सितम्बर 20, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अन्यायाचं धन  (॥)

लूक १६:९

आपण लूकाच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी पाहिली. आता लूक १६:१-१३ वचनांचा अर्थ लावणे आपल्याला सोपे जाईल. ९:५१ पासून ख्रिस्ताची अखेरची वाटचाल सुरू झाली आहे. “त्यानं यरुशलेमकडे जाण्याच्या दृढनिश्चयानं तिकडं तोंड वळवलं आहे.” आता शिष्यांना यार्देन पलीकडच्या पिरीयाच्या एकांतात नेऊन तिथं त्यांना अखेरचं शिक्षण देणार आहे. म्हणजे आपला हा शास्त्रभाग त्या महत्त्वाच्या शिकवणीतला आहे. पुढचा १६ वा अध्याय त्या पलीकडच्या नित्य जिण्यासंबंधीची त्याची जबाबदारी, त्याचा इथल्या जिण्याशी असलेला संबंध स्पष्ट करतो.
१६:१-१३ वचने अध्यायाच्या पहिल्या विभागात मोडतात. त्यांचा १५ व्या अध्यायाशी काही संबंध आहे का पाहायला हवं. त्याचाही स्पष्टीकरणासाठी फार उपयोग होणार आहे.

लूक १६:१ मध्ये म्हटलंय, “त्यानं शिष्यांसही म्हटले,” म्हणजे शिष्यांस देखील म्हटले. म्हणजे आणखी दुसरीकडं त्यानं दुसऱ्या कुणाला तरी काहीतरी म्हटलंय हे खास. चला तर १५ :१-२ कडे. कुणाला म्हटलंय? “शास्त्री परुश्यांना.” ते कसले? “कुरकुर करणारे.” का कुरकुरत आहेत? “सर्व जकातदार व पापी त्याचं ऐकायला येत होते” म्हणून कुरकुर. एवढंच? नाही. तर तो पापी लोकांचा स्वीकार करतो, व त्यांच्याबरोबर जेवतो म्हणूनही कुरकुर. सतत भुणभुण करत राहात कुरकुर. अशा शास्त्री परुश्यांना धाकट्या उधळ्या पुत्राबरोबर बाप जेवतो, त्याला जवळ घेतो म्हणून फुरंगटून कुरकुरत बसलेल्या वडील भावांना येशूनं तो दाखला सांगितला. तो बाप हा देवबाप आणि ही मुलं म्हणजे यहूदी. दोघंही एकाच घरातली. त्यातला धाकटा पातकी. थोरला घरात राहणारा, पण स्वधार्मिकतेनं भरलेला. बाप पातक्याला घरात का घेतो? त्याच्याबरोबर का जेवतो?
मी इतका चांगला, माझ्यासाठी का नाही मेजवानी? पण त्याहून अधिक म्हणजे या पातक्याला बापानं जवळ करू नये ही तीव्र इच्छा. म्हणून त्या गोष्टीचा शेवट प्रभूनं असा केलाय; “बाळा, उत्सव व आनंद करणे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला (नाश झाला) होता, तो सापडला आहे.”

आता या प्रकाशात “शिष्यांसही” याचा अर्थ आपल्याला छान समजेल. बापाच्या चांगुलपणावर, ममतेवर, आपल्या तारण झालेल्या उधळ्या धाकट्या भावावर रुसलेल्या भावाला १५ व्या अध्यायातल्या ‘वडील भावाचा’ दाखला सांगितलाय.
आता प्रभूला हे समजलं आहे की तारण पावलेल्या लहान भावालाही एका दाखल्याची, महत्त्वाच्या शिकवणीची गरज आहे. म्हणून प्रभू हा १६:१-१३ मधला दाखला सांगत आहे. हे दोन दाखले म्हणजे एकाच विषयावर जोड शिक्षण देत जिव्हाळ्यानं जडले आहेत. १५: ११-३२ मध्ये रुसलेल्या नीतिमत्तेने फुगलेल्या ‘वडील भावाचा दाखला’ तर १६:१-१३ मध्ये चैनबाजीनं, उधळपट्टीनं, आपली संपत्ती उडवल्यावर आता घरी परतलेल्या, तारलेल्या, पश्चात्तप्त लहान भावाचा दाखला आहे. ‘ही’ या प्रत्ययातून ते सूचित होतं. हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

