नवम्बर 10, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

शेवटच्या काळातील श्रेष्ठ पाचारण

जॉन पायपर

ग्रेसचा प्रश्न

“पास्टर जॉन, मत्तय २४:३-१४ या वचनात, येशूने शेवटच्या काळात घडणाऱ्या युद्धे, दुष्काळ, भूकंप आणि खोटे संदेष्टे या चिन्हांचे वर्णन केले आहे. जेव्हा तुम्ही बातम्यांमध्ये घटना, नैसर्गिक आपत्ती, राजकीय अशांतता किंवा ऑनलाइन खोट्या बातम्या आणि फसवणुकीचा प्रसार पाहता, तेव्हा तुम्हाला या वचनाची आणि त्यातील इशाऱ्याची आठवण येते का? ह्या वचनांतून जागतिक घटनांबद्दल तुम्ही काय अनुमान काढता? येशू याला ‘प्रसूती वेदनांची सुरुवात’ म्हणतो, आणि आपल्याला आठवण करून देतो की त्याच्या परत येण्यापूर्वी अशी संकटे जगाच्या इतिहासाचा भाग आहेत. जेव्हा तुम्ही माध्यमांमध्ये ही चिन्हे पाहता, तेव्हा विश्वासूपणे जगण्याची आणि सुवार्ता सांगण्याची तुमची निकड अधिक तीव्र होते का?”

उत्तर

याला थोडक्यात उत्तर होय असे आहे, पण मला सुरवातीलाच सांगू द्या की शेवटच्या काळातील ही चिन्हे इतकी महत्त्वाची आहेत की, जिच्यामुळे मी तीन वर्षांपूर्वी येशूच्या दुसऱ्या आगमनाबद्दल एक संपूर्ण पुस्तक लिहिले .

पौलाने त्याच्या आयुष्याच्या अखेरीस लिहिलेली वचने आज माझ्या जीवनाच्या अखेरीस माझे लक्ष आणि अंतःकरण खेचून घेतात. तो म्हणतो, “मी चांगले युद्ध केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे, आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुगूट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल.” मग तो पुढे म्हणतो, “आणि केवळ  मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल” (२ तीमथ्य ४:७-८).  जो मुगूट पौलाला मिळणार आहे, तसाच मुगूट या सर्वांना मिळणार! हे तर थक्क करणारे आहे.

येशूचे प्रकट होणे प्रिय असावे

हा संदर्भ निवडक ख्रिस्ती लोकांबद्दल आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की ही पौलाची ख्रिस्ती व्यक्तीची व्याख्या आहे. आठवा पाहू  पौलाने १ करिंथ १६:२२ मध्ये काय म्हटले आहे, “जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर  प्रीती करीत नाही तो नाशास सोपलेला असो. प्रभू, येत आहे.” येशूवर प्रीती करणे ही ख्रिस्ती असण्याची दुय्यम पायरी नसून हेच  ख्रिस्ती असणे आहे. आणि पौलासाठी तर, येशूवर प्रीती करणे म्हणजे त्याच्या प्रकट होण्यावर प्रीती करणे होय. ते का बरे नसावे? त्याच्या सहवासाची इच्छा असणे म्हणजे त्याच्या समक्ष सहवासाची इच्छा असणे होय. माझे ओझे आहे की, काळाच्या चिन्हांकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा प्रभू येशूच्या प्रकट होण्यावर प्रेम असणे हे आम्हाला अत्यंत निकडीचे वाटावे. या प्रेमाला आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींमध्ये प्रमुख स्थान आहे का? त्याने प्रकट व्हावे अशी आपली इच्छा आहे का? आपण त्याच्यावर प्रीती करतो का? हीच माझी मुख्य कळकळ आहे.

येशू म्हणाला, “कारण मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे” (मत्तय १६:२७). तो असेही म्हणतो, “तो स्वतः कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील, व जवळ येऊन त्यांची सेवा करील” (लूक १२:३७). किती वैभवी! तो आमची सेवा करणार ? विश्वास बसत नाही ना? पौल कलसै.३:४ मध्ये म्हणाला,“आमचे जीवन जो ख्रिस्त तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.” आणि फिलिपै. ३:२०-२१ म्हणते, “आपले नागरिकत्व स्वर्गात आहे, आणि तारणारा, प्रभू येशू ख्रिस्त तेथून येणार त्याची आम्ही वाट पाहतो. तो ज्या सामर्थ्याने सर्व काही आपल्या स्वाधीन करायला शक्तिमान आहे, त्या सामर्थ्याने तो आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवाच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे स्वरूप पालटील.” व्वा, पौलाची किती मोठी अपेक्षा होती. प्रभू येशूच्या येण्याचा विचार त्याला खूप प्रिय होता, आणि जे अजून जिवंत आहेत व जे मरण पावले आहेत, त्या दोघांसाठीही दुसऱ्या आगमनाचा अर्थ काय असेल, याचे त्याला अगदी स्पष्ट आकलन होते.

