दिसम्बर 12, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाच्या दीनांना दिलासा (III)

जुळं स्तोत्र ५३

अक्षरश: १४ व्या स्तोत्रासारखंच. दोनच गोष्टींमध्ये भिन्न आहे.

(१) पाचवं वचन निराळं आहे. (२) देवाचं एलोहीम नाव यात आठ वेळा आलं आहे. १४ व्या स्तोत्रात ४ वेळा एलोहीम व ४ वेळा यहोवा असं ८ वेळा आलं आहे. पण येथे आठही वेळा एलोहीम नाव का येतं याचं रहस्य या स्तोत्रात आहे.

तळमळीशिवाय काव्य नाही आणि तळमळ जितकी अधिक तितक्या कवितेच्या आवृत्या अधिक. आणि त्यातील कल्पना बदलण्याचा संभवही अधिक. सुष्टांवर (सज्जन)  दुष्टांचा बसलेला पगडा दाविदाच्या मनाला खूप लागला. त्यांचा जाच, जुलूम, त्यांनी लादलेली गुलामगिरी, त्यांना भाकरीप्रमाणं खाण्याचा त्यांचा रट्टा ! ते दुनियेतले सुष्ट नसलेले पातकी सत्कर्मी. तर पश्चातप्त पातकी, तारलेले, देवाने नीतिमान ठरवलेले, देवाचे दीन लोक. त्या सर्वांचा पाडाव होतो. भाकरीप्रमाणं ते आहार होतात, आणि देव त्यांच्यासाठी काहीएक करत नाही. या वेदनांनी देवभक्त दावीद वेडा झालेला दिसतो. एलोहीम हे देवाचं साऱ्या दुनियेच्या वापरातलं सामान्य नाम. पण दाविदाला एक श्रेष्ठ नाव माहीत असतं. तारणारा, उद्धार करणारा, असा यहोवा. अन् त्याला एक कटु अनुभव येतो. देवाच्या लोकांत छुपे नास्तिक उघड आस्तिकांना आपल्या गुलामगिरीत डांबून ठेवून भाकरीसारखं खात राहातात. दिल दुखवून सोडणारी गोष्ट म्हणजे देव आपला हात जोडून बसतो. देवाच्या लोकांसाठी सदैव शोकमग्न रक्तसाक्षी यिर्मया, रक्ताश्रुंनी यिर्मया १४: ८-९ मध्ये काय म्हणतो पाहा:

“ रात्रीच्या उतारूसारखा”- एक रात्रीची वस्ती आपली, कशाला मन घाला, अशी बेपर्वाई.
“ देशातल्या उपऱ्यासारखा”- आपण पडलो परके, कशाला मन घाला, असा भेकडपणा.
“ स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा”- धक्क्यानं, दुर्बलतेनं गप्प झाल्यासारखा, ही दुर्बलता.
ती कल्पनाच सहन न होऊन तो म्हणतो; “ वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरूषासारखा” हे आशाकंदा, कल्पनेपलीकडे निष्क्रिय, असा का झालास?

दाविदाचीही आता थेट तीच अवस्था झाली आहे. सुमारे ख्रि पू १००० मध्ये तो केवळ विश्वासाच्या सामर्थ्यानं त्या रहस्याचा उलगडा करतो. आपल्याला आलेल्या अनुभवानं गुलामगिरीच्या काळोखातून सुटकेच्या प्रकाशात उडी घेतो. प्रतिभेच्या फटकाऱ्यासरशी एक कविता हातावेगळी करतो. स्फूर्तीचे एकावर एक कढ येत असतानाच दुसरी कल्पना मनाच्या डोळ्यांपुढं घोळू लागताच ती टिपून घेतो. अन् स्तोत्र ५३:५ हे नवं कडवं टाकून ती कविता लिहितो. त्या नवीन कल्पनेसाठी देवाची नावं बदलतो. त्यातील दोन भिन्न मूल्यांमुळं दोन्ही कवितांना स्तोत्रसंहितेत स्थान मिळतं. आता ५३ व्या स्तोत्रात नवीन कल्पना कोणती? चौदाव्या स्तोत्रातील छुपे नास्तिक देवाच्या मंडळीतले आहेत. ५३ व्या स्तोत्रातील नास्तिक देवाच्या लोकांतले नाहीत. बाहेरचे, देवाच्या लोकांच्या शत्रुंमधले आहेत. त्यांचं नास्तिकपणही मनातलंच आहे.