आणखी एक हा तपशील पाहा. लूक १५:१३ मध्ये म्हटलंय, “त्यानं आपली संपत्ती उडवली.” तसंच १६:१ मध्ये म्हटलंय, “हा तुमचं द्रव्य उडवतो.” ‘उडवणं’ यासाठी मूळ भाषेत वापरलेल्या शब्दाचा अर्थ विखरणं, विसकटणं विंचवाचं विष अंगभर पसरणं, अशा अर्थानं आलेला आहे. १५ व्या अध्यायातील उधळ्या पुत्र आणि १६ व्या अध्यायातील कारभारी, हे दोन्हीही संपत्ती उडवणारे आहेत; हे त्यांच्यातील साम्य आहे. फरक आहे तो त्यांच्या संपत्तीमध्ये होय.

१५ व्या अध्यायातील संपत्तीला दोन शब्द मूळ भाषेत आहेत. बाप जेव्हा संपत्ती वाटतो, तेव्हा तिथं जीवन असा अर्थ आहे. बापाच्या त्या जीवनाला मुलगा संपती, अस्तित्व, आपलं ‘असतं नसतं’ असं म्हणतो. अध्याय १६ मध्ये द्रव्य याला मुळात ‘मालमत्ता’ असा शब्द आहे. त्याचाही अर्थ अस्तित्वाच्या वस्तू, मालमत्ता असा आहे. अध्याय १५ मध्ये बाप आपलं जीवन देतो आणि मुलगा ते बदफैलीत, चैनीत उधळून टाकतो. १६ व्या अध्यायात जगातील वस्तू, मालमत्ता ते उधळतात. दोन्ही दाखल्यातील हे साम्य भेद आपण अंशत: पाहिले.

(क) या उताऱ्याचं स्पष्टीकरण:  
१६: १-१३ मधील दाखल्याचे दोन भाग आहेत. पहिला भाग वचने १-८ व दुसरा भाग वचने ९-१३ हा आहे.

(।) वचने १६:१-८ पहिला भाग – हे चित्र लक्षात घेऊ. एक श्रीमंत मनुष्य आहे. आपल्या श्रीमंतीबद्दल तो काय म्हणतो? “… जगातली सारी राज्ये…. ह्या सर्वांवरील अधिकार व ह्यांचं वैभव मी तुला देईन. .. कारण ते मला सोपून दिलं आहे. .. माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो… माझी उपासना करशील तर ते सारं मी तुझं होईल” ( लूक ४: ४-५). कित्तीतरी श्रीमंत आहे हा धनी. वाटेल त्याला तो वाटेल ते एका अटीवर देतो. त्याची भक्ती, उपासना करा, की झालं ! त्याला नीती, अनीतीची काही चाड नाही. त्यातील फरकाची त्याला काही पर्वा नाही. अनीतीच्या कामासाठी तो आपल्या कामगारांना शाबासकी देतो.
तो फार हुशार आहे. आपली संपत्ती कायम राहावी, वाढावी, यातच त्याचा जीव आहे. त्यासाठी त्याला बऱ्याबुऱ्याचीही काही पर्वा नाही, असा तो अनीतिमान मालक आहे. आणि नोकर? त्यांची तर कमालच आहे. श्रीमंत मालकाच्या अनीतिमान नोकराच्या उधळपट्टीला अपरंपार नुकसान करण्याला सीमा नसणार. मणांच्या अन् खंड्यांच्या गणतीचा माल चुटकीसरशी क्षणार्धात मातीमोल करायला तो का मागेपुढे पाहील? आणि मालकाचे देणेकरी? तेही त्याच माळेतले. न्याय अन्याय यात भेदच नाही. स्वार्थापायी सरळपणाचा पार नाश झालेला. ऱ्हदयच नाही त्यांना. त्यात अनीतीच कुटून कुटून भरलेली. असल्या अंदाधुंद राज्यातली ही मालमत्ता. सारी संस्थाच वाकुडपणानं सडलेली, रोगटलेली. अंधारलेल्या राज्यातला काळ्या संपत्तीचा सारा काळा कारभार. असल्या चाणाक्षपणात प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा पुढं गेलेले.

