दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गेथशेमाने बाग

लेखांक १                                        

प्रस्तावना

आपण दु:खसहनाचा सण पाळत आहोत. ख्रिस्ती धर्म हा मुलखावेगळाच धर्म आहे. कारण इतर धर्मांत जयंत्या, क्वचितदा पुण्यतिथ्या पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा, लाजिरवाण्या मरणाचा सण फक्त ख्रिस्ती धर्मच पाळतो. वास्तविक दु:खासारखा जिव्हाळ्याचा प्रश्नच दुनियेत नाही.. आणि दुनियेला तो अजूनही प्रश्नच आहे. दुनियेला दु:ख हे अजूनही अज्ञातच आहे. दु:खाचं अस्तित्व, आरंभ, अखेर, अर्थ या सर्वच बाबतीत तो एक अवघड प्रश्न आहे. मग त्या दु:खाचा सण पाळणं तर कितीतरी दूरच राहिलं. दु:खाचा प्रश्न सुटला असेल, दु:खाला अमर अर्थ असेल, समाधानकारक स्पष्टीकरण असेल, शाश्वत किंमत असेल तरच दु:खाचा सण अस्तित्वात येईल. नाहीतर दु:खाच्या देखाव्याला कधी कोणी किंमत दिली आहे? वेदनांच्या निरुपतेमध्ये वैशिष्ट्य असेल असं कधी कुणाला वाटलं आहे? दु:खाला ध्येय असेल, दु:खामध्ये देव असेल, त्यात अमर रहस्य असेल, भासवान भविष्य असेल असं ख्रिस्ती धर्माशिवाय कुणाला वाटलं आहे? निंदा, अपमान, तिरस्कार, उपहास याच्याशिवाय दु:खाला कुणी काय बहाल केलं आहे?
म्हणूनच या दु:खसहनाच्या सणाचं महत्त्व फार आहे. माणसाच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याच्या अपरंपार वृद्धिविकासासाठी जिथं अमोल अन्न साठवलं आहे, त्या ह्या ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या सदैव जिवंत, सदैव समृद्ध, सदैव ताज्या रसरशीत हकीगतींचा अभ्यास या सणामध्ये ख्रिस्ती संत करीत आले आहेत. त्याचसाठी यावेळेस देखील तिचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याचं मनात आहे. त्याचं उदात्त ध्येय, त्यामधलं निर्माण सामर्थ्य, त्याच्यातलं समाधान या सर्वांचा आणखी एकदा काळजीपूर्वक अभ्यास करावा…त्यातील सामर्थ्य आपलंसं करावं .. प्रभूच्या दु:खसहनाशी सममनस्क व्हावं…आपल्या मगदुराप्रमाणं त्याचं देवपण आपलंसं करावं; या हेतूनं ही रोमांचकारी रमणीय हकीगत पुन्हा एकदा हाताळावी असं मनात आहे.

ज्या पवित्र शास्त्रात ही हकीगत आहे, ते एक अवर्णनीय पुस्तक आहे. त्यात देवाच्या तारणाची योजना आहे. गरजवंत पातक्याचा उद्धार त्यात आहे. त्यासाठी लागणारं सामर्थ्य तिथं आहे. ते प्राप्त करून घेण्याची वाट तिथं आहे. तिचं मार्गदर्शनही तिथं आहे. सूक्ष्म स्पर्शाची सूचकता तिथंच आहे. तर वास्तवतेचं वैभवही तिथंच आहे. जुन्या करारात तारणाची योजना तर नव्या करारात परिपूर्ती. प्रभूच्या दु:खसहनाच्या  हकीगतीचंही तसंच आहे. नव्या करारात थरारून सोडणारी, मंगलतेनं बहरून टाकणारी घडलेली गोष्ट तिथं आहे. तर त्याच दु:खसहनाची सूचना देणाऱ्या अनेक लाक्षणिक कथा जुन्या करारात आहेत. त्यातूनच एक साधी चित्तवेधक कथा आजच्या विषयाच्या प्रस्तावनेत मननासाठी घेऊ या.

एक वृद्ध बाप… त्याचा तरणाबांड एकुलता एक…देवाच्या वचनाने… म्हातारपणी झालेला जीव की प्राण…दोघे बरोबर वाट चालत आहेत.. देवाची आज्ञा.. कठोर.. काहीतरीच आज्ञा…परिपूर्ण करण्यासाठी दोघे निघाले आहेत. बापाच्या हातून यज्ञपशू होण्यासाठी मुलगा… यज्ञासाठी विस्तव, लाकडं सुरा…यज्ञपशू सोडून सर्व घेऊन दोघे बरोबर वाट तुडवत.. बोलत बोलत चालत आहेत…. “बाबा”… “बाळा?”….”विस्तव आहे, लाकडं आहेत… कोकरू कुठं आहे?” … “देव पाहून देईल बाळा”… दोघं येतात, यज्ञस्थळी पोहंचतात. बाप वेदी बांधतो. लाकडं रचतो. मुलाला बांधतो..वेदीवर ठेवतो.. सुरा घेतो… मुलगा गप्पच! या शहारून सोडणाऱ्या कठोर सहन कथेला बाप काय म्हणतो? …. उपासना !!!