यशया १०:७ व १२ लक्षपूर्वक वाचा. ५-१५ सलग वाचा. तिथंही तीच मस्ती. देवाचा तोच इन्कार… कारणही तेच. माझ्या प्रभावी सामर्थ्यापुढं ह्या राष्ट्राचं क्षुद्र पहाडी दैवत, तो यहोवा काय करील? करायचं असतं तर मागंच सोडवलं असतं त्यानं. यशयाचाही निष्कर्ष तोच आहे. दावीद असो की यशया असो दोघांनाही प्रेरणा देणारा एकच – यहोवाच आहे.

आता स्तोत्र ५३: ५ च्या स्पष्टीकरणाकडे वळू. कारण बाकी शब्दन् शब्द १४ व्या स्तोत्रातलाच आहे. अर्थही तोच आहे. १४ व्या स्तोत्रातील जुलमी नास्तिक देवाच्या मंडळीतील हुद्देदार आहेत. इथं हे परकी सत्तेचे लोक आहेत. ते वचन पाहताच अर्थ स्पष्ट होतो. पाहा ते वचन – “ भय नसता ते भयभीत झाले आहेत. कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणाऱ्यांची हाडं देवानं विखरली आहेत. तू त्यांची फजिती केली आहे. कारण देवानं त्यांचा धिक्कार केला आहे.”

दाविदाचा नि सन्हेद्रीबचा काळ अगदी भिन्न भिन्न. तरी या स्तोत्रातल्या या एकाच वचनाच्या केवळ स्पष्टीकरणासाठीच त्याचं चित्र किती फायदेशीर आहे पाहा. छावणी देऊन पडलेल्या त्या प्रचंड सैन्यावर रात्रीच्या त्या भयाण स्तब्धतेत देवाच्या एका दुताची तलवार चालू होते. दिसत तर काही नाही, पण माणसांचे मुडद्यांवर मुडदे पडत आहेत. भीतीनं लोकांचे चेहरे पांढरे फटक पडलेत. पळता पळता त्यांचीही प्रेतं पडली… दूरवर विखुरली. त्यांची फटफजिती तू केली आहेस… देवा हे तुझंच काम आहे. (२ राजे १९:१-३७; २ इतिहास ३२:२०-२१; यशया ३७: ३६-३७)

१४ व्या स्तोत्रात देवाच्या दीनाला भाकरीप्रमाणं खाणारे, उन्मत्त, मनचे नास्तिक आहेत. त्यांची चलती दीर्घकाळ चालते. तरी अखेर त्यांचीही गुलामगिरी उलटते नि यहोवा आपल्या लोकांना सोडवतो. ५३ व्या स्तोत्रातले मदांध नास्तिक मनातल्या मनातच विचार करणारे. तेही देवाच्या दीनांना भाकरीप्रमाणे खाणारे. अखेर देवाच्या लोकांचा पाडाव करायला देवाच्या गावाला वेढा घालून बसतात. आतापर्यंत देवाच्या लोकांना मांडलिक करून दुरून गुलामगिरी लादलेली असते. आता त्यांची राजधानी, मंदिर, सर्व राष्ट्रच उद्ध्वस्त करायला हा वेढा घातलेला असतो. आता मात्र देव आपल्या दुताला पाठवतो. त्यांचा कधी झाला नाही असा संहार होतो. देव आपल्या लोकांचा कैवार घेऊन सुटका करतो.