(॥) वचने लूक १६: ९- १३ – हा दाखला कोणाला सांगितला ? ‘ही’ या प्रत्ययावरून तो येशूने आपल्या शिष्यांना सांगितला यात शंकाच नाही. “तुम्हास सांगतो… तुम्ही .. मित्र करा.” १५ व्या अध्यायातला दाखला कुणाला लिहिला ते आपण पाहिलंय. त्या कथानकात गायनवादन, पुष्ट वासरू कापून मेजवानी, अंगरखा, अंगठी, त्या उधळ्या गरजवंत, पातकी, पुत्रानं तारणाची पहिली पायरी चढली. सारं संपलं? नाही बरं का.! आता पुढं काय? आता रोजच्या तारणाची पातकी शरीरानं जगातली काट्याकुट्यांची वाट जन्मभर तुडवायचीय. मग त्यासाठी त्या उधळ्या पुत्राकरता दाखला नको का?

(॥।) दाखल्याचं कारण – बापाचं जीवन हीच या पातक्याची आता मूळ संपत्ती. तीच त्याची मालमत्ता. ती उधळली, त्या पापांचे संस्कार देहावर झालेले आहेतच. तो देह कुठं बदललाय? पण मन, जीव आणि आत्मा वळलीत ना देवाकडं! देह अद्याप अनीतीनं भरलेला आहे. जगाची अनीतीची संपत्तीही हातात खेळत आहेच. जगातलं जीवन संपलेलं नाही आणि त्या संपत्तीशिवाय ते जगताच येत नाही. तारणापूर्वी बापाच्या अनंत जीवनाची संपत्ती बदफैलीत उधळली होती. आता जगाच्या संपत्तीनं अविनाशी डेऱ्यातली संत सहवासाची वस्ती कमवायची आहे. मग त्या जगाच्या संपत्तीचा विनियोग कसा करायचा? तिला स्पर्शच न करता विरक्त राहायचं? तसली पळवाट ख्रिस्ती धर्मविश्वासात नाही. म्हणूनच आधी पातकी असलेल्या पण आता तारलेल्या उधळ्या पुत्राला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्ग दाखवायला मोलाची शिकवण देणारा हा दाखला प्रभूच्या शिष्यांसाठी आहे. आता पुढे जाऊ.

(।V) दाखल्याचा मजकूर – प्रभू आपल्या शिष्यांपुढं दोन गोष्टी ठेवत आहे. एक, तो त्यांच्या समोर दोन धनी ठेवतो. पहिला देव, दुसरा संपत्तीचा देव. यासाठी की शिष्यांनी त्यातून योग्य ती निवड करावी. कारण ख्रिस्ती धर्मविश्वास हा देव त्या व्यक्तीवर बळजबरीने लादत नाही. तर आपल्या स्वतंत्र इच्छेनं त्याने तो स्वीकारायचा असतो. म्हणून तो दोन धनी समोर ठेवतो. तसेच दोन प्रकारचे नोकरही समोर ठेवतो. एक असा आहे, की त्याच्यावर सोपवलेल्या अत्यल्प अगर कशाही असलेल्या धनाविषयी विश्वासू आहे. त्या उलट दुसरा त्याच्या हाती सोपवून दिलेल्या अत्यल्प अगर पुष्कळ धनाविषयी अविश्वासू आहे. पहिला, आपल्या धन्यावर म्हणजे देवावर प्रीती करून त्याच्याशी निष्ठेनं वागतो. धनाच्या देवाचा तो द्वेष करतो व त्याला तुच्छ मानतो. त्याच्या उलट दुसरा, देवाला सोडून संपत्तीच्या देवावर प्रीती करतो, व त्याच्याशी एकनिष्ठ वागतो, आणि देवाचा द्वेष करून त्याला तुच्छ लेखतो.

