ख्रिस्ती नेता हा सेवक – नेता असावा हे मत ख्रिस्ती म्हणवणारे सर्व लोक मान्य करतील. येशूने तर स्पष्टपणे म्हटले: “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्यासारखा असावा” (लूक २२:२५-२६). आता एखाद्या परिस्थितीत सेवक-नेतृत्व कसे असावे याबद्दल नेहमीच सहमत नसते. सांगायचे झाले तर हा सेवक नेता कधी दुसऱ्यांचे पाय धुतो (योहान १३:१-७), तर कधी निषेध करतो (मत्तय १६:२३) आणि शिस्तही लावतो (मत्तय १८:१५-२०). कधीकधी ते स्वखर्चाने सेवा करतात (१ करिंथ ९:७) पण इतर वेळी ते कडक आज्ञा देतात (१ करिंथ ५:२; ११:१६).
गढूळ पाण्यातून चालताना
आपल्यासाठी सुद्धा काही बाबी पाणी गढूळ करतात. सुरुवातच करायची तर, सर्व ख्रिस्ती नेत्यांच्या आत पाप वस्ती करून आहे. याचा अर्थ त्यांनी प्रौढतेची कितीही उंची गाठली तरी ते सदोष सेवक असतील. आणि त्यात या सत्याची भर घाला की येशूला अनुसरणाऱ्या बहुतेक लोकांनी अजून प्रौढतेची उंची गाठलेली नाही. त्यात आणखी या सत्याची भर घाला की निरनिराळे स्वभाव, कला, दाने आणि पाचारण यांचा नेत्याने कशी सेवा करावी आणि अनुयायी ते या नेत्याला कसे पाहतात यावर प्रभाव पडतो. एका सच्च्या नेत्याने प्रामाणिकपणे सेवा करण्याचा केलेला प्रयत्न एखादा सच्चा अनुयायी “वर्चस्व गाजवण्याचा” प्रयत्न म्हणून पाहतो (२ करिंथ १:२४). आणि मग काही लांडगे, स्वत:चा फायदा पाहणारे नेते त्यांच्या अनुयायांना फसवत असतानासुद्धा काही काळ सेवक नेत्याला साजेसे वर्तन करताना दिसतात.
यामुळे एखादा नेता ख्रिस्तासारख्या ह्रदयाने सेवा करत आहे का नाही हे ठरवण्यासाठी उदार, धीराचे व नम्र सामंजस्य लागते. हे साधे काम नाही. सर्व नेत्यांना शोभेल असे एका आकाराचे सेवक नेत्याचे वर्णन नाही. सर्वत्र पसरलेल्या मंडळीमध्ये गरजा आणि संदर्भ विस्तृत आणि निरनिराळे असतात आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारचे नेतृत्व व कृपादानांची गरज असते. आपल्या नेत्याच्या ह्रदयाची योग्यता पारखताना आपण आपली स्वत:ची प्रवृत्ती कल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपली पसंती किंवा अनुदार प्रमाण यावर आपण विसंबून राहू शकत नाही.
सेवक नेत्याची चिन्हे
तरीही नव्या करारात ख्रिस्ती नेत्याची योग्यता आपण काळजीपूर्वक समजून घ्यावी म्हणून आपल्याला सूचना दिल्या आहेत (उदा. १ तीम. ३:१-१३). नेत्यामध्ये कोणते गुण आपण पाहावे की जे सुचवतील की ह्याचा मूलभूत कल ख्रिस्तासारखा सेवक असणे हाच आहे? ही यादी इथेच संपत नाही पण मी इथे पाच दर्शिका देतो.
१. सेवक नेता आपल्या धन्याला गौरव मिळेल हे पाहतो.
त्याचा धनी ही त्याची सेवा, प्रतिष्ठा किंवा त्याचे अनुयायी नसून देव हा त्याचा धनी आहे. येशूने म्हटले, “जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही” (योहान ७:१८). ख्रिस्तासारखा नेता हा ख्रिस्ताचा बंदीवान दास असतो (इफिस ६:६) आणि तो दाखवत राहतो की – समाजाची मान्यता, पद, किंवा आर्थिक सुरक्षा याच्याशी त्याची प्रथम निष्ठा नाही तर ख्रिस्ताशी आहे. यासाठी त्याने शपथ वाहिली आहे व ती तो मोडत नाही (स्तोत्र १५:४).
२. सेवक नेता ज्यांची आपण सेवा करतो त्यांना अत्यंत आनंद देण्यासाठी त्यागपूर्वक प्रयत्न करतो.
हे करण्याद्वारे आपल्या धन्याचा गौरव शोधण्याच्या त्याच्या मार्गात मुळीच संघर्ष होत नाही. येशूने म्हटले, “ जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल…ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे” (मत्तय २०:२६,२८). त्याचा स्वभाव, दानांची विविधता, पात्रता, प्रभावाचे क्षेत्र काहीही असो तो आवश्यक ते त्याग करून लोकांची विश्वासात प्रगती होऊन आनंद वाढवा यासाठी प्रयत्न करीत राहील. यामुळे देवाचा गौरव अधिक मोठ्या प्रमाणात होईल (फिली. १:२५; २:९-११).
३. जर सुवार्ता स्पष्ट करण्यास बाध येत असेल तर तो आपले हक्कही सोडून देण्यास तयार असतो.
