नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का? लेखक : ट्रेवीस मायर्स

गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या क्रमांकावर आहे.

या निदानाने मला व माझ्या पत्नीला एका दृष्टीने हायसे वाटले कारण तीन महिन्यांच्या अनेक चाचण्या, एक्सरे, सुया टोचणे प्रकारानंतर आणि दोन सी टी स्कॅन केल्यानंतर मला किडनीच्या उजव्या बाजूला का दुखते हे आता आम्हाला समजले. तथापि ह्या बातमीमुळे आम्हाला मोठा धक्का बसला.

माझ्या शरीरातील पेशी सैरभैर झाल्या असून मला ठार मारायला त्यांचा कट आहे ही कल्पना घाबरवून टाकणारी होती. माझी नेहमीच कल्पना होती की कॅन्सर दुसऱ्या लोकांना होतो आणि म्हणून मला मोठाच धक्का बसला होता.  मी अनेकदा मला सांगितले होते की मला कॅन्सर कधी होणारच नाही. अर्थातच माझ्या बाजूने हे मूर्ख अनुमान होते.
आमच्या जगाला हादरा बसला होता आणि कॅन्सर ह्या शब्दाने आमची कौटुंबिक पंचवार्षिक योजना संपुष्टात आली. सर्वात कठीण दिवस म्हणजे याचा आमच्यासाठी काय अर्थ आहे हे न समजण्याची जाणीव, रोगाचे संभाव्य पूर्वनिदान न समजणे, माझी केस किती गंभीर आहे हे माहीत नसणे आणि मला जगण्यास दिवस उरलेत की नाहीत हे न समजणे. पहिल्यांदा लिम्फोमा हा शब्द ऐकल्यावर तो कोणत्या प्रकारचा, कोणत्या स्टेजचा आणि यावर उपचार होऊ शकतील का हे फक्त समजण्यासाठी अकरा दिवस लागले.

काळीकुट्ट दरी, थंड सावल्या

ते अकरा दिवस माझ्यासाठी कधीही न अनुभवलेल्या मरणाच्या काळ्याकुट्ट आणि थंड सावल्यांनी भरून गेले होते. दर रात्री उशीवर डोके टेकण्यापूर्वी मी व माझी पत्नी २३ व्या स्तोत्राच्या तरवारीने देवामधील विश्वासाशी झगडत होतो. दिवस संपण्यापूर्वी ती आमची प्रार्थना व कबुली असायची. आमचा दिवस संपताना आम्ही देवाच्या ख्रिस्तामधील चांगुलपणाचा आम्हाला उपदेश करत असू.

ते अकरा दिवस मी स्वत:ची तयारी सर्वात वाईट गोष्टीला तोंड देण्यासाठी करत होतो. डॉक्टरकडून चवथ्या स्टेजच्या कॅन्सरची आणि  संभाव्य “मृत्यूदंडा”ची घोषणा ऐकण्यासाठी. आणि जर तेच निदान असेल तर (१ करिंथ १५: ५५-५७) हा शास्त्रभाग पुन्हापुन्हा म्हणत. या नवीन वास्तवाशी व अनिश्चिततेशी तोंड देताना मी देवाबरोबर पण झगडत होतो.

या अकरा दिवसांच्या काळ्याकुट्ट दरीमध्ये एका पेचाला मला तोंड द्यावे लागत होते ते म्हणजे ख्रिस्त हेच सुख वाटणाऱ्या मी, बरे होण्यासाठी कशी प्रार्थना करायची? नाहीतरी ख्रिस्ती सुखवादी (ख्रिश्चन हिडोनिस्ट) लोक विश्वास ठेवतात की जेव्हा आपण ख्रिस्तातच अत्यंत समाधानी असतो तेव्हा ख्रिस्ताचा सर्वाधिक गौरव होतो. आम्हाला ठाऊक आहे की फिली. १:२१ म्हणते  “जगणे हे ख्रिस्त व मरणे हे लाभ आहे कारण येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे” (फिली. १:२३). बरे होण्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणे म्हणजे पापी देहाला शरण जाणे किंवा देवाच्या गौरवासाठी असलेला माझा पाठलाग सोडून देणे असे नाही का? या जगाच्याबद्दल असलेल्या प्रेमाच्या मूर्तीसाठी मी ख्रिस्तामध्ये असलेला सर्वोच्च आनंद व समाधान टाकून  तर देत नाही ना? नाही. याचे उत्तर फिली. १:२४-२५ मध्येच आहे.