अखेर धनही दोन प्रकारचं आहे असं प्रभू दाखवतो. एक धन नाहीसं होणारं, अनीतीचं, अत्यल्प, दुसऱ्याचं आहे. दुसरंही धन आहे, ते अनंतकालिक, अस्सल, खरं, पुष्कळ, आपलं स्वत:चं आहे. म्हणजे नाहीसं च्या उलट चिरकाल. अनीतीच्या उलट अस्सल, खरं. अत्यल्पच्या उलट पुष्कळ. दुसऱ्याचं च्या उलट स्वत:चं. असं या धनाचं स्वरूप आहे.

धनाविषयी शिकवण – (अ) कसलं धन? अनीतीचं धन : या दाखल्यात कुणी मिळवलं?

अन्यायी कारभाऱ्यानं. ते कुणाचं धन? अनीतिमान मालकाचं धन. येशू शिष्यांना काय सांगतो? अनीतीच्या धनाविरुद्ध अस्सल धनही आहे. ते मिळवण्याजोगं आहे. अनीतीचं धन दुसऱ्याचं, व अत्यल्प, नाहीसं होणारं आहे. त्याउलट आपलं स्वत:चं पुष्कळ व अनंतकालिक धन आहे. तेही मिळण्याजोगं आहे. पण ते मिळवण्याचं साधन कोणतं? तर अनीतीच्या, दुसऱ्याच्या, अत्यल्प, नाहीसं होणाऱ्या धनानं मिळवा असं प्रभू सांगतो.

(ब) कसं मिळवा हे धन? अनीतीनं नव्हे, तर विश्वासूपणानं, देवाची सेवा करून, देवावर प्रीती करून, देवाशी एकनिष्ठ राहून आणि सैतानाचा संपत्तीचा, द्वेष करून, संपत्तीला तुच्छ मानून ते मिळवा.

(क) मित्र मिळवा. चिरकाल डेरे, अस्सल धन, स्वत:चं, पुष्कळ धन मिळवा. म्हणजे फक्त ३ गोष्टी मिळवा.

मित्र- सोबत; डेरा- राहाण्याला वस्ती; धन- उपभोगायला.

संपत्ती मिळवा. म्हणजे काय? “पवित्र जनांमध्ये त्यानं दिलेल्या वतनाची वैभवी संपत्ती मिळवा” ( इफिस १:१८).

हे संत, त्यांचं वतन, त्यांच्या वैभवाची संपत्ती काय आहे, हे समजून घ्यायला त्या दाखल्यातल्या अनीतिमान कारभाऱ्याची पुन्हा तुलना करा. मालक अनीतिमान, कारभारी अनीतिमान, संपत्ती अनीतीची आणि शहाणपण या जगातलं, ऐहिक. अनीतिमान मित्रांसंबंधीचं काय मिळवायला? त्याचं इथलं, नाहीसं होणारं धन मिळवायला. अंधाराचीच ती दुनिया; व तिचे ते पुत्र!

उलट, प्रकाशाची दुनिया, देवाची दुनिया, सार्वकालिक, अस्सल, पुष्कळ, स्वत:च्या धनाची, चिरकालिन वतनाची, वस्तीची, सोबतीची ही दुनिया. पण ही दुनिया मिळणार कशानं? अनीतीच्या धनानंच मिळवायची. का बरं? आपण उधळ्या बापाची, त्याच्या जिण्याची, संपत्तीची धुळधाण करून बदफैलीत उधळली. पण पश्चाताप करून बापाकडं परत फिरलो. बापानं क्षमा केली. उत्सव केला, तारण झालं म्हणून नाचलो, बागडलो, गाणी गायली. आता पातकी जगात, पातकी लोकात, दुनियेच्या देवाची अनीतीची संपत्ती घेऊनच वाट तुडवायचीय. आणि विश्वासूपणानं त्या अनीतीच्या संपत्तीचा वापर करून, देवावर प्रीती करीत निष्ठेनं संतांवर पराकाष्ठेची प्रीती करीत चिरकालिक मित्र, वतन मिळवायचे. अखेरपर्यंत आपल्या हातात सैतानाची संपत्ती खेळत राहणारच. पण तीच संपत्ती घेऊन, तिनं सार्वकालिक संत मिळवायचे. म्हणजे ही संपत्ती घ्यायची अन् सुवार्तेसाठी, संतांच्या गरजा भागवण्यासाठी तिचा वापर करायचा. पण आपण काय करत आहोत, प्रियांनो?

