सॅमी विल्यम्स
धडा ६वा
आता तीन मित्रांचे सल्लामसलतीचे भाषण व प्रत्येकाच्या भाषणाला ईयोबाचे प्रत्युत्तर, अशी दोन चक्रे आहेत. अध्याय ४ ते १४ पाहिले चक्र; अध्याय १५ ते ३१ दुसरे चक्र; चौथा मित्र अलीहू याचे संभाषण तिसरे चक्र; अध्याय ३२-३७ त्यानंतर देवाचे इयोबाला उत्तर- अध्याय ३८-४१ असा या काव्यात्मक संभाषणाचा क्रम आहे.
पहिले संभाषण चक्र
आपण निरुपयोगी समुपदेशक कसे नसावे?
देव या तीन समुपदेशकांचे म्हणजे सल्लागारांचे नकारात्मक उदाहरण आपल्यासमोर ठेऊन आपल्याला चांगले समुपदेशक कसे असावे याचे धडे देतो. रोम १५:१४ मध्ये आपण परस्परांना सत्य शिकवून बोध करायचा आहे. पण केवळ सत्य माहीत असून पुरेसे नाही, तर मसलत देताना त्याचे लागूकरण पण उत्तम करता येणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुम्ही निरुपयोगी, वाईट सल्लागार ठरू शकता. हे तिघे असे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. ईयोब २:११ व ४२:७ वरून या तिघांमध्ये अलीफजचे नाव प्रथम आले आहे, हा अदोम येथील तेमानचा होता. कारण तो त्यांच्यात अधिक ज्ञानी, मान्यताप्राप्त, समाजात उच्च दर्जाची पतप्रतिष्ठा असलेला, अनुभवी, चांगला निरीक्षक, वयाने मोठा असा व्यक्ती होता. तो इतिहासतज्ञ व उत्तम निरीक्षक, आध्यात्मिक शिक्षण देणारा शिक्षकही होता. अशा सर्व ज्ञानाने संपन्न असल्याने इतिहास व लोक, यांच्या अभ्यासावरून व अनुभवांच्या आधारे तो आपली तत्त्वे मांडत बोलणार होता. देवाच्या शिकवणीच्या उलट त्या काळची समाजमान्य शिकवण होती की फक्त दुष्टांवरच संकटे येतात. चांगले असाल तर आशीर्वादित राहाणार, वाईट असाल तर संकटे दु:खे येणारच.
अलीफजच्या चुका
१- वचने ४:१-६; २-वचने ७-११; ३- वचने १२-१६; ४- वचने १७-२१ अशा चार भागात आपण पहाणार आहोत. हे सत्य मांडणे पण त्याचे चुकीचे लागूकरण करणे आहे. कारण समुपदेशन करण्याचे ते चार निरुपयोगी मार्ग आहेत.
१ली चूक- वचने ४:१-६- अलीफजची मनोवृत्ती उपहासाने बोलून त्याला समजून घेण्यापूर्वीच त्याला दोषी ठरवते. त्याला अभिवादनही न करता, विचारपूस न करता सरळ बोलू लागतो.
वचने १व २- अलीफज कठोर वाटतो. ईयोबाला गप्प करून त्याचे भाषण थांबवून आपणच बोलू लागतो. तो सहनशील नाही. त्याला धीर नाही. तो सरळ मुकाबला करून ईयोबाला दटावतो व त्याला बोलू देत नाही, प्रतिसाद देऊ देत नाही.
वचने ३-४- ईयोबाची त्याच्या अनेक बलस्थानांबद्दल अलीफज प्रशंसा करतो की, तो चांगला शिस्त लावून शिष्य बनवणारा आहे. दुर्बलांना बल देणारा म्हणजे उत्तेजन देणारा, भयग्रस्तांना धैर्यवान बनवणारा आहे. जे भित्रे असून ज्यांचे गुडघे लटपटतात अशा खिन्न लोकांना कळवळ्याने दया दाखवून स्थिर करून त्याने धीर दिला आहे. आणि लगेच पाचव्या वचनात तो ईयोबाला लाथ मारतो.
वचन ५- दुर्बल, भयग्रस्त लोकांप्रमाणे तुझ्यावर वेळ आली म्हणजे तू त्यांच्यासारखाच अधीर होतोस. तू संकट घेऊ शकत नाहीस. बोलतो तसे न करणारा तू ढोंगी आहेस. तू पेचात पडला आहेस. अस्वस्थ आहेस असे तो ईयोबाला म्हणतो.