तुमचे कार्य चालूच ठेवा

येशूप्रमाणेच प्रेषित पौलाने फिलीपै येथील मंडळीची सेवा करण्यासाठी जीवन जगण्याचे निवडले. त्यांच्या “विश्वासाचा आनंद व प्रगती” यासाठी त्याने जगत राहण्याचे निवडले. देवाने त्याच्या कृपेने माझ्यामध्ये “ख्रिस्ताचे मन” दिले आहे (फिली.२:५).  आणि माझे येशूमधील भाऊ बहिणी – व  माझी पत्नी- सर्वांना मी बरा व्हावा व माझे  माझे अस्तित्व त्यांच्यामध्ये असत जावे असे वाटते कारण ते “ख्रिस्ताच्या गौरवासाठी” पुरेसे कारण आहे.

हे मला स्तोत्र ६:४-५ मध्ये पण आढळले. “हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार; कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात तुझे उपकारस्मरण कोण करणार?”  येथे दावीदराजा या जीवनात राहून संतांमध्ये देवाचा महिमा व्हावा म्हणून आग्रहाने विनंतीची प्रार्थनेचा नमुना आपल्यापुढे ठेवतो. देवाला आपला करार  ठेवणाऱ्या  प्रेमासाठी (त्याचे निश्चल प्रेम) विनंती करण्यासाठी हे उदाहरण आहे की देवा मला बरे कर. अर्थातच हे वचन ख्रिस्ताच्या मरणाद्वारे पुढे होणारी सुटका, न्यायीकरण, आणि जिवाचे रोगनिवारण याबद्दल आहे. तरीही दाविदाने दिलेले हे उदाहरण दाखवते की अजूनही सुवार्ता न ऐकलेल्या लोकांमध्ये येशू जो आपला राजा त्याची ओळख करून देण्याच्या कार्यासाठी ही चांगली आणि देवाला मान्य अशी इच्छा आहे.

यानंतर काहीही झाले तरी

उपचार चालू असताना जगातील कितीतरी ख्रिस्ती लोक माझ्यासाठी प्रार्थना करीत आहेत ही बाब मला व माझ्या पत्नीला खूपच उत्तेजन देणारी होती. प्रसारमाध्यमांबद्दल देवाला धन्यवाद! यामध्ये काही आमचे प्रभूमधील जिवलग भाऊबहीण होते तर काही जणांशी आमची ओळखही नव्हती. याचा आम्हाला विस्मय वाटला. एकच प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा. ख्रिस्ताचे जागतिक शरीर एकमेकांची काळजी घेते.
त्यांच्या काळजी व प्रीतीद्वारे आम्हाला देवाच्या प्रीतीचा अनुभव आला. जर दुसऱ्या कारणामुळे नाही तरी या प्रकारे गरजू राहून देवाच्या लोकांच्या पुरवठा व प्रार्थनेद्वारे देवाच्या प्रीतीचा अनुभव घेणे किती छान आहे!
अखेरीस आम्हाला आशादायी निदान लाभले. माझ्या प्रकारचा लिम्फोमा ज्याला तज्ज्ञ “बोअरिंग” प्रकारचा म्हणतात; तो खूपच संथपणे वाढतो व त्यामुळे उपचार करायला थोडा सोपा असतो. माझी केस जरी शेवटची स्टेज होती तरी  पाच वर्षे जगण्याचे प्रमाण ७०% होते. डॉक्टरांना खात्री होती की ते माझा कॅन्सर बरा करू शकणार होते.  त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. तरीही मला ठाऊक होते की अखेरीस सर्व प्रभूच्या हातात आहे. उपचार यशस्वी होणार की नाही हे तो ठरवणार होता.