पौलाने हे या प्रकारे मांडले: “कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे” (१ करिंथ ९:१९). ह्याचा त्याच्यासाठी काय अर्थ होता? ह्याचा अर्थ काही वेळा त्याने ठराविक प्रकारचे अन्न व पेय वर्ज केले, किंवा ज्यांची सेवा तो करत होता त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली नाही, किंवा स्वत:ला पुरवठा करण्यासाठी स्वत:च्या हातांनी कष्ट केले. किंवा भुकेला राहिला, किंवा चांगले कपडे नव्हते, किंवा त्याला मारहाण करण्यात आली व राहण्यास घर नव्हते किंवा मंडळीत आणि बाहेर त्याची छी: थू करण्यात आली (१ करिंथ ४:११-१३; ९:४-७). आणि त्याने अविवाहित राहण्याचा निश्चय केला (१ करिंथ ९:५). हे सर्व तो हुतात्मा होण्यापूर्वी घडले. पौलाच्या सेवक असण्याच्या प्रमाणाने कमालीची उंची गाठली. पण जर ख्रिस्तासाठी अधिक लोक जिंकायचे असतील तर सर्व सेवक नेत्यांना आपले हक्क सोडून द्यावे लागतील.
४. सेवक नेता स्वत: दिसले जावे किंवा मान्यता मिळावी अशा विचारात गुंतलेला नसतो.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तो स्वत:ला “वराचा मित्र” समजतो (योहान ३:२९). आणि स्वत:ची भूमिका उठून दिसावी अशा विचारांनी तो पछाडलेला नाही. ज्यांची भूमिका कमी दर्जाची आहे ते कमी महत्त्वाचे आहेत असे तो मानत नाही. तसेच अधिक महत्त्वाची भूमिका उठून दिसते म्हणून तो तिचा हव्यास करीत नाही (१ करिंथ १२:१२-२६). आपल्याला मिळालेली भूमिका किती चांगल्या रीतीने करता येईल यासाठी तो मनापासून प्रयत्न करतो. आणि भूमिका देण्याचे काम तो आनंदाने देवावर सोपवतो (योहान ३:२७).
५. सेवक नेता स्वत:चा ऱ्हास व्हावा याची वाट पाहतो व नम्रपणे ती वेळ मान्य करतो.
सर्वच सेवक हे काही मोसमांसाठीच असतात. काहींचे मोसम मोठे तर काहींचे छोटे असतात. काहींचे मुबलक तर काहींचे तुटपुंजे. काहींची नोंद ठेवली जाते व आठवण केली जाते बहुतेकांची नाही. पण सर्व मोसम संपुष्टात येतात. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला आपला मोसम संपला आहे याची जाणीव झाली तेव्हा त्याने म्हटले,
“माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा र्हास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३: २९,३०).
काही वेळा आपला मोसम संपला आहे हे त्या नेत्यालाच प्रथम समजते. काही वेळा इतरांना ते प्रथम समजते. आणि काही वेळा देव त्या नेत्याला त्या वेळी समजणार नाही व अन्यायाचे वाटेल अशा रीतीने त्याचा मोसम संपवतो. पण सेवक नेता नम्रपणे आपली भूमिका ख्रिस्तासाठी सोडून देतो. कारण त्याचा भरवसा व ओळख ही त्याच्या पाचारणामध्ये नाही तर त्याच्या ख्रिस्तामध्ये आहे.
तुमच्या नेत्याशी कनवाळू असा.
जगातील कोणताही ख्रिस्ती नेता ह्या सेवकाच्या पाच मूलभूत चिन्हांचे परिपूर्ण उदाहरण नाही. फक्त येशू हा एकच ते निराळेपण दाखवतो. आपले बहुसंख्य नेते हे अपूर्ण सेवक असून विश्वासू राहण्याचा ते प्रयत्न करतात.
म्हणून आपल्या नेत्यांना आपण काही महान देणग्या देऊ शकतो. १) यापैकी कोणतेही चिन्ह तुम्हाला त्यांच्यात दिसले तर स्पष्टपणे (तोंड उघडून) त्यांना उत्तेजन द्या. २) ते अडखळल्यास आपला शांत धीर दाखवा (तोड आवरणे). ३) प्रश्न उभे करणाऱ्या त्यांच्या निर्णयासाठी उदारपणे न्याय करा आणि नम्रपणे आपले मत सांगा ( जिभेला आवर घालून). आणि त्यांच्याशी बोलण्याचे हेच तीन नियम त्यांच्यासबंधी बोलताना पण लागू पडतात.
जर एखाद्या नेत्याला त्याचा मोसम संपल्याची जाणीव होताना मदत हवी असेल तर त्याच्या विश्वासू मित्रांनी त्याला प्रेमळ, कृपावंत, सौम्य व धीराने उत्तेजन द्यावे आणि गरज असेल तर निषेध करावा.
पण कधी दियत्रफेस (३ योहान ९) प्रमाणे नेत्याचे पापी दुर्गुण हे विनाश करणारे ठरतात. किंवा यहूदाप्रमाणे (लूक ६:१६) ते लांडगे ठरले जातात. अशा वेळी देवभीरू, प्रौढ शिष्यांनी सेवकाप्रमाणे पुढाकार घेऊन कृपावंतपणे निषेध करणे योग्य ठरते (मत्तय १६:२३). आणि कधी त्यांना शिस्तीमध्ये आणण्याची गरज असते (मत्तय १८:१५-२०). बराच काळ निरीक्षण केल्यानंतर ही पाचही चिन्हे जर त्या नेत्यामध्ये दिसत नसतील तर आपण त्या बिंदूला आलो आहे हे समजून घ्यावे.
हे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.
Social