आता हा नव्या करारातला देखावा:

इथं पण बाप अन मुलगा बरोबरच. हा वास्तव… तो सावली. ती योजना… ही परिपूर्ती. हिन्नोम खोऱ्यातला तो कोरडा किद्रोन ओहोळ… रहस्यपूर्ण…गेथशेमाने बाग…उत्कंठ कौमुदी…भेसूर सावल्या… इथंही बरोबरचे सवंगडी… दूर अंतरावर… बापलेक दोघेच. तेव्हाचा मुलगा अजाण… हा सारं समजून चुकलेला पुत्र. दोघेही एकुलते एक पुत्र…प्राणाहून प्रिय… पण या विलक्षण उपासनेत स्वत:चं समर्पण करणारे! इब्री५:७ मध्ये दु:खसहनाला ‘सुभक्ती’ म्हणजे  मूळ ग्रीक शब्दाच्या अर्थानुसार ‘उपासना’ म्हटलं आहे. या दु:खसहनाचा अभ्यास त्याच्याशी सममनस्क होऊन करू या.

मजकूर : गेथशेमानेतील द:खसहन ही कथा पहिल्या तीन शुभवर्तमानांमध्ये आहे. ते सर्व उतारे आपण एकत्रित अभ्यासणार आहोत. मत्तय २६:३६ ते ४६ अकरा वचनं ; मार्क १४:३२-४२ अकरा वचनं; लूक २२:३९ ते ४६ आठ वचनं. त्यांचा आपण (अ) प्रार्थनेपूर्वी (ब) प्रार्थना (क) प्रार्थनेनंतर असे तीन विभाग पाडून अभ्यास करू.

(अ) प्रार्थनेपूर्वी – दु:खाला ख्रिस्ती धर्मात अर्थ, मोल, ध्येय असून सार्वकालिक जीवनाचा मार्ग दु:खातूनच गेला आहे. दु:खाला कधीही डावलता येत नाही; कधी डावलता येणारही नाही. देवालाही डावलता आलं नाही. तीच वाट आमचीही आहे. काटे नसलेले सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायचं असेल तर ते दु:खसहनानंतर. दु:खसहनाची कमाल होत असतानाच ते मिळत राहात असतं. त्याचं भलतंच स्पष्टीकरण करता येत नाही. त्यानं ते नाहीसंही होत नाही की चुकवता येत नाही. मग ते चुकवायचं किंवा उदास, हताश, निष्क्रिय होऊन जिवंत मरण तरी का मरायचं? आपल्या प्रत्येकाच्या पूर्णता प्राप्तीच्या जीवनाच्या वाटचालीत गेथशेमाने आहेच. पण आमच्यासाठी गेथशेमाने पराभवाची जागा नसून विजयाची रणभूमी आहे, म्हणून आपण धन्य आहोत. दु:खाच्या कमालीची असली तरी ती अविनाशी सौख्याची जागा आहे. का बरं? कारण आपण तिथं एकटे नाही आहोत. प्रथम प्रभू तिथं गेलाय, आणि आम्हाला घेऊन गेलाय. “नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या जागी आला” ( मत्तय २६:३६). आमचा तो गुरू, मालक, देव, पुढारी, सोबती. आम्हाला आपल्याबरोबर घेऊन जाणारा! त्यानं वाट दाखवल्यावर शंका अन् धास्ती कसली?

तो आमच्याबरोबर आपलं दु:ख वाटून द्यायला तयार आहे. ती निकडीची गरज आहे. त्या पवित्र भूमिवर तो आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. त्याला दु:ख होतंय, आम्हाला तो ते सांगतोय. अरेरे.. पण तिथं आपणा सर्वांना नाही जाता येत. अब्राहामाच्या गड्यांना मोरिया डोंगर दुरूनच दिसला. त्यांना दूर अंतरावर थांबावं लागलं.

प्रियांनो, कुठं आहोत आम्ही? कुठपर्यंत गेलो आहोत? गेथशेमानेत प्रवेश केलाय का? असलाच तर कसा? प्रत्येकाच्या जिण्यात ती भयाण बाग असतेच. जावंच लागततं तिथं. पण कसं? प्रभुबरोबर की एकटं? राहणार तिथंच की चालणार पुढं? तो नेईल तर! पण तो नेईल का तिथं पुढं? “त्याच्या परिपाठाप्रमाणं तो तिथं गेला” (लूक २२:३९).
तिथं जाण्याचा सराव असावा लागतो. त्याच्याबरोबर असावं लागतं. ते अंगवळणी पडायला हवं असतं. प्रभुभोजनाला आरंभ झाला तेव्हा बारापैकी अकराच राहतात. तीन येशू निकट असतात तर आठ कसेतरी फक्त बागेत प्रवेश करतात. पुढं नाही जाता येत त्यांना. तिथंच बसावं लागतं. “ मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत थोडा वेळ इथं बसा” (मार्क १४:३२-३३; मत्तय २६:३६). अरेरे! प्रार्थनेतही सोबत नाही प्रभूची! ती जागा बागेतच; तरी प्रार्थनेचीही ताटातूट होण्याइतकी पुढे आहे ती जागा.