या घटनेपूर्वीच सुमारे ४०० वर्षे आधी दावीद या काव्यातून हेच स्पष्ट करीत आहे की यहोवा हाच देवाच्या दीनांचा अखेरचा दिलासा, संतांचं समाधान आहे. त्यांना दीर्घकाळर्यंत वाट पाहावी लागते. रक्ताचे अश्रू गिळावे लागतात. अदृश्य कैवाऱ्याशिवाय त्यांचा कोणी वाली नसतो. पण अखेर यांचाही एक हर्ष व उल्हासाचा दिवस उगवतोच. शेवटी सोडवणूक होतेच.
“नीतिमान विश्वासाने वाचतो” (उत्पत्ती १५:६). “यासाठी आम्ही सर्वदा धैर्य धरतो, आणि हे लक्षात बाळगतो की, आम्ही शरीरामध्ये वास करीत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर असलेले प्रवासी आहोत, आम्ही विश्वासानं चालतो, डोळ्यांना दिसतं त्याप्रमाणं चालत नाही” (२ करिंथ ५:६-७). तपश्चर्या खडतर तर खरी. पण शेवट आल्हादकारी !

आता या स्तोत्रातील एका जिव्हाळ्याच्या, महत्त्वाच्या मुद्याविषयी पाहून पूर्ण करू या. ते मूलभूत सत्य हे : “ सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” ( रोम ३:२३). हा मानवी वैचारिक शोध, किंवा बुद्धीचा कयास नव्हे, हे देवाचं प्रगटीकरण आहे. हे सत्य, देवानं दिेलेलं प्रगटीकरण आपण माहीत असूनही पूर्णपणे सहजगत्या डावललं आहे. माणसात चांगुलपण असल्याचं मान्य केलं आहे. जेव्हा पश्चाताप झाला, तेव्हाच हे कबूल केलं आहे. आदामापासून आजपावेतो मानवजात पातकी, असहाय, स्वत:चं तारण करायला असमर्थ असत आली आहे. “नीतिमान कोणी नाही, एक देखिल नाही. सर्व बहकले आहेत. ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, एक देखिल नाही” ( रोम ३:१०-१२). पौलानं हे अवतरण याच स्तोत्रातून घेतलं आहे. तेव्हा या सत्यतेबद्दल शंकाच नको. पण मन दुष्ट, अनुवंशिक पातकी, संशयी आहे. तेव्हा आपलं स्वत:चंच समाधान कसं झालं हे उघड सांगितल्यावर इतर सम-मनस्कांना ते फायदेशीर होईल या अपेक्षेनं दोन शब्द लिहितो.

संपूर्ण शास्त्र संदेश आहे. नि संदेशाचे दोन तरी अर्थ असतात. एक, ज्या काळी तो दिला गेला, त्यावेळी सत्य असलेला अर्थ. पण तो तेवढाच अर्थ नसतो. तो भविष्यासाठीही असतो. संदेश हा अलिकडचा शब्द. पूर्वी यशया, यिर्मया हे “भविष्यवादी” होते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तोच होता व आजही आहे. पण नास्तिक युगात भविष्य हे एक खूळ आहे असे म्हणत. त्यासाठी संदेश हा शब्द आला. पण मुळात तसं नाही हे लक्षात ठेवू या. त्यांचा भविष्यासाठी दुसरा अर्थही असतो हे लक्षात ठेऊ या.

उदाहरणार्थ “पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल.” या देववचनाचे दोन अर्थ आहेत. आहाज राजाच्या वेळी लागू असलेला एक अर्थ आणि पुढे ८०० वर्षांनी परिपूर्ती झालेला दुसरा अर्थ. तेच दोन अर्थ या दोन्ही जुळ्या स्तोत्रातली पौलाने घेतलेली ही अवतरणे आहेत. एक, दाविदाच्या अनुभूतीवरून रचलेला स्तोत्रांचा त्यावेळचा अर्थ. दुसरा, पौलास पवित्र आत्म्याद्वारे कळलेला अखेरचा प्रभू येईपर्यंतचा कायमचा अर्थ.

