांस, गल्लीतल्या लोकांस, गावातल्या मंडळीस शिवत जातं. तिथं सुख, समाधान, समृद्धीचे मळे झुलवीत पुढे जातं. अशा रीतीचं तारणाचं घर अथवा कुटंब हे काय आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे.

(अ) ख्रिस्ती धर्मात कुटुंब म्हणजे काय? इफिस ३:१४ ते १९ वचने लक्षपूर्वक वाचा. तिथं ‘प्रत्येक वंशास’ (व. १४) असे शब्द आहेत. वास्तविक त्या वचनाचं भाषांतर करताना ‘प्रत्येक कुटुंबास’ किंवा शब्दश: भाषांतर केल्यास
 ‘प्रत्येक बापघरास’ असे शब्द हवेत. आणि ते बापघर म्हणजे काय ?
स्वर्गातील बापघराची प्रतिकृती. पृथ्वीवरील व स्वर्गातील कुटुंबाचा एक अंतिम नमुना. त्याच्या लहान लहान दुय्यम आवृत्या म्हणजे जगातील कुटुंबं. किती गोड कल्पना आहे ही! त्यातील १९ वं वचन पाहा. तिथं देवाच्या संपूर्ण
पूर्णतेनं भरण्याची भाषा आहे. हा आहे तारणाचा कळस.

तेव्हा त्यातील दुसरी कल्पना अशी, तारणाच्या योजनेमध्ये मूळ घटक व्यक्ती नाही. तर तारणाचा मूळ घटक म्हणजे कुटुंब! देवानं मानव उत्पन्न करताना ‘नरनारी’ असं पहिलं कुटुंबच उत्पन्न केलं ( मत्तय १९:४). पुढे तारण
करताना केवळ एकट्या दुकट्याचं न करता एका कुटुंबाचं केलं (इब्री ११:७). नोहानं आपल्या घराच्या, कुटुंबाच्या तारणासाठी तारू तयार केलं. पुढं अब्राहामाच्या कुटुंबाचं तारण झालं. त्याच्यापुढं इस्राएलच्या सर्व सेनांनी जेव्हा मिसर सोडलं (निर्गम १२:५१) तेव्हा त्यांच्या तारणाची योजना सांगताना देवानं घराण्याची, कुटुंबाचीच काळजी घेतली, हे स्पष्ट आहे (निर्गम १२:३). नव्या कराराच्या नायकानं जक्कयाला तेच सांगितलं ( लूक १९:९). त्यामागून त्याचा शिष्य पौल यानेही तेच सांगितलं (प्रे कृ १६:३१).

(ब) यावरून आमची जबाबदारी केवढी मोठी आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून येतं. माझं घर, कुटुंब, तारलेलं आहे का? माझ्या घरातून तारण वाहात आहे का? नसेल, तर का नाही? ‘तो माझ्या घरात आहे’ हेच ऐकण्यात येतं का? त्यामुळं
माझ्या दरवाजाजवळ रेटारेट चालली आहे का? तो घरात असेल तर लोकांच्या ऐकण्यात ते आलंच पाहिजे. गर्दी झालीच पाहिजे. घरातून सुवार्ता, जीवन, बाहेर गेलंच पाहिजे.

Previous Article

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना

Next Article

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

You might be interested in …

जर सर्वात वाईट घडलं तर ?

वनीथा रिस्नर माझी भीती वाढत आहे असं मला जाणवलं. ती अगदी ह्रदयाची धडधड बंद करणारी, सर्वत्र व्यापून राहणारी भीती नव्हती पण  सतत कुरतडत राहणारी भीती- जेव्हा तुम्ही सध्याच्या निराशाजनक घटना पाहता आणि हे कधी बदलणार […]

काहीही होवो

डेविड मॅथीस सुमारे २५०० वर्षांपूर्वी हळूहळू पुढे सरकणारी एक आपत्ती प्राचीन जगतात पसरू लागली. एका देशातून दुसर्‍या देशात भीतीदायक वेगाने ती पुढे सरकू लागली. पर्ल हार्बर, दहशतवाद्यांचा हल्ला किंवा त्सुनामी यासारखी ती नव्हती. कारण ही […]

एकटे असणे आपल्याला कठीण का जाते?

ग्रेग मोर्स एकटे असण्याची थोडीशी गैरसोय आणि माझ्या मनात विचार येतो : मी इथं काय करत आहे? इतकी वर्षांची परिचयाची माझी खोली बेढब आकार घेऊ लागते. शांतता, स्तब्धता प्रत्येक वस्तूला अनैसर्गिक दर्जा देऊ लागते. काहीच […]