आमचा परिपाठ कोणता? की वर्षातून एकदा गेथशेमाने? चाळीस दिवस? की दु:खाचा पवित्र आठवडा? की फक्त उत्तम शुक्रवार? की वर्षातून तो देखील नाही? कुणाला ठाऊक प्रियांनो, आयत्या वेळी गडबड करता नाही येणार… त्या बागेत जरासं पुढं नाहीच जाता येणार. तुमचा मगदूर, किंमत तुम्ही परिपाठानं ठरवलेली असते.

सदैव दु:खसहन करणाऱ्या, धन्य आहेस तू! दु:खसहनाच्या आपल्या नेहमीच्या परिपाठानं …थोडं पुढं ( लूक २२:४१) प्रभुबरोबर तुला पवित्र भूमीवर जाता येतं… .. दु:ख हे नेहमीचं रडगाणं नव्हे. दु:खाचा तो परिपाठ .. प्रभूबरोबर प्रार्थना करण्यास… पुढं… थोडंसं पुढं जाण्याचा तो दुर्मिळ, अमोल परवाना! राजकीय हक्क! ( फिलिपै १:२९).
दु:खाला संकटांना त्रासू नको. ती प्रार्थनेची जागा, थोडं पुढं प्रभूच्या सोबतीसाठी जाण्यासाठी तुझी लायकी आहे. लूक २२:३९ मध्ये “तो बाहेर पडून” गेथशेमानेला शिष्यांच्याबरोबर आला, असं म्हटलं आहे. “ बाहेर पडून” चा अर्थ काय? म्हणजे माडीवरल्या खोलीतून बाहेर पडून. तिथं प्रभुभोजनाचा भक्तगणांचा देवासह सौख्यसोहळा झाला. ती शांतता, ते गंभीर वातावरण, ती देवाण घेवाण, घराचा आसरा, उपासनेचा उबारा, हे सर्व सोडून बाहेर यावं लागतंच.

उपासना दोन असतात. एक संतांच्या सहवासातली; दुसरी एकांतातली, उघड्यावरची उपासना. एक सुखाचा सोहळा, दुसरं दु:खाचं दडपण. एक जितकं अवश्य तितकंच दुसरं अटळ ! ते चुकवता येतच नाही.
कितीदा असं वाटतं, आपल्या आवडत्या प्रियजनांसोबत संगती सोबतीत, वचनाचा उलगडा, पित्याची प्रार्थना, मनोभावे गायलेली गोड गाणी, देवाचं देवपण, मर्त्य माणसाला देणारी ही उदात्त उपासना …हा संतांचा मेळावा अखंड असाच चालू राहावा. पण तसं कसं होईल?

स्वत:चं, इतरांचं, दु:खपूर्ण दुनियेचं, संकट, अडचणींनी भरलेलं हे जिणं जगण्यासाठी, ते बदलण्यासाठी, आनंदमय करण्यासाठी त्या रम्य उपासनेचं रूपांतर खडतर कृतीच्या उपासनेमध्ये व्हावंच लागतं. त्या भयाण बागेत, उदास उपवनात, दुसऱ्या कोणाला येता येत नाही. तिथं एकट्यानं जायचं असतं. डावलून चालत नाही, की त्रासून वैतागून कड लागत नाही. मग तिथं जाणं जर असं अपरिहार्य अन् मुक्ररच आहे, तर निराश, निर्बल हताश होऊन कसं चालेल? निभाव कसा लागेल? त्यापेक्षा कठोर काळघटकेला कमालीच्या कणखरपणानं तोंड दिलंच पाहिजे. ‘बाहेर पडलंच’ पाहिजे. तो बरोबर असला की पुरे.

Previous Article

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

Next Article

गेथशेमाने बाग

You might be interested in …

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १० ५ वा – दाविदाचा करार हा  विनाअटींचा करार आहे. दावीद देवाच्या निवासाप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या विचारात असताना, दावीद युद्धप्रिय असून त्याच्या हातून अत्यंत रक्तपात झाल्याने मंदिर बांधण्यास देव त्याला मना […]

तुमची लाडकी पापे ठार करा – त्यांनी तुम्हाला ठार करण्यापूर्वी ग्रेग मोर्स

“एक्स्क्यूज मी, आता जे तुम्ही म्हणालात ते परत सांगता का?” माझी खात्री होती की मी ऐकले ते चुकीचे होते. “…” “ म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जर लैंगिक पापाशी तुम्ही सतत मुकाबला करत असाल तर ती […]

मी कोमट आहे का?

जॉन पायपर कोमटपणा म्हणजे काय? कोमटपणाचे सार म्हणजे असे म्हणणे, “ मला कशाची गरज नाही, मला काहीच नको. मला येशू मिळाला ते पुरे आहे. एक दिवस मी त्याला माझ्या ह्रदयात यायला आमंत्रण दिले होते आणि […]