सितम्बर 22, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

स्वनकाराला वयोमर्यादा नसते.

क्रिस्टिन काउच

पाण्याखालील ट्रेडमिलवरचा माझा पहिला दिवस मी कधीही विसरणार नाही.

गुडघ्याच्या एका हट्टी दुखापतीने मला गरम पाण्याच्या उपचारांच्या या अनोळखी क्षेत्रात आणले. मी नाव नोंदवले, आणि जिममधल्या लॉकरशी चाचपडत असताना मी एखाद्या शाळकरी मुलीसारखी धांदरले.

माझ्या आजूबाजूला, तिशीतल्या तिघींनी त्यांचे पोहण्याचे आकर्षक वेश बदलून भपकेबाज कपडे घातले, ओले केस वाळवले आणि आरशासमोर मुरडल्या. त्यांनी त्यांचे ओठ रंगवले. कानात डूल घातले व डौलदार चपला पायात घालताना ट्रेडमिल वरील फेरीचा वेळ आणि नेमून दिलेल्या वेळेशी तुलना केली. झालं! अगदी सहज आणि निवांत असा त्यांचा मूड होता.

याउलट, मला मात्र स्वतःलाच गबाळे वाटत होते. मी माझा रंग विटलेला टॉवेल कमरेभोवती पटकन लपेटला, आणि स्लीपर घालून लॉकर रूममधून थेरपी रूमच्या दिशेने बाहेर पडले. वाटेत ऑलिम्पिक स्पर्धेत असतो तितक्या क्षेत्राएवढ्या जलतरण तलावात जलतरणपटू थंड पाण्यातून सहजतेने पाणी कापत पुढे जात होते.

नंतर, सत्तरी-ऐंशीच्या वयाच्या स्त्रियांनी गजबजलेल्या ‘जेष्ठांच्या तलावाला’ फेरी मारून  जाताना मी जणू वेगळ्याच काळात शिरले. पोहण्यासाठी घातलेल्या टोप्यांच्यावर आपले कोपरे वेडेवाकडे उंचावून बेडौलपणे त्या पाण्यात नाचत होत्या. संरक्षक कांडी हातात घेऊन किंचाळून सूचना देणाऱ्या प्रशिक्षिकेचे जमेल तसे त्या अनुकरण करत होत्या.

त्या कोमट पाण्यात उतरताना, मला दुःखाची एक तीव्र कळ जाणवली. म्हातारपणाची अचानकता नकळत माझ्यामध्ये  गुपचूप शिरकावली आणि रेंगाळून राहिली. ती एक टोचणारी कुजबुज होती: अमाप उर्जा व नितळ, सुंदर त्वचा असलेली, अशी तीस वर्षांची तरुणी तू राहिली नाहीस, मुलांना कॉलेजमध्ये पाठवणारी, स्वतःला सशक्त व कोणत्याही गोष्टीसाठी सज्ज समजणारी, चाळीस वर्षांची अशीही राहिली नाहीस.

खरं आहे. मी माझ्या पन्नाशीच्या मध्यात पोहोचत आहे, डोळ्यांच्या कडांना सुरकुत्या पडत आहेत आणि त्यात दुखरा गुडघा. व्यायाम करताना माझ्यावर निराशेची एक लाट पसरली, जणू काही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस नाहीसे झाले होते. पण ती भावना? ती केवळ एक भावना होती. एक मूर्ख, कपटी भावना. त्या सकाळी मला केवळ मनोवृत्तीतील बदलाचीच नव्हे, तर दैवी सुधारणेची गरज होती. एलिझाबेथ इलियट यांनी हे छान सांगितले आहे: “जोपर्यंत आपण आपल्या विचारांना पवित्र शास्त्राच्या सरळ रेषेत आणत नाही, तोपर्यंत आपले विचार किती कपटी आहेत हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळत नाही.” तर, देवाच्या गौरवासाठी वृद्ध होण्याबद्दल बायबल आपल्याला काय शिकवते?

१. स्वनकार प्रत्येक वयासाठी आहे.