ज्या सर्वसाक्षी यहोवाचे डोळे पाहात आहेत, तेच हे प्रगट करीत आहेत, भला कोणी नाही. एक देखिल नाही.  “स्वर्गातून मानवाकडं त्यानं पाहिलं.” आणि मग म्हटलं, “नीतिमान कोणी नाही, एक देखिल नाही.” पुन्हा संशयी प्रश्न विचारला जाईल की हे एकाच गटाविषयी आहे, तर सार्वत्रिक अर्थ घेणे योग्य होईल का? त्यावर आम्हाला सुचलेलं उत्तर असं आहे, मनात ‘देव नाही’ असं म्हणणारा नास्तिक एकटाच नाही, तो त्या गटाचा प्रतिनिधी असतो असं आम्ही स्पष्ट पाहिलं आहे. त्या गटातले सर्वच लोक “दुष्कर्मे, अमंगळ कर्मे करतात,” असंही पाहिलं आहे. तेव्हा सत्कर्मे करणारा एक देखिल नाही हे प्रकाशाइतकं स्वच्छ आहे. हा गट देवाच्या मंडळीतला आहे हे लक्षात असू द्या.

आता राहिला दुसरा गट. देवाच्या दीनांचा. पण ते देखील सर्वच्या सर्व पातकी, पापाची जाणीव असलेले, पश्चात्ताप केलेले, तारणाची भिक्षा मागितलेले, क्षमा प्राप्त झालेले, तारण पावलेले, म्हणून नीतिमान ठरलेले. हे लक्षात ठेवलं की झालं. म्हणून ५३ व्या स्तोत्राला विशेष मोल आहे. कारण १४ व्या मध्ये देवाचे लोक आहेत. म्हणून ५३ व्या स्तोत्रात दाविदानं देवाचे नसलेले लोक विचारात घेतले आहेत. पण देवाचे दीन हाच विरुद्ध गट घेतला आहे. तेव्हा वरील स्पष्टीकरणाच्या प्रकाशात ते दोन्ही गटही पातकीच आहेत. त्यांच्यातून सुटून, तारणव्यवस्था पत्करल्यामुळं देवाचे “आपले लोक” “नीतिमान ठरलेले” झाले आहेत. प्रथमत: सर्व पातकी… एकही अपवाद नाही. आणि अखेर… एक गट आपल्या ऐहिक तृप्तीसाठी, ऐहिक यशस्वीतेच्या मस्तीनं, मनातल्या मनात देव नाहीच म्हणून बसतो. नि दुसरा गट देवाचे दीन म्हणून दीर्घकाळ गुलामगिरीत रक्ताश्रू गाळत बसतो. अखेर त्यांची सुटका होते. नि पहिल्यांचं? सर्व कृपेनं भरलेल्या देवानं ज्यांच्यावर आपला मायेचा पडदा टाकला आहे, तो दूर करून आपल्या स्वत:च्या मूलत: पातकी म्हणूनच असलेल्या आपल्या सूडबुद्धीची अखेर, आपण त्यांच्यावर का लादावी? त्यांच्या तारणाकरता खऱ्या कळकळीनं आतापासून अखेरपर्यंत विनम्रपणे, आग्रहानं, मागत राहाणं हे आपलं कमीतलं कमी काम आहे, असं आपल्याला नाही का वाटंत?

“ जिवंत देवाच्या हातात पडणं भयंकर आहे.” ( इब्री १०:२१)

दिनांक २६ ॲागस्ट १९५८

Previous Article

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा (II)

Next Article

“ माझं गौरव” (।)

You might be interested in …

 संतापाचं भांडण : पौल व बर्णबा

प्रस्तावना –  पवित्र शास्त्र हे एक विलक्षण पुस्तक आहे. त्याला ‘पवित्र शास्त्र’ असे नाव आहे. पण त्यात अशाही वाईट पातकांच्या नोंदी आहेत की त्या केवळ ऐकूनही कान भणभणतील. तरीही ते ‘पवित्र शास्त्रच’ आहे. हे त्याचं […]

माझ्या पापाने त्याला तेथे धरून ठेवले

ग्रेग मोर्स उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू […]

व्याधींमध्येही भीतीमुक्त

कॅथरीन बटलर एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मुलांनी आमच्या एका मित्राला दवाखान्यात भेट दिली. त्याला एम्फिसिमाचा (फुप्फुसाचा एक आजार) पुन्हा एक अटक आला होता. हे त्याचे दुखणे बराच काळाचे होते. अनेक उपचारांचे कोर्सेस, कित्येक दिवस […]