नऊ महिने किमोथेरपी आणि दर महिन्याला रेडीएशन घेतल्यानंतर माझा रोग आता बरा होत आहे. ह्या बिंदूला तरी असे दिसते की देवाने मला बरे करण्याचे निवडले आहे. सर्व उपचार, निरनिराळ्या आश्चर्यकारक वैद्यकीय यंत्रणा, आणि चक्रावून टाकणारे निष्णात डॉक्टर्स यांचा उपयोग करून त्याने त्या गाठींना मारून टाकले आहे. आता त्या मला अपाय करू शकत नाहीत. प्रभूची आम्ही स्तुती करतो.

        लिम्फोमाची देणगी
अर्थातच लिम्फोमातून रोगनिवारण होण्यापेक्षा देवाकडून आम्हाला हे अधिक  हवे होते की ह्या दु:खसहनाच्या आणि अनिश्चित काळात वैद्यकीय परिणाम काहीही घडले तरी देवाने आम्हाला त्याच्या विश्वासात टिकवून ठेवावे. तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू” (स्तोत्र ९०:१४). अशा प्रकारच्या आमच्या देवाला केलेल्या प्रार्थना आम्हाला फार मोलाच्या वाटत असत. त्याने याहून चांगले काम आमच्यामध्ये केले आहे. खरे तर या अग्निपरीक्षेमध्ये देवाने दिलेल्या आमच्या विश्वासाचा “सच्चेपणा” सिध्द केला. त्याने “जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिध्द आहे त्याच्या विश्वासाच्या योगे” आम्हाला “राखले” (१ पेत्र१:३-९; ४:१२).

लिम्फोमा झाल्याच्या अनुभवातून आमचा विश्वास टिकवून व बळकट करून देवाने आम्हाला त्याच्या प्रेमाची व आमच्या त्याच्यावरील प्रेमाची अधिक दृढ खात्री दिली. त्याने आम्हाला तारणाची अधिक दृढ खात्री दिली व देव आमचा जीव व आत्मा सुरक्षित राखतो याची खात्री दिली.

या अनुभवातून देवाने जे काही दिवस मला दिले आहेत व जी शक्ती दिली आहे त्याद्वारे त्याची अधिक सेवा करण्यासाठी  एका नव्या दृष्टीने मी सेवेमध्ये पुन्हा आलो आहे (१ पेत्र ४:११). मला हे माहीत आहे की ख्रिस्तामध्ये माझे दु:खसहन किंवा श्रम हे व्यर्थ नाहीत (१ करिंथ १५:५८).
 

Previous Article

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

नव्या वर्षात पदार्पण करताना…

उच्च डोंगरावर चढ.  यशया ४०:९ प्रत्येक विश्वासी व्यक्तीला जिवंत देवाची तहान हवी आणि देवाचा डोंगर चढून त्याला तोंडोतोंड पहायची आस लागायला हवी.  डोंगराचा कडा आपल्याला साद घालत असताना फक्त दरीच्या धुक्यातच तृप्त राहण्याची गरज नाही. […]

आपला देव ऐकतो

डेव्हिड मथीस जो सर्वसमर्थ, विश्वाचा देव त्याच्याशी बोलण्याचे आपल्याला आमंत्रण आहे. तो केवळ महान समर्थ नव्हे तर सर्वसमर्थ आहे. सर्व सामर्थ्य त्याचे आहे आणि त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे व तुमचे […]

एक प्रसिध्द आणि विसरलेली प्रीती

मार्शल सीगल पौलाच्या पत्रामध्ये दखल घेण्यासारख्या एका सुंदर विवाहाकडे बऱ्याच जणांचे लक्षही जात नाही. ह्या विवाहाने पौलाचे ह्रदय काबीज केले असावे. तो लिहितो, “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या […]