वचन ६ – तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? असे म्हणत तो ईयोबाला आव्हान करतो. देवाचे ईयोबाला असलेले भय आणि त्याची निष्ठा याविषयी तो आव्हान देतो. अलीफजचे बरोबर की चूक आहे? अलीफजच अधीर आहे. त्याला दयामाया नाही. नीती. १८:१३; मत्तय ७:१ वाचा. तो स्वत:ला चांगला समजत ईयोबाशी काही बोलण्या आधीच त्याला दोष द्यायला आणि त्याचा न्याय करायला सुरुवात करतो. त्याच्या सर्व दु;खाचा संबंध तो पापाशी लावतो.
२ री चूक – वचने ७-११- तो येथे काय तत्त्व मांडतो? चांगले लोक चिरडले जाऊन नाश पावत नाहीत. निरपराध नाश पावत नाहीत, धार्मिक नष्ट होत नाहीत. प्रे.कृ २८:४ वाचा. पौलाविषयी लोक असेच चुकीचे मूल्यमापन करताना दिसतात.
वचने ८-९ मध्ये तो लागूकरण मांडतो की, जे कराल ते भराल. गलती ६:७. देव सार्वभौम आहे. देव त्यांचा व्यक्तिगत न्याय करतो.
वचने १०-११- सिंह म्हणजे अधम, क्रूर लोक. देव त्यांचा नाश करतो. त्यांचे दात उपटतो असे वर्णन तो करतो. दुष्ट लोक गर्जना करतात, देव त्यांना दूर लोटील. देव त्यांची साधनसंपत्ती व मुलेही काढून घेतो. ईयोबा तू तो अधम आहेस. असे त्याला म्हणायचे आहे. यात त्याचे काय चुकले?
१- तो सत्य सांगतो पण चुकीचे लागूकरण करतो. तो निरपराध लोकांवर येणारे दु:ख धिक्कारतो. म्हणजे ज्यांनी क्लेश येण्यासारखे काहीही केलेले नसते. योहान ९:२-३. त्याचे हे बोलणे शुभवर्तमानाला धरून नाही. रोम ५:३ म्हणते, ‘दु:खसहनाने धीर निर्माण होतो.’ येशू तर निरपराध दु;खसहनाचे जीवन जगला. तेथे हे तत्त्व चालेल का? त्याने तर पापच केले नव्हते.
२- पण अलीफज बदलीचे मरण मरणारा मध्यस्थ विसरतो. अलीहू ईयोब ३३:२३ काय म्हणतो पहा. जुन्या कराराचे लोक अशा मध्यस्थाची वाट पाहात होते. तो देवाशी मध्यस्थी करण्यासाठी व त्याला वाचवण्यासाठी खंडणी भरून सोडवणारा असेल. त्यामुळे दु:खसहनामुळे त्या व्यक्तीकडून हा मध्यस्थ देवाचे गौरव साधून देणारा असेल. हा विचार लक्षात न घेता अलीफज हे चुकीचे विधान करतो.
३री चूक- वचने ४:१२-१६- अलीफज आता काही दैवी दृष्टांतांचे कॅरिस्माटिक (चमत्कारात्मक) दावे करतो. आपल्याला हे सल्लामसलतीचे, या समुपदेशनाचे शब्द कोठून प्राप्त झाले असे तो म्हणतो? पंडिता रमाबाई भाषांतरात वचने १२-१३ पहा. त्याच्या या खास ज्ञान प्राप्तीच्या वर्णनासाठी त्याने वापरलेले शब्द लक्षात घ्या. देवाची खास प्रगटीकरणाची वाणी गुप्तपणे कानात गुणगुणली. गुणगुण हा शब्द आपण एकदाच ईयोब २६:१४ मध्ये देवाच्या वाणीसाठी वापरलेला पहातो. गाढ झोपेत असता, दृष्टांताच्या विचारलहरीत मग्न असता, हे ईश्वरी ज्ञान झाल्याचा तो दावा करतो. हे खरे की खोटे कसे समजायचे? देवाचे लोक या प्रकारे त्याविषयी बोलून फुशारकी मारत नाहीत. योएल २:२८ मध्ये आपण आत्मिक प्रगटीकरणाचे वर्णन वाचतो. आदामाला आलेली दैवी गाढ निद्रा आपण उत्पत्ती २:२१ मध्ये वाचतो. अलीफज कोणत्या अनुभवाचा दावा करतो? वचने ४:१४-१६ वाचा. त्याला भीती वाटू लागली, शरीराचा थरकाप झाला. हाडे लटपटू लागली, आत्मा त्याच्या मुखासमोरून गेला. देवाच्या रूपाने त्याची भेट घेतली. अंगावर रोमांच उभे राहिले. प्रभूच त्याच्यासमोर उभा राहिला. त्याला त्याने ओळखले नाही, मग तो त्याच्याशी बोलला. तो दावा करतो की त्याला खुद्द देवाचे दर्शन झाले. अलीफजच्या अनुभवावरून आपल्याला काय शंका येते?
