सितम्बर 20, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा (II)

मनात देव नसलेल्यांचं पूर्वचरित्र आपण पाहिलं. तोंडात त्याचं नाव नाही, कृती दुष्टाईची. अमंगळ मूर्तिपूजेची. व्यवहारातील समंजसपणा नाही. देवभक्ती नाही आंतरबाह्य वाट चुकलेली. शील बिघडलेलं. देवाचं ज्ञान नाही. तारणाच्या योजनेची माहिती नाही. कळस म्हणजे दीनांना भाकरीप्रमाणं खाणं हे त्यांचं चित्र !

आता त्यांचं उत्तरचरित्र – त्यांचं म्हणण्यापेक्षा भाकरीप्रमाणं खाल्लं गेलेल्यांचं ते उत्तरचरित्र आहे. देवाचे दीन लोक असे त्यांचा आहार बनलेले पाहून खचून गेलेला देवभक्त दावीद त्यांच्या कैवाराकडे अधिक जिव्हाळ्यानं लक्ष देतो. गरीबांच्या सुटकेकडे व त्यांच्या पुन:स्थापनेकडे आशेने, अधीरतेने पाहतो. नि म्हणून असल्या प्रतिष्ठित नास्तिकांकडं त्याचं लक्ष नाही. त्यांना केवढी शिक्षा होणार ही तात्त्विक बाब आहे, पण त्याहून या दीन, गरीबांची त्या जाचातून कायमची सुटका हा त्याचा जिव्हाळ्याचा व तातडीचा प्रश्न आहे.

तेव्हा देवभक्त, गरीबांचा कैवारी दावीद, त्यांच्या अखेरीविषयी काही सांगत नाही. पण त्यांच्या उत्तरचरित्राचा आरंभ सांगितल्याशिवाय राहात नाही. ‘पाहा’ या दिलखेचक उद्गारानं तो आरंभ करतो. आत्मसंतुष्ट, निर्धास्त असं त्यांचं पूर्व चरित्र कुठं आणि आताचं अनपेक्षित, भीतीनं भेदरलेलं चित्रं कुठं. नकळत सहज समाधानाचा आश्चर्याचा उद्गार  ‘पाहा’ हा लक्ष वेधणारा आहे. आणि “ पाहा! ते भयभीत झाले आहेत” या छोट्या वाक्याच्या फटकाऱ्यानं ते त्यांचं भेदरलेलं चित्र तो पुढे करतो. त्यांना आतल्या आत ती भीती दडपून ठेवताच येत नाही. ते बेडरपण, ती रग, तो चढेलपणा, गरीबांशी वागण्याचा मुरलेला बेदरकारपणा, आपण जिंकलोत ही स्वसंतुष्टता आता नष्ट झाली आहे.  आला… तो क्षण आला… आणि त्यांची चर्या पालटली. निर्ढावलेले गुन्हेगार असले तरी ते मंडळीतले असल्यानं त्यांना समजणारी मूलभूत गोष्ट दावीद सांगतो. त्यांचे चेहरे का भेदरले याचं कारण दावीद सांगत नाही. पण तो एक सांगतो, ते देवाचे, त्यांच्या नियंत्याचे ते नीतिमान ठरलेले लोक आहेत. त्यांची नीतिमत्ता स्वत:ची नाही. ती नियमशास्त्राच्या निर्मात्याची कृपेनं बहाल केलेली नीतिमत्ता आहे.

इथं हे नमूद करण्याचं काय कारण? त्या नीतिमत्तेचा निर्माता त्यांच्या पश्चात्तप्त नम्रतेनं खूश होऊन त्यांच्यामध्ये खुद्द घर करून, कायम वस्ती करून राहातो. ही महत्त्वाची गोष्ट त्या वेडगळांच्या लक्षातच आली नव्हती. हे देवाचे लोक आहेत. पातकीच. तरी पातकाचा वीट आलेले, पातकापासून सुटण्यासाठी सतत धडपडणारे, सदैव प्रभूला शरण जाणारे, पश्चात्तप्त होऊन त्याचा धावा करणारे, क्षमा मागून ती नक्की प्राप्त करून घेणारे, म्हणूनच ते नीतिमान ठरलेले आहेत. देव त्यांच्याठायी घर करून राहातो हे ते विसरले होते. उलट देव नाहीच असं म्हणत बसले होते. त्यांनाच काय, पण मानवी संशयानं सदैव गांजलेल्या देवभक्तांनाही तसं कितीतरी दीर्घकाळ वाटलं. पण नाही. देव आहे. तो चांगला, भला, सर्वसमर्थ, आपल्या भक्तांचा कैवार घेणारा आहे. त्यांना मात्र केवळ तो दुबळा, असमर्थ असा दिसला. “ कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी आहे.” म्हणूनच तो त्यांना उपऱ्यासारखा, स्तब्ध माणसासारखा… वीर असून उद्धार करण्यास असमर्थ वाटला ( यिर्मया १४:८-९).