तो म्हणाला, “आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्यांच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभूजवळ सर्वदा राहू” (१थेस्सल. ४:१६-१७). आमची प्रभूवर प्रीती आहे. आम्हाला प्रभूसोबत राहण्याची इच्छा आहे. हा परिच्छेद आम्हाला चकित करतो.

प्रभूवर प्रेम करण्याची आणि त्याच्या प्रकट होण्यावर प्रेम करण्याची अनेक कारणे आहेत. आपण प्रभू येशूवर आणि त्याच्या प्रकट होण्यावर आपल्या प्रेमाची जोपासना करून दररोज स्वतःला  याच गोष्टींसाठी समर्पित केले पाहिजे.

काळाची चिन्हे

ग्रेस मला विचारत आहे की, येशूने मत्तय २४ मध्ये वर्णन केलेली शेवटच्या काळातील चिन्हांसारखी चिन्हे जेव्हा आज  घडताना दिसतात, तेव्हा प्रभूचे येणे आता लवकरच आहे अशी जाणीव देतात का? आणि मी होय म्हटले.

त्यामध्ये येशूने अशा चिन्हांचा उल्लेख केला आहे: खोटे ख्रिस्त, खोटे संदेष्टे उदयास येतील, आपण पाहू शकणारी युद्धे आणि दूरवरच्या युद्धांचे वृत्तांत, दुष्काळ, भूकंप आणि लूक त्यात “साथीचे रोग, महामारी” यांची तो भर घालतो (लूक २१:११). सुवार्तेला  विरोध, हौतात्म्य, अधर्म, ख्रिस्ती लोकांचे विश्वासापासून पतन, अनेकांचे प्रेम थंड पडणे, शेवटपर्यंत टिकून राहण्याची गरज, सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून सुवार्तेची घोषणा होणे, आणि शेवटी युगाचा अंत. मत्तय २४:२७ मध्ये याचे वर्णन असे केले आहे: “कारण जशी वीज पूर्वेकडून निघून येते आणि पश्चिमेपर्यंतदेखील दिसते, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”

येशूवर प्रीती करणे ही ख्रिस्ती असण्याची दुय्यम पायरी नाही. तर हेच  ख्रिस्ती असणे आहे. आणि पौलासाठी तर येशूवर प्रीती करणे म्हणजे त्याच्या प्रकट होण्यावर प्रीती करणे होय.

ग्रेसने तिच्या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे, हे खरे आहे की यापैकी बहुतेक चिन्हे पहिल्या शतकापासून घडत आहेत,  म्हणूनच येशूने घाबरणे आणि तयार असणे यात फरक केला. त्याने मत्तय २४:६ मध्ये म्हटले आहे, “आणि तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या आवया ऐकाल; तुम्ही घाबरू नये म्हणून जपा, कारण या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु शेवट अजून नाही.” पण मला वाटते की, जर आपण उपहासाने असे म्हणतो की, “ठीक आहे, ही चिन्हे तर नेहमीच घडत आलेली आहेत, त्यांच्यामुळे आपल्या मनात अपेक्षा किंवा तातडीची भावना निर्माण होऊच शकत नाही.” असा विचार करणे म्हणजे प्रभू येशूचा अपमान करण्यासारखे होईल, मला वाटते ही एक घोडचूक आहे.

आध्यात्मिक जागरूकता

जर आपण आध्यात्मिकरीत्या दक्ष राहावे असा प्रभूचा हेतू नसता, तर त्याने या गोष्टी का सांगितल्या असत्या? म्हणूनच तो वारंवार म्हणतो, “जागे राहा,” “तयार राहा,” “लक्ष ठेवा,” “सावध राहा” (मत्तय २४:४२, ४४). ख्रिस्ती लोकांचा मोठा धोका चिन्हांचा विपरीत अर्थ काढण्यात नसून, धुंद आणि मंद होण्यात आहे.  म्हणजे मला म्हणायचे की, आध्यात्मिक, भावनिक, वैयक्तिक जीवनात आम्ही मंद, अंध आणि धुंद होतो त्यामुळे प्रभूचे येणे आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपले, तरी ते आपल्याला दिसणार नाही. हाच खरा धोका आहे.