काही वृद्ध ख्रिश्चन व्यक्तींमध्ये एक लोकप्रिय, ऐहिक विचारसरणी शिरली आहे: “माझी उतारवयातील वर्षे ही माझी स्वतःची आहेत आणि ती मी माझ्या मर्जीनुसार व्यतीत करेन.” मी अनेक वृद्ध होत जाणाऱ्या स्त्रियांना पाहिले आहे ज्या निवृत्तीनंतरची वर्षे केवळ भरकटत घालवतात; त्यांची दृष्टी संकुचित असते आणि सातत्याने सर्व दिवस केवळ स्वतःच्या उपभोगासाठी वेळ देताना मी आणि माझा वेळ याची रास रचतात.

“एक सुज्ञ स्त्री देवाला अनमोल मानून आणि इतरांची सेवा करण्यात आपले जीवन वाहून देईल.”

परंतु बायबलमध्ये कोठेही सुचवलेले नाही की, केवळ वैयक्तिक छंद जोपासण्यात स्वतःला झोकून दिल्याने, वायफळ गोष्टींत तासनतास घालवल्याने किंवा सतत भटकंती करणे अशा स्वकेंद्रीत जीवनशैलीचा स्वीकार केल्याने  आपल्या वृद्धापकाळाची वाटचाल सुखमय होते. हे सैतानाच्या कुयुक्तीचे पोतडे आहे, त्याचा उद्देश आध्यात्मिक उदासीनता पैदास करणे. खरे पहाता, अशा चैनींचा पाठलाग विश्वासहीन ह्रदयाची स्थिती दाखवितो. आणि एक पक्का पुरावा दर्शवितो की, मृत्यूसोबत आपल्या जीवनाचा अंत होतो, वास्तविक मरण खरे तर जीवनाची सुरुवात आहे. 

याचे परिणाम दुःखद असतात, कारण देवाची आणि इतरांची सेवा करण्याच्या अनेक संधींकडे दुर्लक्ष केले जाते. जर आपले ध्येय तारुण्यातील मोह, सौंदर्य, मनोरंजन किंवा भपकेबाज साजशृंगार अशा सुखसोयींच्या मागे धावणे हेच असेल, तर आपण वरकरणी आणि स्वार्थी जीवन जगू. काळाने जे पुसून टाकले, ते पुन्हा रेखाटण्यासाठी तासनतास वेळ घालवणे, पैसा आणि ऊर्जा खर्च करणे अगदी मूर्खपणाचे आहे. कुरकुर करणे, निरुपयोगी स्वयंमग्नता, आणि केवळ स्वतःचे लाड पुरवणे या गोष्टी आपल्या मनाला कधीच समाधान देणार नाहीत.

नीतिसूत्रे ३१:३० मध्ये इशारा दिला आहे: “सौंदर्य भुलविणारे आहे, लावण्य व्यर्थ आहे. परंतु यहोवाचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते.” आपण यहोवाचे भय बाळगतो, हे दर्शवण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे बायबलच्या आज्ञांचे मृदू अंतःकरणाने पालन करणे. बायबल सांगते की, येशूचा शिष्य होण्यासाठी आपण स्वतःला नाकारावे, आपला वधस्तंभ उचलावा आणि त्याला अनुसरावे (मत्तय १६:२४). या आज्ञेला वयोमर्यादा नाही. पाहिलेत, येशूने जगाच्या विचारसरणीला  कशी कलाटणी दिली?  एक सुज्ञ स्त्री स्वतःला विसरणाऱ्या वृत्तीच्या अत्तराचा सुगंध सर्वत्र दरवळवते. आणि ख्रिस्ताला मौल्यवान मानून व इतरांची सेवा करण्यात आपले जीवन सार्थकी लावते. हाताने लिहिलेली चिठ्ठी, प्रार्थनेत घालवलेला अधिक अर्धा तास, खाद्यपदार्थ देणे किंवा दुःखी व्यक्तीला बायबल वाचून दाखवणे — हे सर्व स्वतःचा त्याग करण्याचे, कोमल मनाचे मार्ग आहेत. आणि स्वतःच्या ऐहिक इच्छांना नाकारल्यामुळे आपल्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते.