त्याचं सामर्थ्य नष्ट झालेलं नाही. त्याचा कैवार लुळा पडलेला नाही. तारणाच्या इच्छेनं पातक्यांचं तारण व्हावं या सदिच्छेनं त्यानं स्वत:ला कृपाळू, सहनशील ठेवलं आहे. म्हणूनच दावीद म्हणतो, “पाहा! ते भयभीत झाले आहेत! कारण देव नीतिमानांमध्ये वस्ती करून राहातो… दीनांच्या विचारांची… गरीबांनी पुढं मांडलेल्या संकल्पांची, मसलतींची, त्यांनी दिलेल्या सल्ल्यांची तुम्ही अवहेलना, हेटाळणी करून” त्यांना धुडकावून लावता. देवाच्या मंडळीची कामं करण्याचा सर्वाधिकार केवळ आमच्याच हाती आहे असा तुमचा हट्ट असतो. हा हट्ट कशासाठी? मान …अधिकार… पैसा… आपली मुलं परदेशी पाठवता यावीत … त्यांना स्कॅालरशिपसह उच्च शिक्षण मिळावं म्हणून! देवाच्या सेवेसाठी.. सुवार्ताकार्यासाठी…गरीबांसाठी… आध्यात्मिक वाढीसाठी हे चाललं आहे का?

दावीद म्हणतो, “ सत्कर्म करणारा कोणी नाही.” – “ स्वर्गातून मानवाकडे अवलोकन करून देव म्हणत आहे… सत्कर्म करणारा कोणी नाही. एकही नाही.” देवाच्या नियमांनी सर्व चाललं असतं तर कोणाचं काही म्हणणं नसतं…पण मंडळीचं ऐहिक मतदान केंद्रात रूपांतर झालं आहे…त्यामुळं मंडळीची दुरावस्था पाहून दाविदाच्या आतडीला पीळ पडून त्यातून हे स्तोत्र जन्माला आलं, यात नवल ते काय? यावर बोलत असता एक देवभीरू, सुशिक्षित, मंडळीच्या कामात कळकळीनं भाग घेणारा, सेशनची कामं हिरीरीनं करणारा तरुण पाळक मला म्हणाला,  “देवाचा आत्मा मंडळीला सोडून निघून गेला आहे.” वरवर पाहाणाऱ्यालाही वाटेल, खरोखरच देव नाही. पण हे म्हणणं उथळ आहे. देव नीतिमानांमध्ये वस्ती करत राहातो. असा एक दिवस उगवणारच…की ज्या दिवशी भीतीनं ‘देव नाही’ म्हणत वागणाऱ्यांची दे माय धरणी ठाय अशी अवस्था होणारच. दावीद म्हणतो, “गरीबांच्या विचारांची… मसलतींची तुम्ही हेटाळणी करता …पण त्यांचा आश्रय यहोवा आहे. त्यांना तुम्ही धुडकारलंत. पण त्यांचं ऐकायला देव बसला आहे ना! तो त्यांचं ऐकणारा, आधार, आश्रय, सांभाळणारा, ढाल, किल्ला, गड, शरणदुर्ग, यहोवा आहे.