माझा पैसा…मी मिळवलाय…मला हवा तसा मी तो खर्चीन…असं म्हणतो ना आपण? अहो, तो पैसा आपला नाही. तो त्या दुष्टाचा, दुसऱ्याचा आहे. ‘पुष्कळ झालं आता…खूप मिळवलं’ असं आपण म्हणतो. पण ते अल्प आहे. ते केवळ साधन आहे. त्यानं आपण आपलं अनंत तयार करीत आहोत. आपण निदान कमीत कमी आपला दशांश तरी नित्य नेमानं दिलाय का? आपण देवाला फसवलंय, लुबाडलंय, ठकवलंय. उरलेल्या नऊ दशांश रकमेचं काय केलं आपण? खाणंपिणं, कपडेलत्ता, घरदार, मुलंबाळं, शिक्षण…वर कर्ज. सदाचंच भिकारपण…हात पसरलेलेच कुणापुढं तरी. देणं फेडायच्या धास्तीनं…अंधाऱ्या भविष्याची वाट पाहाणारे आहोत का आपण प्रियांनो? प्रियांनो, अनंत वस्ती, अनंत मित्र आहेत का आपल्याला? ते काही आपोआप आपल्याला मिळणार नाहीत. ते इथंच मिळवायचे आहेत.
हातात खेळणाऱ्या पण चटकन् नष्ट होणाऱ्या संपतीनंच ते इथंच मिळवायचे आहेत. नाहीतर? मित्र नाहीत- एकटेच! वस्ती नाही- अंधारच!

“ अनीतीच्या संपत्तीनं तुम्ही मित्र मिळवा.” देवावरील प्रीतीनं, निष्ठेनं, विश्वासू राहून मिळवा. मग संत मित्र, सार्वकालिक वस्ती, सततची अस्सल संपत्ती ही तुमचीच आहेत.

Previous Article

अन्यायाचं धन : लूक १६:९

Next Article

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

You might be interested in …

तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व 

जोनाथन वूडयार्ड                              मी एक गर्विष्ठ माणूस आहे. खरंच. या विभागातला मी एक प्रमुख तज्ज्ञ आहे. मी ढोंग करत नाहीये. मला प्रामाणिक आणि नितळ व्हायचे आहे. गर्वामुळे येणाऱ्या समस्या मी प्रत्यक्ष  अनुभवल्या आहेत. मी […]

आध्यात्मिक धोक्यांबद्दल जागरूक असा

जॉन ब्लूम जागरूक न राहणे हे आपल्या जिवांसाठी नाशकारक आहे.  हा नाश रूपकात्मक अथवा आभासी किंवा काव्यात्मक नाही – तर खराखुरा नाश आहे. आपण ख्रिस्तामागे चालत असताना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार हे प्रेषित पौलाला […]

धडा १८.  १ योहान ३:१६- १८ स्टीफन विल्यम्स

ख्रिस्ताचे प्रीतीचे उदाहरण प्रेमावर रचलेल्या कविता व गाण्यांविषयी तुम्हाला काय वाटते? त्यातून काय साध्य होते असे तुम्हाला वाटते? त्यांना त्यांचे एक स्वतंत्र स्थान आहे असे आपण म्हणू शकतो. पण देवाची प्रीती फार दूर शब्दांच्या पलीकडील […]