२. देव आपला शाश्वत ठेवा आहे

हा आनंद आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळतो. “यहोवा माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत; माझे वतन माझ्या मनाजोगे आहे” (स्तोत्र. १६:५–६). देवाने सुज्ञतेने आपल्या डोक्यावरील केस आणि हृदयाचे ठोके मोजले आहेत. आणि ख्रिस्ताद्वारे आपल्याला एक थक्क करणारे व कधीही न कोमेजणारे वतन दिले आहे. प्रत्येक वाढदिवसागणिक आपण या महान सत्याविषयी अधिक जागृत होतो. आपण या जगात यात्रेकरी आहोत. देव आपल्यासाठी तयार करत असलेल्या शाश्वत निवासाची वाट पहात आहोत.

सुरकुत्या, सांधेदुखी, पांढरे केस आणि सैल पडलेली त्वचा ही आमच्यासाठी कृपायुक्त स्मरणपत्र आहेत, ती आपल्याला आठवण करून देतात की आपली निर्मिती यापेक्षा श्रेष्ठ गोष्टींसाठी झाली आहे आणि स्वर्ग जवळ आहे. वृद्धत्वातील वेदना आणि आव्हानांमधून, नेटाने पुढे जाण्यासाठी “माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती दुर्बलतेमध्येच पूर्णत्वास येते” (२ करिंथ.१२:९). हे येशूचे शब्द आम्हाला मायेची संधी बहाल करतात. होय, ख्रिस्त हाच आपले सार्वकालिक वतन आणि आपला वाटा आहे.

३. असे काम केवळ परिपक्व संतच करू शकतात

एकदा आपण आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचतो तेव्हा, पदर खोचून आनंदाने काम करण्याची तर ही वेळ असते. देवाने आम्हा जेष्ठ संतांसाठी एक अमूल्य सेवा आखून ठेवली आहे: तरुण स्त्रियांना शिकवणे.

तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या; सुशिक्षण देणाऱ्या असाव्या; त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्यांवर आणि मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पहाणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहण्याऱ्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” (तीत २:३-५)

तरुण स्त्रियांना प्रशिक्षण देण्याच्या कामात धीर, वेळ आणि पुन्हापुन्हा शिकवण्याची गरज असते. जेष्ठ स्त्री या नात्याने, तरुण स्त्रियांना शिकवताना. आपले अपयश, आपले पाप, आपण आज्ञाधारक वृत्तीने केलेला पश्चाताप यातून जे काही शिकलो ते शिकवताना देवाच्या सहनशीलतेने भरलेल्या  विश्वासूपणाची (स्तोत्रसंहिता ३७:२५) आठवण ठेवावी. कल्पना करा, जर आपल्यापैकी प्रत्येकीने स्वतःला प्रिय असणाऱ्या काहीनाकाही सुखांना नाकारून (स्वनाकार) आणि तीत २ मधील देवाने दिलेल्या बोधपर निर्देशाचे आज्ञापालन केले, आणि आपल्या मुली, नाती, पणती तसेच मंडळीतील तरुण स्त्रियांच्या हृदयात हे सत्य रुजवले, तर ख्रिस्ताचे शरीर किती बळकट  होईल!

त्यामुळे, जशी नितळ त्वचा नाहीशी होऊन तेथे खोल सुरकुत्या दिसू लागतात, जेव्हा प्रकृतीच्या समस्या वाढतात, आणि तारुण्य हरवल्याची बोचरी जाणीव होते, तेव्हा आठवण करा: ” सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो” (उपदेशक ३:१). देवाच्या कृपेने, आपण प्रत्येक सरत्या वर्षासोबत ख्रिस्तासारख्या दासाच्या वृत्तीमध्ये वृद्धिंगत होऊन वाढत्या प्रमाणात, आपले जीवन देवासाठी आणि इतरांकरिता सर्वस्वी वाहून देऊ या. 

Previous Article

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेतून होते

You might be interested in …

दु:खसहनाची हमी, कृपेची हमी

स्टीफन विल्यम्स “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. […]

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेतून होते

स्कॉट हबर्ड पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी मिळाला असता तर! [क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा आणि जर […]

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग 

 १६८३-१७१९ लेखांक १०                                 प्रास्ताविक रोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही केला नव्हता ही […]