अ- तो त्याविषयी बढाई मारत आहे; २ करिंथ १२:२-५.
ब- तो देवाच्या उरलेल्या वचनांशी विसंगत बोलत आहे; १ करिंथ १४:३७-३८.
४थी चूक- वचने १७-२१- तो केवळ देवाच्या न्याय करण्याच्या भूमिकेवर जोर देतो. तो कोणती संदेशवचने प्राप्त झाल्याचा दावा करतो? “मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय?” वचन१७. आपल्या शुभवर्तमानातील हे तर अगदी चपखल विधान. सर्व सामान्य सत्य आहे पण ह्या संदर्भाला ते समर्पक व लागू होणारे सत्य नाही. आणि दोषारोपासाठी ते वापरल्याने ते सैतानाचा वाद प्रतिध्वनित करते.
वचन १८- देवासमोर कोणी धार्मिक ठरू शकत नाही. हे म्हणताना तो देवदूतांवर आरोप करतो की ते बेभरवशाचे आहे, आणि देव त्यांच्यावर मूर्खपणाचा दोष लावतो. त्याचा मुद्दा आहे की देव जर दूतांना असे म्हणतो, त्यांच्या योग्यतेवर विश्वास ठेवत नाही, तर आपले काय? देव तर सैतान या पतित देवदूताचा या पुस्तकातील शिकवणीसाठी उपयोग करताना दिसतो. अलीफजच्या वादावर पुष्कळ आक्षेप घेता येतात.
वचन १९- आपल्याविषयी तो देवाचे न्यायत्व कोणत्या तीन प्रकारे मांडतो?
१- आपण केवळ मातीच्या घरात राहणारे आहोत. आपले घर क्षणभंगुर आहे.
२- आपली मूळ निर्मिती मातीतून, धुळीतून आहे, आपण धुळीला मिळणार. उत्पत्ती ३:१९.
३- पतंगासारख्या क्षुल्लक किड्यापुढे आपण चिरडले जाणार. तो म्हणतो मानवाच्या शरीराचा न्याय देव त्यांचे बल दुर्बल करणार. पापामुळे तुम्ही इतके कवडी मोलाचे आहात.
वचन २०- पापामुळे दिवसभर कष्ट करून तुमचे तुकडे तुकडे होतात. मग पापी असल्याने तुम्ही इतिहासजमा होता. कोणी तुमची दखल घेत नाही. सर्वाच्या स्मरणातून तुमच्या नोंदी सर्वकाळासाठी नष्ट होतात. अपमानित जीवनाप्रमाणे तुमचा न्याय होतो. पापामुळे अल्पायुषी जीवन जगता. असे अत्यंत निराशाजनक वर्णन अलीफज करतो. उत्तेजनदायी काहीच नाही.
वचन २१- मरण जणू कोणी राहुटीची दोरी तोडावी तसे आहे. आपण पूर्ण विकसित न होताच ज्ञानावाचून मरतो. तुमच्या पापामुळे देव तुमचे जीवन पुरते जगू न देताच संपवतो. असे देवाच्या न्यायावर जोर देत असता त्याच्या वर्णनात कोणती कमतरता आढळते?
१- खरे तर देव नरकाला जाणाऱ्या अधम व अन्यायी व्यक्तीवरही सर्वसामान्य कृपा करतो. मत्तय ५:४५; १२:२०. तो मंदक्रोध आहे. निर्गम ३४:६. तो कृपेने पूर्ण आहे. आपल्याला तर येशू शत्रूंवर प्रीती करायला सांगतो. जरी आपण कोणाला पापदोष दाखवत असू तर तो देखील प्रीतीने कळवळ्याने दाखवावा रागाने नव्हे, तर धीर धरून बोलावे अशी तो इच्छा करतो.
क्रमशः
Social