मनात खंतावलेल्या संता, शास्त्र तुला सांगतं, देव म्हणतो,  “ दुष्कर्म्यांविरुद्ध जळफळू नको. गीळ आपलं दु:ख. यहोवा तुझा आश्रय आहे. देवाच्या मंडळीचं काम त्याच्या नियमाप्रमाणं चालावं अशी अपेक्षा करणाऱ्या, दाविदाच्या अजिंक्य विश्वासाकडं पाहा. दाविदाच्या काळापेक्षा आता कितीतरी अधिक प्रगटीकरण झालं आहे. प्रभूचं येणं जवळ आल्यामुळं मंडळी आताच ख्रिस्तविरोध्याच्या ऐहिक सामर्थ्याच्या पूर्ण आहारी गेली आहे. भिऊ नको. यहोवा तुझा आश्रय आहे. दाविदाचं अखेरचं वचन पाहा. वाचताना मनाला पीळ पडतो… ते कित्तीतरी खरं आहे. “ देव करो, नि सियोनातून इस्राएलाचा उद्धार होवो.” हे देव म्हणजे एलोहीम करो. यहोवा का नको? दाविदाच्या मनातली धांदल पाहिल्यावर मन कळवळतं. यहोवा दुर्बल आहे का? नाहीच नाही. पण एलोहीम नाव यहुदीतरही वापरतात. म्हणून त्यांना तो शरण गेला का? नाही.. यहोवा एलोहीम आहेच. तरी तो आपल्या लोकांचं खास तारण करणारा आहे. तरी लोकांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं, मारून मुटकून त्याला लोकांवर तारण लादायचं नाही..आणि तारण सियोनातूनच व्हायला हवंय. हे एलोहीमला शक्य नाही. देवाची मंडळी उद्धाराचं साधन. पण तिथं एकही सत्कर्मे करणारा नाही. जिथं ते एकूणएक मार्गभ्रष्ट, ज्ञानशून्य झाले आहेत, तिथं सियोनातून उद्धार होणार कसा आणि कोणाचा? इस्राएलचा, स्वत:चा, भ्रष्ट मंडळीनं देवाच्या दीनांचा, उद्धार कसा करायचा? ते स्वत: भ्रष्ट असताना संतांच्या संहाराला उठलेले. मनाची तगमग होत असता देवभक्त दावीद आपली दुबळी इच्छा कशीतरी व्यक्त करीत म्हणतो, एलोहीमला शक्य झालं तर तो करो. पण ही भ्रष्ट जत्रा असल्यावर कसला होतोय उद्धार? पण हे त्याचं अखेरचं चित्र नाही. स्तुती असो

प्रभू तुझी. तुझ्या दीनांना दिलासा, संतांना समाधान बहाल केल्याशिवाय तू हे स्तोत्र कसं पूर्ण होऊ देणार ? त्या दीनांच्या  दिलाशासाठी, संतांच्या समाधानासाठी तर तू हे स्तोत्र आपल्या भक्तांच्या मुखानं गाऊन घेतलंस. “यहोवा आपल्या  लोकांची गुलामगिरी उलटवील. तेव्हा याकोब उल्हासेल… इस्राएल हर्ष पावेल.”

केवळ दुबळी इच्छा प्रगट करण्यानं दाविदाचं समाधान झालं नाही. तो यहोवाकडे आलाच. तिथंच त्याचं निश्चित समाधान झालं. पिडलेल्या संतांना विरंगुळा मिळाला. गुलामगिरीची शृंखला तुटली. जाच, जुलूम थांबला, ही सारी नष्टच झाली. आजपर्यंत डांबलं होतं, ती गुलामगिरी उलटली, नाहीशी झाली, एवढंच? नेमकं काय झालं? बेडी गळाली. देवाच्या मंडळीला, देवाच्या सरदाराला, देवाच्या देहाला हर्ष झाला.

देवाला वीट आणणाऱ्या दुष्कर्मांनं काळवंडलेलं … देवाच्या दीनांच्या जाच, जुलूम, हेटाळणी, गुलामगिरी, पिळवणूक यांनी पिळवटून टाकणारं हे स्तोत्र. पण त्याचा शेवट हर्षात… उल्हासात… संतांच्या संतोषात… देवाच्या दीनांच्या दिलाशात!

संतांचं सौख्य म्हणजे यहोवा ! नि ‘देव नाही’ असं म्हणणारा मूर्ख! त्याचा शेवट काय? ते तुमच्यावर सोपवतो दावीद. त्यात त्याला आनंद नाही. संतांच्या सुटकेमध्ये त्याला संतोष वाटतो.

दिनांक २६ ॲागस्ट १९५८

Previous Article

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा

Next Article

देवाच्या दीनांना दिलासा (III)

You might be interested in …

संपादकीय

नुकतेच कोणीतरी मला म्हणाले, “त्याची तत्वे अगदी आपल्या तत्वांसारखी आहेत.” त्याला म्हणायचे होते की त्याची तत्वे बरोबर आहेत. या विधानावर मी विचार केला आणि ठरवले की असे विधान एक गर्वाचेच  विधान ठरत नाही पण नकळत […]

जेव्हा जीवन चिरडून टाकले जाते

वनिथा रिस्नर “ हे आम्हाला अगदी चिरडून टाकत आहे” माझे प्रिय मित्र सॅम आणि मिलींडा यांच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले. ते एका अगाध दु:खातून जात होते. त्यांनी नुकतीच त्यांची मुलगी गमावली होती. काही वर्षांपूर्वी […]

ख्रिस्ताला समर्पण करण्याची मला भीती वाटते

जॉन पायपर बिलीचा प्रश्न पास्टर जॉन “ मला ख्रिस्ताला संपूर्ण समर्पण करण्याची भीती वाटते.  “होय प्रभू, त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे” असं म्हणण्याच धाडस मला होत नाही. याचं कारण मला भीती वाटते की देव […]