म्हणून प्रभूच्या येण्याच्या आशेने आपण घाबरून जावे अशी त्याची इच्छा नसून, आम्हाला जागृत ठेवणाऱ्या आध्यात्मिक युद्धांशी निकराने लढा देण्याची तातडीची गरज आहे, ही जाणीव बाळगावी अशी इच्छा आहे.  मुद्दा हा आहे: आपल्याला सतर्क ठेवा, त्याची इच्छा पूर्ण करण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवा, त्यामुळे तो येईल तेव्हा आपण लज्जित होणार नाही.

माझ्या सेवेची आवश्यकता जाणून मी अनेकदा स्वतःला आठवण करून देतो की, “पास्टर जॉन, तू  पूर्ण अंतःकरणाने शिक्षण दे, साक्ष दे, आणि लिखाण कर.” का? कारण मत्तय २४:४६ म्हणते, “त्याचा धनी येतो तेव्हा त्याला तसे करताना जो दास सापडेल तो आशीर्वादित आहे.” हाच तर मुद्दा आहे. तुम्हाला देवाने केलेल्या पाचारणासाठी तुम्ही  तुमचे जीवन ओतत आहात की, केवळ खुशालचेंडूचे जीवन जगून तुमचे आयुष्य वाया घालवत आहात? गौरवाचा प्रभू प्रकट होईल आणि आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रतिफळ देईल याची तुम्हाला पर्वाच नाही का? ही आहे जीवन जगण्याची मूर्ख निवड.

देवाने येशूच्या दुसऱ्या आगमनाचा संबंध भूकंप, दुष्काळ आणि महामारी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींशी, तसेच युद्धे, धर्मत्याग आणि छळ यांच्याशी जोडला आहे. यासाठी की, अशा सामाजिक आणि नैसर्गिक उलथापालथ आणि ख्रिस्ताचे दुसरे येणे यातील संबंध आम्ही पाहावा. म्हणून जेव्हा अशी चिन्हे अधिक तीव्र होताना दिसतात, तेव्हा  घाबरून त्याच्या येण्याचा दिवस आपण ठरवू नये, असे मला वाटते. त्याऐवजी, आपण संयम बाळगून आपल्या आध्यात्मिक जीवनात प्रार्थनाशील आणि जागरूक राहावे,  मनापासून देवाच्या इच्छेने चालावे; विश्वासूपणे आपली सर्व कर्तव्ये पार पाडावी आणि हे सर्व करत असताना प्रभूच्या येण्याची उत्कट इच्छा आपल्यात बळावत राहावी.

Previous Article

मुलांचा नाश करणारी महत्त्वाकांक्षा

You might be interested in …

वचनाचे पाठांतर जीवनाला वास्तवता आणते

जॉन ब्लूम अनेक ख्रिस्ती लोकांसाठी शास्त्रवचनांचे पाठांतर म्हणजे वचनांची केवळ घोकंपट्टी करणे आहे. यामागे त्यांचे अपयश (अनेकदा प्रयत्न करून  वाया गेलेले प्रयत्न) , किंवा व्यर्थता (आता ते कसे सर्व विसरून गेले आहेत), किंवा भीती (लोकांसमोर […]

मला बायबल वाचायला वेळ नाही

सॅम्युएल जेम्स “तू खूप घाई करतोयस. तुझ्याकडून निष्काळजीपणाच्या चुका होत आहेत.” माझे वडील मला तळघरात गणिताचा अभ्यास करताना मदत करत असताना त्यांनी काढलेले हे शब्द मला आजही आठवतात. आमच्यासमोर गणिताची एक चाचणी होती आणि त्यातून […]

त्याने त्याची शेवटची रात्र गाण्यात घालवली

ब्रायन टॅब परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? (स्तोत्र ११८:६) गीतांनी त्याला मरण्यासाठी तयार केले. गुरुवारी, येशूला वधस्तंभावर खिळण्याच्या आदल्या रात्री, त्याने पवित्र भोजन केले आणि त्याच्या मित्रांसह पवित्र गीत […]